प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण १५ वें. : इतिकर्तव्यता.

उपप्रकरण ९ वें.
आर्थिक उन्नतीचीं अंगें व त्यांची साधना.

गहाणदलाली.- थोडक्यांत सांगावयाचें म्हटलें म्हणजे गहाणाचा व्यापार बराच भानगडीचा असल्यामुळें या धंद्यांत पैशाचा संचय करणारे लोक फारसे पडत नाहींत. यामुळें शेतकर्‍यास थोडक्या व्याजानें पैसे मिळत नाहींत आणि संचय करणार्‍या वर्गास जमीनगहाणाच्या व्यवहारांत शेंकडा सहा व्याज मिळण्यास देखील पंचाईत पडते. दरमहा दरशेंकडा दीड रुपयाप्रमाणें व्यवहार करून देखील पुष्कळ सावकारांस शेंकडा ५।६ टक्के सुटत नाहींत. या परिस्थितीस तोड म्हणून जी गहाणदलाली अमेरिकेंत करतात तिचें स्वरूप येणेंप्रमाणें:-

दलाल किंवा दलाली करणारी कंपनी रक्कम देऊन गहाण घेऊं इच्छिणाराला खालील आश्वासनें देते.

१ ठराविक तारखेस आम्ही तुमचें व्याज पोंचतें करूं आणि मुद्दलाच्या वसुलीसंबंधानें किंवा गहाणजमिनीच्या मालकीसंबंधानें जर कांहीं भानगड उपस्थित झाली तर त्याचा खर्च आम्ही सोसूं.
२ तुम्हांस जर गहाणपत्र विकून टाकावयाचें असेल तर आम्ही तुम्हांस थोड्या खर्चानें बाजारभावाप्रमाणें विकून देऊं.

अर्थात् शेतकर्‍याकडून योग्य वेळेवर वसुली होण्याबद्दल हा गहाणदलाल जामीन असतो. हा गहाणदलाल आपली प्राप्ति निराळ्या ठरावानें शेतकर्‍याकडून वसूल करून घेतो. त्या ठरावांत मुद्दल मिळवून देण्याबद्दल दलालास द्यावयाची रक्कम आणि व्याजाचा दिवस चुकल्यास व दलालास पैसे भरावे लागल्यास शेतकर्‍यानें दलालास द्यावें लागणारें व्याज यांचा उल्लेख असतो. शिवाय ज्या धनकोकडून पैसे घेऊन ऋणको शेतकर्‍यास दलाल पैसे देतो त्या धनकोस तो दोन पत्रकें देतो. एक शेतकर्‍याच्या सहीचें गहाणपत्र आणि दुसरा जमिनीवर मालकी दाखविणारा सरकारी ऑफिसांतून मिळविलेला दाखला.

हिंदुस्थानांत बर्‍याच ठिकाणीं आतां मालकीची माहिती देणारीं सरकारी दप्तरें झालीं आहेत. रेकॉर्ड ऑफ राइट्स (मालकी दाखविणारीं दप्तरें) नुकतींच पूर्णपणें तयार झालीं आहेत आणि या सोईमुळें गहाणदलालीचा धंदा महाराष्ट्रांत जोरानें सुरू झाला तर त्यांत नवल नाहीं. या धंद्याचे परिणाम शेतकर्‍यांत फार दूरवर जातील. त्यांतील एक परिणाम म्हटला म्हणजे शेतकर्‍यांसाठीं काढलेल्या कोऑपरेटिव्ह बँका शेकर्‍यास कमी अवश्य होण्याचा संभव आहे.