प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ७ वें.
हिंदुस्थान आणि चीन, जपान व तिबेट.

तिबेटीवाङ्‌मय.- सातव्या शतकाच्या पूर्वभागांतच तिबेटी ही साहित्यभाषा होऊन बसली होती. रेव्ह. एच्. जस्खे आपल्या तिबेटी-इंग्रजी-कोशाच्या प्रस्तावनेत खालीलप्रमाणें तिबेटीवाङ्‌मयाच्या इतिहासाचा गोषावारा देतोः-

“तिबेटी वाङ्‌मयाची उत्पत्ति व वाढ आणि या भाषेच्या इतिहासांतील ठळक गोष्टी यांचा अभ्यास करणाराला वाङ्‌मयनिर्मितीचे दोन मुख्य काल लक्षांत घ्यावे लागतात. पहिला भाषांतरकाल, याला सर्वोत्कृष्ट काल असेंहि म्हणतां येईल. कारण पारमार्थिक संदेशाच्या पावित्र्यानें तो (संदेश) ज्या भाषास्वरूपांत सांठविला गेला त्या स्वरूपाला पवित्र व उत्कृष्ट अशा शाश्वत लौकिकाची जोड मिळाली. या कालाला सातव्या शतकाच्या पर्वार्धांत सुरवात होते; यावेळीं स्त्रांग्संसंपोचा प्रधान जो थॉन्मी संभोत त्याला संस्कृत शिकण्याकरितां हिंदुस्थानांच पाठविण्यांत आलें. या थॉन्मनें तिबेटी वर्णमाला तयार केली. यामुळें तिबेटी वाङ्‌मयाला दोन अंगांनीं चेतना प्राप्‍त झाली; पुष्कळ शतकेंपर्यंत हिंदुस्थानचें पांडित्य व तिबेटची कल्पकबुद्धि यांनीं उत्साहानें व एकजुटीनें भाषांतराच्या कामीं पूष्कळ मेहनत घेतली. खर्‍या प्रतिभेला द्यावयाचा जो मान, तो तिबेटी व्याकरणाच्या या आद्यप्रवर्तकांनांच दिला पाहिजे. त्यांनां संस्कृतभाषेच्या अलोट संपत्तीशीं व सौष्ठवाशीं झगडावयाचें होतें. त्यांनां आपल्या जन्मभाषेस शास्त्रीय नियमांनीं निश्चित स्वरूप द्यावयाचें होतें व असें करतांना, त्यांनां तिची स्वतंत्रता राखावयाची होती. अशा स्थितींत त्यांनीं मूळांतील अर्थ बरोबर व्यक्त करून मूळांतील शब्द न सोडणारीं अशीं भाषांतरें केलीं हें विशेष कौतुकास्पद आहे. या पहिल्या अध्यापकांनीं त्यांच्या मागाहून येणार्‍या भाषांतरकार शिष्यांकरितां मार्ग फार सुलभ करून ठेविला होता. कारण तिबेटींत भाषांतर केलेल्या ग्रंथांतून व लेखांतून योजलेल्या लेखनपद्धतींत व प्रतिपादिलेल्या विषयांत पुष्कळ सुसंगतपणा दिसून येतो. अर्थात नमुन्यादाखल कांहीं भाषांतरग्रंथ एकदां तयार झाल्यावर पुढें एखाद्या यंत्राप्रमाणें साहित्योत्पादन करणें शक्य झालें.”

भाषांतरग्रंथ निर्माण होऊं लागल्यानंतर बर्‍याच काळानें तिबेटांतील रहिवाशी स्वतंत्र ग्रंथरचना करूं लागले. त्यांनीं अशी ग्रंथरचना करण्यास सुरुवात केली, तेव्हां प्रतिपाद्य विषय म्हणून ऐतिहासिक किंवा पौराणिक विषयच त्यांनीं घेतले होते. या दुसर्‍या कालांतील भाषा जवळ जवळ अर्वाचीन भाषेप्रमाणें असून, मध्यतिबेटच्या सध्यांच्या बोलीशीं तिचें अतिनिकट साम्य आहे.

शरत् चंद्र दासाच्या मतें दुसर्‍या कालाला सुमारें इ. स. १०२५ त सुरवात होते. तो मिलरस्प आणि अतीश इत्यादिकांचा काल होता. शरत् चंद्र इ. स. १०२५ पासून नवी अवस्था सुरू झाली असें धरितो,-

“मगधांतील उदन्तपुरि व विक्रमशील येथील मोठ मोठे बौद्ध मठ यांची लुटालूट व नाश पाहून आणि इ. स. १२०३ त बखत्यार खिलजीच्या सेनापतित्वाखालीं मुसुलमानांनीं केलेलें बंगाल व बिहार या प्रांतांचें आक्रमण अवलोकन करून, याचसुमारास काश्मिरचा पंडित शाक्य श्री तिबेटला परत आला ... ... त्यावेळचे विख्यात लेखक म्हणजे शाक्य पंडित कुंत्राग्यलशन, कुब्लइखान बादशहाचा आचार्य होगोन फग्-प, आणि दण्डीचा ‘काव्यदर्श’ व क्षेमेंद्राचें ‘अवदानकल्पलता’ यांचें छंदोबद्ध तिबेटींत भाषांतर करणारा शोंगटोन लोत्साव हे होत. १५ व्या शतकाच्या सुरवातीस बुतोन-रिन्चेन डबनें तिबेटी वाङ्‌मयाच्या एका नवीन कालास सुरुवात केली; आणि बुद्धधर्माला फगमोदू राजांच्या कारकीर्दींत नवीन चोदना मिळाली. यावेळीं तिबेटी पंडीत चीनच्या मिंग बादशहांच्या आश्रयाखालीं चिनी वाङ्‌मयाचा जारीनें अभ्यास करीत होते. याच कालांत याला दा-नाइंग (प्राचीन वर्णविचार)चा काल असें म्हणतात-तिबेटच्या महनीय देशी वाङ्‌मयाचा प्रादुर्भाव झाला. विद्वान् लोत्साव, सांग्सप, बुतोन, ग्यल्वा ङगपा, लामा तारानाथ, देस्त्री, संग्ये ग्यत्शोवसुंप खंपो यांसारखे पंडित उदयास आले. हा गेलु-गपाचा म्हणजे सांग्सपानें स्थापलेल्या बौद्धसंप्रदायांतील पीत शिरस्त्रणशाखेचा काल होता; गहदन हें या शाखेचें प्रमुख स्थान होय.

तिसर्‍या कालास १८ व्या शतकाच्या पहिल्या पादांत सुरवात होते. त्यावेळीं तिबेटवर चिनी सत्ता पूर्ण प्रस्थापित झाली होती व गुशीखानच्या घराण्यांतील शेवटला तार्तर राजा, जुनगर तार्तरांच्या सेनापतीकडून मारला गेला ही गोष्ट, आतांपर्यंत गेलुग-पा मठाचा एक क्षुल्लक धर्माधिकारी असलेल्या दलाइ लामाच्या हातीं तिबेटचें स्वामित्व स्वाधीन करण्याच्या कामी कारणीभूत झाली. या तिसर्‍या कालांत पवित्र बोधसत्वाच्या सुखप्रद सत्तेखालीं तिबेटनें अनुपम शांतता उपभोगिली आहे आणि त्याची भाषा उत्तर आशियाची सामान्यभाषा बनलेली आहे.”