प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ७ वें.
हिंदुस्थान आणि चीन, जपान व तिबेट.

तिबेटी लोक.- तिबेटी लोकांच्या तीन जाती आहेतः बोदपा, होरपा आणि डोकपा. बोदपा हे उत्तरेकडील चंग्पा लोक होत, होरपा तुर्कजातीचे आहेत; व डोकपा हे तंबूतून राहणारे गोपाल आहेत,  यांनां द्रुप असेंहि नांव आहे. हे नद्या व सरोवरें असणार्‍या प्रदेशांतून वास करितात. डोकपाखेरीज या तिबेटी लोकांची एक दर्‍याखोर्‍यांतून राहणारी स्थायिक व बैठी जात आहे.

तिबेटी पुरुष साधारण उंचीचे (५फु. ५-९ इं,) असून, बायका यापेक्षांहि ठेंगण्या असतात. यांचें केंस काळेभोर व कांहींसे कुरुळे असतात. गालांची हाडें मंगोल लोकांइतकीं उंच नसलीं तरी साधारण उंच असतात. जबडा रुंद असून ओंठ भरदार नसतात. खांदे मोठे व रुंद, दंड गोल, पण पाय मात्र बारीक असतात. बायका बहुधा पुरुषांपेक्षां सुदृढ असतात. त्यांचे केंस पुष्कळ असल्यामुळें डोकें पांटीएवढें दिसतें;  गालांवर काळ्या रंगाचें रोगण चढविलेलें असतें त्यामुळें त्यांच्या चेहेर्‍यावरील कातडीचें हवेपासून रक्षण होतें व वरील रोगण धुवून टाकलें म्हणजे खालील तजेलेदार कातडी दिसूं लागते. तिबेटी लोक साधारण पिंगट वर्णाचे असतात. हे कपड्याशिवाय राहिले तरी त्यापासून त्यांनां कांहीं बाधा होत नाहीं. यांची वस्त्रें केंसाळ असतात. हे याक-तंबूंतून {kosh याक नांवाच्या रानटी तिबेटी बैलाच्या कातड्याच्या तंब करितात त्याला याक तंबू करितात त्याला याक तंबू म्हणतात.}*{/kosh} किंवा  विशेषतः दक्षिणेकडे धाब्याच्या घरांतुन राहतात. यांचें खाणेंपिणें बेताबातचेंच असतें. हे लोक फार मोकळ्या मनाचे असतात.

या लोकांत ‘ग्युद’ म्हणजे गोत्रें असतात. यांच्यांत सपिंडकुलपद्धत असून एकाकरितां सर्व कुलाला शिक्षा भोगावी लागते. यांच्यांत एकत्र कुटुंबपद्धति आहे. वडील मुलाकडे बापाची मालमत्ता जात व इतर मुलांनां त्याच्या आज्ञेंत राहून तो देईल तितकी पोटगी स्वीकारावी लागते. या लोकांच्या चालींपैकीं सर्वांत विलक्षण चाल म्हणजे अनेकभर्तृकता. सर्व भावांत मिळून एक बायको असते. लहान भांवांनां लग्नें करतां येत नाहींत वडील भावानेच फक्त त्याला वाटेल तितक्या बायका कराव्या. तथापि धनगर जातींतून एकपत्‍नीकत्व आढळून येतें. यांच्यांत असगोत्र विवाहाची पद्धत आहे. घटस्फोटाची चाल नाहीं तरी बायको टाकतां येते. संतति नसलेल्या विधवेला दिराजवळ बायको या नात्यानें राहतां येतें किंवा नवर्‍याच्या मृत्यूपूर्वीं तसें जाहिर केल्यास तिला स्वतंत्रताहि मिळूं शकते. नियोगपद्धति यांच्यांत आढळते. अविवाहित स्त्रिया दारूचीं किंवा इतर दुकानें घालतात, कांहीं भिक्षुणी होतात व कांहीं वेश्येचा धंदा करितात.

सईघराण्याच्या बखरींतून पर्व तिबेटामधल्या तुकुहन लोकांविषयीं खालील वर्णन आहेः-

यांच्या बायका केंसाचीं वेणी घालून त्यावंर शिंपा, मणी किंवा कवड्या बांधतात. बाप वारल्यानंतर मुलगा त्याच्या बायकोशीं-आपल्या आईशीं-लग्न लावतो; भाऊ आपल्या भावजईशीं लग्न करितो. उत्तरक्रिया होईपावेतों यांच्यांत सुतक धरितात. घोडे चोरण्याबद्दल देहांत शिक्षा असते. या लोकांच्या चालीरीती तुर्कांप्रमाणें आहेत.

यांपैंकीं वानरांप्रमाणें इतस्ततः भटकणारी तंगसिआंग नांवाची एक जात आहे.ते केंसांच्या याक तंबूंत राहतात. हे लोक घोड्यावर बसून जातात व तरवारीचा उपयोग करितात. पण त्यांत पद्धतशीरपणा आढळत नाहीं. मुलानें मृत बापाच्या किंवा चुलत्याच्या बोयकोशीं, धाकट्या भावानें वडील भावजयीशीं लग्न लावलेलें चालतें;  पण एकच आडनांव असलेल्या बाईशीं लग्न लावतां येत नाहीं.

नुकुओ हें स्त्रीराज्य असून तें सिंगलिंग पर्वतांच्या दक्षिणेस आहे. तेथें सु पी घराण्यांतील राणी राज्य करते. तिच्या पतीला चिंत्सु असें म्हणतात पण राज्यकारभाराशीं त्याचा संबंध येत नाहीं. लढाईला मात्र पुरुष जातात, बाकी त्यांनां कोठें मान नाहीं. या राज्यांत १०००० कुटुंबें आहेत. राणी नऊ मजल्याच्या वाड्यांत राहते; तिच्या तैनातीस हजारों स्त्रिया असतात. हिच्या खेरीज दुसरी एक छोटी राणीहि असते. दर पांचव्या दिवशीं मुख्य राजकार्यसभा भरते. या राज्यांत ठराविक कर नाहींत. जेव्हां राणी मृत्यू पावते तेव्हां तिच्याच कुळांती दोन बायका, एक राणी व दुसरी छोटी राणी, अशा निवडतात.

श्रीमान् मनुष्य मृत्यू पावल्यास, त्याचें कातडें सोलून, आंतील भाग सोन्याबरोबर एका भांड्यांत भरतात व तें पुरतात. नंतर एक वर्षानें तें कातडेंहि पुरतात.

हे लोक देव व असुर यांची प्रार्थना करितात. पाडव्याच्या दिवशीं मनुष्य किंवा माकडें यांचा यज्ञ करितात. पक्षांवरून शुभाशुभ पाहतात. पूर्वेकडे, चिआंगच्या भागांत, सुफा ला ना चुचुलो म्हणून एक स्त्रीराज्य आहे. यांत ८० शहरें असून ४०,००० कुटुंबें व १०,००० सैन्य आहे. येथील राणी कंग्येन खोर्‍यांत रहाते. हिला पिन् चिन् व अधिकार्‍यांनां कौपली अशीं नांवें आहेत. पुरुष स्त्रियांचे प्रतिनिधी या नात्यानें अधिकारावर असतात. राणीच्या तैनातीस बर्‍याच स्त्रिया असतात. दर पांचव्या दिवशीं राणीचा दरबार भरतो.

मुलगा आईच्या कुळाचें नांव धारण करितो. या प्रदेशांत सोनें सांपडतें. लग्नें खेरेदीविक्रीच्या पद्धतीनें होत असतात. सुतक तीन दिवस धरतात.