प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण ७ वें.
हिंदुस्थान आणि चीन, जपान व तिबेट.
जपान.- जपानांतील वाङ्मयास, विचारास, चित्रकलेस आणि आचारनियमनास भारतीय संस्कृतीचें आवेष्टन कारण झालें. हें आवेष्टन कोणत्या प्रकारानें जपानच्या अंगावर बसलें याची थोडक्यांत कल्पना देतों. जपानांत लहान थोर भौतिक शक्तींची उपासना असे. तारे, आकाश, चन्द्र, वादळ, पाऊस, वीज, जननेंद्रिय हीं सर्व पूज्य होतीं; दुसरींहि अनेक दैवतें देशांत उत्पन्न झालीं होतीं. त्या दैवतांत कांहीं पितृगणांचा म्हणजे गतकालीन थोर पुरुषांचा देखील समावेश झाला होता आणि या दैवतांस धान्य, मध, आणि प्रसंगीं घोडा, तलवार व बायको हीं देखील समर्पण होत असत. या मूळ स्वरूपास चालन दोन गोष्टींनीं मिळालें. एक गोष्ट म्हणजे तेथें झालेला चिनी वाङ्मयाचा व कल्पनांचा प्रवेश ही होय, आणि दुसरी गोष्ट म्हटली म्हणजे भारतीय संस्कृतीचा व बौद्ध संप्रदायाचा प्रसार ही होय. हा प्रसार विशेषतः कोरियामार्फत झाला {kosh टीप - जपानमध्यें बौद्धसंप्रदायाचा प्रवेश कोरियामार्फत झाला व त्याचबरोबर चिनीसंस्कृतीचाहि प्रवेश झाला. भारतीय संस्कृतीचाहि कांहीं परिणाम जपानवर व जपानी नाटकांवर झालेला आहे पण तो फारसा प्रत्यक्ष नसून बौद्धसंप्रदायामार्फत झालेला आहे. जपानी नाटकांवर बौद्धधर्माचा बराच परिणाम झालेला दिसतो. किंबहुना त्यांच्या धार्मिक नाटकांचा आरंभ बौद्धसंप्रदायाच्या प्रवेशापासूनच व त्यांतील सांप्रदायिक उत्सवांपासूनच झाला आहे असें म्हणावयास हरकत नाहीं. Theatre au Japon-Annales du Musee Guimet Vol. XXX.}*{/kosh} तथापि भारतीयांचा तेथें प्रवेश झालानसेलच असें म्हणतां येत नाहीं. जपानमध्यें भारतीयांचा प्रवेश झाला असावा असा संशय येण्यास दोन कारणें आहेत. एक कारण म्हटलें म्हणजे जपानी मातृकारजनेंत आपल्या बाराखडीप्रमाणें व्यंजनांचे पांच विकार आढळून येतात ही गोष्ट होय. उदाहरणार्थ गचे, गा, गी, गू, गे गो असे विकार जपानींत दृष्टीस पडतात, शिवाय जपानांतील कांहीं मूर्तींचे तोंडवळे जपानी स्वरूपाचे नसून भारतीय स्वरूपाचे आहेत ही गोष्ट देखील लक्षांत ठेवण्यासारखी आहे. तथापि हें कबूल केलें पाहिजें कीं, भारतीय संस्कृति चिनी संस्कृतीच्या प्रवाहाबरोबरच जपानांत शिरली, आणि चिनी संस्कृतीचा परिणाम त्यांच्या वाङ्मयावर जो झाला तोच जपानचें आपणाशीं सादृश्य जुळविण्यास कारण झाला. मोठमोठीं देवालयें आणि देवालयांत असलेले प्रचंड नगारे, मोठामोठाल्या घंटा, यांचें जपानांतील अस्तित्व जपानी लोकांचें आपणाशीं सादृश्य असल्याचें बोधक आहे. नवीन बौद्धसंप्रदायानें जुनीं उपास्यें मारून टाकलीं नाहींत तर तीं दैवतें बुद्धाचेच अवतार आहेत असा लोकांस उपदेश केला. लोकांस त्या वेळेस आपण कांहीं परकीय संस्कृति घेत आहोंत असा भासच झाला नाहीं, तर आपण जुन्याच उपास्यांस कां मानावें हें सांगणारें नवीन तत्त्वज्ञान आपणांस मिळालें असें त्यांस वाटलें.
जपानमध्यें भारतीय संस्कृतीची छाप कांहीं अंशीं चीनपेक्षां अधिक पडली. बौद्धसंप्रदाय मांसनिवृत्तिकारक नाहीं असें असून अर्वाचीन काळाचा परिणाम होण्यापूर्वीं मांसनिवृत्ति बर्यात प्रमाणानें जपानांत शिरली हें बौद्धसंप्रदायाच्या अनुषंगानें गेलेल्या भारतीय संस्कृतीचें फल होय. चीनमध्यें विद्वानांचा दर्जा फार मोठा होता व युद्ध करणार्या शिपायाचा सामाजिक दर्जा कनिष्ठ प्रतीचा होता. उलटपक्षीं जपानांतील सामुराईंचा दर्जा उच्च प्रकारचा होता आणि तेथील क्षत्रियधर्मविषयक विचार “बुशिडो” या नांवाखालीं बरेच प्रगल्भ झाले होते. शिवाय चीनमध्यें चित्रलिपीच आजपर्यंत कायम राहिली आहे, मातृकालिपी शिरलेली नाहीं. उलट जपानांत बाहाखडीप्रमाणें का, की, कु, के, को अशीं निरनिराळीं स्वरव्यंजनांची युग्में लोकांस परिचित होऊन त्यांचा लिपीवर परिणाम झाला. पारमार्थिक संप्रदाय आणि राष्ट्रीय संस्कार यांचें भिन्नत्व ज्याप्रमाणें आपल्यामध्यें आहे त्याप्रमाणें त्यांच्यातहि स्थापन झालें. ब्राह्मणाची पदवी पारमार्थिक मार्गदर्शक या नात्यानें फारशी महत्त्वाची नाहीं, तथापि व्यक्तींस संस्कार करणारा आणि धर्मशास्त्र म्हणजे कायदा सांगणारा या नात्यानें ब्राह्मणाचें कर्तव्य महत्त्वाचें आहे. “शिंतो”च्या आचार्यांचें स्वरूप यासारखेंच आहे. हे आचार्य केवळ संस्कर्ते आहेत आणि शिंतो म्हणजे केवळ राष्ट्रीय म्हणजे राजकीय स्वरूपाचे विधी आहेत असें जपानच्या सरकारनें प्रसिद्धहि केलें आहे.
जपानमध्यें कांहीं संस्कृत ग्रंथहि आहेत हें आपणांस “जपानांतील संस्कृत ग्रंथांसंबंधानें चार शब्द” अशा मथळ्याच्या एका फ्रेंच भाषेंत असलेल्या लेखावरून समजतें. {kosh L. de Milloue’ Report of the 6 th International Congress of Orientalists. Leide 1885.}*{/kosh} या बाबतींत जास्त संशोधन झाल्यास भारतीयांच्या जपानमधील कार्यावर अधिक प्रकाश पडेल.