प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ७ वें.
हिंदुस्थान आणि चीन, जपान व तिबेट.

तिबेट.- तिबेटावर जो भारतीय संस्कृतीचा परिणाम झाला त्यांत आपणास खालील थर दिसून येतात. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हटली म्हणजे तिबेटमध्यें जी विचारपद्धति गेली ती महायान होती आणि त्यामुळें या मताबरोबरच अनेक शास्त्रेंहि गेलीं. महायानाबरोबर प्रथमतः तंत्रशास्त्र मिसळून तिबेटांतील अनेक मतें निर्माण झालीं. हिंदुस्थानांतील जीं शास्त्रें तेथें गेलीं त्यांत मातृकाज्ञान, वैद्यक, न्यायशास्त्र, शिल्पशास्त्र, धर्मशास्त्र आणि परमार्थविषयक तत्त्वज्ञान यांचा प्रवेश महायानाबरोबर म्हणजे पंडिती बौद्ध संप्रदायाबरोबर झाला. आज या शास्त्रांचें ज्ञान मात्र येथें फारसें नाहीं असें कावागुची † म्हणतो.

तिबेटामध्यें समाजस्थिति हिंदुस्थानसारखीच दिसते. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या प्रकारचे तीन वर्ण तेथें आहेत. ब्राह्मणांचें स्थान तेथील बोनबो नांवाच्या वर्गानें घेतलें आहे. जेव्हां नवीन पारमार्थिक विचारसंप्रदाय आणि त्याचें भिक्षुमंडळ निर्माण होतें किंवा विशेषेंकरून परक्या ठिकाणाहून येतें तेव्हां परंपरागत आचार्य हे केवळ संस्कारकर्ते होतात ही गोष्ट जशी हिंदुस्थानांतील ब्राह्मणांच्या उदाहरणावरून जपानांतील ‘शेन् ताओ’ उर्फ ‘शिन्तो’ च्या आचार्यांच्या स्थितीवरून सिद्ध होते तशी बोनबो यांच्या तिबेटांतील स्थानावरूनहि सिद्ध होते.

तिबेटमध्यें लग्नें लावणें वगैरे संस्कार हे बोनबो करितात आणि पारमार्थिक उपदेश लामा करितात. तेथें विदुरांसारखा वर्ग आहे. तेथें विटाळाची कल्पना आहे. हे लोक अत्यंत घामट व घाणेरडे जरी आहेत तरी हलक्या जातीच्या मनुष्याच्या ओष्ठस्पर्शानें त्यांचा चहाचा चमस विटाळतो.

भरतखंडांत ज्याप्रमाणें ६० संवत्सरांचें वर्षचक्र आहे त्याप्रमाणें तिबेटांतील कालगणनेतहि ६० वर्षांचें वर्षचक्र आहे. तिबेटमधील कालगणनेंतहि ६० वर्षांचें वर्षचक्र आहे. तिबेटमधील कालगणनापद्धति व भारतीय कालगणनापद्धति यांमध्यें विलक्षण साम्य आहे असें एम्. पी. पेलियट यानें आपल्या एका लेखांत दाखविलें आहे. {kosh Journal Asiatique. 1913.}*{/kosh}

तिबेट येथील शिक्षणपद्धति आणि हिंदुस्थानांतील न्यायमीमांसकांची जुनी शिक्षणपद्धति यांमध्यें बरेंच साम्य आहे. त्याचें कावागुचीनें येणेंप्रमाणें वर्णन केलें आहे.

दरसान मोन्लोम उत्सवाच्या प्रसंगीं तीन्ही मठांतील विद्यार्थी मिळून फक्त १६ उमेदवारांस ल्हारंवा म्हणजे विशिष्ट पंडित अशी पदवी देतात. तिबेटांतील अत्यंत उच्च पदवी हीच. परीक्षा तोंडीं असते. परीक्षकमंडळ मोठ्या कसोशीनें परीक्षा घेतें. विद्यार्थ्यांचा २० वर्षांचा अभ्यासक्रम पुरा झालेला असतो. परीक्षेंत कोट्या आणि मोठे सूक्ष्म वादविवाद होतात. या वादविवादांच्या प्रसंगीं जी सूक्ष्मता कावगुचीनें पाहिली, तशी त्यानें इतरत्र कोठेंहि पाहिली नाहीं. वादविवादांत परिक्षक विद्यार्थ्यांस पकडूं पाहतात आणि परीक्षेस बसलेला उमेदवार त्यांच्या पकडींतून निसटून त्यांसच पकडूं पाहतो. ही परीक्षा नसून हें व्याघ्रसिंहाचें युद्धच आहे असें कावागुचीस वाटलें.

ल्हारंबाच्या खालोखाल पदवी म्हटली म्हणजे सोरंभा होय. या पदवीसाठीं १६ उमेदवार सर्व मठ मिळून पाठविले जातात आणि कोएन्जोच्या उत्सवप्रसंगीं ही परीक्षा घेतली जाते. याच्या खालोखालच्या पदव्या म्हटल्या म्हणजे डोरंबा आणि रिमशी अशा आहेत. डोरंबा ही पदवी असलेले लोक सुद्धां जाडे विद्वान असतात. पण रिसशी ही पदवी अतिशय सामान्य शिक्षणाची निदर्शक होय. रिबोट किंवा गांडेल येथें ५।६ वर्षें घालविलीं, आणि कांहीं पैसे भरले म्हणजे ही पदवी वाटेल त्यास मिळते. तिबेटमध्यें बौद्धग्रंथ साकल्यानें जाणणारे पंडित जपानपेक्षां अधिक आहेत, असें कावागुची म्हणतो. तिबेटांतील बोनधर्म अत्यंत जुना म्हणून सांगितला तो नवीन होऊन त्यास बौद्धरूप आलें आहे. तिबेटांत मुसुलमानहि आहेत. त्यांची संख्या थोडी आहे. जे मुसुलमान आहेत ते काश्मिरी व चिनी मुसुलमानांचे वंशज आहेत. त्यांच्या जातिपरत्वें ल्हासा येथें दोन मशिदी आहेत. ते आपल्या मतांस मोठ्या भक्तीनें चिकटून राहतात. मात्र त्यांचा पुनर्जन्मावर विश्वास आहे. बौद्धांच्या व त्यांच्या समजुतींत फरक एवढाच कीं, बौद्धांच्या मतें मनुष्य पुन्हां खालच्या योनींत जन्मास येऊं शकतो पण मुसुलमानांच्या मतांप्रमाणें मनुष्य पुन्हा नीच योनींत जात
नाहीं. {kosh या मुसुलमानांपासूनच सध्यांच्या थिआसफिस्टांनीं नवीन बनविलेली पुनर्जन्माची विचारपद्धति घेतली नसेल ना ? कां कीं यूरोपांत मनुष्येतर प्राण्यांत “सोल” नांवाचा जिन्नस नसतो आणि तो मनुष्यांतच असतो अशा समजुतीशीं मिळतें करून घेण्यासाठीं पुनर्जन्मविषयक हिंदुकल्पना जराशी बदलून यूरोपांत या मताचे प्रवर्तक मांडतात. त्यांनीं ‘ट्रान्समायग्रेशन आफ् सोल’ हे शब्द आतां टाकून ‘रि-इन्कार्नेशन’ हा शब्द वापरण्यास सुरुवात केली आहे. नीचयोनीपासून जीवाचें “एव्होल्यूशन” होत होत त्यास नरदेह मिळाला म्हणजे त्याला “सोल” प्राप्‍त होतो. तो एकदां मिळाला म्हणजे पुन्हा नाहींसाच होत नाहीं. कां कीं जीवाचें एव्होल्यूशन सारखें चालू राहिलें पाहिजे असें त्यांचें म्हणणें आहे. ब्लाव्हाटस्कीचे महात्मे तिबेटांत होते असें ती सांगत होतीच}*{/kosh} पुनर्जन्माचा सिद्धांत कुराणांत नाहीं असें जरी तेथील मुसुलमानांस सांगितलें तरी तो आहे असें ते म्हणतात.

तिबेटी बौद्धांमध्यें कर्मवाद आहे, आणि मोक्ष स्वकर्मानें मिळवितां येतो ही गोष्ट प्रत्येकाच्या मनावर ठसली आहे. बौद्धसंप्रदायाचा प्रभाव येथें इतक्या जोराचा आहे कीं दुसरा कोणताहि संप्रदाय येथें पसरणें शक्य नाहीं. कांहीं लोकांस आपण ख्रस्ति केलें म्हणून ख्रिस्ती मिशनरी गर्व मानतात तथापि जे तिबेटी ख्रिस्ती झाले आहेत त्यांपैकीं बहुतेक सर्व लोक सिक्किमी असून आपणांस तिबेटी म्हणवून घेणारे आहेत. शिवाय ही मंडळी उघडपणें बायबल घेऊन चर्चमध्यें जातील पण चोरून बुद्धाच्या मूर्तीची पूजा करून धूप जाळतील अशांतली आहे.

येथपर्यंत वाचकांस तिबेटी लोकांबद्दल सामान्य माहिती दिली यापेक्षां थोडी विस्तृत माहिती द्यावयाची म्हणजे प्रथम तेथील भाषा व वाङ्‌मय यांशीं थोडासा परिचय करून देऊन नंतर तेथील समाजस्थिति, परमार्थसाधन इत्यादि माहिती देऊं.