प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण ७ वें.
हिंदुस्थान आणि चीन, जपान व तिबेट.
तिबेटी अथवा भोतिया. - तिबेटी भाषा {kosh Grierson-Linguistic Survey of India Vol, III Part I.}*{/kosh} तिबेट व त्याच्या शेजारचे भारतांतील जिल्ह यांतून चालते. तिबेट या नांवाची उपपत्ति चांगलीशी लागली नाहीं. तिबेटी लोक आपल्या देशाला बोद-युल आणि आपल्या भाषेला बोद-स्कद असें संबोधितात. मध्य तिबेटांत या बोद-स्कदचा उच्चार भो-क असा करितात. तिबेटी मनुष्याला बोद-प असें नांव आहे व याचा भारतीयांनीं भौत्त, भोतिया असा अपभ्रंश केलेला आहे. भारतीय लोक भारत व तिबेट यांच्या सरहद्दींवर राहणार्या तिबेटी लोकांनां ‘भोतिया’ असें नांव देतात व खुद्द तिबेटच्या रहिवाशांनां हूनिय व देशाला हूनदेस् असें संबोधितात. यांच्या भाषेला पुष्कळ नांवें सुचविलीं गेलीं आहेत. पण तिबेटी हेंच नांव त्या सर्वांत विशेष प्रसिद्ध आणि सर्वमान्य आहे.
बाल्तिस्तान आणि लडख यांसह सर्व तिबेटभर तिबेटीच्या निरनिराळ्या पोटभाषा चालतात.श्रीनगरहून द्रसकडे जाणार्या हमरस्त्यावर असलेली झोजिलाची वाट आर्य आणि तिबेट वस्ती यांमधील नृवंशविभाजक स्थळ आहे असें यथार्थ म्हणतां येईल. या स्थळापासून पूर्वेकडे लहौल, स्पिति, कुनावर, गढवाल, नेपाळ, सिक्किम आणि भूतान, या उत्तरेकडील प्रदेशांचच समावेश करून एक वांकडीतिकडी रेषा काढली असतां या विभाजक रेषेच्या तिबेटी बाजूचा भाग तो तिबेटी बोलणारा भाग होय. यावरून तिबेटी ही मुख्यतः हिंदुस्थानाला परकीय अशी भाषा आहे हें उघड होते. ही हिंदुस्थानच्या सरहद्दीवरील जिल्ह्यांतून वस्तीस राहिलेल्या विदेशीय लोकांत मात्र चालते. पूर्वेकडे हिजा प्रसार चीनमधल्या स्सेचुअन प्रांतापर्यंत झालेला आहे.