प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण ७ वें.
हिंदुस्थान आणि चीन, जपान व तिबेट.
परमार्थसंप्रदाय.- तिबेटांतील बौद्धसंप्रदाय भारतीय बौद्धसंप्रदायाच्या महायानशाखेप्रमाणेंच जवळ जवळ आहे. त्यांचा मुख्य देव संग्ये हा आहे. इतर पुष्कळ लहान लहान देव भारतीय पुराणांवरून घेतलेले आहेत. आध्यात्मिक विचारपरंपरेमध्यें त्यांनीं भारतीयांचें बरेंच अनुकरण केलेलें दिसतें. कांहीं किरकोळ बाबतींत काय तो फरक आढळतो बाकी कर्मवाद, पुनर्जन्म, भोग्यवस्तूंचा त्याग, अद्वैत इत्यादि बाबतींत त्यांचें भारतीयांशीं ऐकमत्य आहे.
देवांच्या मूर्ती, मंत्रतंत्र, अगडबंब विधि या लोकांतहि आहेत. कांहीं ख्रिस्ती पाद्य्रांस कांहीं विधी ख्रिस्ती भक्तिमार्गांतले असावेत व ते मध्ययुगांतील चीन व मंगोलियामध्यें राहणार्या
नेस्टोरियन ख्रिस्ती मिशनर्यांमार्फत आले असावेत असा तर्क करण्याची स्फूर्ति झाली होती पण ख्रिस्ती धर्मांतून घेतलेल्या म्हणून समजल्या जाणार्या पुष्कळ गोष्टी, भरतखंडांतील पारमार्थिक संप्रदायांतून घेतल्या आहेत असें पुढें त्यांसच आढळून आलें.
तिबेटी लोक हजारों देवळें बांधतात, व मूर्ती स्थापन करितात. ते प्रार्थनामंत्र गातात, पुटपुटतात व पाण्याच्या शक्तीनें किंवा हातानें मंत्र लिहिलेलीं चक्रें फिरवितात. आपल्याकडे जशी जपमाळ असते तशीं त्यांच्याकडे चक्रें असतात. ते अक्षमाला जपतात, पवित्र संस्कार करितात, देवदैत्यांप्रीत्यर्थ जेवणें घालतात, गंडेनाडे बांधतात, ताईत बनवितात, शुभ चिन्हें काढलेल्या पताका उभारतात, दगडावर अक्षरें लिहून त्यांचे ढीग रचतातच पर्वत, सरोवरें, देवळें , दगडांचे ढीग वगैर वस्तू ते पवित्र मानतात व असल्या वस्तूंनां ते प्रदक्षिणा घालतात; मिरवणुकी काढतात, यात्रेला जातात, लामांनीं पवित्र अवशेषांपासून तयार केलेल्या गोळ्या पापविनाशार्थ भक्षण करितात, माणसाचें मांस वगैरे दाहा अपवित्र गोष्टींपासून तयार केलेलें दुदचि नांवाचें दिव्य पाणी पितात; भूतपसारण, चेटूक, जादूटोणा या गोष्टी ‘पारमार्थिक’ कल्याणाकरितां आचरतात; गूढ संप्रदाय पाळतातं व सैतानाला हांकून लावण्यासाठीं वेड लागल्याप्रमाणें नाचतात.
मृताच्या आत्म्याला त्याची परलोकीं जाण्याची वाट लामा दाखवितात. नोमाड लोक एखाद्यानें मरणापूर्वीं त्याला विचारलेल्या प्रश्नास मरणोत्तर परत येण्याची आपली इच्छा आहे असें उत्तर दिल्यास त्याला श्वास कोंडून मारतात. मेल्यावर त्याच्या प्रीत्यर्थ एक जेवण घालतात, नंतर त्याची एक लांकडी प्रतिमा करून ४९ दिवस त्या प्रतिमेला जेऊं घालतात. (ही चाल ७ व्या शतकांतली आहे) पुढें ती प्रतिमा जाळून तिची राख मातीतं मिसळून त्या मातीच्या शंक्काकार आकृती तयार करितात व त्या देव्हार्यांत ठेवतात. एक वर्षानंतर मृताच्या स्मरणार्थ उत्सव करितात; व पुढें दरवर्षीं त्याच्या नांवानें तर्पण करितात. तिबेटी लोक पूर्वजांनां देवांच्या नांवांनीं संबोधितात.
स्पमो हीं प्राचीन राजपत्न्यांचीं भुतें होत. दद हीं फार भंयकर पिशाच्चे असून बौद्ध संप्रदायाला उपद्रव करणार्या प्राचीन लोकांची तीं पिशाच्चें आहेत अशी त्यांची कल्पना आहे. पण बौद्धसंप्रदायापूर्वींच्या संप्रदायांतील या देवता आहेत, कारण पशुयज्ञ निषिद्ध मानला आहे तरी यांनां डुकरांचे बळी देण्यांत येतात.
कुलदेवतांनां घरांतून प्रमुख स्थान देण्यांत येतें. रोज सकाळीं त्यांनां दूध, दारू व पाणी देतात. त्यांच्या पुढें दिवे लावतात. सुरू (ज्युनिपर) या पवित्र झाडाची फांदी (समिध) अग्नींत टाकून तो प्रदीप्त करितात. रात्रीं पुन्हां एकदां एक फांदी पेटवून, संबंध घरभर फिरवीतात; उद्देश असा कीं, भुतेंखेतें वगैरे नाहींशीं व्हावींत.
पार्थिव देवता पृथ्वीमातेच्या खालील दर्जाच्या, व स्वर्गीय देवता नम्हकर्पोच्या खालच्या असें मानण्यांत येतें.
ज्यांची कुलदैवतें एकच आहेत अशीं माणसें एकमेकांकडे प्रेतसंस्कारास जातात. अशा संघास ‘पासोन’ म्हणतात. स्नेहाची शपथ परस्पर रक्तपान करून घेण्यांत येते. निसर्गाच्या प्रत्येक घटनेच्या मुळाशीं कोणीतरी देवता आहे असें मानतात. उदाहरणार्थ, नदीच्या मुळाशीं ‘नरनाग’ रक्षक म्हणून असतात असें मानतात. यांचें फलज्योतिष भारतीय अथवा चिनी ज्योतिषावरून घेतलें आहे.
इ. स. १८९३ च्या डिसेंबरांत रॉकहिल यास तिबेटमध्यें आपल्या इकडे ज्याप्रमाणें दिवाळींत दिवे लावून आरास करितात त्याप्रमाणें दिवे लावून एक सण साजरा केलेला आढळला.
वर्षाच्या शेवटच्या दिवशीं, लामा हाडांचा सांगडा किंवा विद्रूप राक्षस यांसारखे पोषाख करून रक्तव्याघ्राचा नाच करितात. तेव्हां ते एका मनुष्याकृति पुतळ्यास धर्म व मानवजात यांचा शत्रू कल्पून मारून खाऊन टाकण्याचा औपचारिक विधि करितात.
सर्वच लामा पंचाक्षरी असतात; त्यांच्यांत मुख्य म्हणजे नचुंगचा प्रमुख पंचाक्षरी. आपले पूर्वज मंगोलियांतून आले असून, प्राचीन पॉन्बो धर्माच्या श्रेष्ठ पुरोहितांचे ते वंशज आहेत असें याचें म्हणणें आहे. ते भविष्यकथन, मंत्रतंत्र, जादूटोणे वगैरे करितात व रोग्यांनां औषधेंहि देतात. या कामीं ते चुचेल नांवाच्या गागोटीसारख्या दगडाचा उपयोग करितात.