प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण ७ वें.
हिंदुस्थान आणि चीन, जपान व तिबेट.
प्राचीन उल्लेख. - प्राचीन चिनी ग्रंथांतून कियांग या नांवाखालीं तिबेटी लोकांचा उल्लेख केलेला आहे. यूरोपांत तिबेट हें नांव मुसुलमानांच्या द्वापा गेलें. इ. स. ६ व्या शतकाच्या शेवटीं इस्तख्रीनें तिबेट या अर्थीं तोब्बत या रूपाचा उपयोग केलेला आहे. तिबेटवर, जोहन दि पामानो कर्पिनी (१२४७), विल्हेलमस दि रुब्रक (१२५३), मार्कोपोलो (१२९८) व दुसरे कांहीं विद्वान् यांनीं कांहीं लेख लिहून प्रसिद्ध केले. यांत तिबेट देशासंबंधीं फारशी माहिती मिळत नाहीं. १७ व्या व १८ व्या शतकांत पेकिनचे जेसुइट मिशनरी या प्रदेशांत आले व होर्याझिओ दिला पेन्ना बेला हा इ. स. १७३२ पासून १७ वर्षें ल्हासा येथें राहून तेथील भाषा शिकला.
यूरोपांत गेलेले पहिले तिबेटी लेख दक्षिण सैबेरियांत सांपडलेले होते. इ. स. १७२१ त पीटर दि ग्रेट बादशहानें रोम व पॅरिस येथें पाठविलेला क्रोझ, थिओफिलस सीजफ्राइड ब्रेयर, गरहार्ड फ्रेडरिक मुल्लर वगैरेनीं ते तिबेटी म्हणून ओळखले व प्राच्यभाषाकोविद एटिने व मिचेल या फ्रेंच गृहस्थानीं त्यांचें भाषांतर करण्याचा प्रयत्न केला. लाक्रूझनें तिबेटी वर्णमालेवर एक लहानसा लेखहि प्रसिद्ध केला होता.
जेसुइट मिशनर्यांनीं स्वदेशांत पाठविलेल्या साधनांचा ऑगस्ट अॅटोनियस जॉर्जी यानें इ. स. १७६२ त रोम येथें प्रसिद्ध झालेल्या आपल्या “तिबेटी वर्णमाला” या ग्रंथांत उपयोग केला. यापुढें जॉन बेल, लारेंझो हर्वस अडेलंग वगैरेनीं तिबेटी भाषेचा थोडाथोडा परिचय आपआपल्या ग्रंथांच्या द्वारा लोकांनां करून दिला.
तिबेटी भाषेचा गहन अभ्यास करणारा पहिला युरोपीय म्हणजे अलेक्झांडर क्सोमा दि कोरास नांवाचा हंगेरियन पंडित होय. हा कुमान येथील तिबेटी मठांत बरींच वर्षें राहिला. पहिलें तिबेटी व्याकरण व कोश तयार करण्याचें श्रेय याजला आहे.