प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ७ वें.
हिंदुस्थान आणि चीन, जपान व तिबेट.

समाजव्यवस्था.- तिबेटांतील सरदार घराणीं वंशपरंपरेनें चालत आलेली आहेत. सर्व धंदे वंशपरंपरेनें चालत आलेले आहेत व राज्यकारभारांतील अधिकारहि ठराविक घराण्यांतच पंरपरेनें चालतात. कारागीर, हेलकरी, प्रेतवाहक, चर्मकार इत्यादि धंद्यातील लोकांस अस्पृश्य समजतात. एखाद्याचा वांशिक धंदा अगर अधिकार हातचा गेल्यास तो हलका धंदा करण्यापेक्षां भिक्षावृत्ति पतकरितो. भिक्षु होणें अगर अन्य पारमार्थिक कामें करणें यांस अधिक महत्त्व देतात.

सरकारी अंमलदारांस वेतनाबद्दल जमीन तोडून दिलेली असते, या जमिनीवरील कुळांपासून त्यांस कर वसूल करण्याचा, त्यांचे न्याय निवडण्याचा, वेठबिगार वगैरे घेण्याचा इत्यादि हक्क असतात. या कुळांत शेती करणारे, मेंढ्या पाळणारे, सुतार वगैरे कारागीर, कारकून, किरकोळ कामें करणारीं गडी माणसें इत्यादि सर्व प्रकारचे लोक असतात. यांस ‘मिसेर’ अथवा ‘योग’ असें म्हणतात. या कुळांस त्यांच्या धंद्यापासून होणार्‍या फायद्याचा अंश वेतन म्हणून देण्यांत येतो.

राजा हा एक मोठा सरदार समजला जातो व त्याला सर्व प्रदेशावार कांहीं विशिष्ट प्रकारचे हक्क आहेत.

जीं स्वतंत्र खातेदार कुळें आहेत त्यांस आपली जमीन विकण्याचा वगैरे हक्क आहेत. त्यांनां कांहीं कर भरावे लागतात, सैन्यांत नोकरी करावी लागते व बिगार वगैरे कांहीं कामें कारावीं लागतात.

लडख येथील राजा बौद्ध असून त्याचा बाल्तिस्तान येथील मुसुलमान राजखराण्याशीं शरीरसंबंध होतो पण सामान्य लोकांस मात्र अशा प्रकारचा संबंध करितां येत नाहीं.

नोमॅडो नांवाचे एक रानटी लोक आहेत त्यांच्यामध्यें राजा, त्यानंतर सरदार, त्यांचेमागून जातींचे मुख्य व शेवटीं टोळ्यांचे नायक अशी अधिकारपरंपरा आहे.

एकंदरीत तिबेटांत मुख्य दोन वर्ग आहेत त्यांपैकी एकाची पदवी उच्च असून तो सामर्थ्यवान आहे आणि दुसरा निर्वल असून त्याची पदवी अगदी कनिष्ठ आहे.