प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ७ वें.
हिंदुस्थान आणि चीन, जपान व तिबेट.

पोटभाषा. - तिबेटीभाषा ज्या प्रदेशभर ती एकसारखी नाहीं. तिबेटी वाङ्‌मयाची जुनी अभिजात भाषा, ज्या काळीं तिबेटी लेखनस्वरूपांत आणली गेली त्या काळीं ती कोणत्या अवस्थेंत होती हें दर्शविते.  या जुन्या भाषेंत जोड व्यंजनें आरंभीं असणारे एकाक्षरी शब्द आहेत. मध्यतिबेटी भाषांत वर्णोच्चाराची एक विशिष्ट पद्धत आहे. मध्यतिबेटी भाषांचा विस्तार पश्चिमेकडे स्पितिपासून पूर्वेकडे भूतानपर्यंत आहे. या भाषावर्गांत अनेक पोटभाषा येतात व पश्चिमेकडून निर्देश करीत आल्यास स्पिती, न्यम्कत, जड, गढवाल, कागते, शर्प, दन्जान्गक आणि ल्होके असा त्यांचा अनुक्रम येतो. सिक्किम आणि भूतान यांमधील चुम्बी खोर्‍यांतील तिबेटी भाषा त्या संस्थानांच्या भाषांशीं जुळते.

न्गरी म्हणून तिबेटचा जो पश्चिमभाग आहे त्याचे मंग्युल, खोरसुम आणि मर्‍युल असे तीन भाग पडतात. मंग्युलची भाषा, पूर्व नेपाळांत चालणार्‍या शर्प व कागते या भाषांशीं जुळते; खोरसुमची भाषा स्पिती, न्यम्कत, जड या गढवालवगैरे प्रदेशांतील तिबेटी भाषांशीं जुळते; व खोरसुमच्या उत्तरेकडे असलेल्या ऊडोकमधील भाषा लडखी आणि बाल्ती भाषांशीं एकजीव झालेली आहे.

पश्चिम तिबेटी म्हणून जो दुसरा एक भाषावर्ग आहे, त्यांतल्या ब्रिटिश हद्दींत चालणार्‍या व परस्पर निगडीत असणार्‍या अशा तीन पोटभाषा आहेत, व त्या बाल्तिस्तानमधील बाल्ती, जुन्या पुरिक प्रांतांतील पुरिक व लडखमधील लडखीभाषा या होत. लहौलमध्यें जी तिबेटी भाषा चालते, तिला पश्चिम व मध्य तिबेटी यांनां जोडणारा दुवा असें म्हणतां येईल. पूर्वतिबेटांतील खम्सप्रांतांत जी भाषा चालते, तिला पूर्वतिबेटी असें म्हणतां येईल. उत्तरेकडे व पूर्वेकडे, मिफन आणि स्सेचुअन प्रांतांत पूर्वतिबेटीशीं संबद्ध अशा भाषा वापरतात; त्या तिबेटी आणि आसाम व पूर्वतर उपभारताच्या तिबेट-ब्रह्मी भाषा यांनां जोडणारा दुवा होत.