प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ७ वें.
हिंदुस्थान आणि चीन, जपान व तिबेट.

पॉन्बो.- पॉन्बो अथवा बोनबो हे सर्व तिबेटभर, विशेषतः पूर्व तिबेटांत राहतात. यांनां पाखण्डी बौद्ध मानण्यांत येतें. हे आपल्या धर्मसंस्थापकाला बुद्धावतार मानतात व दलाइ लामाला दांभिक समजतात. यांच्या लामांवर त्यानें ब्रह्मचारी रहावें अशी सक्ती नाहीं. ते लांब केंस वाढवितात; पण चटकन् ओळखूं येण्यासारख्या यांच्या कांहीं विशिष्ट चालीरीती नाहींत. हे आपआपल्या मठांत राहतात व तुर्की शामन आचार्याप्रमाणें दिसतात. अभिचार करतांना, एक उंच टोंक असलेली, मोराचीं किंवा कोंबड्यांचीं पिसें लावलेली काळी टोपी घालतात व जवळ साहित्य म्हणून एक मृताची कवटी, एकावर एक तिरपी ठेवलेलीं दोन हाडें व दोन मानवी कवट्यांचा केलेला एक डमरू ठेवतात. हे प्राण्यांनां, विशेषतः कोंबड्यांनां, बळी देतात. एका लहान पुतळीला टांचणी टोंचून मंत्राचा प्रयोग करण्यांत येतो. कोणी आसन्नमरण स्थितींत असल्यास त्याची प्रतिमा करून, मृत्यूला फसविण्यासाठीं म्हणून ती दूर फेंकण्यांत येते. मृत्यू त्या प्रतिमेस घेऊन जातो व मनुष्य बरा होतो असी त्यांची समजूत आहे.


यांच्यांतील प्रमुख देवता म्हणजे, स्वर्गांतील श्वेतदेव, भूलोकची कृष्णदेवी, रक्तव्याघ्र आणि सपक्ष नाग. यांचें पवित्र चिन्ह म्हणजे उलटें स्वस्तिक व त्याचप्रमाणें सूर्य व अरणि यांच्या आकृती. यांच्या सांप्रदायिक चालीरीती बौद्धलोकांपेक्षां निराळ्या नाहींत. हें शांतिपाठ म्हणतात, प्रार्थना-चक्रें फिरवितात, दगडांचे ढीग, पर्व सरोवरें यांनां प्रदक्षिणा घालतात. तिबेटांतील बौद्धलोकांत अत्यंत सामर्थ्यवान् म्हणून समजला जाणारा मंत्र म्हणजे ‘ॐ मणिपद्मे हुम्’ व पॉन्बोंचा अशाच तर्‍हेचा मंत्र ‘ॐ मते मुयसलेदो’ हा होय. हे आपलीं धर्मचक्रें उलटीं म्हणजे डावीकडे आंतून फिरविण्याच्या ऐवजीं डावीकडून उजवीकडे बाहेरून फिरवितात. या पॉन्बोंचें सारें बौद्धांच्या उलट असतें. हे प्रदक्षिणाहि उलटी घालतात.