प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण ७ वें.
हिंदुस्थान आणि चीन, जपान व तिबेट.
चीन.- आतांपर्यंत सांगितलेला भारताचा इतर सर्व देशांवरील परिणाम एकत्र केला तरी जो ज्याच्या पासंगास पुरावयाचा नाहीं असा भारतीय संस्कृतीचा सर्वांत थोर विजय म्हटला म्हणजे चिनी साम्राज्यावर झालेला बौद्ध संप्रदायाचा परिणाम होय. हा परिणाम कसा काय होत गेला याचा साग्र इतिहास आपणांपाशीं उपलब्ध नाहीं. तथापि शालिवाहन शकाच्या प्रारंभासच चिनी राष्ट्रांत बौद्ध संप्रदायास बादशहाच्या बुद्धसंघप्रवेशामुळें प्रामुख्य आलें, इतकें निःसंशय आहे. या काळाचे चिनी ग्रंथ म्हणजे हान बखरी होत. यांचा उपयोग थोडाबहुत शकांचें परिभ्रमण शोधण्यासाठीं डॉ. फ्रांके यानें केला आहे. पण शोध लावल्यास आणखी पुष्कळ माहिती या बखरींपासून मिळण्याजोगी आहे. भारतीय सुशिक्षित वर्गांत कर्नल वरळीकर यांखेरीज चिनी भाषांचा अभ्यासक कोणी झाला नाहीं. पण डॉ. वरळीकर यांनीं चिनी भाषांचा अभ्यास करूनहि जुन्या चिनी ग्रंथांत अवगाहन करून तद्विषयक लेख कोठें प्रसिद्ध केलेले दिसत नाहींत. चिनी भाषेचा अभ्यास तेथील बौद्ध ग्रंथ वाचण्यासाठीं ज्या यूरोपीयांनीं केला त्यांत बील याचा प्रामुख्यानें निर्देश केला पाहिजे. तसेंच संस्कृत शब्द चिनी भाषेंत कसे लिहिले जातात हें तपासून त्यांच्यावरून पुन्हा संस्कृत शब्द शोधून काढण्याची पद्धति स्टानिलास जुलिआं या फ्रेंच पंडितानें बसविली आहे.
चीनमध्यें भारतीय लोक गेले त्यांचा जीवितक्रम काय असे, केवळ बौद्ध भिक्षूच तिकडे जात किंवा इतर लोकहि जात, इत्यादि विषयांची माहिती आपणांस अजून मिळवयाचीच आहे. मनुस्मृतींत उल्लेखिलेल्या चंचु नामक जातींचें नांव मंगोलियांतील एका आयुधजीवी लोकांस लावलेलें आढळतें. परंतु या दोहोंमध्यें कांहीं संबंध आहे किंवा काय हि गोष्ट अनिश्चित आहे. सध्यां उत्तर हिंदुस्थानांत चंचुनामक जात आढळून येत नाहीं. बौद्ध संप्रदायाचा चीनमध्यें प्रवेश होण्यापूर्वीं ‘लाउत्से’नें स्थापन केलेल्या ‘ताओ’ विचार पद्धतींत आणि आपल्या औपनिषद् तत्त्वज्ञानांत जें सादृश्य आढळतें तें हिंदुस्थानचा प्रकाश चीनवर पडून उत्पन्न झालें आहे असा बील यास संशय येतो.
शक हे जर चीनमधून हिंदूस्थानांत आले असले तर शकांबरोबर हिंदुस्थानांत कांहीं चिनी विद्याहि आली असण्याचा संभव आहे. आशिया खंडांतील निरनिराळ्या भागांत जो आपला प्रवेश झाला त्याचा परिणाम आपल्या राष्ट्रावर काय झाला हें सांगणें आच कठिण आहे. कां कीं आपल्या देशांतील संस्कृतीच्या निरनिराळ्या अंगांचें परीक्षण होऊन ग्रंथांत व्यक्त होणारे आणि समाजांत मूर्त किंवा स्मृतिस्वरूपानें दिसणारे जे अवशेष आज आहेत त्यांचें स्वकीय परकीय भावानें पृथक्करण झालें नाहीं. जर पृथक्करण झालें असतें तर आपणांस इतर देशांचे व हिंदुस्थानचे धागे जोडण्यास सुलभ गेलें असतें. भारतीय आणि चिनी समाज या दोघासहि अवलोकनक्षेत्रांत जवळ जवळ ठेवून तौलनिक पद्धति वापरून त्यांचें निरीक्षण करण्याचें आणि नंतर त्यांमध्यें ज्ञानविषयक आणि आचारविषयक गोष्टींची देवघेव कितपत झाली आहे हें पाहण्याचें काम भावी पिढ्यांचें आहे. आमचा असा तर्क आहे कीं, चीन व हिंदुस्थान हीं दोन्हीं अभ्यासक्षेत्रें अवलोकिलीं गेलीं म्हणजे इतिहासविषयक अनेक महत्त्वाचीं सत्यें हातीं लागतील. हेंच विधान भारतांतील दुसर्या अनेक विषयांसंबंधानें करितां येईल. तथापि आज हा विचार करण्यास अवकाश नाहीं.
चित्रकलेसंबंधानें असें म्हणतां येईल कीं, चिनी किंवा तार्तार हे इटालियन किंवा पोर्तुगीज लोकांप्रमाणेंच भारतीय लालित्याच्या संवर्धनास साहाय्यक झाले आहेत.
आपणांस दिव्य समजणार्या चिनी लोकांचा परिणाम इतर बाबतींत आपणांवर फारसा झाला नाहीं असें आज पुराव्याच्या अभावीं गृहीत धरावें लागतें.