प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण १३ वें.
स्पर्धाक्षेत्राकडे पुन्हां एकदां.
भारतीयसंस्कृतिशकलांचें ऐक्य.- आपण येथें असा एक प्रश्न उपस्थित करूं कीं, जागोजागचे शिलालेख, उपास्यें, रीतिभाती आणि भाषांची स्वरूपें तपासून दृष्टीस पडणार्या हिंदु संस्कृतीच्या इतस्ततः पसरलेल्या फांद्यांचें किंवा गळून पडलेल्या पानांचें सध्यांच्या स्पर्धामय जगांत भवितव्य काय? त्या सर्वांस सामुच्चयिक आयुष्यक्रम कांहीं आहे काय?
या प्रश्नास स्पष्ट उत्तर द्यावयाचें तर असला आयुष्यक्रम त्यांस असल्यास फारच थोडका आहे, हें कबूल करणें भाग आहे. सर्व हिंदूंनीं एकत्र होऊन जगावर राज्य करण्याची इच्छा आज ‘पॅन इस्लामिझमच्या’ उत्कट भावनांपेक्षां देखील अतिशय मूर्खपणाची होईल. जगांतील अत्यंत बलवान राष्ट्रांस देखील ही आशा नाहीं, तर मनुष्यांच्या जगांतील अत्यंत दुर्बल पुंजक्यांस ही आकांक्षा धरणें वेडेपणाचें होईल. ज्या भागांत हिंदू आहेत ते भाग इंग्रजांनीं घेतल्यास या पुंजक्यांच्या शासनविषयक ऐक्याची निदान कल्पना होते. परंतु ती देखील शक्य कोटींतील आहे असें आज म्हणवत नाहीं. इतस्ततः पसरलेल्या हिंदूंची शासन विषयक एकता कल्पावयास आणखी एक उंच भरारी मारली तर ती शक्यतेच्या कोटींतील आहे असें कित्येकांस वाटेल. बोलशेव्हिझमचें उर्फ लेनिनभट्टकृत नीतिशास्त्राचें असेंच ध्येय आहे कीं मनुष्यसंघांनीं आपआपल्या इच्छेप्रमाणें संघ निर्मावे आणि त्या संघांचें एकीकरण संघांनीं आपआपल्या इच्छेप्रमाणेंच करावें म्हणजे कोणत्याहि संघानें वाटेल त्या संघाशीं संयुक्त व्हावें किंवा वाटेल त्या संघापासून वियुक्त व्हावें, (पृष्ठ ७० नियम ११ पहा). हें ध्येय जगाच्या राष्ट्रसंघांत सर्वमान्य होऊन त्या राष्ट्रसंघाच्या नियंत्रणाखालीं सर्व मनुष्यांस स्वेच्छेनें संघ निर्माण करण्याची आणि संघविषयक संयोगवियोगाची मोकळिक मिळाली तर हिंदुत्वाचीं पूर्णपणें फुटून निघालेलीं शकलें संयुज्यमान होण्याची कल्पना करावी. वर सांगितलेल्या कल्पनांशिवाय हिंदुत्वाच्या तुकड्यांच्या राजकीय एकतेची कल्पना होत नाहीं. या कल्पनेच्या शक्यतेस ज्या अटी म्हणून सांगितल्या आहेत त्या जगाच्या एकंदर प्रवृत्तींच्या स्वाभाविक परिणामाच्या अंशभूत आहेत हें मात्र लक्षांत ठेवलें पाहिजे.