प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण १३ वें.
स्पर्धाक्षेत्राकडे पुन्हां एकदां.
व्यापारविषयक संबंध.- आतां आपणांस आपल्या बांधवांनीं व्यापलेल्या प्रदेशांशीं व्यापारविषक दळणवळण कितपत स्थापन करतां येईल याचा विचार करूं. भरतखंडामध्यें सामान्यतः ज्या वस्तू तयार करण्यांत येतात त्या स्थानिक गरजा भागविण्याकरितांच व त्या गरजांपुरेशाच तयार होतात. याप्रमाणेच बहुतेक सर्व प्रदेशांत स्थानिक गरजांपुरेसा माल स्थानिक कारखान्यांतूनच तयार होतो. उदाहरणार्थ, खेड्यापाड्यांतून रोजच्या उपयोगाकरितां लागणारी मडकीं व किरकोळ भांडीं वगैरे व रोजचे वापरावयाचे साधे कपडे व कापड इत्यादि जिन्नस बहुतेक खेडोखेडीं तयार होतात व त्यांचा खपहि आजूबाजूच्या खेड्यांतून होतो व मालहि तेवढ्यापुरेसाच असतो. कांहीं चैनीच्या वस्तू आपले राजेरजवाडे असतां एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणीं जात. उदाहरणार्थ, गजनवीचें कापड इ०. तथापि त्या वस्तू आज प्रचारांतून गेल्या आहेत. हिंदी गांवढळ संस्कृति आणि यूरोपीय नागरिक संस्कृति यांचें मिश्रण म्हणजे सध्यांची भारतीय संस्कृति होय. पक्का माल एकतर आसपासच्या गांवांतला, नाहींतर विलायतचा अशी आज स्थिती आहे. याला अपवाद हाच कीं स्त्रियांच्या पोषाखापैकीं कांहीं जिन्नस मात्र प्रांतोप्रांती खपतात; व हीच गोष्ट पगडीसारख्या कांहीं पुरुषांच्या पोषांखांतील वस्तूंसहि लागू आहे. अशा तर्हेच्या वस्तूंचा बाहेरील प्रदेशांतहि प्रवेश होणें सोपें आहे. विशेषतः ज्या प्रदेशांत आपलें बहिर्गमन नुकतेंच झालें आहे अशा प्रदेशांत तर या वस्तूंचा प्रवेश होणें अधिक शक्य व सुलभ आहे.
आपण वापरतो त्यांपैकीं बरेंचसें कापड परदेशांतून येतें. अशा तर्हेचें कापड आपल्या बहिर्गत बंधूंसाठींहि परदेसांतूनच जाईल. त्याप्रमाणेंच कांचेच्या वस्तु, औषधें, यंत्र वगैरे ज्या जिन्नसा आपल्यालाच परदेशांतून आणाव्या लागतात त्या आपल्या बहिर्गत भारतीय बंधूंसहि परदेशांतूनच आणाव्या लागतील. मसाल्याचे जिन्नस वगैरे पूर्वींप्रमाणेंच आतांहि इकडूनच पुरविण्यांत येतील. साखर पुरविण्याचें काम जावा बेटाकडे तसेंच राहील तथापि जावा बेटाची आपणांस आतां हिंदू प्रदेशांत गणनां करतां येत नाहीं.
अर्वाचीन जागतिक व्यापारामध्यें एक विशेष गोष्ट अशी आहे कीं, व्यापार चालू राहतो तो नेहमीं कच्चा माल उत्पन्न करणारे आणि कच्च्याचा पक्का माल करणारे या प्रकारच्या देशांमध्यें किंवा पक्का माल तयार करणार्या दोन देशांमध्यें आपआपसांत होतो. दोन कच्चा माल पुरविणारे देश एकमेकांपासून बरेचसे वियुक्त असतात. हा सर्वसाधारण नियम उष्णकटिबंधांतील प्रदेशांस एकमेकांपासून वियुक्त ठेवण्यास कारण झाला आहे. हा स्थूल नियम झाला, पण यास कित्येक महत्त्वाचे अपवाद आहेत. दोन निराळ्या कच्चा माल उत्पन्न करणार्या देशांतहि अदलाबदल करण्यास कांहींतरी सांपडतेंच. शिवाय कच्चा माल उत्पन्न करणारा देश आणि पक्का माल उत्पन्न करणारा देश अशी सफाईदार विभागणी कोठेंच झालेली नाहीं. आपला जावाशीं आणि चीन देशाशीं जो व्यापार चालतो तो बराच मोठा आहे, आणि चीन, जावा व हिंदुस्थान हे सर्व देश कच्चा माल उत्पन्न करणारे आहेत. कांहीं वर्षांपूर्वीं कनिष्ठ प्रकारच्या कापडाच्या हजारों गांठी आणि अफूच्या हजारों पेट्या हिंदुस्थानांतून चीन देशास जात असत; आणि चीनमधून अनेक प्रकारचा माल येथें येत असे. अलीकडे बसर्यास आपला व्यापार जोरानें सुरू झाला आहे. पण बसर्यास कोणी पक्का माल करणार्या देशाचें द्वार म्हणणार नाहीं. हातमागाचें कापड जगाच्या बाजारांतून म्हणजे लोकांच्या मागणीच्या दृष्टीनें नष्ट झालें नाहीं आणि अनेक देशांत कांहीं विशिष्ट प्रकारचें कापड होत असल्यामुळें आणि अन्य प्रदेशांत देखील त्याची अभिरुचि उत्पन्न होणें शक्य असल्यामुळें पक्का माल करण्यांत मागसलेले म्हणून जे देश समजले जातात त्या देशांचाहि एकमेकांत व्यापार चालणें शक्य आहे. याशिवाय स्थलांतरक्षम जीं खाद्यें व भोज्यें आहेत आणि जीं करण्यास मोठामोठाले कारखाने लागत नाहींत त्यांचाहि व्यापार पुष्कळ होणें शक्य आहे, व होत आहे. शेतकरी देशांतहि बाहेरचा कच्चा माल पुष्कळ खपतो. खजूर, भुईमूग, बटाटे, वगैरे साधे जिन्नस देखील शेतकरी हिंदुस्थानांत बाहेरून येतात. पक्का माल उत्पन्न करण्याच्या बाबतींत मागासलेल्या दोन देशांमध्यें व्यापार विषयक दळणवळण सुलभ करणारें दुसरें एक कारण म्हटलें म्हणजे उतारपेठेच्या स्वरूपाचीं बंदरें होत. उतारपेठेच्या बंदरांत एका देशांतून माल येतो आणि दुसर्या देशांत जातो. कधींकधीं तो उतारपेठेच्या देशांत कांहीं संस्कार पावल्यानंतर दुसर्या देशांत जातो. या पद्धतीनें वस्तूत्पादनामध्यें मागासलेल्या दोन देशांतहि व्यापारी दळणवळण चालू रहातें. मुंबई व सिंगापूर हीं बंदरें अशींच उतारपेठेचीं आहेत. आफ्रिकेंत खपणारा विलायती माल पुष्कळसा मुंबई बंदरांतुन जातो.
दोन देशांमधील व्यापार कसा काय चालेल याविषयीं विचार करितांना दोन कच्चा माल उत्पन्न करणार्या देशांमध्यें वियुक्तता राहणार या स्थूल व ओबडधोबड नियमावर परिणाम करणारा दुसरा नियम नजरेस येतो तो म्हटला म्हणजे ज्या देशांतील व्यापारी वर्ग अधिक साहसी असेल आणि व्यापारास उत्तेजन देणार्या पेढ्या, नेआणीच्या सोई वगैरे ज्या देशांत अधिक असतील त्या देशाचा इतर देशाशीं संबंध अधिक होतो. दोन देशामध्यें व्यापारविषयक संबंध घडण्याचीं व वाढण्याचीं अवश्य अंगें दोन आहेत. एक परस्परापेक्षित माल आणि दुसरें त्या दोन देशांतील व्यापारसाधनें. या नियमाकडे लक्ष दिलें तर हिंदूंनीं वसाहत केलेले देस कच्चा माल उत्पन्न करणारेच आहेत म्हणून निराश व्हावयास नको. या प्रकारच्या निरनिराळ्या देशांमध्येंहि व्यापार वाढणें अशक्य नाहीं.