प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण १३ वें.
स्पर्धाक्षेत्राकडे पुन्हां एकदां.

स्वसमाजत्यागास अडचणी.- योग्योग्यतेच्या कल्पना शक्याशक्यातेच्या नियमांनीं बद्ध होत असतात. मनुष्यास परकीय समजाचें सदस्यत्व पत्करणें अशक्य किंवा कठिण करणार्‍या तरी कांहीं गोष्टी आहेत काय? तसेंच आपल्या हिंदुत्ववर्धनाच्या इच्छेनें आपण जाळें पसरूं लागलों तर त्या जाळ्यांत किती लोक सांपडतील या गोष्टींचा विचार आपली समाजशास्त्रीय नीति ठरवितांना केला पाहिजे. प्रथम मनुष्यास स्वसमाजास चिकटवून ठेवणार्‍या गोष्टी कोणत्या या प्रश्नाचा विचार करूं.

व्यक्तीची प्रवृत्ति स्वसमुच्चयांतच रहाण्याकडे व्हावयाची यास जी स्वाभाविक कारणें आहेत तीं येणेंप्रमाणेः-

मनुष्य हा निसर्गतः सहवासप्रिय प्राणी आहे व तो ज्या समुच्चयांत जन्मास येतो त्यामध्यें राहून त्यास आपली व आपल्या बांधवांची सुखप्राप्ति जी सहज करून घेतां येते ती परकीय समुच्चयांत जाऊन करून घेण्यास त्यास अत्यंत त्रास पडतो असा अनुभव आहे.

मनुष्य जर आपल्या वृत्तींत कांहीं स्थैर्य न ठेवतां काल्पनिक सुखाच्या पाठीमागें लागून समुच्चयांची वारंवार धरसोड करूं लागेल, तर कोणत्याहि समुच्चयांत मिसळणें त्यास अशक्य होईल.

ज्या समुच्चयांत मनुष्य जन्मास आलेला आहे त्यांत अनुकूल परिस्थिति असून जर त्यास सुखप्राप्ति करून घेतां येत नसेल तर परकीय समुच्चयाच्या परिस्थितींत पडून सुख मिळविणें त्याला त्याहूनहि कमी शक्य आहे.

परकीय समाजाचें सदस्यत्व पत्करतांना मनुष्य तरतमभाव पाहतो. समुच्चय सोडून केवळ स्वतःच्या जबाबदारीनें सुख मिळविणें प्रत्येकास शक्य नाहीं. आणि म्हणून दुसरा समुच्चयच स्वीकारावयाचा तर अगदीं परकीय प्रकृतीच समुच्चय स्वीकारण्यापेक्षां सदृशप्रकृतीचा स्वीकारणें जास्त इष्ट आहे.

समाजाच्या व्यक्तिविषयक अपेक्षांचें ज्ञान आणि त्यांच्या पूर्तीसंबंधानें करावयाच्या कर्तव्याची जाणीव ज्या मानानें मनुष्यास असेल त्या मानानें समाजत्यागास त्याचें मन माघार घेईल.

मनुष्याला नागरिकत्वाच्या निवडीचें ज्ञान प्राप्त होण्यापूर्वीं त्यावर जे कांहीं पूर्वसंस्कार झालेले असतात त्यांचा त्याग त्याच्यानें एकदम होत नाहीं.

मातृभूमीचें किंवा समाजाचें ऋण मनुष्याला प्रत्यक्ष दिसत नसलें तरी त्याच्या ठिकाणीं त्यासंबंधाची भावना जागृत असते.

बाटलेल्या महारास ख्रिस्ती अगर मुसुलमान समाजांतहि त्याच्या शैक्षणिक स्थितीमुळें कनिष्ठ स्थानच मिळणार. ख्रिस्त्यांतील जातिभेद हा या ठिकणीं लक्षांत घेण्यासारखा आहे.

स्वतःपेक्षां संस्कृतीनें, ज्ञानानें, बुद्धिमत्तेनें, द्रव्यानें वगैरे कोणत्याहि एक प्रकारानें श्रेष्ठ अशा समाजांत शिरणार्‍या नवख्या गृहस्थाश उच्चपद मिळणें अशक्य असतें.

श्रेष्ठ पदवीचा मनुष्य कनिष्ठ समजांत गेल्यास श्रेष्ठ पदावर गेला तरच जातो.

धंद्यांची आनुवंशिक होण्याची सामान्य प्रवृत्ति हेंहि एक महत्त्वाचें कारण आहे. दुकारनदाराचा मुलगा दुकानदार न झाल्यास दुकानाची गिर्‍हाइकी, इभ्रत, पत वगैरे फुकट जातात व सहज शिक्षणाचा फायदा फुकट जाऊन नवीन शिक्षण घेण्यास जास्त श्रम, वेळ व द्रव्य हीं लागतात.

एका समाजांत अनेक दिवस राहिल्याचा एक प्रकारचा फायदा ओळखी, नातेवाइक वगैरे असतो तो नवीन समाजांत मिळत नाहीं आणि त्या मानानें सात्मीकरण होण्यास काळ लागतो. नवखा हा कोठेंहि थोड्याफार प्रमाणानें एकाकी असतो.

स्वसमजात्याग करण्यास मनुष्य नाखूष कां होईल त्याचीं कारणें दिलीं. आतां त्यागाकडे प्रवृत्ति कोणत्या कारणांनीं होईल याचा विचार करूं.

स्वसमाजत्यागास प्रवृत्तिकारक कारणें.- कोणत्याहि दुःखाच्या अगर अपमानाच्या प्रसंगीं व्यक्तीची प्रवृत्ति दुःखाचे प्रसंग स्वतःपुरते चुकविण्याकडे असते. सार्वजनिक प्रश्न हातीं घेऊन त्यांजशीं लढण्याकडे नसते. राजकारण हा ज्यांचा धंदा आहे त्यांस तत्त्वासाठीं भांडण्यास अवकाश सांपडेल पण इतरांची तशी गोष्ट नाहीं. ज्या वर्गाचा अपमान होत असेल त्या वर्गाचें सदस्यत्व चुकवावयाचें हा सामान्य प्रकार. हा प्रकार पुष्कळ स्वरूपांत दृष्टीस पडतो. कै० उमेशचंद्र बानर्जी यांनीं कांग्रेसच्या चळवळीपूर्वीं एक पंथ काढला होता तो असा कीं, बायको गरोदर झाल्यानंतर तिला प्रसूतीसाठीं इंग्लंडला पाठवून द्यावयाचें. याचा हेतु असा होता कीं, मुलगा इंग्लंडमध्यें जन्मला म्हणजे त्यास इंग्रजाचे हक्क मिळतील. हिंदुस्थानांतील पारशांपैकीं कांहीं वर्ग आपण नेटिन नाहीं असें प्रतिपादीत असे. यांत त्यांचा हेतु असा होता कीं, नेटीवास जे अपमानाचे प्रसंग येतात त्यांपासून आपली जात सुटावी. त्यांनीं आपण यूरोपीयांचे वंशज आहोंत असें सिद्ध करण्यासाठीं हजारों ग्रीक इराणांत राहिले होते त्या वेळीं त्यांचें म्हणजे यूरोपीय रक्त पारशी जनतेंत मिसळलें असावें असे विचार व्यक्त करण्यास सुरुवात केली. या अर्थाचा एक लेख ‘ईस्ट अ‍ॅण्ड वेस्ट’ या मुंबईस प्रसिद्ध होणार्‍या नियतकालिकांत प्रसिद्ध झाला होता. हिंदुस्थानांत नेटिवांचा अपमान होतो तर हिंदुस्थानांत रहा तरी कशाला, परदेशींच कायमची वसाहत करून कां राहूं नये, या प्रकारचा मोह परदेशीं गेलेल्या भारतीयांस पडतो, हें त्यांशीं संबंध येणार्‍या लोकांस ठाऊक आहेच. समाज पुढें सुधारेल या भावनेनें आपला स्वार्थ सोडणें हें प्रत्येकास करतां येणार नाहीं. आपण मेलों आणि पुढें समाजाला चांगली स्थिति आली तर तिचा आपणांस उपयोग काय हा विचार सामान्य लोकांच्या पुढें येतो.