प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण १३ वें.
स्पर्धाक्षेत्राकडे पुन्हां एकदां.
धर्मशास्त्राचें भवितव्य.- धर्मशास्त्र म्हणून जो नियमसमुच्चय आहे त्याचें भवितव्य देखील थोडेंबहुत ठरलेलेंच आहे. प्राचीन काळापासून ब्रिटिश काळापर्यंत येत जावें तों तों नियमांचें लिगाड अधिकाधिक वाढत आहे, आणि स्वातंत्र्य नाशाच्या कालीं त्याचा अतिरेख होत होता. सोंवळें ओवळें पराशरामध्यें पुष्कळ वाढविलें. या सोंवळ्याच्या कल्पनांनीं हिंदुसमाजास त्याच्या वाईट दिवसांत अलिप्त राखून हिंदू म्हणून त्याचें स्वतंत्र अस्तित्व रक्षण केलें त्या देखील पुढें नष्टप्रायच होणार. एक तर त्यांतील अनेक नियम फार संकुचित बुद्धीनें तयार झालेले आणि परस्परविरोधी आहेत, शिवाय जगांतील अनेक राष्ट्रांचा व लोकांचा एकमेकांशीं जो संबंध वाढत आहे त्याच्या योगानें ते नियम रहाणेंच शक्य नाहीं. पाखंडी आणि प्राटेस्टंट लोकांशीं कसें वागावें म्हणून पोपनें जे नियम कॅथोलिकांस घालून दिले त्यांत त्यांशीं संभाषण करूं नये, पत्रें पाठवूं नयेत इत्यादि विधानें आहेत, तथापि आज तसें वागणें कोणा भाविक कॅथोलिकास शक्य आहे? आज सोंवळे ओवळें साफ बुडालें आहे. पुण्यांत अनेक चहाच्या दुकानांत चहाचे कप आणून देण्यास कुणबीच आहेत. सोडावाटर कोणी तयार केलें याची चौकशी न करतां सर्वच घेतात आणि बिस्कुटांची गणना “निर्लेप” पदार्थांत झाली आहे. सोंवळ्याच्या कल्पनांवर आज ब्राह्मणस्त्रियांचा देखील विश्वास बेताचाच आहे ही गोष्ट वारंवार प्रत्ययास येते. पूर्वीं मोठा विटाळ म्हणजे विटाळशीचा असे. तो देखील आतां कमी झाला आहे. विवाहित स्त्रिया विटाळशी म्हणून बाजूला अजून बसतात पण पुष्कळ ठिकाणीं कुमारिकांस बाजूस बसविण्याची चालच नाहीं. रजोदर्शनापूर्वींच मुलीचें लग्न केलें पाहिजे असें समजणार्या हिंदूंमध्यें व विशेषेंकरून ब्राह्मणांमध्यें आपली कुमारिका मुलगी बाहेरची झाली हें सांगण्यास किंवा दिसूं देण्यास संकोच वाटे आणि त्यामुळें रजस्वाला कुमारी स्वतंत्र बसूं देत नसत; त्याच्यामुळें आतां विटाळशीचा विटाळच नाहींसा होत चालला. मुलींच्या शाळांतून तो आतां लक्षांतच घेत नाहींत. शिवाय आज पुष्कळ कुमारिकांस बाजूस बसण्याचा राग येतो. त्यांनां असें वाटतें कीं आपल्या शरीराची स्थिति आज कशी आहे याची जाहिरात देण्यास ही चाल भाग पाडते. शिवाय विटाळशी हा शब्द गृह्य पण सभ्य मराठी भाषेंत रूढ नाहीं. हा शब्दच बायकांसमोर उच्चारण्याचीं जर पुरुषांस मनाई आणि स्त्रियांस लाज तर त्या स्थितीची जाहिरात देणें अधिक लाजिरवाणें नाहीं काय असें त्यांस वाटतें. विवाहित स्त्रियांच्या मासिक अशौचाचा कडकपणा देखील नियमित झाला आहे.
स्पर्शामुळें जो विटाळ होतो तो संक्षेपांत आला आहे एवढेंच नव्हे तर सुतकहि लोक कमी पाळूं लागले आहेत. घराबाहेर म्हणजे कचेरींत, कारखान्यांत, शाळेंत आतां सुतक कोणी पाळीत नाहीं. ग्रहणप्रंसगी सुतक समजून तें पाळण्याचा प्रघात शहरांतून तरी अनेक वर्षांपूर्वींचा आचार म्हणून कांहीं लोकांस ठाऊक असतो एवढेंच.
याशिवाय ऐतिहासिक पद्धतीचा आणि तन्मूलक विचारांचा पगडा दिवसानुदिवस वाढत जाणार. विष्णु हें सूर्यांचेंच रूपकात्मक नांव आहे हें सर्व लोकांस समजलें म्हणजे विष्णूवर तरी भक्ति कशी राहणार? कारण आज सूर्य, चंद्र यांची उपासना कोणी करीत नाहीं. पूर्वीं समाजांतील एका शास्त्रज्ञवर्गांत असलेलें ज्ञान सार्वत्रिक झालें म्हणजे पूर्वीं तें एका अत्यंत लहान वर्गांत असल्यामुळें इतर वर्गांतील लोकांच्या अज्ञानांवर कांहीं लोकांस आपला जीवनक्रम कंठण्यास मदत होत होती ती देखील बंदच पडत चालली आहे.
कोणत्या गोष्टी जातील हें सांगितलें, तसें टिकेल काय याचा विचार केला पाहिजे. हिंदुसमाजांत परस्परांस बांधणार्या अशा गोष्टी कांहींच टिकल्या नाहींत तर ती गोष्ट मोठी नुकसानीची होईल. ख्रिस्ती व मुसुलमान हे मात्र पृथकपणें स्वतंत्र राहतील. त्यांस एकत्र बाधणार्या ख्रिस्त आणि महंमद या दोन्ही व्यक्ति ऐतिहासिक आहेत, आणि त्या व्यक्तींविषयीं असणारा आदर त्यांस एकत्र ठेवील. हिंदूंचा त्यांच्याविषयीं वाटणारा विटाळ मात्र जाईल. हिंदूंस एकत्र बांधणार्या दोर्या ढिल्या व्हावयाच्या आणि मुसलमानांचा विटाळ नाहीं ही कल्पना दृढ होत जावयाची या हिंदूंच्या विचारविकासाचा परिणाम मुसुलमान व ख्रिस्ती यांची संख्या वाढविण्यासाठींच होईल काय?
ही शक्यता आहे पण संभाव्यता नाहीं. ही गोष्ट खरोखरीच घडून येण्यास अडचणी पुष्कळ आहेत. एक तर विटाळाची कल्पना नाहींशी होण्यास व ऐतिहासिक पुरुषापासून किंवा सृष्टिचमत्कारापासून उत्पन्न झालेल्या आणि पौराणिक कथांनीं गाइलेल्या दैवतांवरचा विश्वास उडण्यास बरीच विचारजागृति अवश्य होते. ही विचारजागृति एकाएकीं होत नाहीं. ज्या समाजामध्यें निरक्षरताच पुष्कळ आहे आणि ज्यांत शंभरपर्यंत आंकडेहि मोजतां येत नाहींत असा वर्ग पुष्कळ आहे. तो समाज परंपरेपासून एकदम तुटेल कसा? शिवाय ईश्वरविषयक स्वतंत्र कल्पना उत्पन्न करील आणि ऐतिहासिक स्वरूपाशीं परिचय करील इतकी विचारजागृति उत्पन्न होण्यापूर्वींच, इतिहासाच्याच ज्ञानामुळें देशांत आत्मीय भावनाहि तीव्रतेनें तीच ऐतिहासिक विचारशक्ति जागृत करील. आत्मीय भावनेनें जेव्हां पुढील पिढी आपल्या ग्रंथांविषयीं अभिमान धरील, तेव्हां सर्व जुन्या ग्रंथामध्यें अभिमान धरण्याजोगा भागहि पुष्कळच आहे, हें त्यांच्या मनाव ठसेल.
पुढील पिढीस ज्याबद्दल अभिमान बाळगता येईल अशा गोष्टी आपल्या वाङ्मयांत थोड्या थोडक्या नाहींत. वेदांचें अतिप्राचीनत्व, उपनिषदांतील गंभीर विचार, जैमिनीची शब्दप्रामाण्यावरून अनुमानपरंपरा काढण्याची विचारपद्धति, पुराणांत गाइलेल्या पुरुषांचीं मनोहर चरित्रें, लोकांपुढें ध्येयरूप होतील अशा थोर स्त्रीपुरुषांचीं चरित्रें, तीं समजावून देण्यासाठीं उत्पन्न झालेलें महाभारतांतील नीतिशास्त्र, वाल्मीकिचा काव्यावेश, या सर्व गोष्टी अभिमानास कारण होऊन लोकांची पूज्यताबुद्धि जरी नाहीं तरी प्रेम हें खास रक्षितीलच. आज आपणांस एखादा मनुष्य मुसुलमान झाला तर दुःख होतें, याचें कारण तो अनेक दैवतें सोडून एकाच निराकार देवाची उपासना करितो हें नव्हे; किंवा कुलस्वामिनीस, पितरांस, सर्पांस किंवा कावळ्यांस बळी देत नाहीं, श्रावणी करीत नाहीं किंवा श्राद्ध करीत नाहीं हेंहि नव्हे. आपणांस दुःख जें होतें तें तीन कारणांमुळें होतें. एकतर तो स्वजातीस मुकतो, एवढेंच नव्हे तर तो स्वजातिनाशक संघास मिळतो आणि आपण ज्यास भ्रष्ट आचार समजतों त्यांचा तो अवलंब करितो आणि कालांतरानें त्याचे वंशज वेद, इतिहास, पुराणें यांपासून दूर जाणार म्हणून होय. असें शक्य आहे कीं, ज्यास आजचे लोक भ्रष्ट आचार समजतात आणि ज्यास परकीय लोक भ्रष्ट आचार समजत नाहींत असे आचार आपल्या समाजांत वृद्धिंगत होतील. गोमांसाहार वेदविहित व सूत्रविहित आहे ही गोष्ट लोक वेदग्रंथ व सूत्रग्रंथ स्वतःच वाचूं लागले म्हणजे कशी लपून राहील? ही शक्यता मनांत ठेवली तर बाह्यांचा तिरस्कार करविणार्या गोष्टींपैकीं एक गोष्ट गळेल आणि हिंदूचा मुसुलमान झाला तर ज्या गोष्टीमुळें दुःख होईल अशा दोनच गोष्टी उरणार. त्यांतील पहिली गोष्ट म्हणजे तो विरुद्ध समाजांत जाणार. ही आपणास दुःखकारक वाटण्यास दोनच कारणें दिसतात. एक मुसुलमानांशीं हिंदूंचें असादृश्य आणि दुसरें स्वसंघांत पुनरागमनाची अशक्यता. ही अशक्यता पूर्ण असल्यामुळें एखादा मनुष्य गळाला तर त्याचें दुःख अधिक होतें. तसेंच तो परकीय संस्कृतीच्या पटलाखालीं असेलला बनेल आणि आपल्या ग्रंथांचें पुढें मागें महत्त्व नाहींसें करून टाकण्यास जो संघ बद्धपरिकर आहे त्या संघामध्यें अंतर्भूत होईल एवढें एक भय उरतें.
उपास्याच्या भिन्नतेविषयीं उदासीन आणि बाह्यांसारखेच किंवा बाह्यसमाजापासून अतिशय भिन्न नाहीं असे आचारविचार असलेल्या समाजाला आपलें विशिष्टत्व ज्यामुळें भासेल आणि ज्या विशिष्टत्वास सोडून कोणी परकीय समाजास मिळाला तर दुःख होईल अशी गोष्ट शेवटीं निघते ती पूर्वजांविषयीं, संस्कृत भाषेविषयीं आणि संस्कृत ग्रंथांविषयीं अभिमान ही होय. जें आपणांस रक्षणीय आहे आणि जें रक्षण करितां येईल अशी गोष्ट एवढीच आहे. संस्कृतींतील बाकीच्या सर्व गोष्टी म्हणजे आचारविचार आणि दैवतें नष्ट झालीं किंवा टिकलीं तरी त्यापासून हरकत होणार नाहीं. एवढें टिकलें आणि बाकी सर्व गोष्टी हिंदूसमाज अनवश्यक किंवा कमी महत्त्वाच्या मानूं लागला तर समाजास बळकटी येईल कीं दौबर्ल्य येईल याचा विचार वाचकांनीं करावा.
एवंच विचारविकासाचा परिणाम परसमाजपोषक व्हावायाचा नाहीं तर मनुष्य अधिक निर्भयतेनें वागूं लागेल. एवढें मात्र खरें कीं जुन्याचा अभिमानी वर्ग नष्ट होत जाईल. आज जुन्याचा अभिमानी म्हणून म्हणविणार्या वर्गाला विशेषेंकरून भिक्षुक वर्गाला ग्रंथांची फारशी ओळख नसते. याचा परिणाम एवढाच दिसतो कीं त्याचा अभिमानी म्हणून जो वर्ग पुढें यावयाचा तो फार दुर्बल होत आहे.
समाजांतील सुशिक्षितवर्गांत खुळ्या समजुती राहणार नाहींत असें नाहीं. आपणांस यूरोपांत आणि अमेरिकेंत कालेजांतील शिक्षण ज्यांनीं मिळविलें आहे अशा कांहीं लोकांचा देखील फलज्योतिषावर आणि पत्ते पाहून भविष्यसांगण्याच्या शक्तीवर विश्वास असतो असें दिसतें. जगांत असे अनेक विषय आहेत कीं ज्यांची कार्यकारणमालिका आपणांपैकीं अत्यंत विद्वान अशा शास्त्रज्ञास माहीत नाहीं. सामान्य मनुष्याची अशी समजूत असते कीं ज्या गोष्टी आपल्या स्थूल दृष्टीस परस्परांशीं असंबद्ध अशा वाटतात त्या खरोखर संबद्ध असतात. मात्र त्या दोहोंचा संबंध जोडणारे सृष्टिनियम आपणांस माहित नाहींत एवढेंच. येशू ख्रिस्त हा त्याच्या आईच्या कौमार्याचा भंग होण्यापूर्वींच गर्भीं राहिला या कल्पनेवर पुष्कळ प्राणिशास्त्रवेत्त्यांचा देखील विश्वास आहे. ते म्हणतात कीं ज्या नियमांनीं ही गोष्ट घडून आली ते नियम आपणांस ठाऊक नाहींत असें म्हणा. या तर्हेची वृत्ति आली म्हणजे शकुनांवर आणि फलज्योतिषांवर भरवंसा उत्पन्न होतो. ज्ञानाची पूर्णता कधींच होणें शक्य नाहीं. जगांत कांहीं गोष्टी तरी अज्ञात राहणारच आणि जेव्हां वस्तूविषयक अज्ञान असतें तेव्हां स्वैर कल्पनेस क्षेत्र मिळतें. ज्ञानाचा संचय जितका वाढत जाईल तितकें तें सामान्य जनापासून अधिक दूर होत जाईल आणि अंधविश्वासास क्षेत्र राहील.
शास्त्रज्ञानाच्या विकासामुळें श्रद्धा जर कमी होत जाईल तर हिंदूंचें विशिष्टत्व नाहींसें होऊन देशाचें सामान्यपणें नुकसानच होईल असें मानणारेहि कांहीं श्रद्धाभक्त आहेत! असो.
हिंदुसमाजांत अनेक महत्त्वाचे फेरफार होऊन समाजाला हळू हळू निराळें स्वरूप येणार ही गोष्ट गेल्या १०० वर्षांत स्पष्ट झाली आहे. परंपरागत आचार नष्ट होण्याच्या पंथास लागून गेले तरी हिंदूंचा अभिमान गेला नाहीं आणि तो जावयाचाहि नाहीं. आपणांपुढें प्रश्न येतो तो हाच कीं, आपल्या व मुसुलमान आणि ख्रिस्ती समाजांचे संबंध इतःपर कसे होतील. इतर राष्ट्रांशीं सहकारिता करण्यास अडचण करणारी विटाळाची भावना गेली म्हणजे सहकाहिता अधिक होईल हें खरें, पण त्यामुळें सर्व समाज एकत्र होतात असें नाहीं. सर्व समाजांस एकत्र होण्यास कांहीं तरी सामान्य परंपरा लागते आणि कांहीं तरी हिताहिताचें ऐक्य लागतें. सामान्य परंपरा अशी आज थोडीच आहे. इतिहास म्हणजे पूर्वींच्याच भांडणांचा हिशोब होय. तसेंच सहकार्य असें आपलें आज फारच थोडें झालें आहे. आज जरी झालें नाहीं, तरी पुढें होईल अशी आशा करण्यास जागा आहे. कां की, सर्व लोकांत एकत्र होऊन काम करण्याची संधि उर्फ स्वराज्याचे हक्क सोळा आणे नाहीं तरी आणा दोन आणे मिळाले आहेत. लोकांस राष्ट्रसंवर्धनाची सामान्य नीति उत्पन्न करण्यास हे हक्क प्रेरक होतील असे वाटते. याशिवाय सार्वजनिक शिक्षणाची प्रगती होत जाणार हें आजच्या लोकांच्या शिक्षणार्थ होणार्या धडपडीवरून निदान आक्रोशावरून स्पष्ट होत आहे. जे समाज अल्पसंख्याक असतात त्यांनां सर्व जनतेहून आपण भिन्न आहोंत ही भावना उत्पन्न करणारा आणि सर्व जनतेशीं फटकून वागण्यास शिकविणारा चोरटा व बेजबाबदार राजा किंवा सत्ताधारी समूह लागत असतो. हा समूह आपलें विशिष्ट व्यक्तिहित किंवा अल्पसामुच्चयिक हित सर्व जनतेच्या हितास दुर्लक्षून साध्य करून घेण्यासाठीं धडपडत असतो. आणि आपल्या स्थानापासून उत्पन्न होणार्या बेसुमार फायद्याचा वांटेकरी अल्पसंख्याकांस करितो. त्याच्या शिकवणीमुळें अल्पसंख्याक किंवा देशावर राज्य करण्यासाठीं भाडोत्री आणलेले परके लोक आपलें हित सर्व जनतेच्या विरुद्ध आहे असें ओळखतात. परंतु लोकसत्तेची जसजशी वाढ होत जाते तसतशी अल्पसंख्याकांस आपलें जनताविरोधी भिन्नत्व काढून टाकण्याची इच्छा होते. इंग्लडवर जर तुर्कांचें राज्य असतें तर तेथील यहुदी लोकांस ख्रिस्ती लोकांपासून आपण किती भिन्न आहोंत हें वारंवार सांगण्याची स्फूर्ति झाली असती आणि मुसुलमानी आणि यहुदी धर्मांत, म्हणजे आचारांत व कल्पनांत निकट साम्यतेचा त्यांनां पत्ता लागला असता आणि ख्रिस्ती सुपरस्टिशनचें (खुळ्या समजुतींचें) वारंवार आश्चर्य वाटलें असतें. लोकसत्तेची वाढ परकीय लोकांस देश्य समाजामध्यें विलीन होण्यास मोठी द्रावक आहे. अशी आशा आहे कीं, हिंदुस्थानामध्यें लोकसत्तेची जसजशी वाढ होत जाईल तसतशी परकीयांचें परकीयत्व घालविण्यास साहाय्यक असी वृत्ति परकीयांतच जन्मास येईल. असो. या प्रसंगीं आपली बाह्यंसंबधानें वृत्ति कशी काय पाहिजे व होईल हें स्पष्ट केलें पाहिजे.