प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण १३ वें.
स्पर्धाक्षेत्राकडे पुन्हां एकदां.
आमचें बाह्यांसंबधाने कर्तव्यकर्म. - चातुर्वर्ण्याच्या बाहेरील जे लोक ते बाह्य लोक. हिंदुस्थानांत जे बाह्य लोक आहेत, त्यांपैकीं मुसुलमान, ख्रिस्ती, पारशी, यहुदी, बेनेइस्त्रायल इत्यादि प्रमुख आहेत. ख्रिस्त्यांमध्यें संस्कृतिभेदानें जे वर्ग पाडतां येतील ते येणेंप्रमाणेः (१) मलबारकडील सीरियन ख्रिस्ती, (२) अलीकडे म्हणजे गेल्या शतकांत ख्रिस्ती संप्रदायांत शिरलेले लोक व पोर्तुगीज लोकांनीं बाटविलेले म्हणजे आमच्यांकडून ओढून घेऊन स्वतःच्या संप्रदायांत नेलेले लोक. अलीकडे ख्रिस्ती झालेले आणि पोर्तुगीज लोकांच्या अंमलाखालीं ख्रिस्ती झालेले यांच्यामध्यें एक संस्कृतिभेद आहे तो हा कीं, पोर्तुगीज ख्रिस्ती लोक हिंदु संस्कृतीपासून जितके च्युत झाले आहेत तितके अलीकडे ख्रिस्ती झालेले जे प्रॉटेस्टंट ख्रिस्ती ते च्युत झाले नाहींत. या भेदास महत्त्वाचीं कारणें आहेत. एक मुख्य कारण म्हटलें म्हणजे संप्रदायविशिष्ट समुच्चयभाव कॅथोलिक लोकांत जितका जागृत आहे तितका प्रॉटेस्टंटांत नाहीं. कॅथोलिक संप्रदायांतील लोकांत प्रॉटेस्टंटांपेक्षां बंधुत्व अधिक तीव्रत्वानें जागृत असतें. इंग्रज कॅथोलिकानें जावानीज कॅथोलिक बाईबरोबर लग्न करण्यास हरकत नाहीं. पण इंग्रज प्रॉटेस्टंटाबरोबर होतां होई तों लग्न करूं नये व करावयाचें असल्यास कॅथोलिक संप्रदायाचे संस्कार व शिक्षण देऊं अशी कबुलायत करून घेऊन मग लग्न करावें असा कॅथोलिक मठाचा आग्रह आहे.
दुसरें कारण म्हटलें म्हणजे कॅथोलिक संप्रदायामध्यें संस्कार, विधी, यांचें पुष्कळ प्राबल्य असतें व यामुळें पृथ्वीवरील निरनिरळ्या भागांतील कॅथोलिक मठाचा नेहमीं असा उद्देश होता कीं, जाति, राष्ट्र इत्यादिक गोष्टींमुळें मनुष्यामनुष्यांत जो निराळेपणा आलेला असतो तो नाहींसा करावा; आपल्या विधिसंस्कारांचा प्रचार करून लोकांत सारखेपणा आणावा; जीं नैतिक बंधनें मठास मान्य असतील तींच चोहोंकडे पसरवावीं; ख्रिस्ती लोकांच्या पवित्र ग्रंथांतील वाक्यांचा कॅथोलिक संप्रदायाचे अधिकारी जो अर्थ लावतील तोच इतरांनीं मान्य करावा व बायबलचा अर्थ लावण्यांत स्वतःची अक्कल चालवूं नये एवंच सामान्य विधी रीतिरिवाज, संस्कार व नीतिशास्त्र यांनीं कॅथोलिक संप्रदायांत एकस्वरूपता पुष्कळ आणिली व निरनिराळ्या राष्ट्रांतील परंपरागत चालीरीतींवर व भिन्नत्वावर वरवंटा फिरविला. जगांतील सर्व भाषांस प्राकृतासमान लेखून कॅथोलिक संप्रदायांतर्गत सर्व लोकांचें नागरवाङ्मय लॅटिनमध्यें ठेवावें व अनारवाङ्मय म्हणजे शूद्रांकरितां निर्माण केलेले ग्रंथ, इंग्रजी, फ्रेंच, मराठी, कोंकणी इत्यादि प्राकृतांत करावे असा कॅथोलिक मठाचा आग्रह आहे.
जगांतील सध्यांच्या सर्व प्रचलित भाषांस कॅथोलिक संप्रदाय अजून तुच्छतेनें वागवितो व त्यांच्या संप्रदायांतील मंत्र, उपासनावाक्यें, हीं सर्व लॅटिनमध्यें असतात. म्हणजे सध्यांच्या प्राकृत भाषांपैकीं एका भाषेचा वरचष्मा दुसर्या भाषेवर ठेवावा या तत्त्वास कॅथोलिक संप्रदायानें फारशी अगर कोठेंच सहानुभूति दाखविली नाहीं.
राष्ट्रीय विभक्तपणास हा कॅथोलिक संप्रदाय फार विरोध करितो. इटालियन लोकांच्या राष्ट्रीय आकांक्षांस या संप्रदायाच्या अधिकार्यांनीं फारच विरोध दाखविला व हिंदुस्थानांतील कॅथोलिक लोकांस खरे हिंदी बनविण्याचा आपण प्रयत्न करीत असतां हा संप्रदाय बराच आडवा येईल असा संभव दिसतो. जर आपण येथील गोवानीच व इतर कॅथोलिक लोकांस लॅटिनऐवजीं संस्कृत शिकण्याचा उपदेश केला तर कॅथोलिक “चर्च” उर्फ मठ फारच विरोध करील. कॅथोलिक मठ संस्कृत शिकूं नका असें म्हणणार नाहीं, पण लॅटिन शिकण्याचा आग्रह धरील व तेणेंकरून हिंदी राष्ट्रीयत्वाला अडथळा करील.
कॅथोलिक “चर्च” चें समाजिक धोरण वर स्पष्ट केलें आहे. त्याचें मनन केलें असतां एतद्देशीय कॅथोलिक ख्रिस्ती व पोर्तुगीज लोक यांच्यामध्यें सारखेपणा कां वाढावा आणि हिंदूंच्या संस्कतीपासून प्रॉटेस्टंट ख्रिस्त्यांपेक्षां हें गोवानीज ख्रिस्ती अधिक भिन्न कां व्हावे याचें कारण लक्षांत येईल.
गोवानीज लोकांचें समाजस्वरूप येथील एतद्देशीय संस्कृतीपासून अधिक च्युत कां व्हावें यास आणखी एक कारण आहे. काळागोरा हा भेद इंग्रजांस जितका भासतो तितका पोर्तुगीजांस भासत नव्हता व पोर्तुगीज लोक एतद्देशीय ख्रिस्ती लोकांशीं लग्नव्यवहार करीत. गोर्या लोकांनीं काळ्या लोकांशीं लग्न लावूं नये यासंबंधानें इंग्रजांचा कटाक्ष किती आहे हें आपणांस फारसें स्पष्ट करावयास नको. पोर्तुगीज सरकारची यासंबंधानें वृत्ति अगदीं निराळीं होती. खुद्द पोर्तुगीज सरकार पोर्तुगीज वसाहतींतील नेटिव्हांनीं पोर्तुगीज मुलींबरोबर लग्नें लावावीं म्हणून खटपट करीत असे. एकदां तर पोर्तुगाल देशाच्या सरकारनें आपल्या आफ्रिकन वसाहतींतील निग्रोंबरोबर लग्न लावण्यास ज्या मुली तयार होतील त्यांस आम्ही इतकी इतकी जमीन देऊं अशी लालूच दाखवून हजारों पोर्तुगीज मुली पूर्व आफ्रिकेंत पाठवून दिल्या व त्यांचीं निग्रोबरोबर लग्नें लावून दिलीं. (Keane’s Africa, London, 1895- ‘Stanford’s Compendium of Geography) हिंदुस्थानांत देखील गोवानीज लोकांस पूर्ण पोर्तुगीज बनविण्यास गोवे सरकारनें अनेक आमिषें दाखविलीं होतीं. पुष्कळ हिंदूंनां मोठमोठे पोर्तुगीज सरकार दत्तक घेत. “आलमिडा,” “आलबुकर्क” या नांवांचा येथील गोवानिजांमध्यें जो बराचसा सुकाळ झाला आहे त्याचें कारण हेंच आहे.