प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण १३ वें.
स्पर्धाक्षेत्राकडे पुन्हां एकदां.
आमचें बाह्यांसंबधाने कर्तव्यकर्म. - चातुर्वर्ण्याच्या बाहेरील जे लोक ते बाह्य लोक. हिंदुस्थानांत जे बाह्य लोक आहेत, त्यांपैकीं मुसुलमान, ख्रिस्ती, पारशी, यहुदी, बेनेइस्त्रायल इत्यादि प्रमुख आहेत. ख्रिस्त्यांमध्यें संस्कृतिभेदानें जे वर्ग पाडतां येतील ते येणेंप्रमाणेः (१) मलबारकडील सीरियन ख्रिस्ती, (२) अलीकडे म्हणजे गेल्या शतकांत ख्रिस्ती संप्रदायांत शिरलेले लोक व पोर्तुगीज लोकांनीं बाटविलेले म्हणजे आमच्यांकडून ओढून घेऊन स्वतःच्या संप्रदायांत नेलेले लोक. अलीकडे ख्रिस्ती झालेले आणि पोर्तुगीज लोकांच्या अंमलाखालीं ख्रिस्ती झालेले यांच्यामध्यें एक संस्कृतिभेद आहे तो हा कीं, पोर्तुगीज ख्रिस्ती लोक हिंदु संस्कृतीपासून जितके च्युत झाले आहेत तितके अलीकडे ख्रिस्ती झालेले जे प्रॉटेस्टंट ख्रिस्ती ते च्युत झाले नाहींत. या भेदास महत्त्वाचीं कारणें आहेत. एक मुख्य कारण म्हटलें म्हणजे संप्रदायविशिष्ट समुच्चयभाव कॅथोलिक लोकांत जितका जागृत आहे तितका प्रॉटेस्टंटांत नाहीं. कॅथोलिक संप्रदायांतील लोकांत प्रॉटेस्टंटांपेक्षां बंधुत्व अधिक तीव्रत्वानें जागृत असतें. इंग्रज कॅथोलिकानें जावानीज कॅथोलिक बाईबरोबर लग्न करण्यास हरकत नाहीं. पण इंग्रज प्रॉटेस्टंटाबरोबर होतां होई तों लग्न करूं नये व करावयाचें असल्यास कॅथोलिक संप्रदायाचे संस्कार व शिक्षण देऊं अशी कबुलायत करून घेऊन मग लग्न करावें असा कॅथोलिक मठाचा आग्रह आहे.
दुसरें कारण म्हटलें म्हणजे कॅथोलिक संप्रदायामध्यें संस्कार, विधी, यांचें पुष्कळ प्राबल्य असतें व यामुळें पृथ्वीवरील निरनिरळ्या भागांतील कॅथोलिक मठाचा नेहमीं असा उद्देश होता कीं, जाति, राष्ट्र इत्यादिक गोष्टींमुळें मनुष्यामनुष्यांत जो निराळेपणा आलेला असतो तो नाहींसा करावा; आपल्या विधिसंस्कारांचा प्रचार करून लोकांत सारखेपणा आणावा; जीं नैतिक बंधनें मठास मान्य असतील तींच चोहोंकडे पसरवावीं; ख्रिस्ती लोकांच्या पवित्र ग्रंथांतील वाक्यांचा कॅथोलिक संप्रदायाचे अधिकारी जो अर्थ लावतील तोच इतरांनीं मान्य करावा व बायबलचा अर्थ लावण्यांत स्वतःची अक्कल चालवूं नये एवंच सामान्य विधी रीतिरिवाज, संस्कार व नीतिशास्त्र यांनीं कॅथोलिक संप्रदायांत एकस्वरूपता पुष्कळ आणिली व निरनिराळ्या राष्ट्रांतील परंपरागत चालीरीतींवर व भिन्नत्वावर वरवंटा फिरविला. जगांतील सर्व भाषांस प्राकृतासमान लेखून कॅथोलिक संप्रदायांतर्गत सर्व लोकांचें नागरवाङ्मय लॅटिनमध्यें ठेवावें व अनारवाङ्मय म्हणजे शूद्रांकरितां निर्माण केलेले ग्रंथ, इंग्रजी, फ्रेंच, मराठी, कोंकणी इत्यादि प्राकृतांत करावे असा कॅथोलिक मठाचा आग्रह आहे.
जगांतील सध्यांच्या सर्व प्रचलित भाषांस कॅथोलिक संप्रदाय अजून तुच्छतेनें वागवितो व त्यांच्या संप्रदायांतील मंत्र, उपासनावाक्यें, हीं सर्व लॅटिनमध्यें असतात. म्हणजे सध्यांच्या प्राकृत भाषांपैकीं एका भाषेचा वरचष्मा दुसर्या भाषेवर ठेवावा या तत्त्वास कॅथोलिक संप्रदायानें फारशी अगर कोठेंच सहानुभूति दाखविली नाहीं.
राष्ट्रीय विभक्तपणास हा कॅथोलिक संप्रदाय फार विरोध करितो. इटालियन लोकांच्या राष्ट्रीय आकांक्षांस या संप्रदायाच्या अधिकार्यांनीं फारच विरोध दाखविला व हिंदुस्थानांतील कॅथोलिक लोकांस खरे हिंदी बनविण्याचा आपण प्रयत्न करीत असतां हा संप्रदाय बराच आडवा येईल असा संभव दिसतो. जर आपण येथील गोवानीच व इतर कॅथोलिक लोकांस लॅटिनऐवजीं संस्कृत शिकण्याचा उपदेश केला तर कॅथोलिक “चर्च” उर्फ मठ फारच विरोध करील. कॅथोलिक मठ संस्कृत शिकूं नका असें म्हणणार नाहीं, पण लॅटिन शिकण्याचा आग्रह धरील व तेणेंकरून हिंदी राष्ट्रीयत्वाला अडथळा करील.
कॅथोलिक “चर्च” चें समाजिक धोरण वर स्पष्ट केलें आहे. त्याचें मनन केलें असतां एतद्देशीय कॅथोलिक ख्रिस्ती व पोर्तुगीज लोक यांच्यामध्यें सारखेपणा कां वाढावा आणि हिंदूंच्या संस्कतीपासून प्रॉटेस्टंट ख्रिस्त्यांपेक्षां हें गोवानीज ख्रिस्ती अधिक भिन्न कां व्हावे याचें कारण लक्षांत येईल.
गोवानीज लोकांचें समाजस्वरूप येथील एतद्देशीय संस्कृतीपासून अधिक च्युत कां व्हावें यास आणखी एक कारण आहे. काळागोरा हा भेद इंग्रजांस जितका भासतो तितका पोर्तुगीजांस भासत नव्हता व पोर्तुगीज लोक एतद्देशीय ख्रिस्ती लोकांशीं लग्नव्यवहार करीत. गोर्या लोकांनीं काळ्या लोकांशीं लग्न लावूं नये यासंबंधानें इंग्रजांचा कटाक्ष किती आहे हें आपणांस फारसें स्पष्ट करावयास नको. पोर्तुगीज सरकारची यासंबंधानें वृत्ति अगदीं निराळीं होती. खुद्द पोर्तुगीज सरकार पोर्तुगीज वसाहतींतील नेटिव्हांनीं पोर्तुगीज मुलींबरोबर लग्नें लावावीं म्हणून खटपट करीत असे. एकदां तर पोर्तुगाल देशाच्या सरकारनें आपल्या आफ्रिकन वसाहतींतील निग्रोंबरोबर लग्न लावण्यास ज्या मुली तयार होतील त्यांस आम्ही इतकी इतकी जमीन देऊं अशी लालूच दाखवून हजारों पोर्तुगीज मुली पूर्व आफ्रिकेंत पाठवून दिल्या व त्यांचीं निग्रोबरोबर लग्नें लावून दिलीं. (Keane’s Africa, London, 1895- ‘Stanford’s Compendium of Geography) हिंदुस्थानांत देखील गोवानीज लोकांस पूर्ण पोर्तुगीज बनविण्यास गोवे सरकारनें अनेक आमिषें दाखविलीं होतीं. पुष्कळ हिंदूंनां मोठमोठे पोर्तुगीज सरकार दत्तक घेत. “आलमिडा,” “आलबुकर्क” या नांवांचा येथील गोवानिजांमध्यें जो बराचसा सुकाळ झाला आहे त्याचें कारण हेंच आहे.
येथील एतद्देशीय ख्रिस्त्यांचा परक्या देशांतील लोकांशीं जितका जितका निकट संबंध येतो, तितका तितका एतद्देशीयांशीं त्यांचा संबंध कमी कमी होऊं लागतो. हिंदुस्थानांतील इंग्रज लोक येथील प्रॉस्टेटंट ख्रिस्ती लोकांस “काला अदमी” प्रमाणेंच वागवितात व यामुळें ख्रिस्ती लोकांस हिंदूंशीं अधिक संबंध ठेवणें भाग पडतें. प्रॉटेस्टंट मिशनर्यांनीं ख्रिस्ती लोकांस इंग्रजांचें अनुकरण करण्यास फारसें उत्तेजन दिलें नाहीं. कारण अनुकरणेच्छा उत्पन्न झाली म्हणजे तिच्याहूनहि जी अधिक भयंकर (अर्थात् त्यांच्या दृष्टीनें) “समतेची इच्छा” ती उत्पन्न होईल, व समतेची इच्छा “नेटिव” ख्रिस्ती लोकांत उत्पन्न होऊं लागावी हें त्यांनां अधिक भयप्रद वाटतें. हिंदू लोकांची जातिवषयक “सुपरस्टिशन” त्यांस ख्रिस्ती करून टाकून घालवून देण्याचा मिशनरी लोकांचा उद्देश आहे हें खरें ; पण ख्रिस्ती झाल्यानें परिणाम असा होत आहे कीं, जे लोक हिंदू असतां इंग्रजांचा विटाळ मानीत व सोंवळ्याओंवळ्याच्या बाबतींत तरी त्यांनां महारांसमान लेखीत त्या लोकांस इंग्रज हे कोणी उच्च, थोर ब्राह्मणापलीकडचे ब्राह्मण आहेत असें भासूं लागतें, व यामुळें साहेबांचे “बटलर” होण्यास तयार असा वर्ग वाढतो.
हिंदुस्थानांतील ख्रिस्त्यांस पारमार्थिक विचारांत यूरोपीय लोकांवर अवलंबून राहणें रूचत नाहीं. ख्रिस्ती संप्रदायामध्यें उत्पन्न झालेला देशाभिमान ज्या कांहीं गोष्टींत व्यक्त होत आहे त्या येणेंप्रमाणेः ब्रह्मदेशांतील करेण स्वतःचा उपासनासंघ म्हणजे चर्च स्थापन करीत आहेत. त्रावणकोरमध्यें यूयोमयं नांवाचा जो संप्रदाय स्थापन झाला आहे तो बायबलविषयीं प्रामाण्यबुद्धि ठेवितो, तथापि संप्रदाय संस्थापकाच्या घराण्याशिवाय परमार्थाच्या बाबतींत दुसर्या कोणाचाहि अधिकार मान्य करीत नाहीं, आणि त्यांच्या क्रिया व कर्में हीं ब्राह्मणपद्धतीवर आहेत. महाराष्ट्रमध्यें संकीर्तनें आणि भजन यांस प्रामुख्य देण्याकडे ख्रिस्ती मंडळीनीं प्रवृत्ति दाखविली आहे. त्याप्रमाणें भारतीय पोषाख करण्याचा व आपल्या मुलांनां यूरोपीय नांवे ठेवण्यापेक्षां भारतीय नांवेंच ठेवावीं अशा प्रकारचा उपदेशहि इकडील विद्वान ख्रिस्ती देश्य ख्रिस्त्यांस व्याख्यानाद्वारा करतांना आढळतात.
ख्रिस्ती संप्रदायाच्या प्रसाराविषयीं आपणांपैकीं पुष्कळांस जें वैषम्य वाटतें त्याचें कारण पारमार्थिक नसून सामाजिक आहे. ख्रिस्तानें केलेला उपदेश अनीतीचा प्रवर्तक आहे असें आपलें मत नाहीं व त्याचें अवलंबन केल्यानें मनुष्य खास दुर्गतीस जाईल असें आपणांस वाटतें असेंहि नाहीं. ख्रिस्ती संप्रदायाचा द्वेष व त्या संप्रदायाच्या ‘प्रसाराचा’ द्वेष या दोन गोष्टी आहेत. आमचें भांडण संप्रदायाशीं नाहीं. त्याच्या प्रसाराशीं आहे; व त्याचें मुख्य कारण हें आहे कीं, या संप्रदायाच्या प्रसाराबरोबर एक सामाजिक अनिष्ट परिणाम घडून येतो. तो हा कीं, आमचें बौद्धिक स्वावलंबन नाहींसें होऊन परावलंबन उत्पन्न होतें व परके लोक सामाजिक दृष्ट्या उच्च वर्गांत मोडतात. आमच्यांतील नास्तिक व हिंदूंच्या परंपरागत दैवतांवर विश्वास न ठेवणार्या लोकांस देखील ख्रिस्ती संप्रदायाचा हिंदुस्थानांत प्रसार झालेला आवडणार नाहीं.
गोवानीज ख्रिस्ती आणि प्रॉटेस्टंट ख्रिस्ती यांची तुलना केली असतां आपणांस आढळून येईल कीं, देशी भाषेशीं प्रॉटेस्टंटांचा अधिक परिचय असतो. रेव्हरंड टिळकांसारखा चांगल्या योग्यतेचा कवि प्रॉटेस्टंटांत झाला आहे. प्रॉटेस्टंट ख्रिस्ती स्त्रियांनीं देशी पोषाख सोडला नाहीं व पुष्कळ पुरुषहि उच्च हिंदूंप्रमाणें पोषाख व आचार ठेवण्याचा प्रयत्न करितात. मराठ्यांच्या इतिहासाबद्दल अभिमान बाळगणारे अनेक लोक ख्रिस्ती महाराष्ट्रीयांत सांपडतात. मराठी भाषा बरोबर येत नाहीं म्हणून ज्या महाराष्ट्रीय ख्रिस्त्यांस पूर्वीं गर्व वाटत असे त्यांचा गर्व कमी कमी होऊं लागला आहे. मराठी नाटकें, मराठी कांदबर्या, मराठी वर्तमानपत्रें, इत्यादिकांचें वाचन जसें हिंदूंत होतें तसें ख्रिस्त्यांतहि होतें. राजकीय चळवळीसंबंधानें महाराष्ट्रीय हिंदू आणि ख्रिस्ती या दोहोंमध्यें एकप्रकारची समानवृत्ति देखील दृग्गोचर होते.
आजचें जें मराठी वाङ्मय आहे त्याचा अभ्यासक वर्ग मात्र ख्रिस्ती मंडळांत फारसा आढळत नाहीं. उदाहरणार्थ, कै. विष्णुशास्त्री चिपळुणकर यांच्या निबंधमालेचें वाचन करणारा, तुकारामाच्या अभंगांस आनंदानें गाणारा, इतिहास संशोधक रा. राजवाडे यांच्या ऐतिहासिक लेखांकडे दृष्टि फिरविणारा, मराठी वाङ्मयाचें तात्त्विकदृष्ट्या विवेचन करणारा, व महाराष्ट्रीय संस्कृतीचा अभिमान धरून महाराष्ट्रीय संस्कृतीचें वर्चस्व पुन्हां संस्थापित करावें म्हणून आवेशानें खटपट करणारा अगर निदान बोलणारा मनुष्य ख्रिस्ती समाजांत क्वचितच आढळेल व महाराष्ट्रीय ब्राह्मण ख्रिस्तांमध्यें स्वाभिमानाची ज्योत जरी कधीं कधीं दृष्टीस पडते तरी ती जितकी तेजोमय दिसावी तितकी दिसत नाहीं. या स्थितीचें कारण केवळ ख्रिस्ती मंडळीचा हेकेखोरपणा व देशाभिमानशून्यता नव्हे; तर ख्रिस्ती मंडळींपैकीं बराचसा वर्ग असा आहे कीं, त्यांस अगर त्यांच्या वाडवडिलांस ख्रिस्ती होण्यापूर्वीं उच्च प्रकारचा महाराष्ट्रीय संस्कारच प्राप्त झाल नव्हता. शिवाय अर्वाचीन ग्रंथकारांपैकीं व त्यांमध्यें विशेषेंकरून देशाभिमानी म्हणून पुढें आलेल्या ग्रंथकारांपैकीं पुष्कळ लोकांच्या लेखांत ख्रिस्ती मंडळींसंबंधानें द्वेषबुद्धि व मत्सरभाव आहे, असा ख्रिस्ती मंडळींचा समज झाल्याकारणानें त्यांनी हिंदूंनीं लिहिलेले ग्रंथ वाचले नाहींत. यामुळें महाराष्ट्रीय ब्राह्मणांत व इतर उच्चजातीय हिंदूंत अर्वाचीन मराठी वाङ्मयानें ज्या प्रकारच्या कल्पना पसरल्या त्या कल्पना ख्रिस्त्यांमध्यें पसरल्या नाहींत. शिवाय १८१८ सालापूर्वींचे जें मराठी वाङ्मय झालें त्यांत पारमार्थिक अंश प्रामुख्यानें असल्यामुळें व “हिंदुंचें पारमार्थिक वाङ्मय वाचणें हें ख्रिस्ती संप्रदायाच्या विरुद्ध आहे, कारण त्याच्या योगानें खुळी मूर्तिपूजा, खोटीं दैवतें, यांजकडे मनाचा ओढा होईल” अशी ख्रिस्ती लोकांस भीति वाटत असल्यामुळें त्यांच्याकडून त्याहि मराठी वाङ्मयाची उपेक्षा झाली. येथें एवढेंच सांगितलें पाहिजे कीं, ख्रिस्तीसंप्रदायानें अगर तदंतर्गत मठांनीं हिंदु वाङ्मयाचा विटाळ ख्रिस्ती लोकांस बिलकुल होऊं द्यावयाचा नाहीं असा पक्क आग्रह धरिला नाहीं. यास प्रत्यक्ष प्रमाण पाहिजे असेल तर, तुकारामादि हिंदू कवींच्या कृतींतील निवडक पद्यें ख्रिस्ती लोकांच्या उपासनाप्रसंगीं म्हणावयाच्या गीतांमध्यें आढळून येतात हें आहे.
महाराष्ट्रीय ‘प्रॉटेस्टंट’ ख्रिस्ती लोकांस (जे लोक आपणांस मराठी ख्रिस्ती म्हणवितात त्यांस) उत्तम प्रकारचे महाराष्ट्रीय बनविण्यास आपणांस अतिशय आयास पडतील असें नाहीं. जें वाङ्मय पारमार्थिक नाहीं म्हणजे ललित, राजकीय अगर सामाजिक आहे त्या वाङ्मयाचा प्रसार ख्रिस्ती मंडळींमध्यें करावयाच म्हटला व जीं राजकीय व सामाजिक ध्येयें आपणांपुढें असतील तीं मराठी ख्रिस्त्यांपुढें ठेवण्याचा प्रयत्न केला, तर त्यांत यश येईल असें वाटतें. यासंबंधानें आपणांस जे मिशनरी कार्य करावें लागणार तें फारसें कठिण नाहीं. मराठी वाङ्मयांतील जातिद्वेष कमी केला, ख्रिस्तीसंप्रदायाबद्दल चीड आणणारी भाषा आमच्या लेखांतून वगळली व ख्रिस्ती मंडळींपैकीं जे सुशिक्षित आहेत त्यांच्याशीं सामाजिक दळणवळण अधिक वाढविलें, तर ख्रिस्ती लोकांची सामाजिक व राजकिय वृत्ति ‘आपुणासारखी तत्काळ करण्यास काळवेळ आपुणांलागीं’ लागणार नाहीं.
येथें आणखी एक गोष्ट सांगितली पाहिजे. ती ही कीं, महाराष्ट्रीय ख्रिस्त्यांमध्यें देखील महाराष्ट्रभाव वाढत आहे, ही गोष्ट दाखविण्यासाठीं एक दोन उदाहरणें देतों.
मराठी भाषेंत “बायबल” चें भाषांतर जें झालें तें भ्रष्ट मराठींत झालें. त्याच्या वाचनानें नीट अर्थबोध होत नाहीं व भाषेच्या दृष्टीनें तें कमी योग्यतेचें आहे ही गोष्ट अलीकडे महाराष्ट्रीय ख्रिस्ती लोकांस जाणवूं लागली आहे. चांगल्या मराठी भाषेंत ‘बायबल’ उतरावें यासाठीं त्यांची खटपट सुरू आहे.
दुसरी एक गोष्ट म्हटली म्हणजे, ख्रिस्ती प्रार्थनामंदिरांचें व तदंतर्गत प्रार्थनांचें स्वरूप महाराष्ट्रीय नाहीं इकडे त्यांचें लक्ष गेलें आहे; व ख्रिस्ती प्रार्थना आपल्या भजनाच्या पद्धतीवर आणण्यासाठीं त्यांची खटपट सुरू आहे. मधूनमधून मराठी चालीचीं भजनें व किर्तनें करण्याचा ख्रिस्ती मंडळी प्रयत्न करितात; शिवाय सध्यां ख्रिस्ती “चर्च” मधून जीं मराठी गीतें गाइलीं जातात तीं देखील इंग्रजी चालींवर तयार केलेलीं असतात; त्यांच्या ऐवजीं मराठी चालींवर गीतें तयार करून तीं भजनाच्या वेळीं म्हणण्याची ख्रिस्ती मंडळींत खटपट सुरू आहे. मराठी ख्रिस्ती वाङ्मयांतून चर्च शब्द काढून दुसरा कोणता तरी शब्द वापरावा यासंबधींची चळवळ ज्ञानोदयाचे अंक चाळले असतां दिसेल.
गोवानीज ख्रिस्ती लोकांचें महाराष्ट्रीयत्व बहुतेक नष्ट झाल्यासारखें आहे. त्यांस मराठी वाङ्मयाचा व भाषेचा बिलकुल गंध नाहीं, व अगदीं सोपेंसें मराठी पुस्तक जर त्यांच्या हातीं टाकलें तर ज्यांस तें समजेल असा वर्ग त्यांच्यामध्यें फारच थोडा आहे. माझा कमींत कमी दोन अडीचशेंवर गोवानिजांशीं प्रत्यक्ष संबंध आला, तथापि या इतक्या समूहांत ज्यांनां साधारपणें शुद्ध मराठी बोलतां येतें, व ज्यांनीं एखादें तरी मराठी पुस्तक वाचलें असेल असे गोवानीज दोनतीन आढळले असें डॉ. केतकर म्हणतात. मराठी पुस्तकेंच जर हे लोक वाचीत नाहींत व होईल तितकें करून प्रारंभापासूनच इंग्रजी शिकण्याचा व नंतर लॅटिन शिकण्याचा प्रचार जर त्यांच्यामध्यें आहे, तर त्यांच्यामध्यें महाराष्ट्रीय कल्पना कितपत उतरणार!
पोषाखाच्या बाबतींत गोवानीज लोक बरेचसे पाश्चात्त्य झाले आहेत. कांहीं गोवानीज स्त्रिया साड्या वापरतात; परंतु बर्याचशा इंग्रजी पद्धतीचा पोषाख करितात. मुसुलमानी संप्रदायांत प्रवेश झाल्यामुळें मूळचे हिंदू लोक जसे अगदीं पालटून गेले व संस्कृतीनें व अंतःकरणानें हिंदूंपासून अगदीं भिन्न झाले त्याचप्रमाणें गोवानीज लोकांचीहि गोष्ट होय. महाराष्ट्रीय प्रॉटेस्टंट ख्रिस्ती लोक आमच्यामध्यें पुढेंमागें सहज मिसळून जाण्यासारखे आहेत; परंतु गोवानीज लोकांस महाराष्ट्रीय बनवणें हें काम अधिक कठिण आहे व यासाठीं आपणास विशेष खटपट करावी लागेल. या खटपटीमधील मुख्य अंगें येणेंप्रमाणेः-
एक तर खुद्द गोव्यास व जेथें जेथें कोंकणी भाषा आहे अशा ठिकाणीं शुद्ध मराठीच्या शाळा उघडावयाच्या. दुसरें काम म्हटलें म्हणजे महाराष्ट्रीय प्रॉटेस्टंट ख्रिस्ती लोकांत “गोवानीज ख्रिस्त्यांनां महाराष्ट्रीय करणें” हें आपलें कर्तव्यकर्म आहे ही भावना उत्पन्न करून द्यावयाची.
पुढें आपल्या इतिहासाचें व राष्ट्रीय कल्पनांचें वाङ्मय गोवानीज ख्रिस्ती लोकांस समजावें म्हणून कोंकणी भाषेंत तयार करावयाचें व शक्य असल्यास कोंकणी भाषा रोमन लिपींत न लिहिंता नागरी म्हणजे मराठीं लिपींत लिहावी या बाबतींत गोवानिजांचें मन वळवावयाचें व युनिव्हर्सिट्यातून यासंबंधानें गडबड करावयाची. गोवानीज स्त्रीपुरुषांस मराठी भाषेच्या प्रावीण्याबद्दल स्कॉलर्शिपा देऊं करावयाच्या. ख्रिस्ती संप्रदायाचीं पुस्तकें चांगल्या मराठी भाषेंत जर निर्माण झाली तर ख्रिस्ती लोकांमध्यें मराठी भाषेवरील आसक्ति वाढेल. हिंदु समाज व गोवानीज समाज हे पूर्वीं एक असतां ख्रिस्ती संप्रदायाच्या प्रसामामुळें त्यांच्यांत जें एक मोठें खिंडार पडलें आहे तें खिंडार भरून काढण्यासाठीं ज्यांचा मराठेपणा पूर्णपणें गेला नाहीं असा अर्वाचीन महाराष्ट्रीय म्हणजे प्रॉटेस्टंट ख्रिस्ती समूहच उपयोगास लाविला पाहीजे.
ख्रिस्ती लोकांस महाराष्ट्रीय करण्यासाठीं जे उपाय योजावयाचे तेच बेने-इस्त्रायल लोकांस महाराष्ट्रीय करण्यास योजितां येतील. जर कोणी एखाद्या महाराष्ट्रीय विद्वानानें हिब्रू भाषेचा अभ्यास करून व यहुदी लोकांच्या इतिहासाचें अवलोकन करून, निदानपक्षीं यहुदी लोकांसंबधानें इंग्रजींत जें वाङ्मय झालें आहे त्याचा अभ्यास करून, किंवा हेंहि झालें नाहीं तर ‘दि ज्यूइश एनसायक्लोपिडिआ’ सारख्या ग्रंथाचा आधार घेऊन यहुदी लोकांच्या संस्कृतीवर जर मराठींत ग्रंथ लिहिले तर इस्त्रायल लोकांची मराठी भाषेवर आसक्ति वाढविण्यास त्यांचा उपयोग होईल. ख्रिस्ती, यहुदी, मुसुलमान, पारशी इत्यादी लोकांबरोबर लग्नसंबंध करण्यास आपला महाराष्ट्रीय समाज तयार होईल आणि या लोकांबरोबर एखाद्या हिंदूनें लग्नव्यवहार केला असतां त्यास हिंदुसमाजास मुकावें लागणार नाहीं, असा काळ केव्हां येईल तो येवो. सध्यां ती गोष्ट शक्य नाहीं व वरील बाह्य समाज देखील आपल्याशीं लग्न लावावयास तयार होईल असें वाटत नाहीं. याबरोबर हेंही एक तत्त्व लक्षांत ठेविलें पाहिजे कीं, जेव्हा या लोकांशीं शरीरसंबंध केल्यानें हिंदूंच्या समाजाचें बल कमी न होतां वृद्धिंगत होईल तेव्हांच असले संबंध केले पाहिजेत; नाहीं तर आपलीं माणसें गमावून त्या माणसांचा समावेश परक्या समाजांत करवून आपल्या समाजास दुर्बलत्व आणणें हें आपल्याच नाशास कारणीभूत होईल. आपणांपैकीं जे लोक बाह्यांशीं लग्नव्यवहार करितील त्यांनीं आपल्या लोकांच्या मताची पर्वा करावयाची नाहीं असें करूं नये. उलट स्वजनांशीं अधिक निकट संबंध ठेवण्याचा प्रयत्न करावा. हिंदूंच्या लोकमताला तुच्छ लेखावयाचें व त्यापासून अलग रहावयाचें व आम्ही लोकमताची पर्वा न करणारे सुधारक आहों असा टेंभा मिरवावयाचा, असल्या गोष्टी खर्या सुधारकास न शोभतां केवळ खोट्या सुधारकांसच शोभतील. अमुक आचरण जनतेच्या विरुद्ध असलें तरी चांगलें आहें म्हणून ज्या लोकांस तें करावयाचें आहे व ज्या लोकांस लोकमताची पर्वा न करितां पुढें जावयाचें आहे त्यांनीं लोकांस न भितां लोकांच्या मताविरुद्ध जें आचरण त्यांनां करावयाचें असेल तें बेधडक करावे; पण त्यांनीं लोकांपासून अलिप्त न राहतां लोकांतच मिसळण्याचा व लोकांमधील आपलें स्थान कायम राखण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या प्रयत्नांत स्वजनांनीं कितीहि मानखंडना केली तरी ती सोसून समाजांतच राहण्याची व समाजांत मिसळण्याची स्वटपट खर्या समाजभक्तानें केली पाहिजे.
सुधारकांची यासंबंधानें कर्तव्यबुद्धि अधिक जागृत व्हावयास पाहिजे. गेल्या पिढींतील कांहीं सुधारकांनीं उपदेशानें व आचरणानें स्वसमाजापासून अलिप्त राहण्याची व केवळ ख्रिस्तीपारशांत मिसळण्याची व पुन्हां आम्ही समाजापासून अलिप्त राहण्याचा ‘स्वार्थत्याग’ करतों म्हणून ऐट मारण्याची शक्कल काढली होती. त्यांच्या त्या प्रवृत्तीचा स्पष्ट व कठोर अशा शब्दांनीं निषेध केला पाहिजे. गेल्या पिढींतील सुधारक लोक असे म्हणत असतील कीं, समाजापासून अलिप्त राहणें हा स्वार्थत्याग होय; तर आम्ही उलट असें म्हणतों कीं, समाजापासून अलिप्त राहणें व या रीतीनें अपमानाचे प्रसंग चुकविणें हा भंयकर समाजद्रोह होय. खर्या सुधारकांनीं एकीकडे बाह्यांबरोबर आपला संबंध वाढवावा व दुसरीकडे जुन्या लोकांबरोबरचा संबंध होईल तितकें करून पूर्ववत् कायम ठेवावा.
पारशी लोकांची देशी भाषेवर आसक्ति वाढविली पाहिजे. पारशी लोक संस्कृतीनें इंग्रज बनण्याची खटपट करीत आहेत व हिंदूंच्या संस्कृतीचा त्यांस गंधहि नाहीं. जे पारशी अवेस्ता भाषा शिकत नाहींत, ते फारशी अगर फ्रेंच शिकण्याचा प्रयत्न करितात; त्यांनां स्वभाषा देखील बरोबर येत नाहीं. गुजराथी भाषा शुद्ध तर्हेनें लिहितां येण्यास निदान आज तरी संस्कृत भाषेच्या ज्ञानाची आवश्यकता आहे. आज पारशांस संस्कृत येत नाहीं व संस्कृत शब्दांचा उपयोग त्यांस गुजराथी लिहिण्यांत करितां येत नाहीं. जो पारशी संस्कृत शिकतो त्याचा हिंदूंसंबंधानें आदरभाव व प्रेमभाव वाढतो असा अनुभव आहे; यासाठीं पारशी लोकांत संस्कृत भाषेचा अधिक प्रसार करण्यासाठीं खटपट केली पाहिजे.
दुसर्यांमध्यें आपल्या संस्कृतीचा प्रसार करावयाचा हें जर आपल्या मनांत असेल, तर आपण एक गोष्ट केली पाहिजे ती ही कीं, ज्या लोकांत आपण आपलीं मतें अगर संस्था पसरविणार त्या लोकांच्या संस्कृतीची व मनोरचनेची आपणांस उत्तम प्रकारें ओळख पाहिजे व त्यांच्या संस्कृतीचा आपण इतका अभ्यास केला पाहिजे कीं, त्यांच्या संस्कृतीसंबंधानें आपणच मोठे पंडीत होऊन बसूं.
इंग्रजांनीं व इतर यूरोपियनांनीं संस्कृत विद्येची इतकी ओळख करून घेतली आहे व संस्कृत वाङ्मयासंबंधानें इतके ग्रंथ लिहिले आहेत कीं, आज जर एखाद्यास संस्कृतचा उत्तम पंडित बनावयाचें असेल, तर त्यास पाश्चात्त्य लोकांच्या ग्रंथांची ओळख करून घेणें भाग आहे. जो वर्ग एखाद्या विषयासंबंधानें परिश्रम करीत आहे किंवा ग्रंत लिहित आहे त्या वर्गांत आपली मान्यता व्हावी असें नवीन प्रयत्न करणारास वाटतें. संस्कृतादि पौरस्त्य वाङ्मयाचा अभ्यास करतांना आपल्या ग्रंथांची पूर्वींच्या शास्त्रीपंडितांमध्यें मान्यता होऊन त्यांच्याकडून आपणांस शाबसकी मिळवी असें पाश्चात्त्य पंडितांस वाटत असे; व शास्त्री लोकांस ज्यामुळें राग येईल अशीं कृत्यें अगर सुधारणा आपण करूं नयेत असेंहि त्यांस वाटत असे. मोनियर वुइल्यम्सनें आपला संस्कृत कोश जेव्हां प्रसिद्ध केला व त्यांत संस्कृत शब्द लिहिण्यास पवित्र नागरी लिपी सोडून “म्लेच्छ” रोमन लिपीचा उपयोग केला तेव्हां शास्त्री लोकांच्या समजुतीखातर कांहीं वाक्यें लिहिलीं व या प्रयत्नाबद्दल शास्त्री लोकांनीं राग मानूं नये म्हणून विनंतिरूपानें आपल्या कृतीचें समर्थन केलें.
हार्वर्ड युनिव्हर्सिटीचे प्रो. लानमन यांनीं कांहीं संस्कृत ग्रंथ प्रसिद्ध केले व त्यांत लांबलचक संधियुक्त अक्षरसमूह न ठेवतां निरनिराळें शब्द तोडून लिहिले; या त्यांच्या सुधारणेवर टीका बरीच झाली. इतर पाश्चात्त्य संस्कृतज्ञ असें म्हणाले कीं, हीं पुस्तकें जर शास्त्रीमंडळीच्या दृष्टीस पडतील तर ते काय म्हणतील! आज हा मनु पालटला आहे एतद्देशीय विद्वानांस असें वाटतें कीं, आपल्या प्राचीन भारतविषयक ग्रंथांची मान्यता पाश्चात्त्य विद्वानांकडून व्हावी. कै० लो० टिळकांसारख्या स्वाभिमानी लेखकासहि वेदांसंबंधीं ग्रंथ लिहितांना तो परभाषेंत लिहावा लागला. यावरून विवक्षित प्रकारें जम बसलेल्या व अगोदरच मान्यता पावलेल्या लेखकांचें महत्त्व लक्षांत येईल.
पारशी लोकांच्या पुरातन संस्कृतीसंबंधानें जर बरेंचसें विद्वत्त्वपूर्ण लिखाण मराठींत झालें तर पारशी लोकांसहि मराठी ग्रंथ आपल्या धर्मासंबंधाने व परमार्थासंबंधानें ज्ञान मिळविण्याकरितां वाचावे लागतील. हिंदू लोकांकडून पारशी लोकांच्या पवित्र ग्रंथांसंबंधानें उत्तम प्रकारचें वाङ्मय निर्माण होण्यास एक अवश्य गोष्ट म्हटली म्हणजे नागरी लिपींत झंदावेस्ताची आवृत्ति तयार करणें ही होय. नागरी लिपींत ‘झंदावेस्ता’ आवृत्ति तयार करणें ही होय. नागरी लिपींत ‘झंदावेस्ता’ तयार झाला म्हणजे त्याच्या अभ्यासाकडे आपल्या संस्कृतज्ञ सुशिक्षितांचें लक्ष वेधेल व ते त्याचा ‘तौलनिक’ पद्धतीनें अभ्यास करून जे ग्रंथ निर्माण करतील ते ग्रंथ पारशी लोकांस वाचावे लागतील. त्यांस स्वतःच्या पवित्र ग्रंथांचें ज्ञान व्हावें यासाठीं हिंदू सुशिक्षितांनीं लिहिलेल्या ग्रंथांचें अवलोकन करावें लागेल व संस्कृत ग्रंथांचें ज्ञानहि वाढवावें लागेल. असें झालें म्हणजे हिंदूंतील बुद्धिमान् लोकांचा व संस्कृत ग्रंथांचा पगडा पारशी लोकांवर वाढावयास लागून पारशांस हिंदूतील विद्वान् वर्गाविषयीं शिष्यभाव उत्पन्न होईल.
आपल्या समाजास पचनीं पाडण्यास अत्यंत कठिण वर्ग म्हटला म्हणजे मुसुलमानांचा होय. मुसुलमान लोक अजूनदेखील अरबी भाषेंतून प्रार्थना करितात. विशेष सुशिक्षित व ज्यांस आपल्या सांप्रदायिक ग्रंथांची चाड आहे असे मुसुलमान अरबी भाषेंतूनच कुराण वाचतात, मग त्यांस त्या भाषेचें जरी ज्ञान नसलें व आपण काय वाचलें यांतलें त्यांस एकहि अक्षर समजलें नाहीं तरी देखील चालतें. ज्याप्रमाणें आपल्यांतील कांहीं लोक संस्कृतचें एक अवाक्षरहि येत नसलें तरी गीता वाचण्यांत पुण्य मानतात, त्याप्रमाणें बर्याच मुसुलमानांची वृत्ति झालेली असते. मुसुलमान लोकांच्या पारमार्थिक ग्रंथांवर व कायद्यावर अधिकारयुक्त वाणीनें आपण परके असल्यामुळें जरी आपणांस बोलतां येणें शक्य नाहीं तरी तुम्ही आपलें धर्मशास्त्र नीट समजून घ्या व जें काय करावयाचें तें अडाण्यासारखें न करितां सुशिक्षिताप्रमाणें करा, हें मुसुलमानांस सांगण्याचा आपला अधिकार आहे. जर आपणांतील कांहीं लोक कुराण व इस्लामी कायदा व अरबी वाङ्मय व इस्लामीयांचें तत्त्वज्ञान उत्तम प्रकारें पढले व मुसुलमानी संप्रदायावर सहानभूतिपूर्वक ग्रंथ लिहूं लागले तर आपल्यांतील विद्वानांसहि थोडाबहुत अधिकार येईल. मुसुलमान लोकांस ‘तुम्ही आपला धर्म समजून घ्या, व अमुकच आपला धर्म, आणि अमुकच आपलें कर्तव्य, अशा कल्पना डोळे मिटून ग्रंथावलोकन न करितां करून घेऊं नका.’ हें सांगणें आपलें कर्तव्यकर्म आहे. कारण, मुसुलमानांसहि आपणांस चांगले नागरिक बनवावयाचे आहेत. कुराणाचें जर आपण अवलोकन केलें तर आपणांस असें दिसून येईल कीं, उत्तम नागरिक होण्यास जो उपदेश मनुष्यास केला पाहिजे त्या प्रकारचा उपदेश मुसुलमान ज्यास पैगंबर (शास्त्रदृष्ट्या) मानितात त्या महंमदानेंहि आपल्या ग्रंथांत केला आहे. जर आपणांस कित्येक ठिकाणीं दिसून येणारा उपदेश अयोग्य वाटला तर आपण त्याचा निषेधहि करावा; पण आपले जे समान नागरिक मुसुलमान त्यांच्या मनोवृत्तीचें व ती मनोवृत्ति घडवून आणणार्या विचारपरंपरचें, आणि त्या परंपरेचा मूलभूत ग्रंथ जो कुराण त्याचें आपणांमध्ये जें पूर्ण अज्ञान आहे, तें आपणांस लांछनास्पद आहे. मुसुलमान व ख्रिस्ती यांच्या ग्रंथांचें आपल्यांतील सुशिक्षित म्हणविणारांतहि किती अज्ञान आहे याची कल्पना या दोन संप्रदायांसंबंधानें रा. अच्युतराव कोल्हटकर यांनीं जे लेख लिहिले व त्यानंतर ‘केसरीं’त जो वादविवाद उपस्थित झाला त्यावरून दिसून येईल.
मुसुलमान लोकांस धर्मग्रंथांचें अक्षरज्ञान आहे त्याच्या ऐवजीं धर्मज्ञान म्हणजे धर्मग्रंथांतर्गत विचारांचें ज्ञान व्हावें, यासाठीं त्यांस देशी भाषेंतून प्रार्थना करण्यास व देशी भाषांतील ग्रंथांतून धर्मज्ञान मिळविण्यास उत्तेजन दिलें पाहिजे. औरंगजेबानें पूर्वीं या प्रश्नाकडे लक्ष दिलें होतें. “धर्मग्रंथज्ञान जन्नभाषेंतून न मिळवितां व प्रार्थना देशी भाषेंतून न करितां परभाषेंतून करावी लागते हें अवश्य आहे काय?” असा आक्षेपरूपी प्रश्न त्यानें आपल्या शिक्षकास एका पत्रांत केला होता. त्याचे उद्गार आज बर्नियरच्या प्रवासवृत्तांत उपलब्ध आहेत. आपणास आजच्या मुसुलमानांपुढें तोच प्रश्न ठेवावयाचा आहे.
आज मुसुलमानांची आसाक्ति अर्थावर नसून अक्षरावर आहे. याचे दुष्परिणाम अनेक आहेत. एकतर मुसुलमानांमध्यं समजूतदारपणाऐवजीं धर्मवेडेपणा असतो. दुसरा दुष्परिणाम म्हटला म्हणजे इस्लामी उपदेशाचे ते शिष्य न बनता विदेशी संस्कृतीचे ते आग्रही बनतात; त्यांचें स्वरूप विदेशी बनतें; व एतद्देशीय भाषांचे व लिपींचे ते द्वेष्टे बनतात. नागरी लिपीचा प्रसार त्यांच्यामध्यें कमी आहे व फारसी आणि अरबी शब्द हिंदुस्थानी भाषेंत मिसळून अधिक कठिण बनविण्यास ते कारण झाले आहेत. मुसुलमानांस जर देशी भाषांतून कुराणाचें भाषांतर करण्यास व त्याचाच पाठ परमार्थसाधनासाठीं करण्यास आपण प्रवृत्त केलें तर भाषाविषयक रणें कमी माजतील व मुसुलमानांची देशी भाषेवर आसक्ति वाढेल. या हेतूच्या सिद्धीसाठीं आपलें कर्तव्य म्हटलें म्हणजे मुसुलमानांस पूज्य असलेल्या कुराणादि ग्रंथांचीं भाषांतरें देशी भाषांतून करवावीं, व संस्कृत भाषेमध्यें प्राविण्य मिळवीण्यासाठीं मुसुलमानांकरितां कांहीं स्कॉलर्शिपा राखून ठेवाव्या; हिंदूंनीं देखील मुसुलमानी धर्माचा व अरबी वगैरे भाषांचा व्यासंग करावा.
हीं बाह्यांसंबधाचीं जीं कर्तव्यें वर दिलीं आहेत तीं कांहीं अशीं बाह्यांच्याच उन्नतीसाठीं आहेत, कांहीं अंशीं हिंदूंच्या उन्नतीसाठीं आहेत व कांहीं अंशीं बाह्य आणि हिंदू हे दोन्ही मिळून जें हिंदी राष्ट्र बनतें त्या हिंदी राष्ट्राच्या उन्नतीसाठीं आहेत. बाह्यांचें आपणांशीं जितकें सादृश्य वाढेल तितका आपलाच फायदा होणार आहे. एक तर महाराष्ट्रीयांपैकीं सध्यां जो लेखकवर्ग आहे तो वर्ग बाह्यांचा शिक्षक व पुढारी होईल. या लेखकवर्गास स्वतःचीं अंतःकरणें जातिद्वेष टाकून अधिक शुद्ध करून घ्यावीं लागतील आमच्यांतील सुशिक्षित व लेखक मंडळीस केवळ हिंदूंचें अगर महाराष्ट्रीय ब्राह्मणांचेंच पुढारीपण करावयाचें नाहीं तर सर्व राष्ट्राचे पुढारी व्हावयाचें आहे. या आपल्या आकांक्षांनुसार आपणांस वर्तन ठेविलें पाहिजे. “केसरी” पत्राचा खप कितीहि असो, लो. टिळक हे कितीहि विद्वान् गृहस्थ असोत, त्यांचें आचरण कितीहि चांगलें असो, आज त्यांनीं आपल्या लेखांतून ज्या कल्पना पसरविल्या असतील त्या कल्पनांचा प्रसार यहुदी, ख्रिस्ती, गोवानीज, पारशी, मुसुलमान यांच्यामध्यें कितपतसा झाला आहे? फार कशाला? मुंबई शेणवी, पाठारे प्रभु, चौकळशी, पांचकळशी, दैवज्ञ ब्राह्मण, या जातींपैकीं कितीसे लोक केसरीच्या लेखांस स्वतःच्या मतांचे आदर्श समजतात व केसरी पत्रास स्वतःचा प्रतिनिधि समजतात? कायस्थ प्रभूंमध्यें केसरिसंबंधानें कितपतसें प्रेम आहे? जो समाज कोंकणस्थ ब्राह्मणांपासून अधिक दूर तितकी त्याची केसरीसंबंधानें कमी भक्ति, असा एक ठोकळ नियम घालण्यास हरकत नाहीं. एवंच, महाराष्ट्रांतील प्रमुख पत्राचा परिणाम ज्या क्षेत्रांत होतो तें क्षेत्र किती नियमीत आहे हें कळून येईल.
समाजांतील सर्व लोक एकाच विचारी लोकसमूहाकडे शिष्यदृष्टीनें पाहूं लागले म्हणजे समाजाचें विचारैक्य होतें, व कवी, नाटककार, निबंधकार व इतर प्रकारचे लेखक जें लोकमत उत्पन्न करितील तें खरेंखुरें सार्वजनिक मत होतें. सर्व जनतेला मान्य असें लोकमत बनविणारांचा वर्ग अजून उत्पन्न व्हावयाचा आहे. मुसुलमान व हिंदू लोक पुष्कळ गोष्टींमध्यें समोरासमोर उभे राहून वादविवाद करूं लागले, म्हणजे सर्व जनांवर परिणाम घडवून आणणार्या कविजनसमूहाची संस्थापना होईल. परंतु जोंपर्यंत दोन्ही लोक आपापल्या पथकापुरती खळबळ करीत आहेत, व एका पथकांत काय चालतें याची शुद्धि दुसर्या पथकास नाहीं असें जोंपर्यंत आहे, तोंपर्यंत समाजाची एकरूपत्वाकडे प्रगति होणें अशक्य आहे.
वर्तमानपत्रांचें क्षेत्र केवळ एका पथकापुरतें नसून कांहीं अंशीं सर्व राष्ट्रापुरतें असतें. लेखक जें लिहील तें एका लहानशा जातींतील माणसेंच न वाचतां सर्व जातींच्या लोकांच्या नजरेसमोर येईल असी लेखकास भीति पडते व त्यामुळें त्याच्या लेखणीवर दाब पडतो. यामुळें साधारण जनतेचीं मतें व अंतःकरणें बदलण्यास थोडीबहुत मदत होते. निरनिराळ्या जातीचे लोक समोरासमोर उभे राहून शांतपणानें वादविवाद करूं लागले म्हणजे सर्व लोकांस मान्य होतील अशा तर्हेच्या नीतित्त्वांचा उद्भव होतो व कालांतरानें या सर्व लोकांच्या वादविवादामुळें उत्पन्न झालेल्या नीतितत्त्वांचा परिणाम राष्ट्रावर होऊन राष्ट्रास एकस्वरूप येण्यास मदत होते.
या सर्वमान्य नीति उत्पन्न करण्याच्या ध्येयाच्या पूर्तीसाठीं एक अवश्य गोष्ट म्हटली म्हणजे लोकांनीं आपले विचार स्पष्टपणें मांडण्यास शिकलें पाहिजे. आपलीं जीं खरीं मतें व भावना असतील त्यांचें सकारण समर्थन करतां येतें कीं नाहीं हें पाहण्याचाहि लोकांनीं प्रयत्न केला पाहिजे व आपल्या मतांचें आणि भावनांचें लोकांकडून परिक्षण होऊं दिले पाहिजे. केवळ शिष्ट लोकांच्या भीतीनें खरे विचार लपवूं नयेत. आपल्या ज्या भावना असतील त्यांची लपवालपव करण्यातं अर्थ नाहीं. कारण, नीतिशास्त्राच्या मुळाशीं मनुष्यस्वभावाचें ज्ञान असलेंच पाहिजे, व मनुष्यस्वभावाचें अविष्करण आपण जर निःशंकपणानें केलें नाहीं तर आपलें नीतिशास्त्र मनुष्यस्वभावाच्या अल्प ज्ञानावर उभारलें जाईल, व तेणेंकरून सदोष असे नीतिनियम उत्पन्न होतील.
हिंदू व बाह्य हे दोन्ही लोक मिळून जो समाज उत्पन्न होतो त्या सर्व समाजास सामान्य अशीं नीतितत्त्वें उत्पन्न होतील अशी व्यवस्था झाल्यास दोन्ही समाजांस परस्परांशीं व्यवहारसंबंध ठेवण्यास सोयीचें होईल. इंग्रजी कायदा म्हणजे हिंदुस्थानांतील शासनसंस्थांनीं उत्पन्न केलेला कायदा परस्परांतील देवघेवीचा व्यवहार नियमित करितो. तथापि हिंदूंस व बाह्यांस सारखेंच बंधनरूप होईल असें लोकमत आपल्या येथें निर्माण झालेलें नाहीं व तें निर्माण करणारा वर्गहि झालेला नाहीं. जो तत्त्ववेत्ता सर्व लोकांस मान्य होतील अशीं नीतितत्त्वें उत्पन्न करील, व सर्व जनांत त्याचा प्रसार करण्यासाठीं खटपट करून सर्व जातींतील व संप्रदायांतील लोकांमध्यें आपल्या तत्त्वांस मान्यता मिळविण्याचा प्रयत्न करील तोच तत्त्ववेत्ता राष्ट्रामध्यें सामान्य नीति उत्पन्न करूं शकेल. सामान्य लोकमत उत्पन्न झाल्याशिवाय सामाजिक दळणवळण व व्यवहार शक्य नाहीं.
आतांपर्यंत बाह्यांसंबंधानें आपलें कर्तव्यकर्म सांगितले व त्यांस आपल्यासारखें करण्यासाठीं आपण कोणत्या गोष्टी त्यांच्याकरितां केल्या पाहिजेत त्यांची यादी दिली; तथापि बाह्यांनीं आपणांसारखें वर्तन ठेवण्यास आपण काय केलें पाहिजे यासंबंधाचें अत्यंत महत्त्वाचें कार्य म्हटले म्हणजे स्वतःचें शक्तिवर्धन हें होय. आम्हीं इतरांस आमची भाषा शिका म्हणून सांगितलें तरी त्यांनीं ती कां शिकावी? आम्हीं इतरांस आमच्यासारखें होण्यास सवलती दिल्या तरी त्यांचा फायदा इतरांनीं कां घ्यावा? जर आपण बलवान् झालों तरच आपण दिलेल्या सवलतीचा फायदा इतर लोक घेतील. नाहीं तर कोणीहि त्यांचा फायदा घेणार नाहीं. ख्रिस्ती लोक आपणांस त्यांच्यासारखें बनविण्यासाठीं जे ग्रंथ लिहितात ते आपण कितपत वाचतों? जर आपणांस कांहीं तादृश फायदा दिसेल तरच आपण ते वाचूं; एरवीं वाचणार नाहीं. इतर लोकांनीं आपणांशीं मिसळावें म्हणून जरी आपण सवलती दिल्या तरी जोंपर्यंत आपण बलवान् झालों नाहीं तोंपर्यंत आपणांशीं स्नेहसंवर्धन करण्यास कोण प्रवृत्त होईल बरें?
सुदैवानें, हिंदुस्थानास आज अंशानें स्वराज्याचा लाभ झाला आहे, आणि त्यामुळें सर्वजनतेच्या भाषेस व तीबरोबर त्या भाषेच्या सुशिक्षित वर्गास अधिक महत्त्व येऊन बाह्यांसंबंधानें खटपट करण्याची आवश्यकता पूर्वींपेक्षां अधिक झाली आहे. आपली व्यापारांत प्रगति झाली व आपला वर्ग श्रीमंत झाला म्हणजे आपण इतरांस दूर सारलें तरी देखील ते लोक आपल्याकडे येण्याची खटपट करतील. आपण आपल्या समाजाची सुव्यवस्थित घटना केली व आपली समाजशक्ति व सत्ता वाढविली तर इतर लोकांस आपल्यासारखें व्हावेंच लागेल.
आपण आपल्या भाषांचें स्वामित्व युनिव्हर्सिट्यांतून व प्रांतिक सरकारच्या कामांत गाजविलें तर इतरांस आपल्यासारखें खास व्हावें लागणार. आपलें व्यवहारध्येय व राजकीय तत्त्व हें असलें पाहिजे कीं, आपण एकीकडे बलवान् होण्याचा प्रयत्न करावयाचा व इतर आपल्यासारखे होण्याचा प्रयत्न करूं लागले तर तुसड्याप्रमाणें त्यांस दूर न लोटतां उत्तेजन द्यावयाचें. पेशवाईंत ब्राह्मण व ब्राह्मणेतर यांच्यामध्यें आचारभेदाची भिंत बांधण्याचा प्रयत्न चालत होता. आज आपणांस त्यांच्या अगदीं उलट प्रयत्न केला पाहिजे. आज महाराष्ट्रीय संस्कृतीच्या सरहद्दीवर ज्या ज्ञाती आहेत त्यांस आपल्यांत ओढून आणण्याचा, आल्यानंतर त्यांस पक्के महाराष्ट्रीय बनविण्याचा, आणि त्यांस आपणांत येण्यामध्यें कोणताहि कमीपणा वाटूं नये म्हणून आपणांत आल्यावर सहानुभूतीनें वागविण्याचा व त्याच्याबरोबरच स्वतःस अधिकाधिक बलवान् करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. राष्ट्राचें एकीकरण जें होतें तें, म्हणजे निरनिराळीं राष्ट्रकें एकत्र आणण्याचें काम, सर्वांत जो वर्ग संख्येनें व राजकीय महत्त्वानें बलाढ्य असेल त्यानें इतरांस एकत्र आणल्यानेंच होते. बलाढ्य वर्ग हा समाजकेंद्र होय, व बलाढ्य वर्गानें इतर वर्गांस व समाजांस आपणांशीं चिकटवून घेतल्यानेंच राष्ट्रीकरण होईल.
राष्ट्रीयत्वभावना ख्रिस्ती जगांत उत्पन्न होऊन परमार्थविषयक विचारांनीं उत्पन्न केलेली आणि भिक्षुकांच्या प्रयत्नानें राखलेली माणसामाणसांतील ताटातूट ख्रिस्ती जगांत कमी कमी होत आहे आणि लोकमतमूलक शासनाचा आणि तत्त्ववेत्त्यांनीं निर्माण केलेया विचारांचा पगडा जनतेवर बसून आज यूरोपांतील व अमेरिकेंतील राष्ट्रें शासित होऊं लागलीं आहेत. ख्रिस्ती जगांत पारमार्थिक सत्तेविरुद्ध राजकीय सत्ता असा प्रकार झाल्यामुळें पारमार्थिककल्पनामूलक सत्तेनें माजविलेला घोंटाळा लवकरच लयास जाण्याच्या पंथास लागला. मुसुलमानांची गोष्ट मात्र तशी नाहीं. तेथें शासनसंस्था आणि पारमार्थिक सत्ता यांचें ऐक्य असल्यामुळें आणि खलीफ हाच चक्रवर्ती राजा आणि मुसुलमानी जगाचा नेता सांप्रदायिक कल्पनांनीं असल्यामुळें परमार्थमूलक संप्रदायामुळें होणारा घोंटाळा राजसत्ताच ढांसळल्याशिवाय नष्ट होणें अशक्य होतें. सर्व मुसुलमान हे एक आहेत आणि इतर जगावर राज्य करण्यासाठीं किंवा त्याची संपत्ति लुटण्यासाठीं त्यांनीं बद्धपरिकर असावें अशा तर्हेची परमार्थप्रचारार्थ उत्पन्न झालेल्या शासनतत्त्वांची मांडणी झालेली आहे. त्यामुळें केंद्र जें खिलाफत त्याचे पूर्ण तुकडे झाल्याशिवाय मुसुलमानांचें लक्ष खैबर घाटापलीकडे न जातां देशांतच स्थिर होणें शक्य नव्हतें. एका विशिष्ट कार्यार्थ उत्पन्न झालेली गति मुळाशीं असलेला जोर अजीबात तुटेपर्यंत चालूच होती आणि ती आपल्या स्वतःच्या कार्यासाठींच स्थानिक सत्तेचा उपयोग करून घेई असें मुसुलमानांच्या समाजाविषयीं म्हणतां येईल. खिलाफतीचे आतां जवळ जवळ पूर्णपणें तुकडे झालेले आहेत, आणि त्यामुळें संप्रदायाभिमानाऐवजीं स्वदेशाभिमान मुसुलमानांत अधिक जागृत होईल अशी अपेक्षा आहे. जर्मनांच्या साहाय्यानें तुर्कांनीं नुक्तें आटपलेलें युद्ध म्हणजे मुसुलमानांच्या जगज्जयिष्णु कल्पनेचा शेवटचा उमाळा होय.
मुसुलमानी संप्रदायामध्यें संप्रदायभावना जागृत रहावी आणि त्यांचें प्रेम शेजारच्या हिंदुंवर असण्याऐवजीं डोंगरांपलीकडच्या राष्ट्रांशीं बद्ध व्हावें ही गोष्ट देशास हितावह नाहीं. खिलाफत ठार मेल्यानें राष्ट्रीय भावनेस जर जोर मिळणार आहे तर खिलाफत प्रश्न हातीं घेऊन सध्यां कांहीं पुढारी म्हणविणारे हिंदू देखील चळवळ करितात याचें बीज काय? हें करण्यामध्यें महात्मा गांधींचा कोणता हेतु आहे? ही चळवळ करणारे हिंदू लुच्चे आहेत कीं मूर्ख आहेत असा प्रश्न वारंवार उपस्थित होतो. व्यक्तींच्या मनांत कोणास शिरतां येत नाहीं, तथापि कृत्यांवरून आणि परिस्थितीच्या शक्य परिणामांच्या पृथक्करणानें कार्यकर्त्याच्या मनांतील हेतू काढावयाचे ठरविल्यास असें म्हणतां येईल कीं, पॅन इस्लामिझम नांवानें ठाऊक असलेली राजकीय चळवळ इतकी आशेपलीकडे गेली आहे कीं, तिला आतां हिंदूनें देखील मदत करण्यास हरकत नाहीं, असें या चळवळींत पडणार्या हिंदूंस वाटत असावें आणि कितीहि आक्रोश केला तरी खिलाफत जर जिवंत होणार नाहीं तर मग फुकटचा शाब्दिक आशिर्वाद देण्यास माघार कां घ्या अशी त्यांची विचारसरणी असावी. केलेल्या आक्रोशामुळें इस्तंबुल सरकारचा जरी कांहीं फायदा झाला तरी तो इतका होणार नाहीं कीं, त्यानें मुसुलमानांची राजकीय सत्ता बळावून ते पुन्हा जगज्जयिष्णु बनूं पहातील. या चळवळीनें मुसुलमानी संप्रदाय राजकीय दृष्टीनें बळकट होण्याचा संभव नसतां यूरोपीय राष्ट्रांच्या अधाशी धडपडींत तुर्कांचें राज्य जितकें अधिक टिकेल तितकें टिकावावें, हलवायाच्या दुकानावर संतर्पण करावयाचें आहे तर ख्रिस्ती राष्ट्रें विरुद्ध मुसुलमान या लढ्यांत आपण मुसुलमानास शाब्दिक मदत करण्यास कोणती हरकत आहे? शिवाय केवळ मुसुलमानी हिताच्या बाबतींत हिंदूंनीं साहाय्य केलें, आणि एवढेंच केवळ नव्हे तर या चळवळींत हिंदूंनीं पुढारीपण घेतलें तर दुसर्या अनेक चळवळींत मुसुलमानांचें साहाय्य मागण्याचा हक्क हिंदू पुढार्यांस सहज उत्पन्न होणार. या दृष्टीनें विचार केला तर महात्मा गांधींजी कृति अगदींच वेडी व गैरधोरणी दिसणार नाहीं.
स्पर्धाक्षेत्राचें अवलोकन करून भारताबाहेर हिंदुत्वाचे अवशेष शोधून आपली कर्तव्यमीमांसा करतांना भारतीयांच्या भारतबाह्य लोकांशीं असणार्या संबंधांचें ज्या बाबतींत रक्षण करणें शक्य आहे त्या गोष्टी मागें वर्णिल्या आहेत. भारतीय साहित्याचा भारतबाह्य भाषांवर व संगीतावर परिणाम घडविणें, ज्योतिःशास्त्र आणि आयुर्वेदयांविषयींच्या आपल्या चळवळींत भारतबाह्य भारतीयांस सामील करून घेणें एवढेच संबंध ठेवण्याचाय आपणांस प्रयत्न करतां येईल. व्यापारानें संबंध ठेवण्याच्या कल्पनेचा आणि राजकिय ऐक्याच्या कल्पनेचा थोडासा विचार मागें केलाच आहे. जो विचार त्यावेळीं वगळला तो सामाजिक होय. हा समाजिक विचार हातीं घेण्यापूर्वीं भारतीयांच्या एकराष्ट्रीयत्वाचें विवेचन अवश्य असल्यानें त्याच्यासाठीं, जेणेंकरून देशांतील अपसृष्टांस जवळ ओढून आत्मवत् करतां येईल असे कोणते फरक हिंदुसमाजामध्यें होणें शक्य आहे याचा विचार करावा लागला. आतां याच विचाराच्या पूर्तीसाठीं समुच्चयरक्षणाच्या नीतिशास्त्राचे नियम तपासावयाचे आहेत. विशिष्टसमुच्चरक्षणाला समाजशास्त्रीय तत्त्वज्ञानाचा कांहीं पाठिंबा मिळतो काय याचा विचार होणें अवश्य आहे. भारतीय सामजव्यवस्था आणि भारतबाह्य भारतीयांची समाजव्यवस्था यांचा संबंध एकसंस्कृतितत्त्वावर जोडतां येईल किंवा नाहीं हा विचार करण्यासाठीं भारतीय समाजव्यवस्था कितपत टिकेल, ती टिकवण्याचा प्रयत्न कां करावा, भारतीय समाज व इतर समाज जोडण्याइतकी भारतीय समाजाच्या आधुनिक स्वरूपाची स्थिरता आहे काय, आणि अशी स्थिरता नसल्यास निदान असें शक्य आहे काय कीं पुढें शेंपन्नास वर्षांपर्यंत दोन्ही समाजांची विशिष्ट तर्हेनें प्रगति होत होत ते समाज एकस्वरूपी होऊं शकतील, हा विचार अवश्य होतो. जे थोडेसे जवळ आहेत त्यांस एकें जवळ करण्याचा प्रयत्न करणें किंवा भारतीय समाजास विश्वबंधुत्वावर एकदम उडी मारावयास उत्तेजन देणें यांपैकीं करावें तरी काय याविषयींचे कार्यसिद्धांत बांधण्यासाठीं आपल्या संस्कृतीचा नाश अथवा रक्षण करण्यासंबंधींचे नीतिनियम तपासले पाहिजेत. आपणांस असा विचार केला पाहिजे कीं आपणच मोडक्या समाजाचे छिन्नभिन्न झालेले अवयव, आपला समाजच आपणांस संभाळतां येत नाहीं तर क्यांबोडियाच्या चामलोकांविषयीं आपण फिकीर बाळगीत बसावें कां? याशिवाय दुसरेहि विचार प्राप्त होतात ते असे. आपल्या समाजाचें स्वरूप जर पुष्कळसें पालटत आहे तर तें वाटेल तसें पालटूं कां देऊं नये? विशिष्ट लोकसमूहांस कोणत्या तरी प्रकारच्या हिंदुत्वाखालीं एकत्र करून आपलें मध्यवर्तित्व ठेवण्यांत इतर लोकांचा फायदा आहे काय? या अट्टाहासानें आपला स्वतःचा तरी कितपत फायदा आहे? आपली समाजव्यवस्था मोडून आपणच दुसर्हा संघांत कां मिळूं नये?