प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण १३ वें.
स्पर्धाक्षेत्राकडे पुन्हां एकदां.
समाजांतील असंतुष्ट वर्गानें स्वसमाजत्याग करावा काय? - जगांतील स्पर्धेविषयीं विचार करतांना समुच्चयांमधील स्पर्धा जेव्हां आपण विचारांत घेतों त्यावेळेस विशिष्ट समुच्चय जगावा आणि त्या समुच्चयाशीं स्पर्धा करणार्या इतर समुच्चयांविरुद्ध त्यास जय यावा या तर्हेची आपली वृत्ति नेहमींच असते. समुच्चय जर व्यक्तिहितासाठीं आहेत तर आपलें हित साधावयास अधिक सवड देणार्या समुच्चयास मिळण्यासाठीं व्यक्तींनीं आपल्या समुच्चयास सोडून कां जाऊं नये याचा विचार केला पाहिजे, आणि त्या विचाराच्या अनुषंगानें व्यक्तीस समुच्चयाचा अभिमान धरावयास लावण्यासाठीं समुच्चयाचें हितचिंतक, अभिमानी किंवा कार्यकर्ते यांच्या समुच्चयांतर्गत व्यक्तीसंबंधानें ज्या अपेक्षा असतील त्या अपेक्षांचें नियमन केलें पाहिजे. हिंदूंनीं ख्रिस्ती अगर मुसुलमान कां होऊं नये? त्यांत नुकसान कोणाचें होणार? देशाच्या राज्यव्यवस्थेसाठीं कर दोघांसहि द्यावा लागतो; आणि देशांतील आर्थिक व आरोग्यविषयक सुधारणा मुसुलमानांच्या हातीं राज्यकारभार आला किंवा हिंदूंच्या हातीं राज्यकारभार आला तरी कारभारी बुद्धिमान असल्यास सारख्याच होतील अशी स्थिति असतां एखादा मनुष्य जर मुसुलमान झाला तर त्यांत त्याचा दोष काय? मुसुलमान होण्यांत त्याचा फायदा होत असेल तर त्यानें मुसुलमान तरी कां होऊं नये? ज्या हिंदूंच्या कायद्यांचें लिगाड फार त्रासदायक आहे आणि ज्या हिंदूंनीं एकमेकांचें हित साधण्यासाठीं संघीभूत होतां येत नाहीं, आणि ज्या समाजास चिकटून राण्यानें जगांतील अनेक रूचिकर मांसें खाण्यास प्रतिबंध होतो किंवा ज्या समाजांत राहिल्यानें वाटेल त्या जातीशीं अगर वर्गाशीं लग्न लावावयास प्रतिबंध होतो, जेथें उच्च कुलांतील विधवांस इच्छेप्रमाणें पुनर्विवाह करावयास त्रास पडतो आणि एकंदर मोकळेपणानें व्यवहार करावयास अडचणी येतात, त्या गचाळ हिंदुसमाजांत राहण्यांत आणि स्वतःचें नुकसान करून घेण्यांत व्यक्ति कोणाचें हित साधणार आहे? आणि ख्रिस्ती अगर मुसुलमान झाल्यानें तरी काय नुकसान होणार आहे? महारांनीं ख्रिस्ती अगर मुसुलमान न होतां हिंदूच राहण्याचा मूर्ख हट्ट कां करावा? ब्राह्मणांतील देखण्या विधवांनीं त्यांनां अरसिक हिंदू पतकरीत नसतील तर ख्रिस्ती अगर मुसुलमान नवरे कां करूं नयेत? याचा खुल्या दिलानें विचार झाला पाहिजे. शंकराची पूजा केल्यानें मनुष्य स्वर्गास जात नाहीं किंवा बिसमिल्ला म्हटल्यानें नरकास जात नाहीं. तर विशिष्ट उपासनेचा किंवा आचाराचा अभिमान तरी कां धरा? आम्ही जे ग्रंथ कोणीहि वाचीत नाहींत त्या वेदांचें, पुराणांचें वगैरे उगाच शाब्दिक म्हणजे खोटें अनुयायित्व कां पतकरावें? त्यांची उपसना करणें हा आमच्या बापदाद्यांचा धर्म असेल पण तसें असलें म्हणून काय झालें? आम्ही मुसुलमान होऊन बापदाद्यांचें श्राद्ध करावयाचें चुकविलें तर आमचे पितर नरकांत पडणार अशी आपली खात्रीच असती तर मेलेल्यांचें हित पहावयाचें कीं जिवंतांचें हित पहावयाचें याचा विचार पडला असता. पण ती खात्री तरी आज आहे काय? पितृगणांच्या अदृश्यसृष्टिविषयींच्या कल्पनांवर तरी आज कितपत विश्वास आहे? पितृतर्पणाच्या उपयोगासंबंधानें खात्री नाहीं, तर मग आचार्यतर्पण कशास पाहिजे आणि अग्नीच्या धुरानें डोळे दुखविणारी श्रावणी तरी कशाला करा? चार बायका करण्यास अनुकूल असा मुसुलमानी संप्रदाय ख्रिस्त्यांनीं कां घेऊं नये? किंवा दारू प्यावयास अनुकूल असा ख्रिस्ती संप्रदाय हिंदुमुसुलमानांनीं कां स्वीकारूं नये? ज्याला जो समाज अनुकूल वाटेल त्या समाजांत शिरावयाच्या इच्छेस गैर काय म्हणून म्हणतां? ज्या कुलांत अगर प्रदेशांत आपला जन्म झाला त्या कुलाशीं संबद्ध असलेल्या समजाचें किंवा देशाचें नागरिक आपण राहिलेंच पाहिजे असा तुमचा हट्ट आहे काय? आपण कोणत्या समाजाचें नागरिक व्हावें हें आपल्या इच्छेनें आपण कां ठरवूं नये? जन्मसिद्ध स्थिति चांगली समजणें हें कर्तव्य आहे काय? आणि त्या जन्मसिद्ध स्थितीशीं श्रद्धामय अन्तःकरणानें तादात्म्य ठेवणें हें जर मनुष्याचें कर्तव्य असेल तर गरीबानें श्रींमत व्हावयाची तरी इच्छा कां करावी? आणि अशिक्षितांनीं सुशिक्षित व्हावयाची इच्छा कां करावी? धर्माभिमान, देशाभिमान हे शब्द लुच्चांचे अमर मूढांचे नव्हेत काय? ज्याप्रमाणें शिक्षकवर्गास अर्धपोटीं काम करावयास लावण्यास त्यांच्य स्वार्थत्यागाची तारीफ करण्याची आपण धर्तता दाखवितों, त्याप्रमाणें धर्माभिमान इत्यादि शब्द कमी किंमतीचा माल अधिक किंमतीस विकण्यासाठीं योजिलेले नव्हेत काय? ख्रिस्ती संप्रदायाचा अवलंब केल्यानें हिंदुसमाजघटनेच्या सिद्धांताप्रमाणें जरी समाजांतील कनिष्ठता मनुष्यास प्राप्त होते तरी व्यावहारिक दृश्य प्रमाण पाहिलें असतां कनिष्ठताच प्राप्त होते असें म्हणवत नाहीं. आज आपण ख्रिस्ती झालेल्या एतद्देशीयांची स्थिती लक्षांत घेतली तर त्यांची स्थिति ज्या वर्गांतून ते ख्रिस्ती झाले त्या हिंदूंच्या वर्गापेक्षां वाईट आहे असें आपणांस म्हणतां येईल काय? आपल्या कुणब्यांपेक्षां किंवा शिंप्यांपेक्षां गोवानीज शिंप्यांची आणि स्वैंपाक्यांची रहाणी वाईट आहे असें म्हणतां येणार नाहीं. पुष्कळ हिंदू असें कबूल करतात कीं गोव्यांतील खालच्या वर्गाच्या हिंदू स्त्रियांपेक्षां ख्रिस्ती स्त्रियांत पातिव्रत्य अधिक चांगलें आहे. नायर स्त्रियांपेक्षां मलबारांतील सीरियन ख्रिस्ती स्त्रियांमध्यें अधिक पवित्राचरण आहे. सांपत्तिक दृष्ट्या पाहिलें तर गोवानीज स्वैंपाकी आपल्या स्वैंपाक्यापेक्षां अधिक पैसे मिळवितो आणि अधिक चांगल्या स्थितींत असतो असें म्हणतां येईल. आपल्या शिंप्यांपेक्षां गोवानीज शिंपी जास्त पैसे मिळवितात हें आपणांस दिसून येतें. याशिवाय व्यापारांत कोंकणांतील हिंदूंपेक्षां गोवानीज अधिक पुढें गेलेले आहेत असें दिसून येतें. महाराचे प्रॉटेस्टंट ख्रिस्ती झालेले लोक पाहिले आणि त्यांची आपल्या महारांशीं तुलना केली तर आपणांस हें खास कबूल केलें पाहिजे कीं सांपत्तिक दृष्टीनें, रहाणीच्या दृष्टीनें आणि कर्तृत्वाच्या व शिक्षणाच्या दृष्टीनें हे ख्रिस्ती आपल्या तत्सम वर्गापेक्षां अधिक चांगल्या स्थितींत आहेत. असें जर आहे तर मग ते ख्रिस्ती झाले याबद्दल आपणांस दुःख तरी कां वाटावें, आणि त्यांस तुम्ही ख्रिस्ती होऊं नका म्हणून सांगण्यांत आपला शहाणपणा कोणता? जें हित त्यांस आपण देऊं शकत नाहीं तें त्यांनीं जर दुसरीकडून मिळविलें तर आपण त्याबद्दल खेद कां मानावा? आणि बाह्यांसंबधानें कर्तव्यकर्म म्हणून सांगण्यांत जीं पानें खर्च केलीं त्यांत शहाणपणा कोणता? स्वहिताकरतां स्वसमाजाचा त्याग करणें व परसमाजांत प्रवेश करणें या गोष्टीचा तात्त्विक विचार झाला पाहिजे. असा तात्त्विक विचार करणें म्हणजे स्वसमाजत्यागाची तयारी करणें असें मात्र खास नव्हे. हा विचार व्यक्तींच्या अपेक्षा आणि समाजाच्या अपेक्षा यांचें परस्परांकडून नियमन होण्यास उपयोगी पडेल.