प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण १३ वें.
स्पर्धाक्षेत्राकडे पुन्हां एकदां.
स्वसमाजनिष्ठा.- आतां नुकसान सोसूनहि समाजास अभिमानानें चिकटून रहाणें या गोष्टीचें समर्थन कसें करतां येईल याचा विचार करूं. धर्माभिमान, देशाभिमान इत्यादि उच्च भावनांचें समजांत कार्य कोणतें आहे? देशाभिमानी मनुष्य इतर राष्ट्राचें नागरिकत्व अधिक फायदेशीर असतांहि आपल्या राष्ट्रास चिकटून राहील. राजा पराभूत झाला असातांहि राजनिष्ठ मनुष्य त्याला सोडणार नाहीं. राष्ट्रत्यागापेक्षांहि संस्कृतित्याग अथवा धर्मत्याग हा लोकांस अप्रिय आहे. राजनिष्ठा, देशनिष्ठा, धर्मनिष्ठा या सर्वांची तारीफ चोहोंकडे होते. जेव्हां राजा दुर्बल असेल, जेव्हां देश सुखकर नसेल, जेव्हा धर्म अनिश्चित आणि असुखकारक असतील, तेव्हां त्यास चिकटून राहिल्यानें कांहीं फायदा नसतो; परंतु जेव्हां चिकटून राहिल्यानें फायदा नाहीं तेव्हांच निष्ठेची खरी परीक्षा होते. कठिण प्रसंगांतून तरून जावयास निष्ठा पाहिजे. स्पर्धामय जगांत समुच्चयांनीं जिवंत रहावयाचें तर व्यक्तींची समुच्चयांच्या ठायीं निष्ठा असणें हें अत्यंत आवश्यक आहे.
स्वजनांस सोडून परकीय जनतेचे आपण अंश व्हावें अशा वृत्तीची निंदा जे करितात त्यांच्या निंदेंत काय अर्थ आहे हें पाहूं. राजनिष्ठा, धर्मनिष्ठा, आणि कर्तव्य म्हणून एखादी गोष्ट आपण केली पाहिजे, त्यांत नुकसान आलें तरी पत्करलें, ही बुद्धि आणि यासारख्या केवळ रुपये, आणे, पैकडे लक्ष न ठेवण्याच्या उदार भावना समाजास अवश्य आहेत किंवा नाहींत? आसक्ति केवळ व्यक्तीच्या फायद्यातोट्यावर ठेवली तर अनवस्था उत्पन्न होते. गरीब नवर्यास सोडून स्त्रीनें दुसर्या एखाद्या श्रीमंताकडे जाऊन कां राहूं नये? आपल्या राजाचा पराभव झाला तर परकीय राजास आपल्या राजाविरुद्ध लढण्यासाठीं सावकारांनीं अधिक व्याजासाठीं द्रव्य कां देऊं नये? राजभक्तीचें प्रयोजन तरी काय?
या प्रश्नांनां असें उत्तर आहे कीं, समुच्चयाच्या द्वारा व्यक्तीचें हित साधावयाचें आहे आणि तें साध्य होत रहावें म्हणून समुच्चयाला तदंतर्गत व्यक्तींच्या भक्तीची आवश्यकता आहे. समुच्चयास वाईट दिवस आले तरी त्यांतून समुच्चयसंस्था पार पाडावी आणि व्यक्तींनीं समुच्चयाचा त्याग करूं नये. कां कीं सामुच्चयिक स्थिति एकदां नष्ट झाली म्हणजे पुन्हां ती जुळविण्यास त्रास पडतो, आणि व्यक्तींनां आपलें सामुच्चयिक हित साधणें कठिण होतें. राज्य गेलें म्हणजे तें पुन्हां मिळविणें कठिण होतें. जेव्हां समुच्चय कार्य करण्यास असमर्थ होतील तेव्हां ते जिवंत ठेवावे आणि त्यांजकडून काम करवून घ्यावें किंवा ते मरू द्यावे आणि व्यक्तिहित साधण्यासाठीं निराळी संस्था निर्माण करावी हा एक विचार करण्यासारख्या प्रश्न आहे.
आपला समाज दुर्बल आहे तर त्याचा त्याग न करितां त्या समाजामध्येंच राहून आपल्या ज्ञातिबांधवांस अधिक महत्त्वाचें स्थान प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हा उच्च प्रकारचा देशाभिमान आहे. येथें कोणी असें म्हणतील कीं विशिष्ट समाजास चिकटून राहून तो वाढविण्याची इच्छा तरी कशाला हवी? जो समाज जगावयास योग्य आहे तो जगेल, त्याला इतर लोक मिळतील. या पद्धतीनें श्रेष्ठ समाज तेवढे टिकतील आणि हेंच झालेलें चांगलें. आपण विश्वबंधुत्व ठेवावें आणि अधिक फायदेशीर समाजास मिळावें. याला उत्तर असें आहे कीं विश्वबंधुत्वाच्या दृष्टीनें देखील नियमित समाजावर जडलेली आसक्ति अश्रेयस्कर ठरणार नाहीं. कां कीं, विश्वबंधुत्वाचें बीज रुजावयास निरनिराळे समाज बर्याच अंशीं सारख्याच स्थितींत असावे लागतात. बलवान् आणि दुर्बल यांचें सख्य होत नाहीं. अल्पसमुच्चयाच्या सदस्यत्वाविषयीं उदासीन राहण्याचा बाणा बाळगणार्या व विश्वबंधुत्वाचा बहाणा करणार्या वक्त्यांसहि आपल्या दुर्बल जातीविषयीं उदासीनता दाखविणें शोभणार नाहीं.
आपला समाज सुधारला पाहिजे किंवा सोडला पाहिजे हा विचार मात्र समाजांत जागृत पाहिजे. कां कीं, त्याशिवाय समाजसुधारणा होणार नाहीं.
जर एखादा विशिष्ट समुच्चय इतर समुच्चयांपेक्षां आपल्या सभासदांची काळजी विशेष घेत असेल, तर त्या समुच्चयांतील लोकांस त्या समुच्चयाच्या सदस्यत्वाबद्दल अभिमान राहील. तसेंच तो समुच्चय जर विशेष संपन्न स्थितींत असला व त्या समुच्चयांतील लोक कर्तृत्वान झाले तर त्यामुळें सर्व समुच्चयास मोठेपणा येतो. जो समुच्चय आपल्यासांठीं घटना उत्पन्न करीत नाहीं आणि व्यक्तींची काळजी घेत नाहीं, तो समुच्चय जिवंत राहण्यास नालायक होय. समुच्चयानें आपण कांहीं एक न करतां सदस्यांच्या निष्ठेची अपेक्षा बाळगणें हें अत्यंत बेजबाबदारपणाचें द्योतक आहे. असो.
समाजनिष्ठेचा प्रश्न एवढ्या विवेचनानें सुटत नाहीं. असाहि एक वाद उपस्थित होतो कीं, देशाभिमान हा व्यक्तींस पर्वापार आलेल्या लहान समुच्चयाचे अभिमानी बनवून मोठा समुच्चय करण्याची क्रिया दूर ढकलील. अमेरिकेंत यादवी चालू असतां दक्षिणेंतील संस्थानें आपल्या संस्थानांचा अभिमान धरून मोठे समुच्चय घडवून आणण्याचें कार्य दूर टाकीत नव्हतीं काय? देशाभिमान धरून जगद्विकासकार्य दूर ढकलणें योग्य आहे काय? कर्याचें महत्त्वमापन करतांना जर आपण जगाचा अंतिम किंवा आज तागाईत झालेला विकास गृहीत धरून त्यास साधक किंवा नाशक अशा कोणत्या गोष्टी झाल्या यावरून क्रियांची युक्तायुक्तता ठरवितों आणि त्या जगद्विकासास जितपत साधक झाल्या असतील त्या प्रमाणानें त्यांचें महत्त्व ठरवितों तर देशाभिमानास महत्त्व कां द्यावें? या तर्हेच्या वादास उत्तर देण्याच्या पूर्वीं जगद्विकासाचे नियम काय आणि त्याचें अंतिम स्वरूप काय हें तपासलें पाहिजे आणि देशाभिमानादी तत्त्वांची पुन्हां उजळणी केली पाहिजे.