प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण १३ वें.
स्पर्धाक्षेत्राकडे पुन्हां एकदां.
बौद्धिक ऐक्य. - राजकीय एकता सोडून दिली तरी बौद्धिक एकता किंवा दळणवळण तरी निदान ठेवणें शक्य आहे काय? हें प्रथमतः शक्य कोटींतील दिसतें. जगांतील कोणत्याहि मनुष्यसमूहानें कोणत्याहि मनुष्यसमूहाशीं दळणवळण ठेवणें हें अशक्य नाहीं. प्रश्न येतो तो परिणामविषयक विचार करतांना येतो. दळणवळण कितपत ठेवतां येईल? राजकीय दळणवळण शतक दीडशतक तरी शक्य नाहीं हें मागील विचारांवरून व्यक्त होईल; आणि व्यापारविषयक दळणवळण देखील फारच नियमितपणाचें होईल हें सकारण पुढें सांगण्यांत येईल. या दोन दळणवळणांच्या अभावीं सुशिक्षितांचा दूर देशीं प्रवास आणि निवास हीं कठिणच आणि त्यामुळें बौद्धिक दळणवळण कमीच राहणार. बौद्धिक दळणवळण सुरूच झाल्यास त्यास साहाय्यक अशा अनेक गोष्टी आहेत. आमच्या अनेक पौराणिक कथांचा आमच्या दूरगत बांधवांस अगोदरच परिचय असल्यामुळें अशा कथांशीं आणि त्यांजवर रचलेल्या नाटक प्रहसनादिकांशीं तो अधिक सुलभतेनें होईल. भाषा गीर्वाण शब्दांनीं संस्कार पावल्या असल्यामुळें आणि भारतीय उपासनाविषयक शब्द आणि कल्पना त्यांच्या भाषांत व आयुष्यक्रमांत शिरल्या असल्यामुळें भारतीयांस आपल्या कल्पना त्यांच्या वाङ्मयांत घुसविण्यास कठिण पडणार नाहीं. याशिवाय जसजसा हिंदूंच्या एकंदर विस्ताराचा इतिहास तयार होत जाईल आणि तो सर्व देशांत पसरविला जाईल तसतशी सर्वांच्या एकत्वाची कल्पना अधिक दृढमूल होत जाईल यांत शंका नाहीं. जें संस्कृत भाषेच्या प्रभावामुळें सादृश्य उत्पन्न झालें आहे तें वृद्धिगंत करण्याकरितां परिश्रम झाल्यास संवर्धनक्षम आहे हें मात्र सांगतां येईल; आणि या सादृश्याशिवाय व इतिहासमुलक ऐक्याच्या कल्पनेशिवाय सर्व लोकांस एकत्र जोडण्याचें साधन आज आपल्यापाशीं नाहीं.