प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण १५ वें. : इतिकर्तव्यता.
उपप्रकरण ८ वें.
अल्पप्रदेशविषयक कर्तव्यें.
महाराष्ट्राचा विशेष विचार.- सर्वसामान्य तात्त्विक विचार सोडून आतां आपलें लक्ष महाराष्ट्राकडे लावूं. विशिष्ट विषयाचा विचार केला असतां सामान्य तत्त्वें आपोआप स्पष्ट होतील. महाराष्ट्राचा आपल्याला शास्त्रीय पद्धतीनें अभ्यास करणें आहे. शास्त्र म्हणजे सामान्य तर्हेचें जें ज्ञान असेल त्यास मोजमाप लावून अधिक निश्चित केलेलें ज्ञान. आज सामाजिक स्थितीचा अभ्यास करतांना फारच थोडें समाजविषयक ज्ञान आपणांस परिमाणात्मक करतां येतें. संपत्तीचे आंकडे देशादेशांचें मिळवून कोणत्याहि दोन देशांच्या संपत्तीची तुलना करतां येते. विवक्षित देशांतील लोकांच्या मृत्यूंचे आंकडे गोळा करून तेथील लोकांचा शिक्षणोत्तर उत्पादनकाल मोजतां येतो. तथापि आंकडेशास्त्र समजाच्या सर्वच अंगांचा विचार करण्यास उपयोगीं पडत नाहीं. आंकड्यांचें अस्तित्व आणि आंकडे मिळविण्याची शक्यता या दोन गोष्टींचा विचार करून समाजशास्त्रीय प्रश्नाकडे वळावें लागतें. आंकडेरूपी साहित्याच्या अभावामुळें किंवा अशक्यतेमुळें, जेथें आंकडेशास्त्र लंगडें पडतें तेथेंहि समाजशास्त्राच्या अभ्यासकास कांहीं परिश्रमक्षेत्र असतें. प्रथमतः हें लक्षांत ठेवलें पाहिजे कीं, परिणात्मक ज्ञान ज्ञानार्थयत्नाच्या उत्तरकालीं प्रात्प होतें. पहिल्यानें जे ज्ञान मिळतें तें गुणबोधक असतें. पाणी कढत आहे हें सांगणें निराळें आणि पाण्याचा कढतपणा ८० डिग्री सेंटिग्रेड आहे असें सांगणें निराळें. मापानें मोजतां येण्यापूर्वीं म्हणजे परिणात्मक ज्ञान प्राप्त होण्यापूर्वीं गुणात्मक ज्ञान मिळवितां येतें. असो.
आज भाषेच्या तत्त्वावर प्रांत पडले नाहींत त्यामुळें महाराष्ट्र व इतर भाग यांची तुलना करण्यासाठीं आंकडे मिळत नाहींत. प्रांतांचे आंकडे मिळतात पण त्यांचा शास्त्रास फारसा उपयोग नाहीं. मुंबई इलाख्यांतील ब्राह्मण व मध्यप्रांत आणि वर्हाड यांतील ब्राह्मण यांच्या आंकड्यांची तुलना करून काय उपयोग? एकीकडे सुशिक्षित महाराष्ट्रीय ब्राह्मण व पाणीभरे गुजराथी ब्राह्मण यांचे आंकडे एकत्र करावे लागतात तर दुसरीकडे महाराष्ट्रीयांचे आंकडे रांगड्यांशीं मिश्र होतात. समाजशास्त्राचा अभ्यास जो करावयचा असतो तो विशेषतः समाजाचें हित साधण्यासाठींच करावयाचा असतो.
शास्त्रीय दृष्टीचें म्हणजे पद्धतशीर अवलोकन जर व्यवहारांत त्या अवलोकनाचा उपयोग होणार असेल तरच होतें. सामाजिक अथवा कोणतींहि शास्त्रीय तत्त्वें विशिष्ट प्रश्न हातीं घेतल्यानेंच खुलीं होतात, आणि तीं लोकांपुढें सोदाहरण मांडलीं तरच त्यांस समजतात. समाजाचा पद्धतशीर अभ्यास कसा करावयाचा हें समजून घ्यावयाचें म्हणजे एखाद्या विशिष्ट समजाचें हित करण्याची बुद्धि जागृत ठेवून तो समाज अधिक सुखी कसा होईल याचे उपाय शोधीत बसावयाचें. आपणांस भारतीय या दृष्टीनें आपलें सामुच्चयिक हित साधावयाचें आहे, तसेंच तें हिंदु या दृष्टीनें व महाराष्ट्रीय या दृष्टीनें साधावयाचें आहे. महाराष्ट्रीय दृष्टीनें आपलें हित साधण्यासाठीं खटपट करण्याकरितां समाजाचीं आजचीं वैगुण्यें शोधण्याकडे आणि नंतर त्यांवर उपाययोजना करण्याकडे आपण अगोदर लक्ष दिलें पाहिजे; कारण, महाराष्ट्रीयांस पुढें सारणें हें आपलें हिंदुस्थानच्या हिताच्या दृष्टीनें कर्तव्य आहे. जोंपर्यंत महाराष्ट्र दुर्बल आहे तोंपर्यंत त्याच्याकडून इतर भागांशीं चांगल्या तर्हेनें सहकार्य व्हावयाचें नाहीं.
महाराष्ट्रीय समाजाचें स्थूल वर्णन येणेंप्रमाणें करतां येईल. हा सुमारें दोन कोटी लोकांचा समूह बर्याच विस्तीर्ण प्रदेशावर पसरला आहे. ज्या प्रदेशांत महाराष्ट्रीयांचें आधिक्य आहे तो महाराष्ट्र असें म्हटल्यास महाराष्ट्र मोठा विस्तृत प्रदेश आहे असें म्हणावें लागेल. जर या प्रदेशांतील लोकांस कार्यस्वातंत्र्य मिळालें तर बर्याच मोठ्या प्रदेशावर महाराष्ट्रीय मंडळीचा अधिकार चालेल. महाराष्ट्रेतर प्रदेशांमध्यें अशी स्थिति नाहीं. या प्रदेशांतून स्थानिक भाषा बोलणार्या लोकांचें दार्ढ्य दृष्टीस पडतें. महाराष्ट्रामध्यें समाजाचा विस्तार अधिक होऊन दार्ढ्या कमी झालेलें दिसतें. या परिस्थितीचा पुढेंमागें महाराष्ट्रास हितकर असा परिणाम होईल. महाराष्ट्रांत आलेले परके लोक महाराष्ट्रीय होतील. महाराष्ट्राचा विकास होण्यास ही स्थिति उपकारक आहे. महाराष्ट्रांत येऊन वस्ती करून राहिलेले लोक जर पुढेंमागें महाराष्ट्रीय झाले तर आजचे जें समाजदौर्बल्य आहे तें नाहींसें होईल.
ही इष्ट स्थिति घडवून आणण्यासाठीं जी एक गोष्ट अवश्य आहे ती ही कीं, महाराष्ट्रीय जनतेची सामुच्चयिक आणि वैयक्तिक कार्यशक्ति आज आहे त्यापेक्षां पुष्कळच अधिक विकसित झाली पाहिजे. ती याप्रमाणें विकसित होण्यासाठीं काय केलें पाहिजे हें शोधणें कर्तव्यात्मक समाजशास्त्राचा म्हणजे सामाजिक सुधारणेचा मुख्य भाग होय. समाजाची अंतर्गत स्थिति कशी असावी, तेथें समाजिक भेदभाव कमी असावा अगर अधिक असावा हें समाजाच्या पुढें जें कार्य असेल त्या वरून ठरतें. महाराष्ट्रापुढें जें कार्य पूर्वीं होतें त्यामुळें आजची स्थिति उत्पन्न झालेली आहे. हें पूर्वींचें कार्य येणेंप्रमाणें होतें. महाराष्ट्रानें हिंदुस्थानांतील बर्याच मोठ्या भागावर राज्य करावयाचें, लोकांनीं सैनिक वृत्तीनें रहावयाचें आणि जमिनीची मालकी मिळवावयाची. या ध्येयामुळें व्यापार वगैरेकडे दुर्लक्ष झालें, आणि पुष्कळ प्रदेश थोड्या संख्येनें व्यापावयाच्या प्रयत्नामुळें देशास जें स्वरूप येतें तें प्राप्त झालें. याविषयींचें विशेष आंकडे महाराष्ट्रीय वाङ्मयसूचीच्या प्रस्तावनेंत दिले आहेत.
आतां आपणांपुढील जो प्रश्न आहे तो व्याप्त केलेल्या प्रदेशास महाराष्ट्रीय स्वरूप कसें द्यावें याविषयींचा आहे, आणि पुढील प्रयत्न या दृष्टीनें होईल असा अजमास आहे. महाराष्ट्रीयांनीं अधिकांशानें व्यापिलेल्या प्रदेशास महाराष्ट्रीय स्वरूप यावें यासाठीं भाषेनुसार देशविभागणीच्या तत्त्वाचा अंमल झाला पाहिजे. देशाचे विभाग भाषेच्या तत्त्वानुसार पाडावें हें तत्त्व आतां लोकांस हळू हळू मान्य होऊं लागलें आहे आणि कै. लोकमान्य टिळकांनीं काँग्रेस डेमोक्रॅटिक पक्षाचें जें कार्य म्हणून पुढें मांडलें त्यांत हें तत्त्व गोंवून दिलें आहे.