प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण १५ वें. : इतिकर्तव्यता.

उपप्रकरण ८ वें.
अल्पप्रदेशविषयक कर्तव्यें.

जुने व्यापारी मार्ग व जुनी सावकारी - महाराष्ट्रांतील पूर्वींचे दळणवळणाचे मार्ग व सावकारीची पद्धति यांवर प्रकाश पाडणार्‍या कांहीं गोष्टी येथें देतों.

कोंकणांतील चौल, कल्याण, सोपारे, ठाणें व दक्षिणेंतील जुन्नर, नाशिक, पैठण यांचा प्राचीन इतिहास पाहिला असतां पुणें जिल्ह्यांतून बरेच व्यापारी मार्ग होते असें दिसतें. ख्रिस्ती शकापूर्वींच्या पहिल्या शतकांत जुन्नरहून समुद्रकिनार्‍यावर जाण्याकरितां माळसेज घाटांतून एक व नानाघाटांतून एक असे दोन मुख्य रस्ते होते. या दोन्ही रस्त्यांवर त्या काळचे शिलालेख, पायर्‍या, हौद, इत्यादि गोष्टी अद्यापि अस्तित्वांत आहेत. त्याचप्रमाणें बेडसा, भाजा व कारला येथील बौद्धांच्या वेळचीं लेणीं व इतर स्थानें यांचा काळ लक्षांत घेतां ख्रिस्ती शकापूर्वीं १०० पासून इ. स. ६०० पर्यंत बोरघाट हा देखील एक व्यापारी मार्ग होता असें दिसतें. शिवनेरीवर असलेल्या एका हौदावरून देवगिरीच्या यादवांच्या वेळेस जुन्नर हें एक व्यापाराचें ठिकाण होतें असें दिसतें. पुढें पेशव्यांची राजधानी पुणें शहर झाल्यावर पेशव्यांनीं नाना, माळसेज, भीमाशंकर आणि कसुर हे घाट बरेच सोईचे केले होते असें दिसतें.

इ. स. १८२६ सालीं अस्तित्वांत असलेले रस्ते.
मुंबई- अहमदनगर रस्ता. पनवेलपासून या रस्त्याची लांबी १४८ मैल.

मार्ग - पनवेल-चौक-खालापूर-खोपवली-बोरघाट-खंडाळें-लोणावळें-खडकाळें-वडगांव-कुवले-तथवडे-औंध-पुणें-वाघोली-लोणी-कोरेगांव-गणपतीचें रांजणगांव-कर्दळवाडी-शिरूर-हिंगणी-कडुस-रांजणगांव-सारोळें-अकुळनेर-केडगांव.

 कल्याण-अवरंगाबाद  रस्ता  १८५ मैल.
 पुणें-सुरत  रस्ता  २५४ मैल.
 पुणें-कल्याण   रस्ता  ७५ मैल.
 पुणें-जुन्नर  रस्ता  ८५ मैल.
 पुणें-खंडाळा  रस्ता  ५० मैल.
 पुणें-धुळें  रस्ता  २०१ मैल.
 पुणें-अवरंगाबाद   रस्ता  १४४ मैल.
 पुणें-सोलापुर (सावळेश्वरमार्गें)  रस्ता  १५७ मैल.
 पुणें-सोलापुर(दिवाघाटमार्गें)  रस्ता  १५७ मैल.
 सोलापुर-सिकंदराबाद   रस्ता  १९२ मैल.
 पुणें-एदूर-बेळगांव  रस्ता  २४१ मैल.
 एदूर-धारवाड  रस्ता  २१३ मैल.
 पुणें-दापोली   रस्ता  ९७ मैल
 पुणें-गोरेगांव   रस्ता  ६६ मैल.
 पुणें-निपाणी  रस्ता  २११ मैल.
 पुणें-नागोठणें  रस्ता  ६४ मैल.

मराठ्यांच्या अमदानींत सह्याद्रीपार होण्यास दोन महत्त्वाचे मार्ग होते. (१) पुणें-कोल्हापूर-कर्नाटक. या रस्त्यास बोरघाट साल्पाघाट आणि न्हावीघाट लागत. (२) रत्‍नागिरी-पंढरपूर रस्ता कलढोण घाटांतून पंढरपूरकडे जात असे.

इ. स.१८२६ मध्यें सातारा जिल्ह्यांत पुढील रस्ते होते.