प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण १५ वें. : इतिकर्तव्यता.

उपप्रकरण ८ वें.
अल्पप्रदेशविषयक कर्तव्यें.

आर्थिक महत्त्वाकांक्षा.- महाराष्ट्राला आर्थिक महत्त्वाकांक्षा नाहीं. महाराष्ट्र या देशाला मोठी महत्त्वाकांक्षा उत्पन्न होईल काय? महाराष्ट्र हा आज संपन्न देश नाहीं. मोठमोठ्या रकमा एकत्र होऊन त्या लोकांच्या हातीं येऊन त्यांचा अधिकाद्रव्योत्पादनार्थ उपयोग कसा काय करावा या तर्‍हेचा प्रश्न लोकांपुढें उत्पन्न झाला म्हणजे देशांतील भौतिक संपत्तीचें आणि त्या भौतिक संपत्तीच्या अनेक उपयोगांचें आणि उद्यमांस उपयुक्त होणार्‍या भौतिक शक्तींच्या लीलांचें ज्ञान करून घेण्याची वृत्ति देशांत उत्पन्न होते. कारखान्यास साहित्या जवळ मिळालें नाहीं तर दुरून मिळवावें, या प्रकारची कल्पना देखील व्यक्तीचें अवलोकनक्षेत्र विस्तृत करावयास लावते. या प्रकारची चोदना आज महाराष्ट्रास नाहीं. महाराष्ट्राच्या मोठमोठ्या रकमा फारशा कोठें गुंतल्या नाहींत आणि अनेक मनुष्यांच्या शिलका गोळा होऊन जो संचय होतो त्या प्रकारचा संचय महाराष्ट्रीयांच्या ताब्यांत नाहीं. त्यामुळें सर्व जगाकडे आर्थिक दृष्टीनें पाहण्याची महाराष्ट्रीयांची प्रवृत्तीच नाहीं.

व्यापाराची वृद्धि होण्यास अवश्य लागणारी एक गोष्ट म्हणजे राजधानीचीं किंवा उतारपेठेचीं ठिकाणें. अशीं ठिकाणें महाराष्ट्रांत आजपर्यंत होऊन गेलीं त्यांपैकीं हिंदुकालामधील अवशेष देवगिरी, चौल व सोपारे याखेरीज दुसरे आढळत नाहींत. मुसुलमानी काळांत प्रसिद्धीला आलेलीं ठिकाणें म्हणजे विजापूर, अहमदनगर आणि इलिचपूर हीं होत. येथें चोहोंकडची संपत्ति येऊन खर्च होत गेल्यामुळें थोडीबहुत कला वाढलेली दिसत असे. मराठी अमदानींत पुणें, नागपूर, कोल्हापूर हीं शहरें भरभराटीस आलीं आणि मराठी राहणीस उपयोगीं पडणारी कला येथें थोडीशी वाढली.

व्यापारी राष्ट्र बनण्यास महाराष्ट्रीयांस अगदीं प्रारंभापासून अडचणी होत्या. अगोदर हें दंडकारण्य, उशीरा वसलेले; त्यांत पुष्कळ भाग डोंगराळ. मेळघाट, बालघाट, सह्याद्रि व सातपुडा हे डोंगर मालाच्या नेआणीस बरीच गैरसोय करणार. महाराष्ट्राला जवळचें असें बंदर तरी कोणतें होतें? येऊन जाऊन चौल. तेथील व्यापारी वर्ग कोणता होता याविषयीं आज स्पष्ट माहिती नाहीं. गुजराथची गोष्ट निराळी आहे. गुजराथला बंदरें पुष्कळ. सुरत व भडोच हीं फार जुनीं बंदरें आहेत. यामुळें येथें बराच मोठा व्यापारी वर्ग येऊन राहिला. गुजराथी लोक व्यापारी बनले व महाराष्ट्रीय बनले नाहींत असें विधान करण्यापेक्षां व्यापार करणारे लोक गुजराथेकडे गेले असें विधान केलें असतां तें अधिक बरोबर होईल. गुजराथेमध्यें वाणी पुष्कळ आहेत पण महाराष्ट्रांत वाण्याची जात जवळजवळ नाहींच. कोंकणपट्टीला कांहीं कुडाळे वाणी, वैश्य वाणी म्हणून विड्यांचा धंदा करितात आणि पुण्याकडे थोडेसे काथर वाणी व कुळवंत वाणी आहेत. पण या सर्वांचे धंदे लहान प्रमाणावर आहेत. जे लोक मोठ्या उतारपेठेंत नाहींत ते लोक धंदा तरी काय करणार? मराठी वाण्यांची कार्यशक्ति लहानशा दुकानदारीपलीकडे फारशी गेलेली दिसत नाहीं. पेशवाईमध्यें किंवा मराठेशाहीमध्यें सावकारीच्या धंद्यास एक निराळें क्षेत्र होतें. ते म्हटलें म्हणजे लढाया करणें, मुलुख जिंकणें इत्यादि खटपटींनीं पैसा पुरविणें हें होय. या प्रकारची सावकारी पुण्यांत बरीच होती. त्याशिवाय सावकारीचें सध्यांचें जें जुजबी काम आहे तेंहि पूर्वीं असेच. जमिनीवर किंवा दागिन्यांवर पैसा देणें हा व्यवहार जितपत सध्यां समजतो तितपत पूर्वींहि समजत असे. कलाकौशल्य वाढविण्याच्या बाबतींत खटपट केली असा तर्‍हेचा आरोप मराठेशाहीवर कधींच येणें शक्य नाहीं, तेव्हां कलाकौशल्याच्या संवर्धनासंबंधींच्या सावकारीचा हिशोब कशास घेत बसावयाचा ? महाराष्ट्रामध्यें जीं लुगडीं खपतात त्यांच्या देखील महत्त्वाच्या पेठा म्हणजे अहमदाबाद, महेश्वर, इरकल या पेठा महाराष्ट्राच्या बाहेरच आहेत. कुणब्याच्या बायकांनां वापरतां येण्याजोगीं लुगडीं आणि घरांत वापरतां येण्याजोगीं मडकीं हीं मात्र चोहोंकडे आढळतात. सध्यां मराठी सुतारहि कोठें दिसेनासा झाला आहे. पांचकळशांनीं तर आपला सुतारीचा धंदा सोडून दिल्यासारखाच आहे. थोडक्यांत सांगावयाचें म्हटल्यास चहाचीं दुकानें, किरकोळ वाणसौदा व स्टेशनरी आणि मधूनमधून सामान्य कापडाचें दुकान यापलीकडे महाराष्ट्राच्या हातांत कांहीं व्यापार नाहीं, कलाकौशल्य नाहीं आणि धंद्यांस उत्तेजन देणारी सावकारीहि नाहीं.