प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण १५ वें. : इतिकर्तव्यता.
उपप्रकरण ८ वें.
अल्पप्रदेशविषयक कर्तव्यें.
गुलामांचा व्यापार.- हिंदुस्थानांत गुलामांचा व्यापार फार पूर्वींपासून चालत होता. गुलाम दुसरीकडून इकडे आणीत व इकडून दुसरीकडे नेत असत अशाबद्दलचा पुरावा मागें दिलाच आहे (पृष्ठ २९९ पहा). महाराष्ट्रांत गुलामांचा व्यापार किती असे हें सांगतां येत नाहीं. मुंबईंतील गुलामांच्या व्यापारासंबंधानें थोडी माहिती येणेंप्रमाणें आढळते.
इ. स. १६७७ -ईस्ट इंडियाचे तीन गुलाम सेंट हेलेना येथें पाठवून द्यावे म्हणून ता. १६ फेब्रुआरी १६७७ च्या पत्रांत उल्लेख आहे.
इ. स. १६८३ - इंग्लंदच्या राजाकरितां गुलाम एक पुरुष व दोन बायका जितक्या ठेंगण्या सांपडतील तितक्या राजानें मागविल्या. मुलाचें वय १७ असावे व मुलींचें वय १४ ते १६ असावें.
इ. स. १६८७ -सेंट हेलेनाला आणखी कांहीं गुलाम पाठविले.
इ. स. १७३६ -ता. २७ आगष्टचें इ. स. १७३६ चें Bombay Government चें Consultation (मुंबई सरकारचा खलिता) यांत १६५ गुलामांचा उल्लेख आहे.
इ. स. १७४१ सालीं एक स्लेव्ह ट्रेड पब्लिकेशन प्रसिद्ध झालें त्यांत असें आदेशिलें आहे कीं, गुलामाची जी जात असेल तीपेक्षां अन्य जातीच्या मनुष्यास त्या गुलामास विकतां येणार नाहीं; आणि जर अन्य जातीचा मनुष्य विकत घेईल तर त्यास १०० रुपये दंड होईल,
सरकारी गुलामांस वागवावें कसें याबद्दल खालीलप्रमाणें वारंवार आदेश आढळतो. तुम्ही त्यांस दयाळूपणानें वागवावें आणि ते जरी आपली मालमत्ता आहेत असें समजण्यांत येतें तरी त्यांनीं आपापलीं कामें आनंदानें करावींत म्हणून त्यांस सर्व प्रकारें उत्तेजन द्यावे. त्यांचें जेवणखाण, रहाणें, कपडे यांविषयीं अशी काळजी घ्यावी कीं त्यामुळें त्यांची गुलामगिरी त्यांस त्रासदायक वाटूं नये. त्यांनां निराळे ठेवावें आणि कोणा विश्वासू मनुष्याच्या हातीं ठेवावें. त्यांस खाण्यापिण्यास थोडें द्यावें. सोल्जरांनां त्यांच्यापासून दूर राखावें, नाहींतर ते त्यांस बिघडवितील आणि ते आजारी पडले असतां जितकी आपण सोल्जरांनां डॉक्टरांची मदत देतों तितकी त्यांस द्यावी.
गुलामांची किंमत इ. स. १७५३ सालीं दर डोक्यास सरसकट ७१ रुपये दिली गेली.
इ. स. १६६७ सालीं ३८ काफरी बायकांची किंमत २१५५ रुपये लिहिली आहे.
मुंबईंतील खाजगी गुलाम-इ. स. १७८० सालच्या खानेसुमारीच्या वेळेस मुंबई शहरांत ४७१७० लोकसंख्येपैकीं ४३१ गुलाम होते.
इ. स. १७६२ च्या एका पत्रांतील सरकारी गुलामांच्या किंमती. | |
प्रत्येक मनुष्य (वय २० ते ४०) | ११० रुपये. |
प्रत्येक स्त्री (वय २० ते ४०) | ८० रुपये. |
प्रत्येक स्त्रीमागें पांच पुरुष गुलाम नेमलेले असावे. | |
प्रत्येक मुलगा (वय १४ ते २०) | ७५ रुपये. |
प्रत्येक मुलगी (वय १४ ते २०) | ५० रुपये. |
प्रत्येक मुलीमागें पांच मुलें गुलाम नेमलेलीं असावींत. |
सरकारी गुलामांचें खाणें पिणें.- आठवड्यांतून पांच दिवस चांगली खिचडी व मासे व दोन दिवस मांसाहार आणि मनुष्यास एक रुपाया व बाईस आठ आणे पानतंबाखूसाठीं. शिवाय त्यांनां भाजीपाला करण्याकरितां जमीन द्यावी. त्यांनां दोन तुमानी, दोन शर्ट व एक टोपी दर सहा महिन्यांनीं द्यावीं असा इ. स. १७५२ च्या कोर्ट आफ डायरेक्टर्सच्या पत्रांत उल्लेख आहे.
इ. स. १७५७ सालीं कांहीं गुलामांनीं बंड केलें त्या वेळीं त्यांस हिंदी लास्करांचें (खलाशांचें) खाणें द्यावें असा शिक्षा म्हणून ठराव झाला. ही शिक्षा दिल्यानंतर ते वठणीस आले. यावरून लास्करांपेक्षां त्यांचें खाणें उच्च होतें असें दिसतें.
सरकारी गुलामांस दिलेलीं कामें-बरेचसे गुलमा लष्करांत व आरमार खात्यांत होते. कित्येक लहान लहान गुलामांस दुसर्यांस कामाकरितां देत असत. गुलामांचा खाण्यापिण्याचा खर्च मजुरांस द्यावयाच्या मजुरीपेक्षां अधिक पडत असे.
पूर्वोक्त विवेचनावरून एवढें स्पष्ट होईल कीं जगाच्या कोणत्याहि भागापेक्षां महाराष्ट्रामध्यें व्यापारी कर्तृत्व पूर्वींपासूनच कमी आहे आणि तें वाढविण्यासाठीं जितकी खटपट करावी तेवढी थोडीच. व्यापारी शिक्षण अथवा प्रत्यक्ष चढाओढीच्या धंद्यांत नोकरी आणि पुढें स्वतंत्रपणें व्यापार या प्रगतीच्या पायर्या आहेत. धंद्यांत प्रवेश व्हावा यासाठीं तरुणांस व्यापारी नोकर्या लावून देण्याची खटपट झाली पाहिजे आणि सामान्य तर्हेच्या व्यापारी शिक्षणाचाहि फैलाव झाला पाहिजे.
पण या सर्वांपेक्षां एक गोष्ट अधिक महत्त्वाची आहे. ती म्हटली म्हणजे खात्रीचें पण थोडें उत्पन्न मिळवावयाचें सोडून पुष्कळ उत्पन्न मिळवावें आणि त्यासाठीं साहस करावें ही वृत्ति वाढली पाहिजे. भर्तृहारी म्हणतो-
कुसुमस्तबकस्येव द्वयी वृत्तिर्मनस्विनाम्।
मूर्ग्धि वा सर्वलोकस्य विशीर्येत वनेऽथवा॥
हा उपदेश जयिष्णु महाराष्ट्रानें लक्षांत ठेवला पाहिजे.
महाराष्ट्रानें काय केलें पाहिजे तें सांगावयाचें म्हणजे आर्थिक उन्नतीचीं तत्त्वें सांगावयाचीं त्यांकडेच आतां लक्ष देऊं.