प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण १५ वें. : इतिकर्तव्यता.
उपप्रकरण ८ वें.
अल्पप्रदेशविषयक कर्तव्यें.
सामुच्चयिक कार्यशक्ति.- आतां यानंतर मुख्य प्रश्न हा आहे कीं, आपली सामुच्चयिक कार्यशक्ति कशी वाढवावयाची?
एखाद्या समजाची किंमत करावयाची म्हणजे प्रथमतः त्या समाजाची कतृत्वशक्ति मोजावयाची. ही मोजतांना आपण दोन प्रश्न विचारले पाहिजेत.
(१) समाजाची संघटित कार्यशक्ति काय आहे?
(२) समाजांतील व्यक्तींची प्रत्येक व्यक्तीच्या कार्यानें उत्पन्न झालेली शक्ति एकत्र केली असतां किती होते?
समाजांतील व्यक्तींची संघटित स्थितींत उत्पन्न झालेली कार्यशक्ति प्रत्येक व्यक्तीच्या स्वतंत्रपणें कार्य करतांना दृग्गोचर होणार्या शक्तीपेक्षां पुष्कळ पटीनें अधिक असते. राष्ट्र म्हणजे व्यक्तींची संघटित स्थिति. कंपनी, ट्रस्ट वगैरे संघ वस्तूंच्या उत्पादनासाठीं तयार झालेले असतात आणि त्यांचें कार्यक्षेत्र नियमित असतें. ज्या संघाचें कार्यक्षेत्र नियमित नसून सर्वव्यापी आहे आणि मनुष्यमात्राच्या सामुच्चयिक स्थितीची पूर्णावस्था ज्या संघांत दृग्गोचर होते तो संघ म्हटला म्हणजे राष्ट्र होय. सर्वच राष्ट्रें आपल्या सर्व सभासदांचें म्हणजे नागरिकांचें सर्व प्रकारें श्रेय साधण्यासाठीं आपलें अस्तित्व आहे हें ओळखतात असें नाहीं. जें राष्ट्र हें कर्तव्य अधिक ओळखतात असें नाहीं. जें राष्ट्र हें कर्तव्य अधिक ओळखतें तें राष्ट्र अधिक प्रगमनशील आहे असें समजलें जातें. स्वातंत्र्यनाश म्हणजे नागरिकांच्या सामुच्चयिक हितास अत्यंत उत्कटतेस पोंचवावयाच्या संधीचा नाश होय. स्वराज्याची इच्छा म्हणजे सामुच्चयिक हित अधिकाधिक साधतां येईल जशा परिस्थितीची इच्छा होय. ही इच्छा जोंपर्यंत अस्तित्वांत नाहीं तोंपर्यंत स्वराज्याची इच्छा म्हणजे समाजांतील कांहीं चळवळ्या व्यक्तींनां अधिक महत्त्वाचें पद मिळावें हि इच्छा होय.
महाराष्ट्रास स्वराज्य नाहीं म्हणजे महाराष्ट्रीयांस आपलें हितसाधन सामुच्चयिक प्रयत्नानें करण्याची संधि नाहीं. ही संधि नसतां महाराष्ट्रीयांचें सामुच्चियक कार्य किती झालें याची मोजदाद करणें व्यर्थ वाटतें. आपणांस सोळा आणे सामुच्चयिक हितसाधन करून घेणें शक्य होण्यास दोन गोष्टी पाहिजेत. एक स्वराज्य पाहिजे आणि दुसरें सामुच्चयिक हितसाधनाची राष्ट्रांत आकांक्षा पाहिजे.
महाराष्ट्राची स्थिति एकंदरींत फार विलक्षण आहे. महाराष्ट्रांतील मुख्य राज्यकर्ते परके आहेत. इंग्रज, पोर्तुगीज व निजाम या त्रयीनें महाराष्ट्रांतील बहुतेक भाग व्यापला आहे. महाराष्ट्रीय संस्थानिक महाराष्ट्राबाहेर आहेत. तेथें जर राजांमध्यें प्रजेच्या हिताविषयीं अधिकाधिक दक्षता उत्पन्न होऊं लागली तर तिचा फायदा महाराष्ट्रीयांस न मिळतां इतरांस मिळणार. महाराष्ट्रीय हिताची वृद्धि स्वजातीय राज्यकर्त्यांमार्फत व्हावयासारखें क्षेत्र म्हटलें म्हणजे कोल्हापुर संस्थान आणि सांगली मिरजेसारख्या जहागिरी होत. तेथें स्वदेशीय लोकांच्या हातीं कांहीं तरी सत्ता आहे. महाराष्ट्रीय संस्थानांत देश्य लोकांच्या हितासाधनाचा प्रयत्न फारसा झालेला दिसत नाहीं. याचें कारण तेथें असलेला एतद्विषयक विचाराभाव होय.