प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण ११ वें.
बाह्यांचा हिंदुस्थानावर परिणाम.
नृत्य आणि नाट्य. - नाट्यशास्त्रांत नृत्य आणि नाट्य असे नृत्यविभाग धरले आहेत. नाट्य म्हणजे हावभावांनीं युक्त आणि कथासूचक असें नाचणें. नाट्य हा नृत्यवाचक शब्द असून तो नाटकांकडे उपयोजिला गेला त्या अर्थीं नाटकांचें मूळ नृत्यांत शोधिलें पाहिजे ही कल्पना सहज बसते. हिचा अनुवाद श्रोडरनें केला आहे. आणि स्वमतपुष्ट्यर्थ त्यानें आप्तवाक्येंहि दिलीं हेत. नाट्यनामक नृत्यांत वाक्यें म्हणणेंहि येतें असें श्रोडर समजतो. “नृत्य” आणि “नाट्य” यांचा उपयोग देवतांसाठीं देवतांपुढें झाला एवढेंच नाहीं तर या कलेचा उपयोग देवतांनीं केला हें आपल्याकडील अनेक ग्रंथकाराचें म्हणणें अनुवादित करून ऋग्वेदकालीन नाट्य शोधण्यास श्रोडर प्रवृत्त होतो.
ऋग्वेदांतील संवाद हे नाट्यावशेष आहेत असें म्हणणारा श्रोडर ते संवाद भारतीय नाट्यकलेचा प्रारंभ होय असें म्हणणार्या लोकांशीं देखील आपला मतभेद व्यक्त करतो. तो म्हणतो कीं, ऋग्वेदांत जी नाट्यकला दृष्टीस पडते ती भारतीय नाट्यकलेचा प्रारंभ नसून वेदपूर्वकालीन नाट्यकलेचें अंतिम स्वरूप होय. अर्वाचीन भारतीय नाट्यकला सामान्य जनांत तंत्रशास्त्रीयांच्या खेळांत आणि बीजशक्तिदैवतप्रधान मंडळींच्या खटाटोपांत निर्माण झाली. ऋग्वेदोक्त नाट्यकला अस्तंगत झाली. तिचे वंशज हिंदुस्थानांत सांपडणार नाहींत. तिचे भाऊबंद व संबंधी पाश्चात्य राष्ट्रांत सांपडतील. ऋग्वेदांतील हजारांवर सूक्तांमध्यें संवादरूपी सूक्तें फार थोडीं आहेत. यजुर्वेदांत तर अशीं सूक्तें मुळींच नाहींत आणि त्यापुढें तर ती कला मृतकल्प झालेली दिसते. उत्तरकालीन वेदग्रंथ तयार होण्यापूर्वींच ऋग्वेदांतील नाट्कला मृत झाली. तथापि प्राकृत जनांच्या खेळांची परंपरा फार जुन्या काळापासून, कदाचित् वेदकालापासून, पुढें चालू राहिली आहे.
श्रोडरनें ऋग्वेदांत जीं संवादसूक्तें नाटकें म्हणून हुडकून काढलीं आहेत आणि ज्यांच्या स्पष्टीकरणासाठीं त्यानें विशेष पानें खर्चिलीं आहेत त्या सुक्तांचे विषय येणेंप्रमाणेः-
इन्द्र, मरुत् आणि अगस्त्य (ऋ. मं १. सू. १७०,१७१, १६५.).
लोपामुद्रा आणि अगस्त्य (ऋ. मं १. सू. १७९).
सरमा आणि पणी (ऋ. मं १०. सू. १०८.).
अग्नि परत मिळविणें (ऋ. मं १०. सू. ५१-५३; १२४).
वरुण आणि इंद्र (ऋ. मं ४. सू. ४२.).
विश्वामित्र आणि नद्या (ऋ. मं ३. सू. ३३.)
पुरूरवा आणि ऊर्वशी (ऋ. मं १०. सू. ९५.).
यम आणि यमी (ऋ. मं १०. सू. १०.).
ऋष्यश्रृंग आणि शांता.
वृषाकपि आणि इंद्राणी (ऋ. मं १०. सू. ८६.).
इंद्राचा अमानुष जन्म (ऋ. मं ४. सू. १८.).
इंद्र वायु ( ?) आणि कवि (ऋ. मं ८. सू. ८९.)
मद्गलाची शर्यत (ऋ. मं १०. सू. १०२.).
सोम प्यालेला इंद्र (ऋ. मं १०. सू. ११९.).
वैद्याचें प्रहसन (ऋ. मं १०. सू. ९७.).
पश्चात्ताप पावलेला जुगारी (ऋ. मं १०. सू. ३४.).
बेडूक (ऋ. मं ७. सू. १०३.).
सोमप्राशनाचें लळीत (ऋ. मं ९. सू. ११२.).
यांपैकीं कांही खेळांचें स्वरूप वर्णन करतांना पाश्चात्य तुल्य गोष्टींची श्रोडर वारंवार आठवण देतो; आणि या नाटकांपैकीं बर्याच नाटकांचा प्रारंभ मूलगृहकालीं झाला आणि शेवट ऋग्वेदकालांत झाला असें दाखविण्यांत तो प्रयत्न करितो.
कांहीं असो. एक गोष्ट सर्वमान्य होईल ती ही कीं, नाटकें भारतीय संस्कृतींतच जन्मास आलीं. नाट्यवाङ्मय ग्रीकांपासून घेतलें असें तर आज कोणीच मान्य करणार नाहीं. विंडिशनें ज्या पात्रांची यवनकल्पनेपासून उत्पत्ति दिली आहे ती देखील सहज मान्य होणार नाहीं. उदाहरणार्थ, विदूषकाचा उगम व हर्षदेवाच्या नाटकांत ह्या पात्राचा उपयोद या विषयावर मांटगोमेरी शूलर यांनीं निराळें भाष्य केलें आहे. {kosh अमेरिकन ओरिएन्टल सोसायटीचें जरनल व्हॉल्यूम २०, द्वितीयार्ध.}*{/kosh}