प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण ११ वें.
बाह्यांचा हिंदुस्थानावर परिणाम.
आतांपर्यंत जें विवेचन झालें तें ज्या आपल्या संस्कृतीच्या प्रसारानें आपल्या समाजाची वृद्धी होईल किंवा इतर समाज आपणाशीं सदृश होण्यास मदत होईल त्या संस्कृतीचा प्रसार किती जनतेवर झाला हें शोधण्यासाठीं झालें. आतां इतर लोकांच्या संस्कृतीचा परिणाम आपणांवर काय झाला आणि होत आहे याच्याविषयीं माहिती दिली पाहिजे. इतर लोकांचे आपल्यावर जे परिणाम होतात त्यांत खालील गोष्टी ठळकपणें लक्षांत येतात.
(१) ज्या परकीय संप्रदायांच्या योगानें आपल्या समाजांतील व्यक्ती इतर समाजांत जाऊन मिळतात अशा संप्रदायांचा प्रसार म्हणजे आपल्या लोकांनीं ख्रिस्ती किंवा मुसुलमान होणें.
(२) इतर जातींच्या संनिकर्षामुळें आणि विचारप्रवर्तनामुळें आपल्या आचारांत तफावत पडणें.
(३) आर्थिक स्पर्धेचा आपल्या समाजावर परिणाम होणें. परक्यांच्या आपणांवर होणार्या पहिल्या प्रकारच्या परिणामाचा आजपर्यंतचा हिशोब आंकड्यांनी व्यक्त केलाच आहे. जे मूळचे आपल्यांतील होते पण जे आज हिंदु समाजाच्या बाहेर आहेत अशा लोकांचें हिंदूंशीं प्रमाण शेंकडा तीस आहे. यावरून परकीयांच्या आपल्यावरील परिणामाचा हा प्रकार किती चिंताजनक स्वरूपाचा झाला आहे हें लक्षांत येईल. असो.