प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ११ वें.
बाह्यांचा हिंदुस्थानावर परिणाम.

महाभारतांतील रामोपाख्यान.- महाभारतामध्यें रामायणाबद्दलचे उल्लेख पाहूं जातां प्रथम मुख्यतः तिसर्‍या पर्वाच्या शेवटीं रामोपाख्यानामध्यें रामायणांतील कथेप्रमाणेंच संक्षेपतः सर्व कथा दिलेली आढळते. परंतु या कथेमध्यें रामायणाचा अथवा वाल्मीकीचा उल्लेख मुळींच आढळत नाहीं. ही कथा जयद्रथानें हरण करून नेलेल्या द्रौपदीस परत आणल्यावर युधिष्ठराचें शांतवन करण्याच्या हेतूनें पूर्वींहि याप्रमाणें गोष्टी घडून आल्या आहेत असें दाखविण्याकरितां मार्कंडेय ऋषीच्या मुखामध्यें घातली आहे. परंतु या दोन कथांमधील सादृश्य, व त्यांच्या लेखनामधील सादृश्य पाहून महाभारतांतील कथा ही वाल्मीकीच्या कथेचेंच सार असावें असें वाटतें. परंतु या दोन्ही कथांमध्यें कांहीं फरकहि आढळून येतात. उदाहरणार्थ, महाभारतांतील कथेंत रावण व त्याचे बन्धू यांचा पूर्ववृत्तान्त, दशरथानें केलेला यज्ञ, रामाचें शिक्षण व सीताप्राप्ति व बालकांडांतील बहुतेक भाग अजीबात गाळला आहे. या कथेस रामजन्मापासून आरंभ करून त्याच्या बालपणांतील कांहीं गोष्टी देऊन दशरथानें त्यास युवराज करण्याच्या बेत केल्याचें सांगितलें आहे. नंतर अयोध्याकांड व अरण्यकांड यांतील भाग थोडक्याशा श्लोकांत सांगून टाकला आहे. मुख्य ज्या उद्देशानें ही गोष्ट सांगितली तो भाग आल्यापासून वर्णन जरा विस्तृत तर्‍हेनें दिलें आहे. शूर्पणखेचें काननाक कापल्यानंतर रावणाकडे झालेलें आगमन या गोष्टीपासून पुढील हकीकत सर्व रामायणाप्रमाणेंच क्रमाक्रमानें बारीकसारीक गोष्टींत कोठें क्षुल्लक फेरफार करून सांगितली आहे. कबन्धाची गोष्ट दिली आहे पण त्याच्या शापमोचनाचा उल्लेख केला नाहीं. शबरीची कथा सांगितलेली नाहीं. त्याप्रमाणेंच ब्रह्मदेवानें सीतेस पाडलेल्या स्वप्नाची हकीकत दिलेली नाहीं. त्रिजटेचें स्वप्न व रावणानें सीतेस दिलेली भेट या गोष्टी, सुग्रीवास राज्यदान व ४ महिन्यांनीं त्याला युद्धास मदत करण्यास केलेलें पाचारण या दोन गोष्टींच्या दरम्यान दिलेल्या आहेत. सीताशुद्धि ही हनुमानाच्या रामाजवळील लहानशा भाषणांत वर्णन केली आहे. या कथेंत रामायणाप्रमाणें समुद्राशीं युद्ध केल्याशिवायच त्यानें नलाच्या हातून सेतु बांधविण्यास संमति दिली. बिभीषणाचें आगमन सेतु पुरा होण्याच्या पूर्वीं न देतां मागाहून दिलें आहे. कुंभकर्णास रामाच्या ऐवजीं लक्ष्मणानें मारल्याचें वर्णन आहे. निकुंभिलेमध्यें इंद्रजितानें केलेल्या हवनाचें वर्णन दिलें नाहीं. इंद्रजितानें शरबंधानें रामलक्ष्मणास बांधल्याचें वर्णन दोनदां दिलें नसून एकदांच दिलें आहे. गंधमादन पर्वतावरून हनुमानानें वनस्पति (औषधि) आणल्याचें वर्णन एक वेळहि नाहीं. मुंबई प्रतीमध्यें हा पर्वत एकदांच आणल्याचें वर्णन आहे (VI.74.33 ff.) सीतेनें अग्निदिव्य केल्याचा मुळींच उल्लेख नसून तिनें पाचारण केलेल्या अग्नि, वायु, वरुणा, ब्रह्मा इत्यादि देवता तिच्या पातिव्रत्याची साक्ष देतात असें वर्णन आहे.

यावरून, विशेषतः रामानें सीतेस अग्निदिव्य करावयास न लावितां तिच्या शपथेवर व देवतांच्या साक्षीवर भरंवसा ठेवून तिच्या पातिव्रत्याबद्दल खात्री करून घेतली या गोष्टीवरून, महाभारतांतील गोष्ट जास्त प्राचीन दिसते; व केव्हां केव्हां असा प्रश्न मनांत येतो कीं, महाभारतांतील रामोपाख्यान हें रामायणाचें सार नसून निदान तिसर्‍या सर्गापासून पुढील रामायणाचें संक्षिप्‍त संविदानकच तर नसेल ? आणि याचाच तर वाल्मीकीनें विस्तार करून आपलें रामायण रचलें नसेल ? अथवा हल्लींच्याच रामायणाच्या एखाद्या जुन्या अस्सल प्रतीवरून तर ही गोष्ट घेतली नसेल ? परंतु हें गृहीत धरल्यास यावरून असें अनुमान निघेल कीं, या महाभारतांतील कथेंतच मध्यंतरीं एवढा फरक होऊन गेला होता कीं मूळ कोणचें व वाढविलेलें कोणचें याचा निर्णय करतां येणें अथवा हीं दोन्हीं एकच होतीं असें म्हणणें अशक्य झालें होतें; किंवा एकाच संविधानकावर हीं दोन निरनिराळीं काव्यें रचलेलीं असून जरी त्यांतील संविधानक एक होतें तरी अवांतर गोष्टींत पुष्कळ फरक होता; किंवा रामायाणाचें सार काढणार्‍यानें हे फरक आपल्या बुद्धीनें शोध म्हणून केले असतील, मात्र या शोधामुळें संविधानकास ज्यास्त साधें व प्राचीन स्वरूप आलें (पण ही कल्पना जरा वरील अनुमानाच्या विरुद्ध दिसते); किंवा रामोपाख्यान व रामायण हीं एकाच संविधानकावरून पण निरानिराळ्या हेतूनें निरनिरळ्या कवींनीं अगदीं निरनिराळीं काव्यें रचिलीं असावीं असेंहि अनुमान काढतां येतें.
यांपैकीं कोणतें अनुमान खरें असावें हें सध्यां नक्की सांगतां येत नाहीं. पण एवढी गोष्ट मात्र निश्चित दिसते कीं, महाभारतांतील रामोपाख्यानाच्या रामायणाशीं असलेल्या साम्यावरून त्या कालीं रामायण हा ग्रंथ कोणत्या तरी रूपामध्यें अस्तित्वांत होता एवढें सिद्ध होतें. या कथानकास भारतामध्यें स्थान केव्हां मिळालें ही गोष्ट आपणांस ठाऊक नसल्यामुळें या वरील गोष्टीचा आपल्याला रामायणरचनेच्या कालनिश्चयाच्या कामीं कांहीं उपयोग होत नाहीं हें खरें, तथापि या कथानकाचा भारतामध्यें प्रवेश ज्या कालीं रामायणाचा उपयोग वैष्णव लोक बौद्ध धर्माच्या विरुद्ध करूं लागले त्या कालीं झाला असावा असें म्हणण्यास कांहीं हरकत नाहीं.

महाभारतामध्यें वरील आख्यानाखेरीच इतर ठिकाणींहि पुष्कळ वेळां रामायणांतील गोष्टींचा उल्लेख आलेला आहे. तिसर्‍या पर्वामध्येंच हनुमन्त व भीम यांच्या भेटीचें वर्णन दिलें आहे त्या ठिकाणीं हनुमन्तास “रामायणेऽतिविख्यातः” असें म्हटलें आहे (३-१११७७). या भेटींत मारुतीनें सीताहरणानंतरचा रामायणाचा भाग भीमास सांगितला आहे. या ठिकाणीं रामास विष्णूचा अवतार म्हटलें आहे.

विष्णुर्मानुषरूपेण चचार वसुधातलम्॥
याप्रमाणेंच सातव्या पर्वामध्यें सीताहरण व रावणवध यांचें थोडक्यांत वर्णन करून रामाच्या कालीं लोक सुखी होते असें म्हटलें आहे व मोठ्या थोरपुरुषांनाहि इतर मनुष्यांप्रमाणें मरण येतें याबद्दल जीं सोळा उदाहरणें दिलीं आहेत त्यांत रामाचेंहि उदाहरण दिलें आहे.

बाराव्या पर्वामध्यें रामाच्या कारकीर्दीस सुवर्णयुग म्हटलें आहे.