प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण ११ वें.
बाह्यांचा हिंदुस्थानावर परिणाम.
महाभारतांतील रामोपाख्यान.- महाभारतामध्यें रामायणाबद्दलचे उल्लेख पाहूं जातां प्रथम मुख्यतः तिसर्या पर्वाच्या शेवटीं रामोपाख्यानामध्यें रामायणांतील कथेप्रमाणेंच संक्षेपतः सर्व कथा दिलेली आढळते. परंतु या कथेमध्यें रामायणाचा अथवा वाल्मीकीचा उल्लेख मुळींच आढळत नाहीं. ही कथा जयद्रथानें हरण करून नेलेल्या द्रौपदीस परत आणल्यावर युधिष्ठराचें शांतवन करण्याच्या हेतूनें पूर्वींहि याप्रमाणें गोष्टी घडून आल्या आहेत असें दाखविण्याकरितां मार्कंडेय ऋषीच्या मुखामध्यें घातली आहे. परंतु या दोन कथांमधील सादृश्य, व त्यांच्या लेखनामधील सादृश्य पाहून महाभारतांतील कथा ही वाल्मीकीच्या कथेचेंच सार असावें असें वाटतें. परंतु या दोन्ही कथांमध्यें कांहीं फरकहि आढळून येतात. उदाहरणार्थ, महाभारतांतील कथेंत रावण व त्याचे बन्धू यांचा पूर्ववृत्तान्त, दशरथानें केलेला यज्ञ, रामाचें शिक्षण व सीताप्राप्ति व बालकांडांतील बहुतेक भाग अजीबात गाळला आहे. या कथेस रामजन्मापासून आरंभ करून त्याच्या बालपणांतील कांहीं गोष्टी देऊन दशरथानें त्यास युवराज करण्याच्या बेत केल्याचें सांगितलें आहे. नंतर अयोध्याकांड व अरण्यकांड यांतील भाग थोडक्याशा श्लोकांत सांगून टाकला आहे. मुख्य ज्या उद्देशानें ही गोष्ट सांगितली तो भाग आल्यापासून वर्णन जरा विस्तृत तर्हेनें दिलें आहे. शूर्पणखेचें काननाक कापल्यानंतर रावणाकडे झालेलें आगमन या गोष्टीपासून पुढील हकीकत सर्व रामायणाप्रमाणेंच क्रमाक्रमानें बारीकसारीक गोष्टींत कोठें क्षुल्लक फेरफार करून सांगितली आहे. कबन्धाची गोष्ट दिली आहे पण त्याच्या शापमोचनाचा उल्लेख केला नाहीं. शबरीची कथा सांगितलेली नाहीं. त्याप्रमाणेंच ब्रह्मदेवानें सीतेस पाडलेल्या स्वप्नाची हकीकत दिलेली नाहीं. त्रिजटेचें स्वप्न व रावणानें सीतेस दिलेली भेट या गोष्टी, सुग्रीवास राज्यदान व ४ महिन्यांनीं त्याला युद्धास मदत करण्यास केलेलें पाचारण या दोन गोष्टींच्या दरम्यान दिलेल्या आहेत. सीताशुद्धि ही हनुमानाच्या रामाजवळील लहानशा भाषणांत वर्णन केली आहे. या कथेंत रामायणाप्रमाणें समुद्राशीं युद्ध केल्याशिवायच त्यानें नलाच्या हातून सेतु बांधविण्यास संमति दिली. बिभीषणाचें आगमन सेतु पुरा होण्याच्या पूर्वीं न देतां मागाहून दिलें आहे. कुंभकर्णास रामाच्या ऐवजीं लक्ष्मणानें मारल्याचें वर्णन आहे. निकुंभिलेमध्यें इंद्रजितानें केलेल्या हवनाचें वर्णन दिलें नाहीं. इंद्रजितानें शरबंधानें रामलक्ष्मणास बांधल्याचें वर्णन दोनदां दिलें नसून एकदांच दिलें आहे. गंधमादन पर्वतावरून हनुमानानें वनस्पति (औषधि) आणल्याचें वर्णन एक वेळहि नाहीं. मुंबई प्रतीमध्यें हा पर्वत एकदांच आणल्याचें वर्णन आहे (VI.74.33 ff.) सीतेनें अग्निदिव्य केल्याचा मुळींच उल्लेख नसून तिनें पाचारण केलेल्या अग्नि, वायु, वरुणा, ब्रह्मा इत्यादि देवता तिच्या पातिव्रत्याची साक्ष देतात असें वर्णन आहे.
यावरून, विशेषतः रामानें सीतेस अग्निदिव्य करावयास न लावितां तिच्या शपथेवर व देवतांच्या साक्षीवर भरंवसा ठेवून तिच्या पातिव्रत्याबद्दल खात्री करून घेतली या गोष्टीवरून, महाभारतांतील गोष्ट जास्त प्राचीन दिसते; व केव्हां केव्हां असा प्रश्न मनांत येतो कीं, महाभारतांतील रामोपाख्यान हें रामायणाचें सार नसून निदान तिसर्या सर्गापासून पुढील रामायणाचें संक्षिप्त संविदानकच तर नसेल ? आणि याचाच तर वाल्मीकीनें विस्तार करून आपलें रामायण रचलें नसेल ? अथवा हल्लींच्याच रामायणाच्या एखाद्या जुन्या अस्सल प्रतीवरून तर ही गोष्ट घेतली नसेल ? परंतु हें गृहीत धरल्यास यावरून असें अनुमान निघेल कीं, या महाभारतांतील कथेंतच मध्यंतरीं एवढा फरक होऊन गेला होता कीं मूळ कोणचें व वाढविलेलें कोणचें याचा निर्णय करतां येणें अथवा हीं दोन्हीं एकच होतीं असें म्हणणें अशक्य झालें होतें; किंवा एकाच संविधानकावर हीं दोन निरनिराळीं काव्यें रचलेलीं असून जरी त्यांतील संविधानक एक होतें तरी अवांतर गोष्टींत पुष्कळ फरक होता; किंवा रामायाणाचें सार काढणार्यानें हे फरक आपल्या बुद्धीनें शोध म्हणून केले असतील, मात्र या शोधामुळें संविधानकास ज्यास्त साधें व प्राचीन स्वरूप आलें (पण ही कल्पना जरा वरील अनुमानाच्या विरुद्ध दिसते); किंवा रामोपाख्यान व रामायण हीं एकाच संविधानकावरून पण निरानिराळ्या हेतूनें निरनिरळ्या कवींनीं अगदीं निरनिराळीं काव्यें रचिलीं असावीं असेंहि अनुमान काढतां येतें.
यांपैकीं कोणतें अनुमान खरें असावें हें सध्यां नक्की सांगतां येत नाहीं. पण एवढी गोष्ट मात्र निश्चित दिसते कीं, महाभारतांतील रामोपाख्यानाच्या रामायणाशीं असलेल्या साम्यावरून त्या कालीं रामायण हा ग्रंथ कोणत्या तरी रूपामध्यें अस्तित्वांत होता एवढें सिद्ध होतें. या कथानकास भारतामध्यें स्थान केव्हां मिळालें ही गोष्ट आपणांस ठाऊक नसल्यामुळें या वरील गोष्टीचा आपल्याला रामायणरचनेच्या कालनिश्चयाच्या कामीं कांहीं उपयोग होत नाहीं हें खरें, तथापि या कथानकाचा भारतामध्यें प्रवेश ज्या कालीं रामायणाचा उपयोग वैष्णव लोक बौद्ध धर्माच्या विरुद्ध करूं लागले त्या कालीं झाला असावा असें म्हणण्यास कांहीं हरकत नाहीं.
महाभारतामध्यें वरील आख्यानाखेरीच इतर ठिकाणींहि पुष्कळ वेळां रामायणांतील गोष्टींचा उल्लेख आलेला आहे. तिसर्या पर्वामध्येंच हनुमन्त व भीम यांच्या भेटीचें वर्णन दिलें आहे त्या ठिकाणीं हनुमन्तास “रामायणेऽतिविख्यातः” असें म्हटलें आहे (३-१११७७). या भेटींत मारुतीनें सीताहरणानंतरचा रामायणाचा भाग भीमास सांगितला आहे. या ठिकाणीं रामास विष्णूचा अवतार म्हटलें आहे.
विष्णुर्मानुषरूपेण चचार वसुधातलम्॥
याप्रमाणेंच सातव्या पर्वामध्यें सीताहरण व रावणवध यांचें थोडक्यांत वर्णन करून रामाच्या कालीं लोक सुखी होते असें म्हटलें आहे व मोठ्या थोरपुरुषांनाहि इतर मनुष्यांप्रमाणें मरण येतें याबद्दल जीं सोळा उदाहरणें दिलीं आहेत त्यांत रामाचेंहि उदाहरण दिलें आहे.
बाराव्या पर्वामध्यें रामाच्या कारकीर्दीस सुवर्णयुग म्हटलें आहे.
तेव्हां दशरथजातकाबरोबर जुळणारें जें ब्राह्मणी रूप दिलेलें रामकाव्य तेंच हें होय. ज्या अर्थीं दशरथजातकामध्यें रामवनवासाचा मुळींच उल्लेख नाहीं त्या अर्थीं हें काव्य रचण्याच्या वेळीं वाल्मीकीचें काव्य मुळींच अस्तित्वांत नव्हतें असें मानणें चुकीचें होईल. कारण दशरथजातक हा ग्रंथ रामाबद्दलचा सर्व वृत्तांत देण्याकरितां लिहिलेला नसून त्याच्या एकंदर राज्याचें वैभव करण्याकरितां लिहिलेला होता; व त्याप्रमाणें त्या ग्रंथांत वर्णन आहे आणि कित्येक ठिकाणीं तें शब्दशः रामायणांतील वर्णनाप्रमाणें आहे. या कथेच्या दोन्हीहि रूपांमध्यें राम हा विष्णूचा अवतार होता असें म्हटलेलें नाहीं. बाराव्या पर्वामध्यें राजाच्या अवश्यकतेबद्दल एक श्लोक आहे तेथें वाल्मीकीच्या काव्याचा स्पष्ट उल्लेख आहे-“पुरा गीतो भार्गवेण महात्मना । आख्याने रामचरिते…॥”— (उत्तराकांडामध्यें वाल्मीकीस भार्गव असें स्पष्ट म्हटलें आहे {kosh Verz, der Berl. S. H. p. 121.}*{/kosh} ) तो श्लोक पुढें दिल्याप्रमाणें आहे.
“राजानं प्रथमं विन्देत्ततो भार्यां ततो धनम् ।
राजन्यसति लोकस्य कुतो भार्या कुतो धनम्॥
हाच श्लोक श्रीरामपूरप्रत व मुंबईप्रत यांमध्यें थोड्या शाब्दिक फरकानें आढळतो.
अराजके धनं नास्ति नास्ति भार्याप्यराजके॥
हाच श्लोक हितोपदेशांत आढळतो. {kosh I. 194}*{/kosh} परंतु श्लेजेल, व गोरेसिओ आणि “अ” या प्रतींत हा श्लोक किंवा याला सदृश असा दुसरा श्लोक सांपडत नाहीं.
सातव्या पर्वामध्यें सात्यकीच्या मुखामध्यें पुढील श्लोक वाल्मीकीचा म्हणून घातला आहे.
अपि चायं पुरा गीतः श्लोको वाल्मीकिना भुवी॥ या पुढें पुढील श्लोकार्ध आहेतः-
न हन्तव्यः स्त्रिय इति यदृरवीषि प्लवंगन ॥ १९॥
सर्वकालं मनुष्येण व्यवसायवता सदा ॥
पीजाकरममित्राणां यत्सात्कर्तव्यमेव तत् ॥२०॥
रामायणामध्यें हे श्लोक कोठेंहि आढळत नाहींत व असे शब्द वानराजवळ उच्चारण्यासारखा प्रसंगहि दिसत नाहीं;
कारण ताटकेचा वानरांशी कांहीं संबंध नाहीं. परंतु या अवतरणावरून या कालीं अथवा तत्पूर्वीं कांहीं काल वाल्मीकीचा एक ग्रंथ अस्तित्वांत असून त्यामध्यें वानरांचा संबंध आला होता हें सिद्ध होतें. आणि हा ग्रंथ म्हणजे रामायण असला पाहिजे. याशिवाय महाभारतामध्यें वाल्मीकीचा महर्षि म्हणून मोठ्या सन्माननीय तर्हेनें उल्लेख आलेला आहे, परंतु ग्रंथकार या नात्यानें मात्र त्याचा उल्लेख आढळत नाहीं. तेव्हां वाल्मीकि हें नांव रामायणाच्या कर्त्याबद्दल घातलेलें आहे किंवा तैत्तिरीय परिशिष्टांतील वैय्याकरणी याच्याबद्दल वापरलेलें आहे किंवा या नांवानें दुसर्याच एखाद्या महर्षीचा उल्लेख केला आहे तें नीटसें कळत नाहीं. जवमेजयाचें वर्णन “वाल्मीकिवत्ते निभृतं स्वीवीर्यम् {kosh I. 2110}*{/kosh} ॥” याप्रमाणें केलें आहे. नारदानें युधिष्ठिराजवळ शक्रसभेचें वर्णन करतांना म्हटलें आहे, “वाल्मीकिश्च महातपाः॥” यावरून तो इन्द्राच्या सभेमध्यें सभासद होता असें दिसतें. त्याप्रमाणें तो कृष्णाचाच उपासक होता असें म्हटलें आहे. “असितो देवलस्ता वाल्मीकिश्च महातपाः । मार्कंडेयश्च गोविन्दे कथयत्यद्भुतं महत् ||.” {kosh XII. 7521}*{/kosh} याप्रमाणेंच ५ व्या पर्वांत म्हटलें आहे, “शुक्रनारदवाल्मीका मरुतः कुशिको भृगुः । देवब्रह्मर्षयश्वैव कृष्णं यदुसुखावहम् || प्रदक्षिणमवर्तन्त सहिता वासवानुजम् ||.” {kosh V. 2946.}*{/kosh}
महाभारताची पुरवणी समजल्याजाणार्या हरिवंशामध्यें रामायणासंबंधीं कांहीं उल्लेख आढळतात. या ग्रंथास हल्लीं जरा विशेष महत्त्व आलें आहे; कारण वासवदत्ता या ग्रंथाचा कर्ता सुबन्धु याजवळ (इ.स. च्या सातव्या शतकामध्यें) हरिवंशाची एक प्रत अथवा हल्लीं उपलब्ध असलेल्या हरिवंशाचा निदान कांहीं भाग असलेली प्रत असावी हें निश्चित झालें आहे. {kosh Ind. Streifen I. 380. || कादंबरी I.45,80.}*{/kosh} त्याप्रमाणेंच बाणानें कादम्बरीमध्यें या ग्रंथाचा उल्लेख केला असल्यामुळें त्याजवळहि एखादी प्रत असावी असें वाटतें.|| बाण याचा काल सुबन्धूनंतरचा परंतु त्यानंतर लवकरच असावा असें धरितात.
हरिवंशामध्यें विष्णूच्या नऊ अवतारांबरोबर रामवताराचें वर्णन करीत असतां, रामाचें बालपण, त्याचा वनवास, त्याचें रावणाबरोबर युद्ध वगैरे सर्व रामायणाप्रमाणेंच वर्णन केलें असून राम लंकेहून परत आल्यावर त्याच्या राज्याचें वैभव महाभारतांतील ७ व्या आणि १२ व्या पर्वांप्रमाणेंच केलें असून तें रामायणांतील वर्णनाशीं जुळतें. ग्रंथकारानें ही माहिती गाथांवरून दिली आहे असें म्हटलें आहे. (गाथाश्चाप्यत्र गायन्ति ये पुराणविदो जनाः। रामे निबद्धाः २३५२||
रामायणाबद्दल दुसरा स्पष्ट उल्लेख पाहूं गेलें असतां रामायण महाकाव्याचें नाटक केल्याबद्दलचा आढळतो. या ठिकाणीं वाल्मीकीचा जरी उल्लेख केलेला नाहीं, तरी एकंदर तेथील मजकुरावरून असें दिसतें कीं, त्या काळीं हल्लीं उपलब्ध असलेली वैष्णवी रूपामध्येंच रामायण अस्तित्वांत होतें. ज्या नटाच्या संबंधानें तो स्तुतिपर भाग रचलेला आहे त्या नटानें राक्षसांच्या राजास मारण्याकरीतां विष्णूनें जो अवतार धारण केला होता त्या अवताराचें सोंग घेतल्याचें त्यांत वर्णन आहे. या नाटकामध्यें दशरथ आणि लोमपाद ऋषि यांनीं शांता व इतर नाटकशाळा यांकडून ऋष्यशृंगास आणविलें. राम, लक्ष्मण, शत्रुघ्न, भरत, ऋष्यशृंघ व शांता यांचे पोषाख विशिष्ट तर्हेनें सजविलेले होते. पुढें शेवटी महाभारताची स्तुति असलेल्या श्लोकामध्यें म्हटलें आहे, “वेद, रामायण, भारत या सर्वांमध्यें अथपासून इतिपर्यंत हरीची स्तुति भरली आहे.” त्याप्रमाणेंच व्यासाबरोबर वाल्मीकीची केलेली स्तुति-कदाचित् रामायणकर्ता म्हणून -पुढें आढळून येते, ‘तल्लभ्यते व्यासवचः प्रमाणं गीतं च वाल्मीकिमहर्षिणांच’(५-५). याप्रमाणेंच “हे आर्य आपण ‘सरस्वती च वाल्मीकेः स्मृतिर्द्वैपायने तथा।’ असे आहां” (५-२२८५) असें वर्णन आहे.
महाभारतामधील वैष्णवी वर्णनें पाहून अशी खात्री होते कीं, यांच्या रचनेच्या कालीं बौद्ध धर्माविरुद्ध वैष्णवी धर्मामधील देवांचा झेंडा फडकूं लागला होता. परंतु हीं काव्यें या कालाच्या अगदीं आरंभीं झालीं होतीं किंवा काय याबद्दल थोडा संशय येतो. अथवा ज्या ठिकाणीं अवतारांचा क्रम ठरलेला आहे तेथें त्या क्रमास अनुसरून असलेल्या वर्णनाबद्दल संशय येण्याचें कारण नाहीं असेंहि वाटण्याचा संभव आहे. तसेंच हरिवंशाचें अस्तित्व जरी इ. स. च्या सहाव्या शतकांत होतें असें सिद्ध झालें तरी देखील हल्लीं असलेले १६३७४ श्लोक त्यावेळीं त्यामध्यें होते कीं नाहीं याबद्दल संशय वाटतो.
आतां आपण आर्षकाव्यांचा पुण्यकारक वातावरणांतून थोडे खालीं उतरून जरा अर्वाचीन वाङ्मयाकडे वळूं. यापैकीं ज्यामध्यें रामायणाचा उल्लेख येऊन त्याच्या अस्तित्वाबद्दल बोध होतो असा सर्वांत जुना ग्रंथ म्हटला म्हणजे शूद्रक राजाच्या नांवानें प्रसिद्ध असलेली मृच्छकटिका ही नाटिका होय. परंतु या ग्रंथाचा काल अद्याप निश्चित झालेला नाहीं. कारण शूद्रक नांवाचे राजे पुष्कळ होऊन गेले आहेत. तथापि यावरून एवढें मात्र निश्चित होतें कीं, या वेळीं बौद्ध संप्रदाय पूर्ण भरभराटींत असून रामपूजा अथवा कृष्णपूजा अद्याप प्रचारांत आली नव्हती. कालिदासाच्या नाटकांमध्यें रामायणाबद्दल कोठेंच उल्लेख आढळत नाहीं. पंरतु त्याच्या मेघदूत काव्यामध्यें (१-९९) आणि रघुवंशामध्यें ‘प्राचेतसोपज्ञम् रामायणम्’ याप्रमाणें रामायणाचा व वाल्मीकीचाहि (१५. ६३-६४) उल्लेख आढळतो. परंतु या ठिकाणींहि कालिदासाच्या कालाची अनिश्चितता (तिसरें किंवा सहावें शतक इसवी सन) {kosh Abh. uber Krishna’s Geburtsfest of Webber. p. 319. Z.D.M.G.XXII. 726 ff.}*{/kosh} आणि मेघदूत व नाटकें लिहिणार्या कवीनेंच रघवंश लिहिला होता किंवा काय या गोष्टीबद्दल संशय हीं आपल्या मार्गांत येतात. {kosh cf. Z.D.M.G. XXII. 710.; Ind. Streifen I. 312. II. 373}*{/kosh} या ठिकाणीं कालिदासाच्या नांवानें प्रसिद्ध असलेलें {kosh See Hofer. Z. fur die W. der Spr. II. 500 ff. Verz. Der. Berl. S.H. p. 156, 369}*{/kosh} व रामायणाचा आधार घेऊन रचलेलें सेतुबन्ध हें काव्यहि नमूद केलें पाहिजे. अलीकडील विद्वानांचें असें मत आहे कीं हें काव्य कालिदासानें विक्रमादित्याच्या आज्ञेनें प्रवरसेन राजाकरितां लिहिलें.
प्रवरसेन यानें आरंभींचा कांहीं भाग लिहिला होता तो कालिदासानें पुरा केला. याच्या आरंभीं प्रस्तावनेमधील ९ व्या श्लोकांत हा ग्रंथ प्रवरसेन यानें आरंभिला होता असें म्हटलें आहे. यावरूनच बाण यानें (सुमारें सातवें शतक) हर्षचरिताच्या आरंभी सेतुबंधकाव्य प्रवरसेन यानें रचिलें असें म्हटलें आहे. {kosh Hall. Vasavdatta. p. 13, 14,54 & Ind Streifen I. 357.}*{/kosh} राजतरंगिणीमधील (III, १०९, १२३, २९३) काश्मीरचा राजा प्रवरसेन (दुसरा) हाच वरील प्रवरसेन कवि असावा असें वाटतें. हा काश्मीरचा प्रवरसेन उज्जनीचा राजा हर्ष उर्फ विक्रमादित्य आणि प्रतापशील उर्फ शिलादित्या यांचा समकालीन होता. हा राजा हर्ष राजानें काश्मीरच्या गादीवर बसविलेल्या म्हणण्याप्रमाणें {kosh Ind. Alt. II (402) 770,9१0, ff. XXIV.}*{/kosh} जर हा राजा खरोखरच इ. स. २४१ ते २६६ पर्यंत राज्य करीत असेल तर सेतूबन्ध काव्याचा काल तिसरें शतक ठरतो. परंतु डॉ. भाउ दाजी यांनीं प्रवरसेन व हिओयुएन-त्संग यांचा संबंध आला असल्याबद्दल उल्लेख केला आहे {kosh Jour. Bombay Barnch R.A.S. VII. 208 ff. (1१861 Jan.) 223 ff. VIII. 248-51 (१864 Aug. published in 1868).}*{/kosh} व हर्षवर्थन, शिलादित्य आणि हिओयुएन-त्संग हे समकालीन होते असें म्हटलें आहे त्यावरून प्रवरसेन (दुसरा) हा हिओयुएन-त्संग याच्या वेळीं अथवा त्याच्या येण्याच्या पूर्वीं थोडे दिवस होऊन गेला असावा असें म्हणणें जास्त सयुक्तिक दिसेल. यावरून प्रवरसेन हा सातव्या शतकाच्या आरंभीं अगर सहाव्या शतकाच्या उत्तरार्धांत होऊन गेला असें निघतें.
सेतुबन्ध या काव्याचा काल याच्या पलीकडे जात नाहीं हें बाण यानें केलेल्या उल्लेखाशिवीय दण्डीनें आपल्या काव्यादर्शामध्यें केलेल्या उल्लेखावरून (१-३४) स्पष्ट होतें. कारण दण्डीच्या काव्यादर्शाचा काल सहावें शतक असा आतां निश्चित झाला आहे. {kosh Ind Streifen I. 312 ff.}*{/kosh}
पुढेंपुढें आपणांस रामायणाचा उल्लेख पुष्कळच ग्रंथांतून आढळतो. वराहमिहिरानें राम याचा देव म्हणून उल्लेख केला आहे त्यावरून त्याचा कालीं रामास पूज्य मानीत असत हें उघड होतें. {kosh Abh. Uber die Râma Tâp. Up. p. 279. || According to Lassen. §Abh. uber die Râma Tâp Up. p. 8, १2, 29, 30.}*{/kosh} त्याप्रमाणेंच पुढील काव्यांतून रामायणाबद्दल उल्लेख आहे. श्रीधरसेन राजाच्या आज्ञेवरून वल्लभी येथें लिहिलेलें भट्टीकाव्य|| (५३०-५४५), त्याच ठिकाणीं शिलादित्य राजाच्या आज्ञेवरून लिहिलेलें शत्रुंजयमाहात्म्य (५९८) §, सुबन्धु कवीचें वासवदत्ता (सुमारें सातव्या शतकाचा आरंभ), यांमध्यें सुंदरकांडाचा विशेषतः उल्लेख केलेला आहे. यानंतर लवकरच लिहिली गेलेली बाण कवीची कादंबरी, त्याप्रमाणेंच हल याचें सप्तशतक आणि सर्वांत शेवटी भवभतीचीं नाटकें.
भवभूतीचा काल ललितादित्य याचा समकालीन राजतरंगिणीमधील यशोवर्मा राजा याची कारकीर्द (६९५-७३३) हा होय. {kosh Lassen.}*{/kosh} या कवीनें वाल्मीकीच्या रामायणावरून दोन नाटकें रचल्याचें प्रसिद्धच आहे. यांपैकीं उत्तररमाचरितामध्यें रामायणामधून अवतरणें घेतलीं आहेत. प्रथमतः रामायणाबद्दल स्फूर्ति होण्यास कारणीभूत झालेला “मा निषाद……” हा श्लोक दुसर्या अंकांत जशाच तसाच दिला आहे. त्याप्रमाणेंच सहाव्या अंकामध्यें बालकांडांतील शेवटचे श्लोक घेतले आहेत.
प्रकृत्यैव प्रिया सीता रामस्यासीन्महात्मनः।
प्रियाभावः स तु तया स्वरगुणैरेव वर्धितः।।
तथैव रामः सीतायाः प्राणेभ्योऽपि प्रियोऽभवत् ।
हृदयं त्वेव जानाति प्रीतियोगं परस्परम्।।
हेच श्लोक बालकांडामध्यें ‘ब’ ‘क’ या प्रतींत, श्लेजेलच्या प्रतींत व मुंबई प्रतींत शेवटच्या सर्गांत पुढीलप्रमाणें आढळतात.
प्रिया तु सीता रामस्य दाराः पितृकृता इति।
गुणाद्रूपं गुणाच्चापि प्रीतिंर्भूयोव्यवर्धत।।
तस्याश्च भर्ता द्विगुणं हृदये परिवर्तते।
अन्तर्गतमपि व्यक्तमाख्याति हृदयं हृदा।।
सर्व प्रतींत जरी हे श्लोक एकसारखे नाहींत तरी समानार्थी आहेत; आणि उत्तरराचरितांतील श्लोकांशींहि यांचें अर्थसाम्य आहे. गोरेसिओ याच्या प्रतींत यांसारखे श्लोक आढळत नाहींत. परंतु ‘अ’ प्रतीमध्यें जे श्लोक आहेत ते बहुतेक भवभूतीच्या श्लोकांशीं तंतोतंत जुळतात; व ते बालकांडाच्या शेवटींच आढळतात.
सहाव्या अंकामध्यें दुसरा एक श्लोक असा आहेः-
त्वदर्थमिव विन्यस्तः शिलापादोयमग्रतः।
यस्याऽयमभितः पुष्पैः प्रविष्ट इव केसरः।।
याला सदृश असा श्लेजेल, कॅरे, मार्शमन, व मुंबईप्रत यांमध्यें पुढील श्लोक आहे.
त्वदर्थमिव विन्यस्ता त्वियं श्लक्ष्णसमा शिला।
यस्याः पार्श्वे तरुः पुष्पैः प्रहृष्ट इव केसरः।।
गोरेसिओच्या प्रतींत पुढील श्लोक आहे.
त्वदर्थमिह विन्यस्तः शिलापट्टोयमग्रतः।
अस्य पार्श्वे तरुः पुष्पैः प्रवृष्ट इव केसरः।।
‘अ’ प्रतीमध्यें हा श्लोक असा आहेः-
त्वदर्थमिह विन्यस्ता शिलेयं सुखसंस्तरा ।
यस्याः पार्श्वै तरुः पुष्पैर्विभ्रष्ट इव केसरैः।।
आतां या श्लोकांमध्यें दिसणार्या फरकांवरून जर या अवतरणाच्या सत्यतेबद्दल आपण विचीर करूं लागलों तर आपला उलटच समज होण्याचा संभव आहे. परंतु येथें आपणांस हें पाहिलें पाहीजे कीं, अवतरण घेतांना भवभूतीनें मूळामधून जसेंच्या तसेंच घेतलें होतें काय ? आपणांला चुकीचीं अवतरणें पुष्कळ ग्रंथांतून आढळून येतात. परंतु या ठिकाणीं हें लक्षांत ठेवलें पाहिजें कीं, हीं अवतरणें एका जगद्विख्यात ग्रंथांतून घेतलेलीं होतीं आणि प्रेक्षक लोकांचें ज्ञान जरी इतकें बिनचूक आणि सूक्ष्म नसलें तरी मूळापासून विशेष फरक झाला असता तर त्याजकडे जनतेचें लक्ष गेल्याशिवाय राहतें ना.
हा फरक विशेषसा लक्ष देण्यासारखा नसल्यामुळें, निरनिराळ्या प्रतींतून जे कित्येक वेळां परस्परविरोधी आणि विसंगत पाठ आढळून येतात त्या मानानें हा फरक कांहींच नसल्यामुळें, त्याकडे कोणी लक्ष न देणें साहजिक दिसतें; व भवभूतीच्या या अवतरणांवरून रामायण हें त्या काळीं हल्लींच्या रूपांतच अस्तित्वांत होतें असें अनुमान निघतें. कारण कीं यावेळीं उत्तरकांडामध्यें वर्णन केलेल्या गोष्टी-सीतात्याग, वाल्मीकीच्या आश्रमांत कुश व लव यांचे जन्म, वाल्मीकीनें स्वतः रचलेल्या रामायणाचें त्यांच्या कडून पठण, आणि रामसीतापुनर्मीलन इत्यादि सर्वतोमुखीं झाल्या होत्या. {kosh या गोष्टी रामायण, महाभारतांतील रामोपाख्यान आणि हरिवंश यांमध्यें मुळींच आढळत नाहींत. उलट या ग्रंथांत रामानें परत आल्यावर ‘दशाश्वमेधानजर्हे जारुथ्यान्स निरर्गलान्।’ असें वर्णन आहे.}*{/kosh}
याप्रमाणेंच रघुंवशाचीहि गोष्ट आहे. परंतु उत्तरकांडामध्यें दिलेल्या हकीकतीमध्यें भवभूतीनें थोडासा फरक केला आहे. त्यानें रामसीतेचा वियोग एकदम न करितां त्यांनीं कांहीं दिवस एकत्र घालविले आणि सितेला आपल्या पातिव्रत्याबद्दल आणखी एक दिव्य करावें लागलें असें दाखविलें आहे; हें दिव्य म्हणजे तिनें भूमीची प्रार्थना केल्यावर तिला भूमीनें आपल्या पोटांत जागा देऊन रसातलास नेलें हें होय. त्याप्रमाणेंच रामाची व कुशलवांची भेट अध्यात्मरामायणामध्यें आणि रघुवंशामध्यें रामाच्या यज्ञामध्यें त्यांनीं वाल्मीकिप्रणीत रामायण म्हणून दाखविल्यानंतर झाली असें वर्णन आहे. परंतु भवभूतीनें लवाकडून रामसैन्याचा पराभव करवून नंतर करविलेली भेट अधिक काव्यमय आहे. या मुलाच्या पराक्रमावरून त्याच्या जन्माचें पावित्र्य व त्याच्या आईचें पातिव्रत्य हीं सिद्ध केलीं आहेत. परंतु भवभूतीनें हा फरक स्वतःच्या कल्पनेनें केला किंवा उत्तरकांडाची एखादी दुसरीच प्रत त्यास सांपडून तीवरून केला हा प्रश्न आहे. उत्तरकांडाच्या व्हीलर याच्या प्रतींत व जैमिनिभारतामध्यें भवभूतीनें दिल्याप्रमाणेंच कांहीं हकीकत सांपडते यावरून ही सर्व भवभूतूचीच कल्पना असावी असें वाटत नाहीं. उलटपक्षीं .या दोन्ही ग्रंथांतून दिसून येणार्या अतिशयोक्तीवरून तरी हे दोन्हीहि ग्रंथ भवभूतीच्या नाटकानंतर रचले गेले असावे असें वाटतें.
वेबर याच्यामतें कुश आणि लव यांची सर्व गोष्ट कुशीलव म्हणजे भाट आणि गवई यांनीं कुशीलव या शब्दाचा दोष घालविण्यासाठीं रचिली असावी. या गोष्टीमुळें कुशीलवांचा दर्जा वाढेल असें त्यास वाटलें असावें. {kosh Webber. Acad. Vorles. uber Ind. Lit. G. & the St. Petersburg Lexicon, S. V.}*{/kosh} फ्रेडरिक याच्या म्हणण्याप्रमाणें उत्तरकांड हेंहि वाल्मीकीनेंच लिहिलें असून त्याचें कविभाषेमध्यें भाषांतर झालें आहे.
कविभाषेमध्यें असलेलें अर्जुनविजय हें काव्य रामायणाच्याच (उत्तरकांडाच्या) आधारें रचिलें आहे.{kosh Uber die Sanskrit und Kavi Literatur aufder Incel Bali ef. Ind. Stud. II १33-6. अर्जुनविजय ībid p. 142.}*{/kosh} परंतु हें काव्य जावामध्यें केव्हां गेलें हें जोंपर्यंत आपणांस ठाऊक झालें नाहीं तोंपर्यंत वरील गोष्टीचा आपल्याला कालनिर्णयाच्या कामीं काहींच उपयोग नाहीं. कारण जावा बेटांमध्यें वसाहतकरणारें लोक एकाच वेळीं गेले नसून निरनिरळ्या वेळीं गेले व त्यांपैकीं कोणाच्या वेळीं रामायणाचा प्रवेश त्या बेटांत झाला तें कळत नाहीं. लासेन यानें हा काल इ. स. ५०० च्या पूर्वींचा नसावा असें म्हटलें आहे. {kosh Ind. Alt II. १043 ff. Catalogue of Oriental MSS. Of the College Fort St. George. Madras १857. I, 295, 296,299,4१9, 450, 455}*{/kosh} परंतु त्याच्या मतावर कितपत विश्वास ठेवावा तें निश्चितपणें सांगतां येत नाहीं. रामायणाच्या कविभाषेंतील भाषांतरावरून रामायणाचें पुरातनत्व सिद्ध होत नसून उलट हें भाषांतर मूळ रामायणावरून केलेलें नसून उत्तरकांडामधील वगैरे सर्व गोष्टी ज्यांत आहेत अशा एखाद्या बालरामायणावरून केलेलें असेल ही कल्पना खरी असण्याचा संभव आहे. कारण नुकत्याच बालरामायणाच्या धर्तीवर लिहिलेल्या रामायणांतील गोष्टी हिंदुस्थानांत सांपडल्या आहेत.‡ याशिवाय दोन संग्रहरामायणांचा उल्लेख आढळतो. पैकीं एक सात सर्गांचें आहे व दुसरें (याचा उत्तरार्ध फाटला आहे) सुमारें ५० सर्गांचें असावें. {kosh Ibid p. 456. $ Ibid p. 169. || Ib. pp. 269, 520, 52१. §Ib. 499.}*{/kosh} त्याप्रमाणेंच २१ सर्गांचें एक प्रसन्नरामायण आहे$. यांशिवाय दक्षिणेमधील निरनिराळ्या भाषांतील भाषांतरांचा उल्लेख आढळतो त्यांत तामिल,|| तेलगु,§ मल्यालम,** {kosh Ib.p.670.}*{/kosh} उरिया, {kosh Ib.p.675.}*{/kosh} कानडी (गद्य व पद्य) {kosh Ib. p. 595, 597, 604, 605, 665, 666, 602}*{/kosh} अशीं भाषांतरें आहेत. याशिवाय हल्लींच्या काळीं देखील कविरामायणासारखीं पुष्कळ रामायणें उपलब्ध आहेत. तेव्हां दुसर्या कोणत्या तरी तर्हेनें कविरामायणाचें प्राचीनत्व झाल्याशिवाय तें फार जुनें आहे असें आपणांस म्हणतां येत नाहीं.
भवभूतीनंतरच्या ग्रंथामधून रामायणाचे उल्लेख पहात बसणें अनवश्यक आहे. परंतु वाङ्मयाच्या इतिहासाच्या दृष्टीनें हें काव्य फार महत्त्वाचें असल्यामुळें हे उल्लेख पाहण्यामध्येंहि थोडेंसें तथ्य आहे. तेव्हां साधारणतः वरवर आढळून येणार्या काव्यांपैकीं कोणकोणत्या काव्यांमध्यें याचें अस्तित्व असल्याबद्दल उल्लेख आहे अथवा कोणतीं काव्यें याच्या आधाराच्या ग्रंथात लिहिली आहेत तें आपण पाहूं. यांपैकीं प्रथमतः राजशेखरनें रामायण आणि वाल्मीकि यांची केलेली स्तुति आढळतें. याचा काल दहाव्या शतकाच्या अखेरीचा असावा.{kosh Ind Streifen I. 3१3-4.}*{/kosh} यानें ही स्तुति त्याच्या प्रंचडपांडव ग्रंथाच्या आरंभीं केली आहे.
याच कालीं होऊन गेलेल्या धनंजय कवीनें आपल्या दशरूप ग्रंथामध्यें (१-६१) रामायणाचा उल्लेख केला आहे. {kosh Hall. ed. (Cal. १865) Intro. p.2-3.}*{/kosh} याप्रमाणेंच गोवर्धनानें सप्तशतीच्या आरंभीं उल्लेख केला आहे. गोवर्धनाचा काल दहावें अथवा बारावें शतक हा असावा. {kosh Abh. Uber Hala’s Saptasataka p.9-१0}*{/kosh} त्रिविक्रमभट्ट यानें दमयन्तीकथेच्या आरंभीं उल्लेख केला आहे. {kosh Verse ११.}*{/kosh} त्याप्रमाणेंच राजतरंगिणीमध्यें उल्लेख आहे {kosh I. १66}*{/kosh} व शार्ङ्गधर यानेंहि उल्लेख केला आहे. {kosh Hall. Intro. to वासवदत्ता p. 48. A. D. १363. || Burnouf Intro. to the Bhagwata Purana. I. 23. §III. 3}*{/kosh} त्याप्रमाणेंच ब्रह्मवैवर्तपुराण,|| विष्णुपुराण,§ यांमध्यें उल्लेख आहेत. विष्णुपुराणांत भृगूचा वंशज ऋक्ष याला वाल्मीकि म्हणत व तो चोविसाव्या द्वारपारमधील व्यास होता, असें म्हटलें आहे.
आतां रामायणाच्या आधारानें रचलेलें ग्रंथ पाहूं. यांत प्रथम पुराणांकडे पाहिलें असतां, अग्निपुराणाच्या पहिल्या सात सर्गांमध्यें रामायणाचीं सात कांडें सारांशरूपानें दिलीं आहेत. {kosh Aufrecht’s Catalogue, p. 7a.}*{/kosh} पद्मपुराणामध्यें कांहीं सर्गांमध्यें रामायणाचा सारांश दिला आहे. {kosh Ibid p. १3-१4}*{/kosh} स्कंदपुराणामध्यें रामनवमीव्रतासंबंधीं रामायणांतील कांहीं हकीकत दिली आहे. याप्रमाणेंच विष्णुपुराणामध्येंहि यांतील कांहीं भाग दिला आहे. ब्रह्मांडपुराणामध्यें रामायणमाहात्म्य दिलें आहे. {kosh Ibid p. l. c. 30a}*{/kosh} नंतर कवि राजाच्या राघवपांडवीय काव्यांत रामायण व महाभारत यांचें सार त्यांतीलच श्लोक घेऊन दिलेलें आहे. याचा काल अकरावें शतक असावा. {kosh Ind. Streifen I. 352. 269-27१}*{/kosh} यानंतरचीं अर्वाचीन काव्यें म्हटलीं म्हणजे, अग्निवेश याचें रामचंद्रचरित्रसार, {kosh Auf-Catalo. p. १2१6. ॥॥Ibid p. 2१4 b; १32a. §§ Verz. Der Berl. S, H. १54}*{/kosh} साहित्यदर्पणाचा कर्ता विश्वनाथ याचें राघवविलास, रामचरण व हरिनाथ यांचीं रामविलास हीं एकाच नांवाचीं दोन काव्यें,श्रीराम भद्राम्बा इचा घनाथाभ्यदय,§§ श्रीरलगानथ याचें अभिरामनाम काव्य, {kosh Auf. Catalogue. p. १56.}*{/kosh} गोविन्द कवीचें रामकुतूहल {kosh Ibid १986.}*{/kosh} व सेतुबन्धाचें सुधारून केलेलें काव्य सेतुसरन्नि इत्यादि होत.
राणायणाच्या आधारें पुष्कळशीं नाटकेंहि रचिलीं गेली आहेत. यांत प्रथम महादेव याचा पुत्र जयदेव यानें लिहिलेलें प्रसन्नराघव हें येतें. यांतील एक श्लोक धनिकानें आपल्या काव्यांत घेतला आहे. {kosh Hall. Preface to Dasarupa p. 36.}*{/kosh} यावरून या नाटकाचा काल दहाव्या शतकाच्या मध्यभागीं येतो. हनुमन्त कवीचें म्हणून मानलेलें महानाटक हेंही याच सुमारास झालें असावें. कारण यांतील अवतरण भोजदेवाच्या कंठाभरणामध्यें आढळतें; व त्याचा काळ दहाव्या शतकाची अखेर हा ठरला आहे. {kosh Auf-Cat. p. 209a}*{/kosh} विदर्भराज याचें चंपूरामायण हें पंचांकी नाटकहि भोजाच्या कालींच रचलें गेलें असावें. {kosh Taylor I. १74, 455.}*{/kosh} राजशेखर याचें बालरामायण आणि धनिकानें उल्लेख केलेलीं उदात्तराघव आणि छलितराम {kosh Hall p. 36.}*{/kosh} हीं नाटकेंहि याच कालीं लिहिलीं गेली असावी.
या तिन्ही नाटकांतून साहित्यदर्पणामध्यें अवतरणें घेतलीं आहेत. यांखेरीज पुढील नाटकेंहि रामायणाच्या आधारानें रचिलेलीं आहेत. मुरारि याचें अनर्घराघव (१३ वें अथवा १४ वें शतक), {kosh Wilson II. 383}*{/kosh} कृत्यारावण, जानकीराघव, वालिवध, राघवाभ्युदय, रामचरित, रामाभिनन्द, रामाभ्युदय, हीं सर्व १३ व्यापासून १४ व्या शतकांतील होत. कविचन्द्र याचें रामचन्द्रचंपू हें साहित्यदर्पणानंतर रचलें गेलें असावें. {kosh Auf. 2११6.}*{/kosh} अभिरामणणि नाटक याचा काल इ. स. १५९९ नंतरचा असावा. {kosh Wilosn II 395. Auf. १376.}*{/kosh} श्रीसुभट कवीचें दूतांगद नाटक हें महाराजाधिराज श्री त्रिभुवनपालदेव याच्या आज्ञेवरून श्रीकुमारपालदेव याच्या यात्रेच्या प्रसंगीं लिहिलें असून तें बरेंच अर्वाचीन दिसतें {kosh Wilson II. 390 Auf. १396.}*{/kosh} हॉल यानें अमोघराघव या नांवाचें नाटक व दुसरें एक चोक्कनाथाचें जानकीपरिणय नांवाचें नाटक पाहिल्याचा उल्लेख केला आहे. {kosh Hall, Intro, to Dasarupa, p. 30.}*{/kosh} पुरुषोत्तम कवीचें रामचन्द्रोद्य हेंहि यांपैकींच आहे. शेवटीं वेबर म्हणतोः रामाच्या पूजेबद्दलच्या ग्रंथांचें वर्णन मी दुसर्या ठिकाणीं केलेंच आहे; {kosh Abh. Uber die Râma Tâpaniya Upnishad. Berlin १864.}*{/kosh} व रामानुज व रामानन्द यांच्या संप्रदायांचें वर्णन करणें अप्रस्तुत होईल; तेव्हां येथें रामपूजनाबद्दल ग्रंथांत रामायणाचा संबन्ध निकट {kosh See Verz der Berl. S. H. p. १23-१27.}*{/kosh} आला आहे. असा अद्भुतोत्तरकांड हा ग्रंथ आहे एवढेंच सांगतों.
वेबर यानें शोधून ठरविलेले मुद्देः-
१ रामायणाच्या अस्तित्वाबद्दलची ग्रंथातर्गत प्रमाणें हा ग्रंथ इ. स. च्या ३ र्या किंवा ४ थ्या शतकांत लिहिला गेला असावा असें दाखवितात.
२ हल्लींच्या या ग्रंथाच्या विस्ताराकडे (२४००० श्लोक) आणि निरनिराळ्या प्रतींमधून दिसून येणार्या फरकांकडे पाहिलें असतां या ग्रंथाच्या मूळच्या स्वरूपाबद्दल कांहींच निश्चय होत नाहीं. ग्रंथाच्या स्वरूपाकडे पाहतां त्या काळीं ग्रीकसंस्कृतीची छाप आर्यवर्तावर पूर्णपणें बसली होती असें स्पष्टपणें दिसून येते.
३ रामायणाच्या संविधानकाचें मूळ जी बौद्ध दंतकथा तीमध्यें रावणानें केलेले सीताहरण व लंकेवरील स्वारी या दोन गोष्टी मुळींच नसल्यामुळें वाल्मीकीनें या गोष्टी ज्याप्रमाणें होमरच्या काव्यांतील इतर कांहीं गोष्टी बौद्ध दंतकथांमध्यें घेतल्या आहेत त्याप्रमाणें होमरमधील गोष्टी ऐकून त्यांवरून रचल्या असाव्या.
४ रामायणाचें जें हल्लीं वैष्णवी रूप दिसतें आहे (व इतर वाटतें) तें मुळापासून तसेंच होतें कीं काय हें अनिश्चित आहे. परंतु एवढें मात्र स्पष्ट दिसतें कीं, हल्लींचें या काव्याचें हें वैष्णवी रूप कवीचा, बौद्ध दंतकथा घेऊन तिचा ब्राह्मणी देवतांशीं संबंध जोडून व त्यांचे पराक्रम वगैरे करून बौद्धधर्माविरुद्ध उपयोग करण्याचा जो उद्देश, त्याला अनुसरून दिसतें.
५ व्हीलर याचें जें मत आहे कीं लंकेंतील राक्षस हें नांव तेथील बौद्धांस दिलें असावें तें खरें असण्याचा थोडासा संभव आहे.
६ दशरथजातकामधील राम व सीत यांच्या कथेमध्यें ऐतिहासिक सत्य किती आहे हें अनिश्चित आहे.
त्या कथेमध्यें कांहीं ऐतिहासिक भाग असेल तर वाल्मीकीनें त्या कथेंत भर घालून राम ही शेतकीचें पालन करणारी देवता समजून व त्याला कांहीं काळ त्याच्या कामांत वनवासामुळें अडथळा येतो (हा काळ बहुतकरून हिंवाळा असावा) अशी कल्पना करून आणि सीता हें दैवत नांगराच्या तासावरून कल्पून या देवतांची स्तुति आपल्या ग्रंथांत केली असावी.
७ वाल्मीकीनें दाखविलेली रामच्या स्वभावांतील विलक्षण शांति ही बौद्ध दंतकथेवरूनच उचलली असावी. कांहीं कालनें कांहीं ख्रिस्ती दंतकथाहि यामध्यें प्रविष्ट केल्या गेल्या असण्याचा संभव आहे (उदाहरणार्थ शबरी, शंबुक.)
८ वाल्मीकीनें आपल्या काव्यांत यजुर्वेदांतील गोष्टी वर्णन केल्या आहेत (अंगराग, जनक, अश्वपति) यावरून तो यजुर्वेदी असावा; आणि त्याची जन्मभूमि अयोध्येच्या जवळपास असावी.