प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण ११ वें.
बाह्यांचा हिंदुस्थानावर परिणाम.
रामायणाचा इतर ग्रंथांत उल्लेख.- कालानुक्रमानें रामायणआबद्दलचे उल्लेख पाहूं गेलें असतां प्रथम उल्लेख जैनांच्या अनुयोगद्वारसूत्रांत आढळतो. या ठिकाणीं भारताप्रमाणें हें काव्यहि नास्तिक काव्यामध्यें सर्वांत वरच्या पायरीचें ठरविलें आहे. अनुयोगद्वारसूत्र हें भगवतीसूत्रानंतर पुष्कळ वर्षांनीं रचलेलें आहे आणि जरी हें जैन सूत्रांपैकीं बरेंच प्राचीन सूत्र आहे तथापि त्यास त्यांच्या मुख्य द्वादश अंगांमध्यें स्थान मिळालेलें नाहीं. याचें माहात्म्य सूर्यज्ञप्तिसूत्राइतकेंच आहे. तथापि तें सतराव्या शतकामध्यें लिहिलेल्या कल्पसूत्रापेक्षां पुष्कळ जुनें आहे. या सूत्राचा नक्की काल मात्र आपणांस ठरवितां येत नाहीं. परंतु या सूत्रामध्यें उल्लेख केलेलें भारत हें प्रथम झालें असून रामायण हें त्यानंतर रचलें गेलें असावें असें म्हणणें कदाचित् ज्यास्त सयुक्तिक दिसेल. कारण महाभारतामध्यें रामायणाचा उल्लेख आलेला असून रामायणामधील रामाची सर्व कथा महाभारतामध्यें आढळते. परंतु ही गोष्ट नक्की ठरविण्याच्या कामीं मुख्य अडचण ही येते कीं अनुयोगद्वारसूत्राच्या कालीं जें भारत होतें त्यामध्यें ही रामाची कथा त्या वेळीं होती किंवा ती मागाहून प्रक्षिप्त केलेली आहे हें नक्की कळत नाहीं.