प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ११ वें.
बाह्यांचा हिंदुस्थानावर परिणाम.

विदूषकाचा उगम.- फार प्राचीन संस्कृत नाटकें हल्लीं उपलब्ध नसल्यामुळें विदूषकाचा उगम शोधून काढण्याच्या कामांत बराच अडथळा येतो. वर्तमान नाटकांत शूद्राकचें मृच्छकटिक नाटक अत्यंत जुनें आहे; अगदीं प्रथम नाटकें कशीं लिहीत त्याचा हा एक नमुना आहे. त्यांतील कल्पना व त्याची एकंदर रचनाहि प्रगल्भ स्वरूपाची असल्यामुळें त्या नाटकाच्या पूर्वीं संस्कृत नाटकाच्या इतिहासांत ओबडधोबड नाटकें लिहिण्याचा काल होऊन गेला असावा असें म्हणणें आपणांस भाग पडतें. आज जीं नाटकें उपलब्ध आहेत त्यांतील विदूषकाची कामगिरी लक्षांत घेऊन नंतर आपण भरताचें नाट्यशास्त्र, साहित्यदर्पण वगैरे ग्रंथांत विदूषक बनविण्याविषयीं जे नियम दिले आहेत तिकडे नजर दिल्यास आपणांस ह्या एकाच पात्रासंबंधीच्या कल्पनांमध्यें कसा विरोध व फरक आहे तो समजतो. ह्या विरोधाचा उलगडा होण्यास आपणांस असें अनुमान करावें लागतें कीं, विदूषकाचा उगम राजदरबारांतल्या नाटकांत झालेला नसून हिंदूस्थानांतील निरनिराळ्या जातींतील किंवा वर्णांतील प्राचीन खेळांत झालेला आहे. हे खेळ प्रहसनें असत व त्या कालीं जी लोकांची राहणी असे तिचें प्रतिबिंब प्रहसनांतील पात्रांत दृष्टीस पडे. अधिकारी धर्मोपदेशक ब्राह्मणांबद्दल लोकांनां जो तिरस्कार वाटत असे तो प्रहसनरूपानें उघड करून दाखवीत. लोक विदूषकाला ब्राह्मण करी पण तो फार हलक्या दर्जाचा व तिरस्करणीय क्षद्र मनुष्य असे. अशा रीतीनें ते आपल्या ओबडधोबड व आकाररहित खेळांनां प्रहसनाचें स्वरूप देऊन उच्च वर्गाचा सूड घेत.

कांहीं कालानंतर ब्राह्मणांनीं जेव्हां नाटकाचें काम आपल्या हातांत घेऊन दरबारांत त्याला काव्याचें रूप दिलें व नाटकाची रचना करण्याकरितां जेव्हां नियम तयार करण्यांत आले त्या वेळेस खेड्यापाड्यांतील नाटकांत लोकांमध्यें रूढ झालेलीं जीं पात्रें आढळत त्या सर्वांचा ह्या नाटकांत समावेश करण्यांत येऊं लागला. लोकांच्या मनामध्यें पूर्णपणें ठसलेल्या विदूषकासारख्या पात्राला आपल्या नाटकांत ब्राह्मणांना काट देतां येईना; पण त्याच वेळीं आपल्या वर्गाची तिरस्कारपूर्ण अशी लोकांनीं केलेली निंदा त्यांनां पहावेना. त्यामुळें ब्राह्मणांनीं विदूषकाच्या पात्रांत जो ओंगळ भाग होता त्यांत फरक करून त्या पात्राच्या आंगीं असणार्‍या विनोदाला प्राधान्य दिलें. वर्तमान नाटकांतला विदूषक खुषमस्कर्‍या व गम्मत करणारा असतो ह्याचें कारण हेंच होय. पाणिनीय संस्कृतांत लिहिलेल्या नाटकांतील प्राकृतांत जी मोठी भिन्नता दृष्टोत्पत्तीस येते त्याचेंहि कारण हेंच आहे. नाटकाचे मूळ उत्पादक जर ब्राह्मण असते तर त्यांनीं विदूषक हा निःसंशय ब्राह्मण म्हणून त्याचे मुखांत संस्कृत भाषा घातली असती व दरबारांतल्या श्रोत्यांनां सहज समजणारी अशी अर्थयुक्त व जोरदार भाषा विदूषकानें वापरली असती. परंतु ब्राह्मणांनीं नाटकाचें काम हातीं घेण्यापूर्वीं प्राकृत भाषेंतरील नाटकें प्रिय झालेलीं होतीं; त्यामुळें तीं घेऊनच त्यांत स्वतःच्या उपयोगासाठीं जरूर तेवढी सुधारणा ब्राह्मणांनीं केली. आपणांला जेवढीं म्हणून नाटकें माहीत आहेत त्या सर्वांत विदूषक प्राकृतांत बोलतांना आढळतो ह्याचें हेंच कारण. दुसर्‍या कोठेंहि ब्राह्मण प्राकृतांत बोलता तर ती गोष्ट योग्य मार्गाविरुद्ध झाली असती.

येणेंप्रमाणें पाणिनीच्या कालच्या संस्कृत नाटकांपूर्वीं प्राकृतांत खेड्यापाड्यांत जी नाटकें होत त्यांत विदूषकाचा उगम आपणास आढळण्यासारखा आहे. हें पात्र ब्राह्मण कवीनीं शोधून काढलेलें नाहीं.

विदूषकाचीं उत्तम उदाहरणें हर्षदेवाच्या तीन नाटकांत, विशेषतः त्याच्या नागानन्द नाटकांत आढळतात. हर्षाचा विशेष कल बौद्धधर्माकडे होता; पण इतर धर्मांचा तो द्वेष करीत नसे. प्रियदर्शिका व रत्‍नावली हीं आपलीं दोन नाटकें त्यानें शिवाला अर्पण केलीं आहेत, व म्हणून अर्थातच त्यांनां ब्राह्मणसारस्वताचा संस्कार लागलेला आहे. ह्या दोन नाटकांतील विदूषक गमत्या आहे. नागनन्दांतला विदूषक मात्र भिन्न प्रकारचा आहे. नागानन्दांतील नांदी बुद्धाला उद्देशून लिहिलेली आहे. नागानन्दाच्या तिसर्‍या अंकांत हर्षानें पूर्वींच्या लोकप्रिय नाटकांप्रमाणें ब्राह्मणांची भरपूर निंदा केली आहे. ही निंदा अत्रेय नांवाच्या मूढमति व हीन दर्जाच्या विदूषकाकरवीं करण्यांत आली आहे. इतर प्राचीन नाटककार ब्राह्मण असल्यामुळें त्यांनां ब्राह्मणांची फजिती करितां आली नाहीं; पण या अत्रेय पात्रानें मात्र ब्राह्मणांची खूप निंदा केली आहे.

ही विदूषक या पात्रासंबंधाची गोष्ट झाली. विंडिशनें ज्या अनेक पात्रांच्या ठायीं केवळ सादृश्यावरून यवनमूलकत्व आरोपिलें आहे तींहि निरनिराळ्या संस्कृतींत विदूषकाप्रमाणेंच स्वंयस्फूर्तीनें उत्पन्न होण्यासारखीं आहेत. असो.

विंडिशचीं कांहीं मतें आपण खोडून काढलीं तरी ग्रीक रंगभूनीचा भारतीय रंगभूमीवर परिणाम बराच झाला असेल ही गोष्ट आपणांस नाकारंता यावयाची नाहीं.