प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण ११ वें.
बाह्यांचा हिंदुस्थानावर परिणाम.
रामायण चोरलेलें.- ज्या गोष्टींबद्दल आपण फार अभिमान बाळगतों त्यांपैकीं एक म्हटली म्हणजे आपलें वाङ्मय होय. रामायाणासारख्या आर्षकाव्यांबद्दल अर्वाचीन हिंदूंच्या प्रमाणें चोहोंकडील प्राचीन ग्रंथकारांच्या मनांत नेहमीं आदर वसत असे. व्यास आणि वाल्मीकि यांच्या कृती म्हणजे आपणांस जवळ जवळ वेदांप्रणाणें पूज्य. सामान्यजनांमध्यें वेदांपेक्षां याच कृतींचा अधिक परिचय. कोणी या बाबतींत हें परक्याचें धन आहे ही कल्पना सांगितली तर ती आपल्य मनास विचित्र वाटते. तथापि या तर्हेची कल्पना व्यक्त झाली आहे. वेबरनें रामायण हा ग्रंथ होमरचें कथानक भारतांत आल्यामुळें झाला असें म्हटलें आहे. या त्याच्या म्हणण्याचें परिक्षण लासेन व तेलंग यांनीं केलें आहे. नाट्यकला आपण ग्रीकांपासून घेतली असें सांगणारे ग्रंथकारहि आहेत. तथापि अलीकडे वेदांचा अभ्यास वाढला असल्यामुळें वेदकालीं देखील नाट्यकला होती असें दिसून येऊं लागलें आहे. आतां रामायणासंबंधाचें वेबरचें म्हणणें अगोदर सांगून नंतर लासेन आणि तेलंग यांचें म्हणणें वाचकांपुढें ठेवूं.
वेबरचें रामायणाविषयीं मत.- ‘द अलविस’* यानें परिश्रम करून रामायणाची मूळ कल्पना प्रथम बौद्ध ग्रंथ ‘रामसागा’ यामध्यें असून वाल्मीकिमहर्षींनीं तिच्यांत यज्ञदत्तवध या दंतकथेची भर घालून रामायण रचलें असें प्रतिपादन केल्यापासून रामायणरचनेच्या प्रश्नास अगदीं निराळेंच स्वरूप प्राप्त झालें आहे. † कारण बौद्ध कथेमध्यें व वाल्मीकींनीं दिलेल्या कथेमध्यें महत्त्वाचे फरक आढळतात. बौद्ध कथा ही जास्त प्राचीन दिसते यावरून ती प्रथम लिहिली गेली असावी असें वाटतें आणि हेंच अनुमान ‘द-अलविस’ यानें काढलें आहे.