प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ११ वें.
बाह्यांचा हिंदुस्थानावर परिणाम.

बौद्धकथा व रामायण यांची तुलना.- किरकोळ गोष्टी सोडून दिल्या तर बौद्ध कथेमध्यें खालीं दिल्याप्रमाणें फरक आढळतातः-
(१) राम आणि त्याचा बन्धु लक्ष्मण यांस त्यांच्या बापानें आपल्या हयातींतच त्यांचें सापत्‍न मातेच्या कारस्थानापासून रक्षण करण्याच्या हेतूनेंच अरण्यांत पाठविलें.
(२) सीतादेवी‡ ही या दोन भावांची बहीण असून ती स्वेच्छेनेंच त्यांच्याबरोबर अरण्यांत गेली.

(३) १२ वर्षें अरण्यांत घालविल्यावर राम परत येऊन राज्यावर बसतो आणि नंतर आपल्या सीता बहिणीबरोबर राज्यावर बसतो आणि नंतर आपल्या सीता बहिणीबरोबर विवाह करतो.

(४) यामध्यें रावणाकडून सीताहरण व लंकेवरची स्वारी या कथा मुळींच नाहींत.

रामवनवासाची सर्व कथा बौद्ध दंतकथांवरूनच घेतली असावी असें आपणांस सिद्ध करतां येईल.

बुद्धघोषानें ‘धम्मपद’ ग्रंथावरील टीकेंत वाराणसी येथील राजा ब्रह्मदत्त याची एक दंतकथा दिली आहे.  {kosh Fausboll Ed. p. 303. † महावंसोमध्यें (पृ. १८४५) गंगातीरावर एक रामगाम नांवाच्या गांवाचा उल्लेख असून तेथें एक स्तूप असल्याचेंहि वर्णन आहे. हा गांव अशोकाच्या काळीं असून तो कोलिय घराण्याकडे होता असें म्हटलें आहे. (Cf. also, Bigandet Life of Buddha p. 349). याच वेळीं फा हिआननें (Ch 22end) व नंतर कांहीं वर्षांनीं हिओयुएन-त्संग यानें कपिलवस्तूच्या हद्दीवर ‘लान-मो’या नांवाच्या गांवाचा उल्लेख केला आहे. ‘लान-मो’ याचें मातृकान्तर स्टॅ. जूलिआं (II.325) आणि ‘बील’   (Fa. Hian p. 89) यांनीं रामग्राम असें दिलें आहे.}*{/kosh}   या दंतकथेंत असें आहे कीं, ब्रह्मदत्तानें आपल्या राणीस एक वर दिला होता व त्यापासून पुढेंमागें तिच्या पुत्रांस संकट येऊं नये म्हणून त्यानें महिंशासक आणि चन्द (चन्द्र) या राजपुत्रांस देशाबाहेर पाठविलें. त्या वेळीं ज्याच्याकरितां या राजपुत्रांस हा त्रास सोसावा लागला तो त्यांचा सावत्र भाऊ सूर्य हा त्यांच्याच बरोबर जातो. नंतर पित्याच्या मरणानंतर ते परत येऊन वडील भाऊ राज्यावर बसतो. चंद्र हा ‘उपराज’ होतो आणि सूर्य हा सेनापति होतो.

याप्रमाणेंच बुद्धघोषानें ‘सुत्तनिपात’ या ग्रंथावरील टीकेंत बुद्धाचें पूर्वज शाक्य आणि कोलिय वंश यांच्याबद्दल एक दंतकथा दिली आहे ती अशीः- अंबत्थराजन् यानें आपल्या तरुण राणीस खूष करण्याकरितां आपल्या ४ मुलांस व ५ मुलींस देशांतरास पाठविलें. अरण्यांत गेल्यावर त्यांपैकीं ४ भावांनीं ४ बहिणीं बरोबर लग्नें केलीं व ते वडील बहिणीस आईप्रमाणें मानूं लागले. त्यांचा उद्देश असा होता कीं, आपल्या बहिणींस भलत्याच पुरुषाशीं लग्न करण्याचा प्रसंग येऊं नये. पुढें वडील बहीण पिया ईस कुष्ट झाल्यामुळें ते त्या जंगलाच्या दुसर्‍या भागांत गेले. त्या ठिकाणीं एक राम नांवाचा राजा कुष्टी होऊन आला होता पण तो नुकताच बरा झाला होता. त्यानें तिला त्या रोगापासून मुक्त करून तिच्याबरोबर विवाह केला. †

यावरील तीन दंतकथांमध्यें कितीहि फरक असला तरी यांच्यातील परस्परसंबन्ध तेव्हांच लक्ष्यांत येतो.

दशरथजातकामध्यें वनवासाचें व या बहिणभावांच्या लग्नाचें कारण दिलें असून शिवाय त्यामध्यें दशरथ, लक्ष्मण, भरत सीता आणि राम हीं नांवें आढळतात. राम या राजाची या वनवासांतील मुलाशीं ओळख नव्हती असें न दाखवितां तो त्यांच्यापैकींच एक असून त्यांच्यांत मुख्य होता असे या जातकांत म्हटलें आहे.

नंतर रामायण रचीत असतांना कवीनें वरीव गोष्टी घेऊन राम आणि सीता यांनां प्रणयी दंपत्या करून याखेरीज महत्त्वाची अशी सीतेच्या हरणाची व लंकेवरील स्वारीची गोष्ट त्यांत घातली आहे. त्याप्रमाणें वाराणसी हें स्थळ बदलून अयोध्या नगरी ही पसंत केली आहे व वनवासाची जागा हिमालयाच्या ऐवजी दण्डकारण्यांत कल्पिली आहे.

लंकेवरील स्वारी वर्णन करावयाची असल्यामुळें कवीनें वनवासाची जागा दक्षिणेंत पसंत करणें साहजिक आहे.

त्याप्रमाणेंच दशरथजातकामध्यें ब्रह्मदत्त व अंबरत्थराजन् हे वाराणसी येथें राहत होते असें म्हटलें आहे; परंतु त्यांचीं वनवासास धाडलेली मुलें अथवा निदान त्यांचे वंशज शाक्य आणि कोलिय हे कपिलपुर (कपिलवस्तु) अथवा कोलियपुर येथें राहिले असावे. हीं नगरें रोहिणीनदीच्या {kosh रोहिणी नदी- ‘क्लॅपरॉथ याच्या म्हणण्याप्रमाणें ही नदी नेपाळमधून येऊन महानन्देस मिळते व तेथून गोरखपूरनजीक रपति नदीपर्यंत पोंचते’-(Hardy)}*{/kosh}  दोन्ही तीरांवर आहेत. याप्रमाणें त्यांचा संबंध अयोध्येकडे येतो आणि यावरून अयोध्या हें स्थळ कवीनें पसंत केलें असावें.

लंकेवरील स्वारीचें वर्णन करण्यांत कवीचा आर्यसंस्कतीचा दक्षिणेंत कसा प्रसार झाला हें वर्णन करण्याचा विचार होता असी आजपर्यंत समजूत होती. {kosh Vide Lassen Ind. A. K. I. 535. & Webber Vorles. Uber Ind. L. G. p. 181}*{/kosh}  परंतु मि. तलबॉइज व्हिलर {kosh In. History of India (London 1869).}*{/kosh}  यानें असें
मत प्रदर्शित केलें आहे कीं यांत फक्त ब्राह्मणांनीं लंकेतील बौद्ध लोकांस राक्षस वगैरे वर्णन करून त्यांच्याबद्दल द्वेष दाखविला आहे. रावण आणि त्याचे भाऊ हे ब्राह्मण कुलांतच जन्मले असून त्यांनीं ब्रह्मा, अग्नि वगैरे देवतांस प्रसन्न करून घेतलें होतें असा उल्लेख असल्यामुळें वरील मतास पुष्टि येते. {kosh There was also separation of Rakshasas into पौलस्त्य & शालकटंकट (VIII. 23-24) or सालंकतंकटा (VIII 20-23) i.e. Aryans & Aborigines}*{/kosh}  तसेंच ख्रिस्ती शकाच्या पहिल्या शतकांतील ग्रंथकारानें आपल्या काव्यासाठीं त्यावेळीं चाललेल्या ब्राह्मण-बुद्ध वादविवादाचा विषय घेऊन बुद्धांच्या दक्षिणेंतील एका मोठ्या स्थानाच्या  पराभवाचें वर्णन करणें साहजिक आहे. दक्षिणेंतील मूळचे लोक यांचें वानर म्हणून वर्णन केलें आहे आणि ते वालीशिवाय सर्व रामपक्षाचे असून त्यांनीं आर्यसंस्कृतीचा यापूर्वींच स्वीकार केला होता असें दिसतें. त्याप्रमाणेंच निषादांचा राजा गुह याची स्थिति होती. चित्रकूट पर्वतावरील आणि दंडकारण्यांतील ऋषींस पीडा करणारे राक्षस यांस बौद्ध लोक म्हणण्यांत जरी व्हीलर यानें या कल्पनेचा अतिरेक केला आहे तरी सीतेच्या अहिंसापर भाषणांत {kosh III. 13.2.}*{/kosh} तिनें राक्षसांविरुद्ध लढाई करण्यास उद्युक्त झालेल्या रामाचा निषेध केला त्यावरून  असें दिसतें कीं, ही मूळ बौद्ध कल्पना आहे. तीमध्यें क्षत्रियानें प्रत्यक्ष स्वतःस इजा पोंचवल्याशिवाय ब्राह्मण आणि बौद्ध यांच्या भांडणांत पडूं नये असें ध्वनित केलें आहे असें वाटतें. परंतु लंकेच्या अथवा तेथील रहिवाशांच्या वर्णनांत ज्याचा बौद्धांशीं कांहीं संबंध येईल असें कांहींच आढळत नाहीं.
उलट होमरमधील ग्रीक आणि ट्रोजन लोकांप्रमाणें राम आणि रावण हे दोघेहि त्याच देवांची पूजा करीत होते असें दाखविलें आहे. {kosh VI. 19, 40, 52, 21.}*{/kosh}  इंद्रजिताच्या ऐन्द्रजालिक हवनाच्या वेळीं उपाध्यायांनीं घातलेल्या तांबड्या पागोट्यावरून व त्यांनीं नेसलेल्या तांबड्या वस्त्रांवरून आपणांस सामवेदांतील ऐन्द्रजालिक मंत्रांची आठवण होते. {kosh Vide. Ind. Stud. I. 51, 52.}*{/kosh} या वस्त्रांचा बौद्ध केशरी वस्त्रांशी (कषाय व रक्तपट) कांहीं संबंध नाहीं. ज्या एकाच ठिकाळीं बुद्धाचा उल्लेख आहे आणि जेथें त्यास चोर म्हटलें आहे तो श्लोक मागाहून प्रक्षिप्‍त केलेला आसावा. असें ‘श्लेजेल’ (Schlegel) याचें म्हणणें आहे. {kosh 109,33.ed. Sch.}*{/kosh} वरील गोष्टी सोडून दिल्या तरी ज्याचें व्हीलर याच्या मताप्रमाणें मत असेल त्यास असें अनुमान काढावें लागेल कीं, ज्याअर्थीं कवीनें बौद्ध व ब्राह्मण यांच्यामधील भांडणाचें वर्णन करण्याच्या मूळ उद्देश गुप्‍त ठेवावा लागला आणि त्याला एक मूळ बौद्ध दंतकथा घेऊन तिचें आपल्या बेतास साजेल असें रूपांतर करावें लागलें.

या राजकीय आणि सांस्कृतिक हेतूंशिवाय तिसरा एक हेतू रामायणरचनेच्या मुळाशीं अगदीं वरवर पहाणार्‍यासहि दिसून येतो. तो म्हटला म्हणजे राम हा विष्णूचा अवतार होता ही कल्पना दृढमूल करून रामाची योग्यता इतर देवतांपेक्षां वाढविणें हा होय. स्वतः वाल्मीकीच्या मनांत हा उद्देश कितपत होता तें सांगता येत नाहीं. बहुतकरून हा उद्देश पुढें या काव्यांत भर टाकण्यास कारण झाला असेल; आणि या उद्देशानें घातलेल्या श्लोकांची इतर श्लोकांशी जी ठिकठिकाणीं असंबद्धता दिसून येते तीवरून हें दुसरें अनुमानच बरोबर दिसतें.

तथापि रामायण हें बौद्धमताचा पाडाव करण्याच्या हेतूनेंच लिहिलें असें व्हीलर याचें मत जे लोक सर्वांशीं  ग्रहण करण्यास तयार असतील त्यांच्या दृष्टीनें रामायणास दिलेलें हें वैष्णवी रूप खुद्द वाल्मीकीनें दिलें असावें हेंच मत पुष्कळ अंशांनीं ग्राह्य ठरेल. कारण हें मत बौद्धमतखंडनाच्या कल्पनेशीं तंतोतंत जुळतें. एवढें खरें कीं रामायणानें व त्याच्या या वैष्णवी रूपानें त्यांच्या देवतांनां दिलेल्या निराळ्या वळणानें ब्राह्मणांनां बौद्ध लोकांनीं हिरावून नेलेली सत्ता परत मिळविण्याच्या प्रयत्‍नांत मदत झाली. हा मोठा चमत्कारिक योग जमून आला कीं, बुद्धांच्या रामाच्या कथेला वाल्मीकीनें मोठ्या चातुर्यानें निराळ्याच वैष्णवी रूपांत नटविल्यानें ती कथा बौद्धांच्याच विरुद्ध उपयोगांत आणतां आली. या कथेमध्यें सामान्य जनतेस रुचणारीं मूळांतील तत्त्वें जशींच्या तशींच ठेऊन वर नुसता निराळा मुलामा मोठ्या कौशल्यानें करण्यांत आला.