प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण ११ वें.
बाह्यांचा हिंदुस्थानावर परिणाम.
परकीय लोकांची राजकीय सत्ता.- हिंदुस्थानाचा जगाशीं व्यापारी संबंध आज दोन हजारांहून अधिक वर्षें आहे. राजकीय संबंध देखील असाच जुना असून अनेक प्रकारचा आहे. ब्रह्मदेशावर चीननें अनेक स्वार्या केल्या आणि नेपाळ, भूतान आणि सिक्कीम या संस्थानांस देखील चीनचें मांडलिकपण स्वीकारावें लागलें होतें. जवळच्या पश्चिमेच्या राष्ट्रांपैकीं अनेक जातींनीं येथें राज्य केलें. इराणचा डरायस हिस्टासपिस यानें हिंदुस्थानाचा बराच भाग काबीज केला होता. ग्रीक, शक, पल्हव आणि हूण या नजीकच्या लोकांनीं येथें स्वार्या करून मुलुखहि पादाक्रांत केला होता. अरबांनीं आठव्या शतकांत कांहीं दिवस या देशांत राज्य केलें आणि मुसुलमानाच्या अनेक जाती, वंश आणि राष्ट्रें या देशांत जागजागीं राज्य करीत होतीं. आफ्रिकेंतील हबशी लोकांचें एक संस्थान जंजिर्यास आहे. याशिवाय अर्वाचीन यूरोपीय लोकांपैकीं डच, पोर्तुगीज आणि फ्रेंच या निरनिराळ्या राष्ट्रांनीं येथें कांहीं मुलुख काबीज केला आहे. इंग्रजांनीं तर जवळ जवळ सर्वच देश घेतला आहे. हा परकीय राष्ट्रांचा हिंदुस्थानाशीं घडलेल्या संबंधाचा राजकीय परिणाम होय.
सध्यां आपले राज्यकर्ते साता समुद्रांपलीकडचे आहेत. राजा सहजच देशांतील अनेक गोष्टींवर परिणाम घडवूं शकतो. आज आपल्यावर प्रत्येक बाबतींत पाश्चात्य परिणाम दिसत असल्यामुळें त्या परिणामांचा हिशोब देखील देतां येत नाहीं. शक, यवन, पल्हव, हूण इत्यादि अनेक परकी राष्ट्रांनी या देशाचा कांहीं भाग काबीज केला होता, तथापि त्यांचा सांस्कृतिक परिणाम आपल्यावर काय झाल हें आज खात्रीनें सांगवत नाहीं. वास्तुसौंदर्यशास्त्रांत आपण अनेक गोष्टी परकीयांपासून घेतल्या असें विधान कांहीं संशोधक करितात. कांहीं तें नाकबूल करतात.