प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ११ वें.
बाह्यांचा हिंदुस्थानावर परिणाम.

परकीय शिल्पकलेचें अनुकरण.- आपल्या देशांत मूर्ती अनेक प्रकारच्या. कारण देशच मूर्तिपूजक. तेव्हां देशांत मूर्तीची कला वाढली तर त्यांत नवल नाहीं. पण या बाबतींत देखील पाश्चात्य लेखक असें म्हणतात कीं आपण परकीय लोकांचें बरेचसें घेतलें. मूर्तिकर्म बौद्धांनीं देशांत सुरू केलें. तेव्हा बौद्धांच्या कलेचा एक अभ्यासक  {kosh “Buddhist Art in India” by A. Grunwedel Translated by Gibson, revised by J. Burges. 1901.}*{/kosh} आपल्या एतद्विषयक ग्रंथात काय म्हणतो हें आपण पाहूं.

परकीय कलेचा भारतीय कलेमध्यें प्रवेश या विषयावर प्रकाश पाडण्यासाठीं हा ग्रंथकार लिहितोः- यूरोपांत भारतीय सुधारणेचा इतिहास चांगला ज्ञात झाल्यापासून, भारतीय कलेच्या प्राचीनत्वाविषयीं पाश्चात्य लोकांत असलेल्या पूर्वकल्पना अतिशयोक्तीच्या आहेत असें आढळून आलें. वास्तविक पाहतां, मूर्तिशिल्पविषयक सर्व प्राच्य कल्पनांत भारतीय कल्पना अतिशय अर्वाचीन आहे. कारण भारतांत कोणतेंहि महत्त्वाचें स्मारकचिन्ह इ. सं. पूर्वीं ३ र्‍या शतकाच्या मागचें आढळत नाहीं. या कलेच्या वाढीला एक हजार वर्षें लागलीं;  म्हणजे इ. स. पू. ३ रें शतक ते इ. स. ६ वें किंवा ७ वें शतक. या कालांत या प्राचीन भारतीय म्हणजे बौद्ध कलेचें प्रामुख्य असावें. हिंदुस्थानाबाहेरच्या आशिया खंडांतील ज्या देशांनीं पुढें बौद्धसंप्रदायाचा स्वीकार केला अशा देशांत, भारतीय पद्धतींवर पारमार्थिक विषय चित्रिणार्‍या व गौरविणार्‍या कलेची वाढ १३-१४ व्या शतकांपर्यंत चालू होती. त्यावेळेपर्यंत नकशीचीं कामें बहुतेक मोठ्या प्रमाणांत दगडांवर होत असत. पण पुढें हळू हळू बौद्धांचीं शिल्पकामें दगडाऐवजी लांकूड आणि माती व त्यानंतर ओतींव धातू यांवर होऊं लागलीं.

भारतीय चित्रकलेनें दोन भिन्न भिन्न चित्रकलासंप्रदायांपासून कांहीं अंगें उसनीं घेऊन, त्यांचा आपल्या राष्ट्रीय चित्रप्रबंधांतून उपयोग केला आहे, असें ग्रुनवेडेल म्हणतो. हे दोन संप्रदाय म्हणजे एक प्राचीन एशियांतीलच संप्रदाय याची सुरवात अकिमेनाइड्स (Achâemenides)  कडून झाली-आणि दुसरा ग्रीको-रोमनसंप्रदाय. हिंदुस्थानांतील प्राचीन स्मारकांतून अकिमेनाइड्स यांच्या धाटणीचें बरेंच वर्चस्व आढळून येतें व हें वर्चस्व भारतीय चित्रकलापद्धतींत कांहीं ग्रीक अंगांचा समावेश करण्यास कारणीभूत झालें. तथापि भारतीय चित्रकलेच्या अंगीं निसर्गाच्या जिवंत व जोरदार कल्पनांचें वास्तव्य असल्यानें तिनें आपलें स्वातंत्र्य कायम ठेवून कांहीं विशिष्ट मर्यादेपर्यंत आपली वाढ करून घेतली.

याच्या उलट प्राचीन नमुने आदर्शभूत झाले आणि चित्ररचनेची (यूरोपांतील) जुनी तर्‍हा प्रसृत्त झाली, यामुळें कांहीं विशिष्ट रचनापद्धति सोंवळी बनून लोकांवर लादली गेली.

हिंदुस्थानाच्या चित्रकलेचा इतिहास लिहावयाचा म्हणजे ज्या बाहेरच्या प्रदेशांतून हिंदुस्थानांत कल्पना आल्या त्या प्रदेशांतील कल्पनांचा अभ्यास करावयास पाहिजे या तर्‍हाचे विचार सांगून बर्जेस पुढें म्हणतोः-

जेव्हां निरनिराळ्या प्रकारच्या बुद्धांच्या, बोधिसत्वांच्या, देवांच्या आणि दैत्यांच्या रूपांचा इतिहास उपलब्ध होईल, तेव्हांच पुष्कळशा इतिहासज्ञानांतील अडचणी दूर होतील. दुर्दैवानें, या कामाकिरतां लागणार्‍या कच्च्या साहित्यांपैकीं कांहींहि अजून प्राप्‍त करून घेतां आलेलें नाहीं. चित्रें आणि खोदकामें यांखेरीज तिसरें एक वाङ्‌मयरूपी साहित्य उपलब्ध आहे, तें विशेषेंकरून उत्तरेकटील चित्रकला-संप्रदायांचें असून त्याचें महत्त्व बौद्धांच्या पुरातन वस्तूंच्या वर्णानाच्या कामीं फार आहे. बुद्ध आणि बोधिसत्व यांच्या मूर्ती तयार करण्याविषयींचीं अर्वाचीन अनुशासनें व तसेंच ‘कंजूर’ आणि विशेषतः ‘तंजूर’ या तिबेटी ग्रंथांतून आढळणारीं लांबलचक देवांचीं वर्णनें, हे बौद्ध प्रतिमारचनेचे प्रमाणग्रंथ होत. वरील अनुशासनांत डोळे उघडणें, मूर्तीला सजीव करणें इत्यादी संस्कारविधींसह मूर्तींची रचना व परिमाणें दिलीं आहेत व देवांच्या वर्णनांत मूर्तींचीं परिमाणें, प्रभामंडले, त्यांच्या सिद्धी इत्यादी विषय आहेत. या कारणामुळें आपणांस भारतीय मूर्तिकलेची माहिती करून घेण्यासाठीं तिबेट किंवा जपान यांचीहि मूर्तिकला शोधावी लागते.

पल्लव राजांची कला रोमन कलेपासून अस्तित्वांत आली अशा प्रकारचें विधान एका फ्रेंच ग्रंथकारानें {kosh ‘The Pallvas’ by G. Jouveau Dubreuil. Translated by Dikshitar, Pondecherry १9१7, Chap.I.}*{/kosh}  केलें आहे. तो म्हणतोः-

पल्लवकलेचे जे अवशेष मद्रासमधील पदार्थसंग्रहालयांतून मांडले आहेत, त्यांवरून पाहतां, त्याकलच्या कलेचा विषय बौद्ध, पेहेराव बौद्ध, आणि दागिने हिंदूंचे, परंतु कारागिरी यूरोपीय दिसते.

यूरोपीय कलेचें वर्चस्व दर्शविणार्‍या बौद्ध मूर्तींच्या मस्तकावर ग्रीक पद्धतीचे कुरळे केंस आहेत, यांचा चेहरा समभाग (Symmetrical) व अवयव शारीरशास्त्रांतील नियमानुरूप उठावदार कोरून त्यांमध्यें स्नायू दाखविले आहेत. कांहीं मूर्ती रोमन टोग्याची आठवण करील अशा वस्त्रानें आच्छादित आहेत.

हिंदु-युरोपीय कलेचें मिश्रण फक्त कृष्णेच्या तीरावरच नजरेस पडतें असें नव्हे तर तें सार्वत्रिक दिसतें. गांधार देशांत तें विशिष्टत्वानें नजरेस पडते. हें यूरोपीय शिल्पकलेचें वर्चस्व दुसर्‍या व तिसर्‍या शतकांत हिंदुस्थानांत पराकाष्ठेला पोंचलें होतें, यावरून पल्लव कालांतील कलेवर रोमन कलेची छाप बसली होती हें सिद्ध होतें.

आंध्रवंशाच्या नाशाबरोबरच ग्रीक-बौद्ध कला नष्ट झाली नाहीं.

कृष्णातीरावरील तिसर्‍या शतकांतील शिल्पकला ही सर्वांशीं हिंदु-रोमन पद्धतीचीच आढळते. पांचव्या शतकांत हें रोमन वर्चस्व पार नाहीसें झालें.

इ.स. १९१७ सालीं  बेझवाडा येथें लेखकास सांपडलेल्या बुद्धमूर्तीवर जर नामनिर्देश नसता तर ती मूर्ति एखाद्या प्राचीन कुरळे, डोळे बिनबाहुल्यांचे, व सामान्य स्वरूप रोमनप्रमाणें असून प्राचीन यूरोपीय पद्धतीप्रमाणें ती मूर्ति शुभ्र संगमरवरी पाषाणाची घडलेली आहे.

वरील मूर्ति पल्लव कालांतील असेलच असें म्हणण्याचा लेखकाचा आग्रह नाहीं. त्याचें इतकेंच म्हणणें कीं, यूरोपीय शिल्पकलेचें वर्चस्व हिंदी कलेवर होतें, व आंध्र व पल्लव यांच्या कालीं म्हणजे तिसर्‍या शतकांत हें वर्चस्व उच्चीला पोंचलेलें दृष्टोत्पत्तीस येतें.