प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ११ वें.
बाह्यांचा हिंदुस्थानावर परिणाम.

यूरोपीय ग्रंथकारांचे अभिप्राय.- आतां या बाबतींतील दुसर्‍या विद्वान यूरोपीय ग्रंथकारांचे अभिप्राय पाहूं. भारतीय ज्योतिःशस्त्रविषयक बाबतींत ज्यांनां मत देण्याचा सामान्यतः अधिकार पोंचतो असे यूरोपीय पंडित म्हटले म्हणजे कोलब्रूक, इ. बर्जेस, व्हिटने आणि वर उल्लेखिलेला डॉ. थिबो हे होत. या पंडितांपैकीं कोलब्रूक यास भारतीय ज्योतिषाची माहिती बेताचीच होती. बर्जेस आणि व्हिटने यांचेंहि ज्ञान सामान्य प्रतीचेंच होतें. डॉ. थिबो यास मात्र साधारण माहिती होती, तर जेवढी आपणांस दीक्षितांच्या ग्रंथांत सांपडते तेवढी नव्हती. बेंटली हा ज्योतिःशास्त्राच्या मूळाचा फारसा शोध करण्याच्या भानगडींत पडलाच नाहीं. डॉ. कर्न यानें बृहत्संहितेच्या उपोद्धातांत (इ. स. १८६५) आणि जेम्स बर्जेस यानें एका लेखांत (इ. स. १८९३) या विषयावर कांहीं उद्‍गार काढिले आहेत व गणित आणि जातक दोन्ही हिंदूंनीं ग्रीकांपासून घेतलीं असें या दोघांचेंहि मत आहे. परंतु यांचें विवेचन सविस्तर व सप्रमाण नसल्यामुळें विचारार्ह नाहीं.

को ल ब्रू क. - कोलब्रूक यानें गणित व जातक या दोहोंविषयीं अभिप्राय देऊन अरबी ज्योतिषाविषयींहि अभिप्राय दिलेला आहे. अरबांपासून हिंदूंनीं ज्योतिष घेतलें असा एकदां कांहीजणांचा अभिप्राय होता परंतु हल्लीं यासंबंधी अधिक माहिती उपलब्ध झालेली आहे व प्रथम अरबांनीं हिंदूपासून ज्योतिष घेतलें याविषयीं आतां कांहीं संशय राहिला नाहीं. “ताजिक” मात्र मुसुलमानांकडून इकडे आलें. कोलब्रूक  म्हणतो. “हिंदू लोकांनां परिचित असलेली क्रांतीवृत्ताच्या द्वादशधा विभागाची पद्धति किंचित् फेरफार करून अरबांनी घेतली असें मला वाटतें. हिंदू लोकांनीं ही पद्धति ग्रीकांपासून घेणें अगदींच असंभवनीय नाहीं. मात्र ती त्यानीं आपल्या प्राचीन २७ विभागांनां अनुरूप अशी केली. गोलयंत्राची कल्पना हिंदूंनीं ग्रीकांपासून घेतली किंवा त्यांस दिली घेतली असली तरी त्यांनीं टालमीच्या गोलाची सर्वांशीं नक्कल केली नाहीं. दोहोंच्या रचनेंत बरेंच अंतर आहे. इजिप्‍तच्या आणि बाबिलोनच्या लोकांप्रमाणें  हिंदू लोक राशीचे तीन भाग करितात. त्यांस द्रेष्काण म्हणतात. द्रेष्काणपद्धति खाल्डिअन, इजिप्शिअन आणि पर्शियन यांची एकसारखी आहे. हिंदूंची पद्धति केवळ तशीच नाहीं. काहीं भिन्न आहे. हिंदूंनीं द्रेष्काणपद्धति परकीय राष्ट्रापासून घेतली हें निःसंशय आहे. (ही कल्पना मूळची इजिप्‍तचा राजा नेकेपसो याची असें फरमिकुस म्हणतो), केंद्रच्युतवृत्तें, प्रतिवृत्तें, अधिवृत्तें इत्यादि पुष्कळ गोष्टींत हिंदू ज्योतिषांचें ग्रीक ज्योतिषांशीं साम्य आहे, आणि तें काकतालीय न्यायानें आहे असें म्हणणें कठिण आहे. ही गोष्ट आणि हिंदी ज्योतिषांत यवनाचार्य, रोमकसिद्धांत हीं नांवें आहेत ही गोष्ट, यांवरून हिंदूंस ज्योतिषज्ञान बाहेरून कोठून तरी प्राप्‍त होऊन त्याच्या योगानें आपलें मूळचें अपूर्ण ज्योतिष त्यांनां वाढवितां आलें आणि शुद्ध करितां आलें असें मानण्यास आधार होतो, असें कोणास वाटेल तर त्या मताविरुद्ध जाण्यास माझा कल होणार नाहीं. तसेंच हिंदूंचीं प्रतिवृत्तें आणि नीचोच्चवृत्तें या पद्धतीचें टालमीच्या अथवा हिपार्कसच्या पद्धतीशीं अगदीं ऐक्य नसलें तरी साम्य आहे, इत्यादि गोष्टींवरून ग्रींकापासून हिंदूंस सूचना मिळाल्या याविषयीं संशय राहत नाहीं.”

व्हि ट ने.- आतां व्हिटने याचें मत काय आहे तें पाहूं. त्यानें प्रथमतः ग्रीक व हिंदू ज्यातेषांतील ग्रहस्पष्टगतिस्थिति प्रमेयांची तुलना करून दोहोंत अनेक प्रकारें साम्य असल्याचें दाखविलें आहे. पुढें तो म्हणतो कीं, सूर्यसिद्धांतास बीजसंस्कार कल्पिला त्यांत मुसुलमानी ज्योतिषाचा कांहीं तरी संबंध असावा. कारण असें फेरफार हिंदूंनीं स्वतंत्रपणें करण्याजोगे त्यांचे वेध किंवा त्यांजवरून निघणारीं अनुमानें होतीं हें अद्यापि सिद्ध होणें आहे. यानंतर हिंदू ज्योतिषाच्या मूळासंबंधानें तो लिहितो. “आमचें मत असें आहे कीं, ख्रिस्ती शकाच्या आरंभानंतर लवकरच हिंदू ज्योतिःशास्त्र हें ग्रीक ज्योतिःशास्त्रापासून उत्पन्न झालें आणि इसवी सनाच्या पांचव्या आणि सहाव्या शतकांमध्यें तें पूर्णतेस आलें. याला प्रमाण प्रतिवृत्तपद्धति दोहोंत सारखीच आहे. हीं  प्रतिवृत्तें कांहींअंशीं नैसर्गिक आहेत हें खरें असलें तरी या पद्धतींत इतका पुष्कळ भाग कृत्रिम आणि मनःकल्पित आहे कीं, दोन्ही राष्ट्रांनीं स्वतंत्रपणें ही एकाच प्रकारची पद्धति शोधून काढिली, हळू हळू सुधारली आणि टालमीनें ती पूर्ण स्वरूपानें ग्रथित केली असें मानण्यास प्रमाणें आहेत. खाल्डियन, इजिप्शियन यांपासून यांपासून काय घेतलें हें ते स्पष्ट सांगतात. प्रतिवृत्तकल्पनेचें मूळ, तिचे आधारभूत वेध आणि तिला सिद्धांतरूप देण्याची संयोगीकरणपृथक्करणपद्धति, हीं सर्व ग्रीक ग्रंथांत दिसून येतात. हिंदुपद्धति पहावी तों तिला वेध नको, कांहीं नको. ती एकदम साक्षात् ईश्वरापासून पूर्णत्वानें आली. गति इत्यादिकांच्या संख्या दोहोंच्या बर्‍याच मिळतात या गोष्टीस आम्ही महत्त्व देत नाहीं. कारण दोन राष्ट्रें सत्याच्या शोधास लागलीं तर त्यांचा निसर्गाशीं व परस्परांशीं बहुतांशीं मेळ पडेल हें संभवनीय आहे.” याखेरीज मेषादि राशी केवळ आकाशाच्या क्षेत्रबोधक म्हणून घेणें व नांवांस कमी महत्त्व देणें, वारांचा उदय आणि कांहीं सिद्धांत रोमकनगर (रोम) येथें ईश्वरापासून मिळाले अशा दंतकथा, यवन, यवनाचार्य यांचा उल्लेख, केंद्र, लिप्ता इत्यादि शब्द, त्यानें आणखी प्रमाणांदाखल दिले आहेत. हें ज्योतिःशास्त्राचें ज्ञान रोमच्या व्यापाराचें बंदर जें अलेक्झांड्रीया तें व पश्चिमहिंदुस्थान यांचा समुद्रमार्गें इसवी सनाच्या आरंभींच्या शतकांत व्यापार चालत असे त्याबरोबर टालमीच्या पूर्वींच ज्योतिषपद्धतीच्या मूळरूपानें आलें व त्याला सांप्रतचें स्वरूप ख्रिस्ती शकाच्या पांचव्या आणि सहाव्या शतकांत आलें. असें व्हिटनेचें मत आहे. मध्यंतरी जे फेरफार झाले त्यांत फार उपयोगी आणि महत्त्वाचा असा फेरफार म्हणजे ज्या यांच्या जागीं अर्धज्या यांचा उपयोग हा होय. तसेंच रेखागणिताबद्दल अंकगणिताचा उपयोग होऊं लागला हेंहि ध्यानांत ठेवण्यासारखें आहे.

ब र्जे स. - आतां आपण बर्जेसच्या मताकडे वळूं. बर्जेस हा अनेक वर्षें हिंदुस्थानांत राहिलेला असून त्याला येथील आचार विचारांची माहिती होती. व्हिटने अमेरिकेंत राहिलेला व त्याचें या बाबतींत पूर्ण अज्ञान. तेव्हां व्हिटनेपेक्षां बर्जेस हा या विषयावर मत देण्यास ज्यास्त अधिकारी हें उघड आहे. याचीं बहुतेक मतें व्हिटनेच्या विरुद्ध आहेत. तो म्हणतो, “हिंदूंनीं ज्योतिषगणित आणि जातक हें ग्रीकांपासून जसेंच्या तसें घेतलें आणि एतद्विषयक कांहीं गोष्टी अरबी, खाल्डियन, चिनी यांपासून घेतल्या असें व्हिटनेचें मत दिसतें. मला वाटतें तो हिंदूंस न्याय्य मान देत नाहीं आणि ग्रीकांस वाजवीपेक्षां जास्त मान देतो. ग्रीकांनीं पुढें त्या शास्त्रांत जास्त सुधारणा केली हें खरें. तथापि मूलतत्त्वें आणि त्यांची बरेच अंशीं मरामत हीं हिंदूंचीं आहेत; आणि हिंदूंपासून तें शास्त्र ग्रीकांनीं घेतलें असें मला खात्रीनें वाटतें. याबद्दल निरनिराळे मुद्दें पाहूं. (१) क्रांतिवृत्ताचे २७ किंवा २८ विभाग ही पद्धति कमजास्त फरकानें हिंदु, अरब आणि चिनी यांची सारखीच आहे. (२) क्रांतिवृत्ताचे १२ विभाग व त्यांचीं नांवें याविषयीं पाहिलें तर नांवें हिंदु व ग्रीक या दोहों पद्धतींत सारख्याच अर्थाचीं आहेत. विभागकल्पना आणि नांवें यांचें मूळ एकच आहे, हें मत खरें आहे. (३) ग्रहाची गति आणि स्पष्टस्थिति हीं काढण्याची प्रतिवृत्तपद्धति दोहोंची सारखीच आहे; निदान त्यांचें इतकें साम्य आहे कीं, प्रत्येक राष्ट्रानें स्वतंत्रपणें ती शोधून काढणें संभवत नाहीं. (४) हिंदू, ग्रीक आणि अरब यांच्या जातकपद्धतींत साम्य आहे. किंबहुना कांहीं भागांत एकसारखेपणा आहे. यावरून मूलतत्त्वासंबंधें त्यांची उत्पत्ति एकच असली पाहिजे. (५) प्राचीन लोकांस माहीत असलेलीं पांच ग्रहांचीं नांवें व त्यांवरून स्थापिलेली वारपद्धति. या पांच गोष्टींबद्दल बर्जेस यानें आपला अभिप्राय पुढीलप्रमाणें दिला आहे.

“(१) क्रांतिवृत्ताच्या सत्तावीस किंवा अठ्ठावीस विभागाची पद्धति तिच्या विस्तृत रूपानेंहि हिंदू लोकांत फार प्राचीन आहे;  आणि इतर राष्ट्रांच्या संबंधानें अशा प्रमाणांचा अभाव अथवा अत्यल्पता आहे. यावरून या पद्धतीची उत्पत्ति शुद्ध हिंदू आहे असें माझें निःसंशय मत आहे व बायो याच्या विरुद्ध अभिप्रायानेंहि तें पालटत नाहीं. (२) क्रांतिवृत्ताच्या बारा भागांचा उपयोग आणि त्यांचीं नांवें हीं कोणत्याहि देशांत जितक्या प्राचीन काळापासून आहेत तितक्या प्राचीन काळापासून हिंदुस्थानांत आहेत असें सिद्ध करितां येईल व इतरांस ठाऊक होण्याच्या पूर्वीं पुष्कळ शतकें ही विभागपद्धति हिंदूंस माहीत होती अशींहि प्रमाणें आहेत. मात्र तीं इतकीं स्पष्ट व खात्रीचीं नाहींत. याविषयीं आयडलर व लिप्सियन यांचेहि असेच अभिप्राय आहेत. (३) प्रतिवृत्ताचें प्रमेय ग्रीक व हिंदु या दोन राष्ट्रांत भिन्न रीतीनें सुधारत गेलें आहे. यावरून या राष्ट्रांस एकमेकांपासून फार तर सूचना मिळाल्या असतील, व त्या हिंदूंनां ग्रीकांपासून मिळण्यापेक्षां ग्रीकांसच हिंदूंपासून मिळाल्या असाव्या असें म्हणण्यास जास्त आधार आहे. (४) जातकाची कल्पना आणि सुधारणआ यासंबंधीं हिंदु आणि खाल्डियन यांच्यामध्यें वाद आहे आणि त्यांत हिंदुंस अनुकूल अशींच प्रमाणें एकंदरींत पाहतां अधिक आढळून येतात. (५) हिरोडोटस म्हणतो, ‘देवांचीं नांवें इजिप्‍त देशांतून ग्रीस देशांत गेलीं’. यांत देव शब्दानें ग्रह समजावयाचे आहेत. यावरून नांवाविषयींची स्वतः ग्रीकांची समजूत दिसून येईल. ग्रहांची नांवें वारांस प्रथम कोणीं दिलीं हें निश्च.नें ठरविणें अशक्य आहे. याविषयीं प्रो. एच्. एच्. विल्सन म्हणतो, हि पद्धति ग्रीकांस माहित नव्हती आणि रोमन लोकांनींहि बर्‍याच अर्वाचीन काळापर्यंत ती स्वीकारली नव्हती. ही इजिप्, आणि बाबिलोन येथील लोकांची असें सामान्यतः म्हणतात, परंतु यास पुरता आधार नसल्यानें ही मूळ कल्पिल्याचा मान इतर लोकांस जितका आहे तितकाच हिंदूंसहि आहे.’

“ज्योतिःशास्त्राचे मूळ कल्पक आपण असें अरब लोक म्हणत नाहीं, त्यांस ग्रीक ज्योतिषाचें ज्ञान होण्यापूर्वीं ते हिंदु ज्योतिषांत अगदीं रंगून गेले होते. नंतर टालमीच्या सिंटाक्सिस पुस्तकाचें भाषांतर अरबांनीं केलें आणि अरबीच्या लॅटिन भाषांतरावरून तें यूरोपांत माहित झालें. या लॅटिन भाषांतरांत राहूला ‘नोडस कॅपिटिअस’ (मस्तक-पात) आणि केतूला ‘नोडस काडी’(पुच्छ-पात) म्हटलें आहे. यावरून व इतर प्रमाणांवरून हिंदू ज्योतिषांचें वर्चस्व अरब लोकांवर किती होते हें दिसून येतें. यावरून क्रांतिवृत्ताच्या २७ भागांचे मूळ कल्पक अरब होते असें म्हणतां येत नाहीं. त्याप्रमाणेंच अयनचलनाचें वर्षमान, पृथ्वीच्या संबंधानें सूर्य आणि चंद्र यांचें आकारमान, सूर्याचें परमफल इत्यादि महत्त्वाच्या गोष्टींत ग्रीकांपेक्षां हिंदूंचीं मानें जास्त शुद्ध आहेत. आणि हिंदूंचे भगणकालहि फार शुद्ध आहेत. हिंदू आणि ग्रीक यांनीं एकमेकांपासून घेतलें असें फार थोडें आहे, हें अगदीं उघड आहे आणि एकापासून दुसर्‍यास मिळण्याचा ओघ कोलब्रूक मानतो त्याहून निराळा म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेस असण्यापेक्षां पूर्वेकडून पश्चिमेकडे आहे असें मला वाटतें. ज्याप्रमाणें कोलब्रुक तत्त्वशास्त्रें व धर्म या बाबतींत हिंदू हे ग्रीकांचे शिष्य नव्हते तर शिक्षक होते असें म्हणतो त्याप्रमाणेंच ज्योतिषशास्त्राविषयीं मी म्हणतों.”

थि बो. - पंचसिद्धांतिकेच्या उपोद्धातांत बर्‍याच ऊहापोहानंतर डॉ. थिबो लिहितो कीं, “सूर्यसिद्धांतासारखे ग्रंथ मुख्यतः ग्रीक ज्योतिषग्रंथांचे अनुयायी आहेत. तरी, पुष्कळ गोष्टींत त्यांत स्वतंत्र कल्पना आणि शोध आहेत आणि ते जरी पुष्कळ गोष्टींत मूळ ग्रीक ग्रंथांहून कमी योग्यतेचे आहेत तरी कोठें कोठें त्यांत नव्या रीती आणि युक्ती आहेत, त्यांत चातुर्य आणि कल्पना दिसून येते हें निर्विवाद आहे. उत्तम हिंदी ग्रंथांतील पद्धति केवळ ग्रीकांपासून घेतलेली जशीच्या तशी आहे अथवा तिला सर्वस्वी धरून आहे असें नाहीं तर तींत मिश्रण आहे आणि जास्त सुधारणा आहेत; आणि या दृष्टीनेंच पाहिलें तर कल्पकत्वाचा मान सूर्यसिद्धान्तकारास दिला पाहिजे.”