प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ११ वें.
बाह्यांचा हिंदुस्थानावर परिणाम.

लासेनची वेबरवर टीका. {kosh Prof. Lassen on Weber’s dissertation on the Ramayan, Trnslated from Indische Alterthumskunde, Vol. II pp. 502 ff. by J. Muir. Indian Antiquary Vol. (1874)pp.12-103..}*{/kosh} - वेबर याच्या निबंधांतील महत्त्वाचे सिद्धांत लासेन येणेंप्रमाणें मांडतोः (१) रामायणाच्या कथानकाचें अतिप्राचीन स्वरूप दशरथजातक या बौद्ध ग्रंथांत पहावयास सांपडतें, (२) रामायणामध्यें आर्य हिंदी लोक व मूळचे रहिवाशी यांच्यांमधील झगड्याचें काव्यरूपांत वर्णन केलें नसून त्यांत ब्राह्मण व बौद्ध यांच्या आपसांतील वैमनस्याचें चित्र रेखाटलें आहे, (३) कृषिकर्माचा आद्यप्रवर्तक पौराणिक बलराम व रामायणाच्या कथानकांतील राम हे दोघेहि एकच आहेत व सीता ही नांगराच्या तासाची देवाता आहे, (४) रावणाकडून सीतेचें हरण व द्वितीय रामानें जेष्ठरामाचा केलेला पराजय या कथाभागांवरून हिंदी लोकांचा होमरच्या काव्याशीं परिचय होता असें ध्वनित होतें, आणि (५) या काव्यास हल्लींचें स्वरूप ख्रिस्ती शकाच्या तिसर्‍या शतकापूर्वीं प्राप्‍त झालें नसावें. आणि यांवर तो म्हणतोः (१) वेबरच्या पहिल्या मुद्दयासंबंधानें एवढें कबूल केलें पाहिजे कीं, रामायणाचें कथानक आज ज्या निरनिराळ्या स्वरूपांत उपलब्ध आहे त्यामध्यें, ‘राम आपला बंधु व सीतानामक भगिनी यांच्या समवेत हिमवत् पर्वताकडे अरण्यवासास गेला’ असें ज्या बौद्ध गोष्टींत वर्णिलें आहे तिला अतिप्राचीनत्व दिलें पाहिजे. परंतु या गोष्टीच्या मुळाशीं ब्राम्हणप्रणीत रामाच्या कथानकाविषयीं बौद्धांची गैरसमजूत असावी, किंवा त्यांनीं मुद्दाम मूळ गोष्टीस वेडेंविद्रें स्वरूप दिलें असलें पाहिजे; कारण सुखदुःखाचे वांटेकरी होणें व संकटसमयीं साथ देणें हें पत्‍नीचें कर्तव्यकर्म आहे असें इतरत्र मानलें गेलें आहे.

जर पुढेंमागें या बौद्ध गोष्टींत रामायणांतील कवितांचा कांहीं मागमूस सांपडला तर या तर्कास निश्चयात्मक स्वरूप येईल. (२) दुसर्‍या मुद्दयासंबंधीं एवढी गोष्ट लक्ष्यांत ठेवली पाहिजे कीं, बौद्धांविषयीं सर्व रामायणांत फक्त एकाच ठिकाणीं उल्लेख आलेला आहे. तेथें एका नास्तिकास त्याच्या निंद्य आचारामुळें तुच्छतेनें वागविलें असें वर्णन आहे. पण या ठिकाणीं देखील हा नास्तिक म्हणजे बौद्धच असला पाहिजे असें निश्चयात्मक सांगतां येत नाहीं. कदाचित् तो शब्द तेथें एखाद्या चार्वकाला उद्देशून वापरला असेल. शिवाय तो भाग प्रक्षिप्‍त असल्यामुळें त्याला फारसें महत्त्व देतां येत नाहीं. या प्रश्नाचा निर्णय करितांना दुसरीहि एक गोष्ट विचारांत घेतली पाहिजे ती ही कीं, दक्षिणेकडील मोठमोठ्या मुलखांवर त्या कालीं ब्राह्मणी आचारविचारांच्याच राजांची सत्ता असल्यामुळें, बौद्धानीं ब्राह्मणांवर हल्ला केला असेल तर तो सिंहरद्वीपाकडूच झाला असला पाहिजे. परंतु दुसर्‍या अशोकाच्या वेळेपासून सिंहलद्वीपाचा जो विश्वसनीय इतिहास लिहून ठेवला गेला आहे त्यांत सिंहली राजे व हिंदुस्थानच्या दक्षिण किनार्‍यावरील राजे यांच्यामधील लढ्यांचींच फक्त वर्णनें आहेत. असो. (३) ब्राह्मणांनीं दुसरा राम (दाशरथी) व तिसरा राम (बलराम) यांजमध्यें केव्हांच घोटाळा केला नसल्यामुळें, व दुसर्‍या कृषिदेवता मानावयासहि कांहीं आधार नसल्याकारणानें वेबर याचा तिसरा सिद्धांतहि फोल ठरतो. मागाहून जरी पहिल्या (जेष्ठ) रामाची अवतारांत गणना होऊं लागली, तरी ज्या ऐतरेय ब्राह्मणांत त्याचा इतिहास दिला आहे त्यांत विष्णूच्या अवतारांचा कोणत्याहि प्रकारचा उल्लेख आलेला नाहीं, व म्हणून या रामाच्या ऐतिहासीक खरेपणाविषयीं शंका घेणें अशक्य आहे. याच कारणामुळें दाशरथी राम देखील ऐतिहासिक पुरुष होता असें प्रो. लासेन मानतो, व तो देवाच्या पदवीस जाऊन पोहोंचल्यावरच त्यास सीतेशीं संबंध जोडण्यांत आला असें त्याचें म्हणणें आहे. सीतेच्या नांवावरूनच ती पुढें पृथ्वीची कन्या-नांगराच्या तासाची देवता-समजली जाऊं लागली.(४) सीता-हरणाची व लंकेंतील युद्धाची अशा दोन्हीही रामायणांतील कल्पना, हेलेनचें पळून जाणें व ट्रोजनयुद्ध या कथाभागांपासून घेतल्या आहेत असें विधान करण्यांत वेबर यानें वस्तुस्थितीचा विपर्यास केला आहे. तो असें धरून चालतो कीं हिंदी लोकांचा होमरच्या काव्याशीं परिचय झालेला होता; परंतु तसें मानावयास त्याच्यापाशीं कांहींच आधार नाहीं. धनुष्य हें ज्यांचें एक मुख्य आयुध आहे अशा लोकांमध्यें धनुर्विद्येंतील आपल्या नैपुण्यामुळें प्रतिस्पर्ध्याचा पराजय करणार्‍या नायकाविषयीं गोष्टी रचल्या जाव्या हें अगदी नैसर्गिक आहे. अशा प्रकारें जर आपण तुलना करूं लागलो तर, अर्जुनानें द्रौपदीच्या पाणिग्रहणप्रसंगीं धनुर्विद्येंतील आपल्या नैपुण्यामुळें प्रतिस्पर्धी राजांचा पराभव केला या कथाभागाच्या मुळाशीं देखील होमरचें काव्यच होतें असें म्हणावें लागेल. सीताहरण हा रामायणाच्या कथानकांतील महत्त्वाचा भाग आहे. उलटपक्षीं, होमरनें केवळ युद्धाचें कारण देण्याकरितां हेलेनच्या पातिव्रत्यभंगाचा उल्लेख केला आहे; तो त्याच्या कथानकांतील मुख्य विषय नाहीं. म्हणून या दोन राष्ट्रांत प्रचलित असलेल्या गोष्टींची एकमेकींशी तुलना करणें केव्हांहि बरोबर होणार नाहीं. (५) आतां शेवटच्या मुद्याविषयीं म्हणाल तर रामायणांतील ज्योतिषविषयक माहितीस पुरावा या दृष्टीनें कांहींच महत्त्व देतां येत नाहीं. प्रो. लासेनच्या मतें हिंदू लोकांनीं आपलें राशीसंबंधींचें ज्ञान ग्रीक लोकांपासून घेतले नसून, तें त्यांनीं खाल़्डियन लोकांपासून संपादन केलें होतें. उत्तरेकडील प्रदेशांत यवनांचीं व शकांची बलाढ्य राष्ट्रें होतीं याविषयीं जो रामायणांत उल्लेख आला आहे त्यापासून खरें म्हटलें असतां आपणांस इतकेंच अनुमान काढतां येईल कीं हिंदू लोकांनां ग्रीक व शक लोकांची माहिती होती. त्यांनीं त्या भागांत आपली सत्ता प्रस्थापित केली होती असेंच कांहीं म्हणतां येणार नाहीं. काश्मीरच्या दामोदर राजानें रामायणाची कथा आपल्या समोर वाचवून घेतली असें जें राजतरंगिणींत (१.१९९) म्हटलें आहे ती गोष्ट प्रो. लासेन खरी मानतो. परंतु  सध्यां उपलब्ध असलेलें रामायण-काव्य त्यापूर्वीं केव्हां रचलें गेलें होतें, हें ठरविणें बहुधा अशक्य कोटींतीलच गोष्ट आहे असें त्याचें मत आहे.