प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ११ वें.
बाह्यांचा हिंदुस्थानावर परिणाम.

समाजांत परकीय रक्ताचा प्रवेश.- आपल्या रक्ताच्य शुद्धतेविषयीं तीव्र अभिमान बाळगणार्‍या हिंदूंनीं हेंहि लक्षांत ठेवलें पाहिजे कीं, परक्या देशांतून सुरेख स्त्रिया खरेदी करून आणून आपल्याकडे दासी म्हणून ठेवण्याच्या परिपाठास भारतीयांनीं उत्तेजन दिलें. {kosh Periplus of the Aerthrian Sea. Indian Antiquary Vol. VIII मधील लेखांत प्राचीन काळीं हिंदु स्थानांतून निर्गत होणार्‍या व बाहेरून येथें येणार्‍या मालाची यादी खालीलप्रमाणें दिली आहेः}*{/kosh} {kosh निर्गत माल - (१) गुलाम बायका. (२) तूप. (३) चिनी कातडीं (केंस असलेलीं). (४) हस्तिदंत. (५) शिंगें. (६) लाख. (७) रेशीम दोरा. (८) गुग्गुळ. (९) तेंदू (एबोनी). (१०) तिळाचें तेल. (११) नीळ. (१२) डिकेमाली. (१३) कापूस. (१४) साखर. (१५) दालचिनी. (१६) जटामांसी अ० नलद. (१७) कुष्ठ अथवा पुष्करमूळ. (१८) रुझट (Ruzot). (१९) कुटज अथवा करचाला. (२०) मलमल. (२१) तांदूळ. (२२) मिरीं. (२३) चंदन. (२४) लोखंड, पोलादी तरवारी. (२५) माणीक (Carbuncles). (२६) हिरे. (२७) गोमेद (Onyx). (२८) चिनी मातीसारख्या मातीचीं भांडीं. (२९) नीलमणि.(३०) हिआसिंथ (Hyackinth). (३१) खांद्यावरून घालण्याचे पट्टे व कमरपट्टे.}*{/kosh} {kosh आयात माल. - (१) सुरेख मुली (बरगुझा म्हणजे भडोच येथें आणीत. (२) गुलाम (बरगुडा म्हणजे भडोच येथें आणीत). (३) चिनी कापूस. (४) प्रवाळ (५) मोतीं. (६) शुक्ति (शिंपले). (७) कांसवाची पाठ. (८) श्रीवास. (९) विड्याचीं पानें. (१०) Melilot, Honey lotus. (११) बोळ. (१२) नारिकेळ (नारळ).  (१३) मलमल. (१४) दारु. (१५) कच्चीं द्राक्षें. (१६) Sandarake (चंद्रस धूप). (१७) शिलारस. (१८) खारका. (१९) चांदीचीं भांडीं. (२०) सोमल. (२१) रोमन नाणें दिनारी किं ८ १/२ पेन्स (याची भडोच येथील नाण्यांशीं अदालाबदल होत असे.) (२२) कथील. (२३) शिसें. (२४) पितळर्‍याचा नाण्याकडेहि उपयोग होत असे. (२५) सुर्मा. (२६) तांबें व तांब्याचीं भांडीं. (२७) सोनें. (२८) कल्याण नांवाचा खडा. (२९) संगमरवरी दगड. (३०) चिनी मातीसारखी माती. (३१) कांच. (३२) पुष्पराग. (३३) निरनिराळ्या तर्‍हेचे पुरुषांचे व बायकांचे कपडे. (३४) फुलें काढलेले अगर कांठाचे कमरपट्टे. (३५) फुलें काढलेल कपडे. (३६) मर्ति इत्यादि कारागिरीचे पदार्थ. (३७) वाद्यें}*{/kosh} हि गोष्ट बाहेरचा पुरावा भरभक्कम असल्यामुळें हिंदुस्थानांतील ग्रंथकारांनीं लक्षिली नसली तरी बाहेर पडणारच. आपल्या ग्रंथांत पूर्णपणें आपल्या ग्रंथकारांस ही गोष्ट लपवितां आली नाहीं हें संस्कृत नाटकांतील राजासन्निध असलेल्या यवनींवरून दिसून येतें. हिंदुस्थानांतील कच्चा माल तसाच कलाकौशल्याचा माल बाहेरदेशीं विक्रयास जाई, आणि हिंदुस्थानांत उलट विकावयास ज्या कित्येक गोष्टी येत असत त्यांत परदेशाच्या स्त्रिया येथें आणून विकावयाचाहि परिपाठ असे. बाहेर देशांचा किंवा राष्ट्रांचा आपल्यावर जो परिणाम झाला तो केवळ सांस्कृतिक आणि राजकीय विकृतींसच कारण झाला नसून या परकीय स्त्रियांच्या द्वारा जातिविकृतीसहि कारण झाला हें लक्षांत ठेवलें पाहिजे.