प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ११ वें.
बाह्यांचा हिंदुस्थानावर परिणाम.

रामायणरचनेचा काल - आपणाला प्रथम ग्रीक ग्रंथकार ट्राजन याच्या कालीं होऊन गेलेला डायो क्रिसोस्टोम आणि नंतर एलियन यांच्या ग्रंथांत आर्यवर्तामध्यें होमरच्या काव्याचें भाषांतर असल्याबद्दलचा उल्लेख आढळून येतो. हें म्हणणें जरी शब्दशः खरें धरलें नाहीं तरी यावरून इतकें अनुमान निघतें कीं या कालाच्या सुमारास ग्रीस आणि आर्यवर्त या दोन देशांमध्यें होमरच्या काव्याप्रमाणें दोन महाकाव्यें प्रचलित होतीं. त्याप्रमाणेंच डायो क्रिसोस्टोम यानें म्हटलें आहे कीं आर्यवर्तांतील लोकांस प्रायमचा शोक, अँड्रोमॅकि आणि हेकबे यांचा विलाप, आणि  अचिलिस व हेक्टर यांचें शौर्य यांची कल्पना होती. यावरून महाभारत व रामायण- विशेषतः महाभारत- या ग्रंथांवर ग्रीक काव्यांची छाप होती असें अनुमान निघतें. परंतु लंकेवरील स्वारी आणि त्या शहाराचा वेढा यांचें ट्रॉयवरील स्वारी आणि त्याचा वेढा यांच्याशीं जितकें साम्य दिसतें तितकें साम्य कुरूक्षेत्राच्या मैदानावर झालेल्या भारती युद्धांत दिसून येत नाहीं. उलट डायो क्रिसोस्टोम हा रामायणांतील सीतेचें हरण हें जें मूळ युद्धाचें कारण व नंतर झालेली लंकेवरील स्वारी यांचा मुळींच उल्लेख करीत नाहीं. त्यावरून त्याच्या मनांत आर्यावर्तांतील आर्षकाव्य हें रामायण नसून महाभारत असावें असें दिसतें. परंतु याविरुद्ध असेंहि म्हणतां येईल कीं डायो क्रिसोस्टोम हा रामायण म्हणजे होमरचें भाषांतरच समजत असल्यामुळें त्याच्या प्रस्तुत कार्याकरितां त्याचा वेगळा उल्लेख करण्याची गरज त्यास वाटली नाहीं. यावरून त्यास रामायणाची माहिती असण्याचा संभव होता असें अनुमान काढण्यास हरकत नाहीं. परंतु एवढ्यावरून आपल्याला या काव्याच्या कालनिर्णयाबद्दल विशेषसें खात्रीचें असें अनुमान काढतां येत नाहीं.

(डायो क्रिसोस्टोम याचा काल अद्याप नक्की झाला नाहीं. वेबर याच्या मतें तो प्लिनीनंतर झाला असावा. बेनफे याचेंहि तेंच मत आहे. लासेन याच्या मतें मेगास्थिनीस यानें प्रथम रामायणाबद्दल ग्रीस देशांत माहिती आणिली.)

आपण प्रथम या काव्यांतर्गत पुराव्याचा कालनिर्णयार्थ विचार करूं.