प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ११ वें.
बाह्यांचा हिंदुस्थानावर परिणाम.

नाटकांतील कथानक.- हिंदूस्थानांतील जुन्या जुन्या नाटकांवर ग्रीक नाटकांचा परिणाम झालेला अधिक असणार; करिता अशा नाटकांचेंच आपण परिक्षण करूं.

मृच्छकटिक नाटकाच्या धर्तीवर नाटकें लिहिण्याचा प्रयत्‍न त्याच्यानंतरच्या नाटकांत कोणीं केलेला दिसत नाहीं. त्या नाटकांटतल्या कथानकाचें इतर नाटकांमधील कथानकांशीं क्वचितच साम्य आहे. उलटपक्षीं मृच्छकटिकांतील कथानक अगदीं तंतोतंत ग्रीकरोमन आनंदपर्यवसायी नाटकांतल्या सारखें आहे; म्हणजे नायक हा एक श्रेष्ठी आहे व नायिका ही एक वेश्या आहे. अथेन्स शहर त्या वेळीं राजकीय व सामाजिक अवनतावस्थेंत असल्यामुळें वर वर्णिलेली परिस्थिति चांगली लक्षांत येण्यासारखी असून तिची कारणमीमांसाहि बरोबर सांगतां येते; ग्रीकांच्या आनंदपर्यवासायी नाट्यकलेच्या वृद्धींतील ही शेवटली ग्रीकांच्या आनंदपर्यवसायी नाट्यकलेच्या वृद्धींतील ही शेवटली पायरी आहे. भारतेतिहासांत अशा तर्‍हेनें परंपरेची सांखळी जुळवून दाखविण्याचा प्रयत्‍न करणें विफल होईल. सामान्य प्रकारच्या आयुष्यक्रमांतील पात्रें व प्रसंग रंगभूमीवर नाट्यप्रयोगाच्या रूपानें दाखविण्याची कल्पनाच मूळ ग्रीकलोकांपासून घेतलेली आहे. एखाद्या वेश्येला थोड्याफार गंभीर स्वरूपाच्या नाटकांतील नायिका करणें, ही गोष्ट भारतीय समाजस्थितीच्या आधारावर रचलेली असणें शक्य दिसत नाहीं. हें मृच्छकटिक नाटक ग्रीक नाटकांच्या अनुकरणानें केलेलें आहे असें मानलें म्हणजे वरील प्रकारच्या कथानकाबद्दल तितकें आश्चर्य वाटत नाहीं; आणि मग मृच्छकटिकाचा कर्ता शुद्रक राजा होता याबद्दलहि आश्चर्य करण्याचें कारण पडत नाहीं. दुसरी गोष्ट अशी कीं, एका उदार वणिजाच्य प्रेमाला पात्र झाल्यानेंच केवळ उघडउघड वेश्या असलेल्या स्त्रीचा समाजांत दर्जा वाढूं शकतो, ही कल्पनाहि सर्वस्वी ग्रीक लोकांतील आहे. आतां ही गोष्ट खरी आहे कीं, भारतीय वाङ्‌मयामध्यें कथासरित्सागराच्या १२ व्या तरंगांत कांहीं अंशीं अशा प्रकारची  रूपिणिकेची गोष्ट आली आहे. वास्तविक ह्या गोष्टींतील पहिल्या भागाचें मृच्छकटिकाच्या कथानकापेक्षां ग्रीक-रोमन नाटकाशींच अधिक साम्य आहे. म्हणूनच ही गोष्ट, प्रत्यक्षपणें म्हणआ अप्रत्यक्षपणें म्हणा, ग्रीकग्रंथावरून रचलेली असावी, असें नक्की दिसतें. त्या गोष्टींचें सिस्टेलॅरिया (Cistellaria) च्या पहिल्या अंकाशीं असलेलें सादृश्य नुसतें आश्चर्योत्पादकच नव्हे, तर संशोधकांनां तें अनेक दृष्टींनीं फार महत्त्वाचें आहे.

कालिदास, श्रीहर्ष, भवभूति यांच्या ग्रंथांत जागोजाग ग्रीक नमुन्यांवर रचना केलेली आढळते. मालविकाग्निमित्र, रत्‍नावली व नंतरचे विद्धशालभाञ्जिका यांतील कथानकांची तुलना करून पहा, म्हणजे अशी खात्री होईल कीं, यांत जें सादृश्य दिसतें तें क्वचित् ठिकाणीं व सहजगत्या आलेलें नसून अशा तर्‍हेचा प्रकार अनेक नाट्यग्रंथांतून सारखा आढळून येतो.

ग्रीको-रोमन व भारतीय दोन्ही नाट्यग्रंथांतून आढळून येणारी आणखी एक समान गोष्ट म्हटली म्हणजे, लहान डबी, किंवा एखादी अंगठी, अशा प्रकारच्या कांहीं खुणेच्या वस्तूच्या साहाय्यानें शेवटीं ओळख पटणें, ही होय; उदाहरणार्थ, रत्‍नावली, मालविकाग्निमित्र, शाकुंतल, विक्रमोर्वशी, नागानंद.

विदूषक, विट, दासी ह्या प्रकारचीं पात्रे घालण्याची पद्धतहि ग्रीक नाटकांवरून पडली.

बर्‍या वाईट कोणत्याहि मार्गानें द्रव्य मिळवून एखाद्या दासीला दास्यांतून सोडवून न्यावयाची, ही गोष्ट भारतीय व ग्रीक-रोमन नाट्यग्रंथांतून सारखीच आढळते; तसेंच वेश्येच्या अलंकाराच्या डब्याची गोष्ट, मालतीमाधवांतील माळेची गोष्ट, पुनर्मिलन घडवून आणणारें कारण, या अनेक बाबतींतहि दोहोंमध्यें फार साम्य दिसून येतें.

मृच्छकटिक नाटकांत प्रत्यक्ष रंगभूमीवर खुनाचा प्रयत्‍न केल्याचा देखावा आहे. वास्तविक ह्या ठिकाणीं भारतनाट्यशास्त्रांतील नियम मोडलेला आहे. ग्रीक ग्रंथांचें अनुकरण केल्याचें या देखाव्यावरून स्पष्ट दिसतें.

नाटकाच्या कथानकांतील काळासंबंधानेंहि कांहीं साम्य दोहोंत आढळतें; तथापि भारतीय नाटकांत बर्‍याच अधिक मोठ्या काळांतील गोष्टी दाखविण्यांत येत असतात.

पात्रें.-सामान्यतः ग्रीको-रोमन नाटकांतून जितकीं पात्रें असतात तितकींच भारतीय नाटकांतूनं आढळतात. याला अपवाद मृच्छकटिक नाटक. यांत २९ पात्रें आहेत. तसेंच प्रत्येक नाटकांत एक नायक, एक नायिका असावयाची; नायकाचा जो प्रतिस्पर्धी तो त्या प्रणयी युगुलाच्या संमीलनाला अडथळा आणणारा असावयाचा या गोष्टी व नायिकेच्या सख्या, दासी वेश्येची आई मध्यस्थी करणारी वगैरे वगैरे गोष्टी दोहोंकडे सारख्याच दिसतात.

मृच्छकटिकांतील विट, शकार आणि विदूषक हीं तिन्ही पात्रें ग्रीकांच्या पात्रांवरून घेतलेलीं आहेत.

विदूषक हा ब्राह्मण आहे; ग्रीक नाटकांत तो गुलाम असतो. त्या वेळच्या भारतीय सामाजिक स्थितीशीं ग्रीक स्थितीची तुलना करून पाहतां हें सयुक्तिकच दिसतें. हा विदूषक आपल्या मालकाच्या प्रणय-प्रकारणांतच फक्त विश्वासांत घेतलेला असतो.

भारतीय नाटकांतील मुख्य विनोदी पात्र म्हणजे हा विदूषक होय; हा विदूषक म्हणजे ग्रीको-रोमन नाटकांतील बफूनसारखा सर्वस्वीं जरी नसतो तरी बहुतेक तसाच असतो; तो बराच ग्रीक लोकांतील गुलामासारखा असतो. शिवाय शकार व विट यांच्या बाबतींतहि दोहोंमध्यें साम्य आहे.


भवभूतीच्या नाटकांत या तीन पात्रांपैकीं कोणीच आढळत नाहीं. यावरून ग्रीक नाट्यकलेचें म्हत्त्व हळूहळू नष्ट होत गेले असें दिसतें. भवभूतीच्या ग्रंथांतूनहि त्यानें ग्रीकनमुन्यावर रचना केली आहे असें स्पष्ट दिसतें. मात्र भवभूतीनें वरील तिन्ही पात्रें गाळलीं आहेत. याचें कारण उघडच आहे तें हें कीं, भारतीय समाजांत असल्या व्यक्तींनां मृच्छकटिकांत दिलें आहे इतकें महत्त्व मुळींच नाहीं.

एकंदरींत भारतीय नाटकांतील बराचसा पात्रवर्ग ग्रीक नमुन्यावर तयार केलेला असे असें अनुमान काढण्यास बरीच जागा आहे.

प्रस्तावना. - हिची पद्धत भारतीय व ग्रीकृ-रोमन नाटकांत सारखीच आहे; भारतीय व रोमन दोहोंतील प्रस्तावना मूळ ग्रीक नमुन्यावरून घेतलेली आहे. (Captatio Benevolentiae) सभापूजा व प्ररोचना हीं दोहोंतहि सारखीं आहेत. भारतीय व ग्रीक दोन्ही प्रस्तावनांच्या शेवटीं पुढें पहिल्या अंकांत जी पात्रें असतील त्यांनां उद्देशून मजकूर असावयाचा असा परिपाठ दिसतो.

सूत्रधार.- सूत्रधार उर्फ स्टेजमॅनेजर हा बहुधा स्वतःहि एक पात्रच असावा. तो नाटकांत येणारें पहिलें पात्र असतो इतकेंच नव्हे, तर सर्व नाटकांत त्याच्याकडे मुख्य काम असतें असें दिसतें; व याप्रमाणें तो ग्रीकांतील ‘प्रोटॅगोनिस्टिस’ प्रमाणें किंवा रोमनलोकांतील ‘डुक्स ग्रेगिस’ सारखा दिसतो. तेव्हां हें साम्यहि केवळ यदृच्छया आलेलें नसून त्यावेळीं ग्रीक नाटकमंडळ्या देशोदेशीं फिरत असत असा जो वर उल्लेख केला आहे त्या गोष्टीचाच हा परिणाम असला पाहिजे.

रंगदेवता, स्थळ, काळ, प्रसंग या बाबतींतहि भारतीय नाट्यप्रयोगांचें ग्रीक नाट्यप्रयोगांशीं कांहींसें साम्य आढळतें. Dionysis Coir म्हणजे भारतीय शिव होय. ग्रीक ‘एलॅफिबोलिओन्’ म्हणजे चैत्र हाच नाट्यप्रयोग करून दाखविण्यास अत्यंत योग्य काळ होय.

या दोन्ही देशांत कोणताहि नवा प्रयोग प्रथम असल्या समारंभप्रसंगीं करीत असत.

ग्रीकनाट्यग्रंथांतील संभाषणें नेहमीं कविताबद्ध असत; भारतीय नाटकांत तीं बहुतेक गद्यांत असतात; व कांहीं पद्यांतहि असतात.

गद्य भाग प्रामुख्यानें असून त्यांत मधूनमधून पद्यें घालावयाचीं ही तर्‍हा सर्वस्वीं भारतीय नाट्यकारांचीच कल्पना होय; परंतु तीहि कदाचित् जेव्हां ग्रीकांचे पद्यमय नाट्यप्रयोग त्यांनीं प्रत्यक्ष अवलोकन केले तेव्हां त्यांवरून त्यांनां सुचलेली असावी. त्यांनां जेव्हां सर्व चा सर्व भाग पद्यांत घालणें अशक्य झालें, तेव्हां भाषणांचे सामान्य व उच्च असे दोन प्रकार करून फक्त उच्च दर्जाचें भाषण पद्यांत घालण्याची पद्धत त्यांनीं पाडली असावी.

तसेंच नाटक हें शक्य तितकें वस्तुस्थितीचें निदर्शक करण्याचा प्रयत्‍न असल्यामुळें सामान्य पात्रांच्या तोंडीं प्राकृत भाषा घालण्याचा नियम पडला. आणि ज्याअर्थीं रोजच्या व्यवहारांतील गोष्टी रंगभूमीवर आणण्याची पद्धत भारतीयांनां ग्रीकलोकांनीं लावून दिली हें खरें आहे, त्याअर्थीं सदरील प्राकृताची योजनाहि ग्रीक कलेचाच परिणाम होय असें म्हणण्यास हरकत नाहीं. एवढें मात्र खरें कीं, आतां ग्रीक ग्रंथांत भारतीयांइतकी मजल या वस्तुस्थितिनितदर्शनाचे बाबतींत मारलेली दिसत नाहीं.