प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ११ वें.
बाह्यांचा हिंदुस्थानावर परिणाम.

ग्रीक नाट्यकलेचा भारतनाट्यकलेवरील परिणाम
या विषयावर इ. विंडिश यानें प्राच्य संशोधकांच्या सार्वराष्ट्रीय पांचव्या परिषदेंत निबंध वाचला त्याचा सारांश येणेप्रमाणेः-

बॅक्ट्रिया, पंजाब व गुजराथ येथील ग्रीक राजांच्या दरबारांत ग्रीक नाटकांचे प्रयोग करण्यांत येत. हे प्रयोग पाहून भारतीयांनां त्यांचें अनुकरण करावेंसें वाटलें, व अशा तर्‍हेनें भारतीय नाट्यकलेचा उगम झाला; नृत्य, गायन व संगीत या कला मात्र त्यापूर्वींच हिंदुस्थानांत अस्तित्वांत होत्या; असें वेबरचें म्हणणें आहे. उलट प्रो. ब्रॉकहॉस म्हणतो कीं, अभिमानी ब्राह्मण जातीच्या लोकांनीं म्लेच्छ लोकांपासून कधींच कोणतीहि गोष्ट उचललेली नाहीं; आणि भारतीय नाट्यकलेचें ग्रीक नाट्यकलेशीं बिलकुल एका बाबतींत सुद्धां साम्य नाहीं.

शेवटीं लासेननें सिद्ध केलेली जी परंपरा तिलाच (पतञ्जलीचें महाभाष्य पहा) दुजोरा देऊन वेबरनें असें म्हटलें आहे कीं, हिंदुस्थानांत नाटकें रचण्याकरतां अत्यंत जुन्या गोष्टी ज्या घेतल्या आहेत त्या म्हणजे देवांच्या व विशेषतः श्रीविष्णूच्या कथा होत. हें जरी खरें असलें तरी भारतीय नाट्यरचनेच्या बाबतींत तिच्यावर ग्रीक नाटकांचा परिणाम झाला होता, असें त्याचें मत आहेच.

अलेक्झांडर दि ग्रेट यानें निरनिराळ्या देशांवर ज्या ज्या वेळीं स्वार्‍या केल्या त्या त्या वेळीं त्यानें आपल्या बरोबर अनेक कलाकुशल लोकहि घेतले होत; आणि जेथें जेथें त्याचे मुक्काम होत तेथें तेथें तो नाटकांचे प्रयोगहि करवीत असे. याप्रमाणें त्या काळी ज्ञात असलेल्या सर्व पृथ्वीवरील देशांत ग्रीक नटांनीं ग्रीक नाटकलेचा फैलाव केला. हे नाट्यप्रयोग विशेषेंकरून राजांच्या दरबारीं होत असत. हिंदुस्थानासंबंधानेंहि असाच प्रकार झाला असावा. आणि त्यामुळें त्यांच्या कलेचा भारतीय कलेवर परिणाम झाला असावा. हा परिणाम झाला तो भारतीय आनंदपर्यवसायी नाटकांवर झालेला आहे, दुःखरपर्यवसायी नाटकांवर नाहीं. तसेंच हा परिणाम निरनिराळ्या देशांतून प्रवास करणार्‍या नाट्यकवींच्या योगानेंहि झालेला आहे. ग्रीक लोकांच्या सत्तेखालीं अलेक्झांड्रिया असतांना त्या शहराचा व्यापारी संबंध हिंदुस्थानच्या पश्चिमकिनार्‍यावरील शहराशीं होता इतकेच नव्हे, तर हिंदुस्थानच्या अंतर्भागांतील एका व्यापारी दळणवळण मार्गानें तो संबंध जुनें राजधानीचें शहर जें उज्जयिनी तेथपर्यंत पोहोंचला होता. मृच्छकटिक नाटकांतील संविधानकाचें स्थळ हेंच उज्जयिनी शहर होय. ग्रीक नाट्यकलेचे परिणाम म्हणून जीं भारतीय नाटकें निर्माण झालीं त्यांचें प्रमुख स्थळ हें उज्जयिनी नगरच होय. याप्रमाणें भारतीयांचा ग्रीक कामेडीशीं (आनंदपर्यवासायी नाटकांशीं) परिचय झाला तो अलेक्झांड्रियाहून बर्यगाझाला (भडोचला) व्यापार करिण्याकरतां जे डायोनिशियन कलाकुशल लोक आले त्यांच्या मार्फत झाला असावा. भारतीय नाट्यकवींवर जो परिणाम झाला तो केवळ ऐकींव गोष्टींनीं झालेला नव्हता तर प्रत्यक्ष ग्रीक नाट्यप्रयोगांच्या प्रेक्षणानें झाला होता.
नवीं ग्रीक आनंदपर्यवसायी नाटकें रोममध्यें लोकांनां ठाऊक झालीं त्याच काळाच्या सुमारास तीं हिंदुस्थानांतहि ठाऊक झालीं असलीं पाहिजेत. तथापि त्यांचा भारतीय नाट्यकलेवर परिणाम प्रत्यक्ष केव्हां झाला तो काळ नक्की सांगतां येत नाहीं. ग्रीक नाट्यकलेचा पश्चिम हिंदुस्थानांत अत्यंत परिणाम झालेला दृष्टीस पडतो तो मिनांडर राजाच्या कारकीर्दीमध्यें होय. लासेनच्या मतें ह्याला आरंभ झाला तो इ. पू. १४४ च्या सुमारास झाला असावा. तें कांहीं असलें तरी हिंदुस्थानाशीं ग्रीक व्यापार पुढें कित्येक शतकें चालू होता, एवढें खरें.

येणेंप्रमाणें भारतीयांनां ग्रीकांचे नाट्यप्रयोग व विशेषतः त्यांचीं आनंदपर्यवसायी नाटकें पहावयास मिळालीं होतीं असें म्हणण्यास केवळ शक्यतेच्यापेक्षां पुष्कळच अधिक पुरावा आहे.

भारतीय नाटकांचें ग्रीको- रोमन आनंदपर्यवसायी नाटकांशीं कांहीं कांहीं बाबतींत जें साम्य आहे तें एकंदरींत इतकें पुष्कळ आहे कीं, एक तर हें साम्य हा केवळ आश्चर्यकारक योगायोग होय असें म्हटलें पाहिजे, किंवा भारतीय नाट्यकलेवर ग्रीक नाट्यकलेचा चांगलाच परिणाम झाला ही गोष्ट मान्य केली पाहिजे.

भारतीय व ग्रीको-रोमन आनंदपर्यवसायी नाटकांत कोणतेंहि नवें पात्र रंगभूमीवर आणण्यापूर्वीं प्रेक्षकांची मनोभूमि त्याच्याबद्दल अगोदरच करून ठेवावयाची, असा साधारण नियम ठरून गेलेला दिसतो.

अपटी (अल्पः पटः) म्हणजे रोमन (Unbaeum) ही नव्हे व हल्लींचा पडदाहि नव्हे. हल्लींच्यासारखे पडदे पूर्वीं हिंदू लोकांत नव्हते व ग्रीक लोकांतहि नव्हते. तेव्हां अपटी म्हणजे रंगभूमीची (बॅकग्राऊंड) पृष्ठभूमि होय; व ती रंगभूमि (Stage) आणि नेपथ्य (पात्रें सजण्याची खोली Actors’ room) यांच्या मध्यें येते. नेपथ्य म्हणजेच ग्रीको-रोमन लोकांतील पोस्ट-सीनीम (Post-Scenium) होय, आणि अपटी म्हणजे ग्रीकलोकांची दारें असलेली चित्रित पृष्ठभूमि (सीन वॉल) होय. त्याच्यापुढें स्टेज म्हणजे रंगभूमि असते. याप्रमाणें सामान्यतः भारतीय नाट्यगृहाची रचना ग्रीको-रोमन पद्धतीशीं जुळती आहे.

ग्रीक ‘स्कीनी’ याला सदृश्य भारतीयांत यवनिका म्हणून आहे. पट, अपटी हे तत्समानार्थींच शब्द आहेत. शिवाय दशरूप १,५५ यांत अन्तर्यवनिकासंस्थैश्चूलिकार्थस्य सूचना इत्यादि उल्लेख आहे. आरंभींचा मजकूर (मंगलाचरण) ‘नेपथ्यपात्रेण’ म्हणजे नेपथ्यामधील माणसानें म्हणावयाचा, असें टीकाकारानें स्पष्ट करून सांगितलें आहे. ‘यवनिका’ याबद्दल जवनिका असें जरी आढळतें, तरी हा केवळ प्राकृतभाषाविशिष्ट प्रकार आहे; कारण जवनपासून जवनिका असा शब्द झाला, असें म्हणणें मुळींच सयुक्तिक दिसत नाहीं. हा शब्द (ग्रीक) यवन शब्दापासून झालेला आहे असें वेबरनें पूर्वींच सिद्ध केलें आहे, आणि विंडिशनेंहि तें ग्राह्य मानलें आहे. ग्रीक लोकांतील (सीनवॉल) चित्रित पृष्ठभूमीसारखी रचना करतांना तिला भारतीयांनीं (ग्रीकवॉल) यवन-भित्ति अथवा यवनिका हा शब्द योजला असावा, ही कल्पना सहज करतां येण्यासारखी आहे.

एका ग्रीक नाटकामध्यें मेडिया ही आपल्या स्वतःच्या घरावर ड्रेगनच्या (असुराच्या) रथामध्यें बसलेली अशी दाखविलेली आहे. भारतीय प्रयोगशालेला अशा प्रकारचा देखावा दाखविण्यास सोयीची अशी खोलीच नसे; किंवा एकापेक्षां अधिक मजले नसत. शाकुंतल नाटकाच्या ७ व्या अंकांत दुष्यंतराजा आकाशरथांत (आकाशयान) बसलेला अशा आकाशांतून खालीं भूमीवर उतरतो, असा देखावा आहे; पण असा देखावा प्रत्यक्ष रंगभूमीवर दाखवीत नसावेत असें वाटतें. पण तशी प्रेक्षकांची समजूत होण्याकरितां दुष्यंतराजा रंगभूमीवर इंद्राच्या रथासह येतो असें दाखवितात.