प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ११ वें.
बाह्यांचा हिंदुस्थानावर परिणाम.

कृषिविषयक रूपक.- वर दिलेल्या दंतकथांशिवाय वाल्मीकीनें दुसर्‍याहि पुष्कळ माहितीचा उपयोग आपल्या काव्यामध्यें केला असला पाहिजे व त्यामुळें तें काव्य जास्त लोकप्रिय झालें असलें पाहिजे. या काव्यांतील राम आणि ब्राह्मणांचा ‘हलभृत् राम’ यांचा संबंध स्पष्टच दिसतो. या रामकाव्याचीं रूपें जीं महाभारत वगैरे ग्रंथांतून दिसतात त्यांमध्यें कांहीं अतिशय जुनीं असून त्यांत रामाचा काल ‘सुवर्णयुग’ असा वर्णन केलेला आढळतो आणि त्यावेळीं जमिनीपासून अतिशय उत्तम पीक निघत असे असें वर्णन केलेलें आढळतें. रामाचा वनवासकाळ हा हिंवाळा असून यावेळीं निसर्ग विश्रांती घेत असतो व शेतकीचीं कामें बंद असतात. सीता हें नांव पौराणिक असून शिवाय वेदामध्यें नांगराचें तास या देवतेबद्दल सीता हा शब्द वापरला आहे. या दोन शब्दांमधील संबंध लक्ष्यांत ठेवण्यासारखा आहे. त्याप्रमाणेंच रामायणामध्यें शेत नांगरीत असतां सीतेची उत्पत्ति झाल्याचें वर्णन व शेवटी भूमीच्या पोटांत तिचें झालेलें अंतर्धान या गोष्टी व तिच्या बहिणीचें नांव उर्मिळा याचा अर्थ धान्याच्या शेतावरील लहरी असा करितां येतो, तसेंच तिचा बाप जनक याचें नांव सीरध्वज {kosh उत्तररामचरित.}*{/kosh} (नांगर राजचिन्ह असलेला) असें होतें, या गोष्टीहि लक्ष्यांत घेण्यासारख्या आहेत. गृह्यसूत्रामध्यें इन्द्र अथवा पर्जन्य याच्या अर्धांगीचें जें वर्णन दिलें आहे {kosh Cf. Webber’s Abh. Uber Omina und Portenda pp. 370-373}*{/kosh}  त्यांत थोड्याशा कविकल्पनांची भर घातली असतां आपणांस रामायणांतील सीतेचें वर्णन दिसेल. शिवाय महाभारत आणि शुल्कयजुर्वेदाचीं ब्राह्मणें यांतून उल्लेखिलेल्या विदेहदेशाच्या जनक राजाची सीता ही मुलगी कल्पिल्यामुळें तिला अधिक महत्त्व आलें; आणि यामुळें रामकथेस ब्राह्मणी स्वरूप देण्याच्या कामीं सीतेच्या गोष्टीची बरीच मदत झाली. या गोष्टीमुळें वेबरची जी पूर्वींची कल्पना होती कीं वाल्मीकि हा कोशल राज्याच्या प्रदेशांत जन्मला असावा ती दृढ होते. कोशलदेश हा विदेहदेशाला लागूनच असून ते दोन्ही देश एकमेकांशीं मित्रत्वाच्या नात्यानें असत. दशरथाचा शालक केकयदेशाचा राजा अश्वपति याचाहि उल्लेख शुक्लयजुर्वेदीय ब्राह्मणांमध्यें जनकाचा समकालीन असा आला आहे. यजुर्वेदामध्यें सीता हें नांवहि आढळतें. परंतु त्या ठिकाणीं तें नांव सवितर् म्हणजे प्रजापति याच्या मुलीचें असून तिचें मन चंद्रावर गेलें होतें, परंतु चंद्र हा तिची बहीण श्रद्धा इच्यावर प्रेम करीत होता, पुढें तिच्या बापाच्या खटपटीनें सीता व चन्द्र यांचा विवाह झाला असें वर्णन आहे. {kosh Ramayana III 3. 18.}*{/kosh} या गोष्टीचाहि वाल्मीकीनें आपल्या काव्यांत उपयोग केलेला दिसतो. सीतेच्या बापानें तिला एक हार घातला होता तो मंतरलेला असून त्यामुळेंच तिच्यावर चंद्राचें पुढें प्रेम बसलें, ही जी या दंतकथेंतील मुख्य गोष्ट तिच्यांतील कल्पनेवरूनच अत्रीची पत्‍नी अनुसूया इनें सीतेच्या अंगाला लावलेल्या अंगरागाची कल्पना वाल्मीकीस सुचली असावी. तसेंच राम यास रामचन्द्र {kosh Bhacbhuti महावीरचरित.  III. १8. ॥ Ramtap p. 333.}*{/kosh} किंवा नुसतें चन्द्र॥ असें म्हटलेलें आढळतें. त्याप्रमाणेंच त्याचा स्वभावहि अतिशय शांत दाखविला आहे. त्यावरून रामाची कल्पना मूळ चन्द्र या देवतेवरून घेतली असून या काव्याचें मूळ तैत्तिरीय ब्राह्मणांतील कथानकामध्येंच असेल. रामायणांतील अंगराग आणि तैत्तिरीय ब्राह्मणांतील स्थाकर अलंकार हें नांगरलेल्या जमिनीवर पडलेलें चांदण्यामध्यें चमकणारें दंव असावें हीं कल्पना खरोखरच काव्यमय दिसते व ती खरी असण्याचा संभवहि असता, परंतु राम यास रामचंद्र आणि चंद्र हीं नावें इतकीं उशीरां दिलेलीं आढळतात कीं याच्या उलट अशीच कल्पना अधिक संभवते कीं रामाच्या शांत स्वभावामुळें पुढें त्यास एखाद्या कवीनें चन्द्राची उपमा दिली असावी. परंतु या कल्पनेवरून सुद्धां तैत्तिरीय ब्राह्मणावरून सीतेची कल्पना प्रथम सुचली असावी हें म्हणणें कायमच राहतें.