प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ११ वें.
बाह्यांचा हिंदुस्थानावर परिणाम.

ख्रिस्ती लोकांची वाढ.- ही फारच मोठी दिसते. इ. स. १९०१ च्या सेन्सस रिपोर्टवरून हिंदुस्थान व ब्रह्मदेश यांच्या २९,४३,६१,०५६ लोकसंख्येपैकीं २९,२३,२४१ लोक ख्रिश्चन (नेटीव ख्रिश्चन २६,६४,३१३) होते. १९११ सारीं ख्रिस्त्यांची वाढ सुमारें दहा लक्षांनीं झाली म्हणजे सुमारें एकुणचाळीस लाख ख्रिस्ती होते. हिंदुस्थानांतील १०० ख्रिस्त्यांपैकीं ९२ ख्रिस्ती भारतीयच होत. आणि १९११ सालीं दर दहाहजार लोकसंख्येंत १२४ ख्रिस्ती होते. पोर्तुगीज व फ्रेंच हद्दींतील ख्रिस्ती लोक धरल्यास आणखी ३,५०,००० त्यांत मिळवावे लागतील. लोकसंख्येच्या मानानें ही संख्या फार नसली तरी मागील सेन्ससच्या रिपोर्टांतील ख्रिस्ती संख्यांशीं तुलना करतां ही प्रगति विशेषच आहे असें म्हणावें लागतें. इ.स.१८७२ त, १५,१७,९९७; १८८१ त, १८,६२,५२५ (२२.७% वाढ); १८९१ त, २२,८४,३८० (२२.६% वाढ); १९०१ त, २९,२३,२४१ (२८%वाढ). इ.स. १८९१ ते १९०१ या दहा वर्षांत हिंदुस्थानांतील एकंदर लोकसंख्या २१/२% नीं वाढली तर ख्रिस्ती लोकसंख्या २८% नीं वाढली हें ध्यानांत ठेवण्याजोगें आहे. ही वाढ हिंदुस्थानांतील प्रत्येक प्रांतात व संस्थानांत झालेली आहे. १९१० सालीं हिंदुस्थानांत एकंदर १२२ प्रचारक मंडळ्यांतून ४६१४ मिशनरी (स्त्रिया धरून), १२७२ हिंदू (ख्रिस्ती) धर्मोपदेशक, व शिक्षक व बायबलप्रचारक स्त्रिया धरून ३४,०९५ इतर देशी कामगार होते. मिशनरी लोकांनां हिंदुस्थान सरकारच्या वरिष्ठ अधिकार्‍याचें व्यक्तिशः व एकंदरीनें चांगलें पाठबळ असतें, ही गोष्ट सांगणें अवश्य आहे.