प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण ११ वें.
बाह्यांचा हिंदुस्थानावर परिणाम.
काव्यांतर्गत पुरावा.- १ हें काव्य मोठें असल्यामुळें एका कवीकडून तें लिहिलें जाणें शक्य नाहीं. हें समग्र लिहून होण्यास कित्येक शतकें लागली असतील व वरचेवर त्यामध्यें भर पडत गेली असेल. प्रत्येक हस्तलिखित प्रतींत निरनिराळा मजकूर आढळून येतो. या काव्याच्या निरनिरळ्या प्रतींत विरोध व कांहीं ठिकाणीं विसंगतपणा दिसून येतो, त्यावरून या काव्यामध्यें निरनिराळ्या लोकांनीं तपासून भर टाकली आहे हें स्पष्ट होतें.
आजपर्यंत ठाऊक असलेल्या प्रतींत व्हीलर यानें एका ‘वायव्य प्रती’ ची भर टाकली आहे. ही प्रत अगदींच अर्वाचीन दिसते आणि या प्रतींत पुष्कळसा मजकूर गाळलेला दिसतो. {kosh Wheeler p. LXXXV 28, 65, 144, 203.}*{/kosh} निरनिराळ्या प्रतींमध्यें मूळ कोणतें व प्रक्षिप्त भाग कोणता हें कळणें फार कठिण आहे. बालकांडांतील विश्वमित्राच्या कथेमध्यें {kosh Chap. 51. 65. Schlegel.}*{/kosh} क्षत्रियाचा ब्राह्मण केल्यामुळें ही कथा फार प्राचीन दिसते. त्याप्रमाणेंच रामानें परशुरामाच्या केलेल्या पराजयाची गोष्ट आहे. {kosh ibid Chap. 84-86.}*{/kosh} या गोष्टी एकंदर ब्राह्मणांच्या मनांविरुद्ध असून सुद्धां कवीनें चातुर्यानें वर्णन करून त्यांची नावड घालविली आहे. या गोष्टी मुख्य कथानकाशीं जरी कदाचित विसंगत दिसल्या तरी सुद्धां त्या मागाहून घूसडून दिल्या असतील असें म्हणणें अशक्य आहे. या गोष्टी सर्व प्रतींत आढळून येतात. परंतु जनक राजाचा पुरोहित शतानन्द यानें सांगितलेली विश्वामित्राची धेनुहरणाची गोष्ट घ्या. या गोष्टींत पल्हव, शक, कांबोज येथील यवन वगैरे लोकांपैकीं-कांबोज, पल्हव, यवन, शक, बर्बर, तुषार, हारीत, किरात याचीं यादी दिली आहे. हे सर्व लोक वसिष्ठ ऋषीच्या आज्ञेनें त्याच्या कामधेनूनें विश्वामित्राच्या सैन्याचा पराजय करण्याकरितां उत्पन्न केले होते. हीं नांवें रामायणामध्यें येणें पल्हव, शक, यवन वगैरे लोक येऊन त्यांनीं भारतीय क्षत्रियांचा ज्या वेळीं पराजय केला त्याच वेळीं शक्य आहे (कारण या गोष्टींत या लोकांनीं विश्वामित्राच्या सैन्याचा पराजय केला). हा काल म्हणजे ग्रीस व बॅक्ट्रियामधील लोक आणि भारतीय शक लोक यांनीं ज्या वेळीं वायव्य प्रांत काबीज केला तो होय.
या वरील गोष्टीस अनुसरूनच पुढें चतुर्थकाण्डांत कांहीं गोष्टी आढळून येतात. सुग्रीवानें सीताशुद्धयर्थ ज्या वेळीं चारी दिशांकडे वानर धाडले त्या वेळीं त्यांनीं पाहिलेल्या निरनिराळ्या देशांचीं व तेथील लोकांची वर्णनें दिलीं आहेत. उदाहरणार्थ, पश्चिमेकडील वानरांनीं पुढील ठिकाणीं शोध केला. यवनांचीं नगरें, पल्हवांचीं घरें, आणि त्याच्या जवळच पंचनद (पंजाब), काश्मीर [पारद, (क) {kosh कंसामध्यें (अ, ब क) अक्षरें दिलीं आहेत तीं निरनिराळ्या हस्तलिखित प्रतींचीं द्योतक आहेत. हीं बर्लिनमधील रॉयल लायब्ररीमध्यें तीन हस्तलिखित प्रती आहेत त्यांस वेबर यानें दिलेलीं नांवें आहेत.}*{/kosh} ], तक्षशिला, शालक, पुष्कलावती, शालव, मणिमंत पर्वत [अरट्ट, कपिश, वाल्हिक (अ,क)], गान्धार देश इ. उत्तरेकडील देशांमध्यें, गान्धार, यवन, शक, ओड्र, पारद [चीन, पौंड्र, मालव, (अ,क)], वाल्हीक, ऋषीक, पौरव, किंकर,(रामथ अ,क,)), चीन, अपर-चीन, [अरम-चीन, (अ,क)] तुखार, वर्वर, कांबोज, [खस ? (क)] दरद आणि हिमवन्त. {kosh IV. 44. १3 &c. Gorr.}*{/kosh} यांपैकीं मुख्य मुख्य नांवें सर्व प्रतींतून आढळतात. हीं नांवें ज्या वेळीं यवन (ग्रीक), पल्हव, पारद, शक वगैरे लोक वायव्य प्रांतांत येऊन राहिले होते व यामुळें कांबोज, वाल्हीक, दरद, गान्धार वगैरे लोकांचे शेजारी झाले होते त्याच वेळीं या ग्रंथांत येणें शक्य आहे. दुसर्या कांडामध्यें एका ठिकाणी {kosh II. 2-10 Gorr.}*{/kosh} यवनांचें राज्य शक लोकांच्या राज्याला लागून होतें असा उल्लेख आहे.
२ दुसरी विचार करण्यासारखी गोष्ट म्हटली म्हणजे रामाची जन्मपत्रिका होय. विशेषतः त्या वेळीं राशींनां दिलेलीं कर्कट आणि मीन हीं नांवें लक्षांत घेण्यासारखीं आहेत. या नांवांवरून श्लेजेल यानें या ग्रंथांचे पुराणत्व प्रस्थापित केलें एवढेंच नव्हें तर त्यानें राशिचक्राचा शोध प्रथम भारतदेशांतच लागला असें ठरविलें. {kosh Z. fur die Kunde des Morgeul I. 354 ff. III. 369 ff.}*{/kosh} परंतु होल्ट्झन याच्या ग्रंथावरून (Urber den Griechischen Ursprung de Indischen Thierkreisco Karlshruhe 1841.) आतां खरी गोष्ट याच्या उलड असल्याबद्दल कोणासच संशय उरलेला नाहीं. हल्ल् प्रचारांत असलेलें राशिचक्र ख्रिस्तपूर्व पहिल्या शतकांत हिंदुस्थानांत आलें असावें, त्याच्या पूर्वीहि नव्हे अथवा त्यानंतरहि नव्हे. आणि हें सर्वसाधादरणपणें प्रचारांत येऊन सर्व लोकांस माहीत असल्याप्रमाणें या गोष्टीचा कवीनें उल्लेख करण्यास कांहीं तरी कालावधि लागलाच असला पाहिजे.
यद्यपि ही जन्मपत्रिका बंगालमधील त्याप्रमाणेंच वरील अ, ब, क वगैरे प्रतींत आढळून येत नाहीं {kosh Vide Kern Vorrende zu Varahmihira’s Brihatsamhita p. 40.}*{/kosh} तरी ती किंचितहि फरक न दिसतां श्रीरामपूर, शलेजेल, आणि मुंबई वगैरे प्रतींत आढळून येते. याशिवाय ग्रंथाच्या इतर भागांत जरी ज्योतिषासंबंधीं उल्लेख आढळतो तरी राशिचक्राबद्दल कोठेंहि उल्लेख आढळत नाहीं. त्यावरून ज्या प्रतींमध्यें राशिचक्र आढळतें त्या प्रतींबद्दल तरी असें अनुमान निघतें कीं मागाहून कोणीतरी ज्योतिष्यानें एवढ्या महत्त्वाच्या गोष्टीबद्दल नक्की माहिती दिली पाहिजे असें समजून ही पत्रिक घुसडून दिली असली पाहिजे. {kosh या ठिकाणीं आपणांस फक्त तर्कानें अनुमान काढावयाचें आहे. यावरून नक्की काळ ठरवितां येत नाहीं (See Weber Abh. uber die Naksh १. 288) बेंटले यानें रामाच्या जन्मपत्रिकेवरून त्याचा जन्मकाल ख्रि. पूं. ९४० वर्षीं असावा आणि रामायणरचनेचा काल इ. स. २९५ असावा असें ठरविलें आहे. (Hindu Astronomy, London १825, p. १4 ff.) गेर्यां (Guerin) यानें रामयणरचनेचा काल इ. स. १०५ हा ठरविला आहे. (Astronomie Indienne p. 238)}*{/kosh}
आपण या पत्रिकेबद्दलची गोष्ट सोडून देऊन इतर जे ज्योतिषासंबंधीं उल्लेख आढळतात त्यांसंबंधानें विचार करूं. रामायणामध्यें नक्षत्रांचीं नांवें असून कांहीं ग्रहांचींहि नांवें आढळतात. {kosh I. 71, 24;72, १3. II 4,20-2१. Schlegel. V. 55,१, 2,73, १5, 56 ff. Gorr.}*{/kosh} या ग्रहांबद्दलची माहिती भारतीय ज्योतिषांस रामायणरचनेचा हल्लीं जो काळ धरतात त्याच्या पुष्कळ मागाहून लागलेली आहे. या ग्रहांचा उल्लेख प्रथमतः याज्ञवल्क्यच्या अथर्वपरिशिष्टामध्यें आढळतो. (I. 294 ff.) {kosh Cf. however मनु I. 24; VIII. 121. See. Ind. Stud. II 240,242. $ Vide Ind. Stud VIII 4१3. X. 3१9. ॥ यांपैकीं ताप्रोबेन हें फार प्राचीन काळीं, पालिसिमुन्दु हें पेरिप्लुसच्या काळीं आणि सलिके अथवा सिएलेदिब हें नांव टॉलेमी व कॉसमास इंडिको प्लयुस्टस यांच्या वेळीं होते.}*{/kosh} तसेंच ज्या श्लोकांमध्यें या ग्रहांचा उल्लेख आढळतो त्या श्लोकांमध्यें मंगळ (Mars) याचा युद्धाशीं, बुध (Mercury) याचा व्यापाराशीं, गुरु (Jupirer) याचा यज्ञविधीशीं वगैरे जे संबंध दाखविले आहेत त्यांवरून भारतीय ज्योतिषांस या ग्रहांचें ज्ञान प्रथम ग्रीक लोकांपासून मिळालें असलें पाहिजे असें दिसतें.$$ कारण मंगळ, बुध, गुरु यांचा संबंध भारतीय कल्पनेप्रमाणें वरील गोष्टींशी जुळत नाहीं.
३ रामायणामध्यें सिलोन बेटास ग्रीक लोकांस ठाऊक असलेलीं जीं नांवें ताम्रपर्णी, सिंहल, पालिसीमन्त॥ यांपैकीं एकहि नांव न देतां सर्व ठिकाणीं लंका हें नांव दिलें आहे.
लंका हें नांव ग्रीक लोकांस माहीत नव्हतें. त्याचा प्रथम उल्लेख (महावंसो सोडून दिल्यास पृ. ४७) अथर्वपरिशिष्ट (कूर्मविभाग-सिंहलोकांची लंकापुरी) यामध्यें आढळतो. नंतर आर्यभट्ट, वराहमिहिर यांच्या ग्रंथांत आढळतो. रामायणामधील भूगोलक्षेत्र महाभारतापेक्षां मोठें आहे. कारण महाभारतामध्यें फक्त कुरुक्षेत्रावरील लढाईचें वर्णन करावयाचें होतें पण रामायणामध्यें लंकेपर्यंतचा प्रदेश आक्रमावयाचा होता. तथापि पुष्कळांचें असें म्हणणें आहे कीं रामायणामध्यें दक्षिणेमधील भूगोलविषयक माहिती फारशी बिनचूक नाहीं; परंतु वायव्यकडील प्रांताबद्दलची माहिती मात्र कवीला बिनचूक होती असें दिसतें. ही गोष्ट वर दिलेल्या विश्वामित्राच्या कथेवरून व भरतास मामाकडून आणावयास धाडलेल्या दूतांचा व भरताचा प्रवास वर्णन केला आहे त्यावरून दिसते. लंकेमधील रावणाचा प्रासादामध्यें हनुमानास वायव्येकडील उमदे घोडे आढळ्याचें वर्णन आहे. {kosh V. 12-36. Lassen Ind. Alt. II. १6}*{/kosh} तसेंच भरतानें अश्वपतीपासून मिळालेले कुत्रे आणले. या कुत्र्यांचें वर्णन ग्रीक लोकांच्या ‘कीकेओइ’ देशाच्या वर्णानांत आढळतें. {kosh Annals of Rajasthan. Vol I. p. ६६३ f.}*{/kosh}
४ रामायणामध्यें संस्कृत हा शब्द कोणत्याहि विशिष्ट अर्थीं वापरलेला दिसत नाहीं. परंतु या कालाच्या सुमारासच हा शब्द देशभाषेहून एका निराळ्या विशिष्ट भाषेचा द्योतक बनत चालला होता.$ त्याप्रमाणेंच यावेळीं साधारणतः प्रचारांत असलेल्या व बर्याच परिणत अवस्थेस पोंचलेल्या वाङ्मयाचा उल्लेख ठिकठिकाणीं आढळतो. यापैकीं कांहीं वाङ्मयास साधारणतः अर्वाचीन नांवें दिलेलीं आढळतात. उदाहरणार्थ, शास्त्र हा शब्द नुसताच एखाद्या ग्रंथाचें नांव असल्याप्रमाणें उल्लेख केलेला आढळतो व कांहीं ठिकाणीं हाच दुसर्या शब्दाच्या शेवटीं जोडलेला आढळतो. वेद, शिक्षादि सहा वेदांगें, सूत्र, भाष्य, कल्पसूत्र, यांशिवाय पुढील नांवें आढळतात; धनुर्वेद, त्याचीं अंगें, उपांगें, उपनिषद्, रहस्य, गंधर्वविद्या, (ज्योतिर्गतिषु निष्णातः) ज्योतिष, लेख्यसंख्या, अर्थशास्त्र, त्याप्रमाणेंच शिल्पादि कला, नाटक, धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, न्यायशास्त्र, तसेंच कांहीं ठिकाणीं जडवादी व नास्तिक [लोकायतिक,॥ आणि नास्तिक§] लोकांच्या मतांचा उल्लेख केलेला आढळतो. कांहीं ठिकाणीं अवतरणें घेतलेलीं दिसतातः-
हस्तिभिर्गीताः श्लोकाः॥ (१) नातेवाइकांमधील वैराबद्दल). कण्डुना गीताश्चिरोद्गाः॥ (२) (साहाय्य मागणार्यांबद्दल). पौराणिगाथा, (३) इमं पुराणं धर्मसंहितम्... ... ऋक्षेण गीतो यः श्लोकः॥. (४)
त्याप्रमाणें धन्वन्तरी याचा उल्लेख वैद्यांचा राजा (१) व सुषेण याचा पिता (२) असा केला आहे. तसेंच जैमिनी (३) कात्यायन (४), जाबालि, मार्कंडेय यांचा अयोध्या येथील मन्त्री म्हणून उल्लेख केला आहे.
या वाङ्मयविषयक उतार्यांवरून (हे गौड प्रतीमधून घेतलेले आहेत) जरी रामायणाचा नक्की काल आपणांस ठरवितां येत नाहीं तरी रामायण हल्लीं समजलें जातें इतकें प्राचीन नाहीं हें ठरविण्यास यांवरून पुष्कळसा आधार मिळतो.
५ रामायणावरून जी परमार्थसाधनाबद्दल ऐतिहासिक माहिती मिळते तीवरून रामायण हें फार प्राचीन होतें असें म्हणण्यास फारसा निश्चित असा आधार मिळत नाहीं.
या ठिकाणीं ही गोष्ट लक्ष्यांत ठेवली पाहिजे कीं या काव्यांत कृष्णाचा अथवा कृष्णपूजेचा कोठेंहि उल्लेख आढळत नाहीं {kosh या ठिकाणीं ही गोष्ट लक्ष्यांत ठेवली पाहिजे कीं, राम व कृष्ण या दोन विष्णूच्या निरनिराळ्या अवतारांचे भक्त निरनिराळ्या संप्रदायांचे असल्यामुळें त्यांच्यामध्यें एकमेकांविषयीं मत्सर असणें संभवनीय असून त्यामुळें रामायणामध्यें कृष्णाचा उल्लेख नसणें संभवनीय आहे. वैष्णव धर्मांतील रामपूजा ही जास्त प्राचीन होती हें खरें, तथापि हा एक निराळा पंथ होण्याचें कारण कदाचित् कृष्णपूजा पूर्वीं प्रचलित होऊन जाणें हेंहि असूं शकेल.}*{/kosh} यावरून वास्तविक रीतीनें हें काव्य आपणांस अतिशय प्राचीन आहे असें अनुमान काढतां येत नाहीं. तसेंच यामध्यें डाकिनी अथवा विद्याधर यांचा उल्लेक नाहीं त्यावरूनहि या ग्रंथाची फारशी प्राचीनता सिद्ध होत नाहीं.
इंद्र, अग्नि, वायु, रुद्र वगैरे वैदिक देवतांचा मात्र वरचेवर उल्लेख असून त्यांनीं कथानकामध्येंहि भाग घेतल्याचा उल्लेख आहे. परंतु त्यांच्या बरोबरीनेंच ब्रह्मा, विष्णु (नारायण), महेश यांचाहि उल्लेख असून कवीच्या मनाची प्रवृत्ति या सर्व देवतांमध्यें विष्णुचें श्रेष्ठत्व स्थापन करण्याकडे असलेली निदान या काव्याचें जें हल्लीं स्वरूप आहे त्यावरून स्पष्ट दिसून येते. या हेतूस पुष्टिकारक अशा शबरी, शरभंग, कबन्ध, विराध वगैरेंच्या दंतकथा आहेत त्या मोनिअर वुइल्यम्सच्या मताप्रमाणें ख्रिस्ती दंतकथांवरून {kosh S’abari indeed recalls the “woman of Samaria”}*{/kosh} घेतलेल्या आहेत, किंवा वेबर याच्या मताप्रमाणें बौद्ध दंतकथांवरून घेतलेल्या {kosh Râm. Tap. Up. p. 276.}*{/kosh} आहेत, हें सध्यां तरी अनिश्चितच आहे. परंतु या दंतकथा मूळांत नसून मागून घातलेल्या आहेत असें म्हणणें बरेंच कठिण आहे.
६ या ग्रंथाची भाषा महाभारतापेक्षां जास्त व्याकरणशुद्ध आहे. त्याप्रमाणेंच या दोन ग्रंथाच्या रचनेमध्येंहि फार फरक दिसून येतो. रामायणाच्या प्रत्येक सर्गाच्या शेवटील श्लोक (सर्व प्रतींमध्यें) काव्याच्या साध्या अनुष्टुप् वृत्तांत नसून निरनिराळ्या वृत्तांतामध्यें राचिलेले आढळतात. यावरून हें काव्य जास्त अलंकारिक व शुद्ध करण्याचा हेतु असावा असें उघड दिसतें; म्हणून रामायणास पुष्कळ ठिकाणीं महाकाव्य म्हटलें आहे. याच गोष्टीला सर्गांची नांवेंहि पण थोडासा आधार देतात.
येथपर्यंत दिलेल्या ग्रंथातर्गत प्रमाणांवरून रामायण हें आर्यावर्तावर ग्रीक संस्कृतीची छाप बसल्यानंतर लिहिलें गेलें असावें अशी कल्पना करणें वावगें होणार नाहीं असें दिसतें. नाहींतर आपणांस या काव्यांतील कांहीं महत्त्वाचा भाग प्रक्षिप्त म्हणून गाळावा लागेल. (त्यांतील ग्रहांचा उल्लेंख आलेला भाग गाळणें बरेंच कठिण जाईल). कारण या भागावरूनच ग्रीक लोकांचा संबंध आढळून येतो. इतर मराठी वाङ्मयामध्यें या काव्याचा जो जो उल्लेख येतो त्यावरून काढलेलीं प्रमाणेंहि वरील अनुमानासच बळकटी आणतात.
राजतरंगिणीमध्यें (१-११६) दामोदर राजास एक दिवसांत सर्व रामायण ऐकण्याचा योग येईपर्यंत सर्पयोनीमध्यें जन्म काढण्याचा शाप मिळाल्याबद्दल गोष्ट आहे. ही जर पुरेशी मानली {kosh Gorresio. Intro-to Vol. I p. xcvii-vii..}*{/kosh} तर यावरून रामायण हें फार जुनें होतें असें सिद्ध होतें. कारण, दामोदर राजा हा ख्रिस्तपूर्व चवदाव्या शतकाच्या आरंभीं होऊन गेला. परंतु राजतरंगिणी हा ग्रंथ इसवी सनाच्या बाराव्या शतकांत (इ. स. ११२५ सु.) {kosh Lassen Ind. Alt. I. 473. II. १8.}*{/kosh} लिहिला गेला हें प्रसिद्ध आहे. तेव्हां केवळ या ग्रंथाच्या रचनेपूर्वीं २४०० वर्षें होऊन गेलेल्या एका राजाच्या शापासंबंधानें या ग्रंथांत वर्णन असून त्यांत रामायणाचा संबंध येतो एवढ्यावरून रामायणाचें पुरातनत्व सिद्ध होतें असें म्हणणें जरा धाडसाचेंच होईल. शिवाय, राजतरंगिणीमधील दामोदर राजाचा ख्रिस्तपूर्व चवदाव्या शतकाशीं कांहींएक संबंध नाहीं. कारण या काव्यांत त्याला अशोकाचा वंशज असें म्हटलें आहे (१-१५३). याच्यामागून गादीवर बसलेल्या राजांची नांवें भारतीय-शक (तुरुष्क) राजे हुष्क, जुष्क, कनिष्क अशींच दिलीं असल्यामुळें हा ग्रीक राज्य नाहींसें झाल्यानंतर ख्रिस्तपूर्व शतकांतच होऊन गेला असावा असें वाटतें.
या बाबतीमध्यें राजतरंगिणी ग्रंथास जरी विशेष महत्त्व दिलें नाहीं तरी रामायणाचा सर्वांत प्राचीन काळ पाहूं गेलें असतां यवन व शक यांच्या राज्यांच्या दरम्यान येतो व या वेळीं तें पूर्ण झालें होतें असें दिसत नाहीं. यवन आणि शक या दोहोंचाहि उल्लेख रामायणांत आढळतो, हें वर सांगितलेंच आहे.