प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ११ वें.
बाह्यांचा हिंदुस्थानावर परिणाम.

विदूषकाचा उगम.- फार प्राचीन संस्कृत नाटकें हल्लीं उपलब्ध नसल्यामुळें विदूषकाचा उगम शोधून काढण्याच्या कामांत बराच अडथळा येतो. वर्तमान नाटकांत शूद्राकचें मृच्छकटिक नाटक अत्यंत जुनें आहे; अगदीं प्रथम नाटकें कशीं लिहीत त्याचा हा एक नमुना आहे. त्यांतील कल्पना व त्याची एकंदर रचनाहि प्रगल्भ स्वरूपाची असल्यामुळें त्या नाटकाच्या पूर्वीं संस्कृत नाटकाच्या इतिहासांत ओबडधोबड नाटकें लिहिण्याचा काल होऊन गेला असावा असें म्हणणें आपणांस भाग पडतें. आज जीं नाटकें उपलब्ध आहेत त्यांतील विदूषकाची कामगिरी लक्षांत घेऊन नंतर आपण भरताचें नाट्यशास्त्र, साहित्यदर्पण वगैरे ग्रंथांत विदूषक बनविण्याविषयीं जे नियम दिले आहेत तिकडे नजर दिल्यास आपणांस ह्या एकाच पात्रासंबंधीच्या कल्पनांमध्यें कसा विरोध व फरक आहे तो समजतो. ह्या विरोधाचा उलगडा होण्यास आपणांस असें अनुमान करावें लागतें कीं, विदूषकाचा उगम राजदरबारांतल्या नाटकांत झालेला नसून हिंदूस्थानांतील निरनिराळ्या जातींतील किंवा वर्णांतील प्राचीन खेळांत झालेला आहे. हे खेळ प्रहसनें असत व त्या कालीं जी लोकांची राहणी असे तिचें प्रतिबिंब प्रहसनांतील पात्रांत दृष्टीस पडे. अधिकारी धर्मोपदेशक ब्राह्मणांबद्दल लोकांनां जो तिरस्कार वाटत असे तो प्रहसनरूपानें उघड करून दाखवीत. लोक विदूषकाला ब्राह्मण करी पण तो फार हलक्या दर्जाचा व तिरस्करणीय क्षद्र मनुष्य असे. अशा रीतीनें ते आपल्या ओबडधोबड व आकाररहित खेळांनां प्रहसनाचें स्वरूप देऊन उच्च वर्गाचा सूड घेत.

कांहीं कालानंतर ब्राह्मणांनीं जेव्हां नाटकाचें काम आपल्या हातांत घेऊन दरबारांत त्याला काव्याचें रूप दिलें व नाटकाची रचना करण्याकरितां जेव्हां नियम तयार करण्यांत आले त्या वेळेस खेड्यापाड्यांतील नाटकांत लोकांमध्यें रूढ झालेलीं जीं पात्रें आढळत त्या सर्वांचा ह्या नाटकांत समावेश करण्यांत येऊं लागला. लोकांच्या मनामध्यें पूर्णपणें ठसलेल्या विदूषकासारख्या पात्राला आपल्या नाटकांत ब्राह्मणांना काट देतां येईना; पण त्याच वेळीं आपल्या वर्गाची तिरस्कारपूर्ण अशी लोकांनीं केलेली निंदा त्यांनां पहावेना. त्यामुळें ब्राह्मणांनीं विदूषकाच्या पात्रांत जो ओंगळ भाग होता त्यांत फरक करून त्या पात्राच्या आंगीं असणार्‍या विनोदाला प्राधान्य दिलें. वर्तमान नाटकांतला विदूषक खुषमस्कर्‍या व गम्मत करणारा असतो ह्याचें कारण हेंच होय. पाणिनीय संस्कृतांत लिहिलेल्या नाटकांतील प्राकृतांत जी मोठी भिन्नता दृष्टोत्पत्तीस येते त्याचेंहि कारण हेंच आहे. नाटकाचे मूळ उत्पादक जर ब्राह्मण असते तर त्यांनीं विदूषक हा निःसंशय ब्राह्मण म्हणून त्याचे मुखांत संस्कृत भाषा घातली असती व दरबारांतल्या श्रोत्यांनां सहज समजणारी अशी अर्थयुक्त व जोरदार भाषा विदूषकानें वापरली असती. परंतु ब्राह्मणांनीं नाटकाचें काम हातीं घेण्यापूर्वीं प्राकृत भाषेंतरील नाटकें प्रिय झालेलीं होतीं; त्यामुळें तीं घेऊनच त्यांत स्वतःच्या उपयोगासाठीं जरूर तेवढी सुधारणा ब्राह्मणांनीं केली. आपणांला जेवढीं म्हणून नाटकें माहीत आहेत त्या सर्वांत विदूषक प्राकृतांत बोलतांना आढळतो ह्याचें हेंच कारण. दुसर्‍या कोठेंहि ब्राह्मण प्राकृतांत बोलता तर ती गोष्ट योग्य मार्गाविरुद्ध झाली असती.

येणेंप्रमाणें पाणिनीच्या कालच्या संस्कृत नाटकांपूर्वीं प्राकृतांत खेड्यापाड्यांत जी नाटकें होत त्यांत विदूषकाचा उगम आपणास आढळण्यासारखा आहे. हें पात्र ब्राह्मण कवीनीं शोधून काढलेलें नाहीं.

विदूषकाचीं उत्तम उदाहरणें हर्षदेवाच्या तीन नाटकांत, विशेषतः त्याच्या नागानन्द नाटकांत आढळतात. हर्षाचा विशेष कल बौद्धधर्माकडे होता; पण इतर धर्मांचा तो द्वेष करीत नसे. प्रियदर्शिका व रत्‍नावली हीं आपलीं दोन नाटकें त्यानें शिवाला अर्पण केलीं आहेत, व म्हणून अर्थातच त्यांनां ब्राह्मणसारस्वताचा संस्कार लागलेला आहे. ह्या दोन नाटकांतील विदूषक गमत्या आहे. नागनन्दांतला विदूषक मात्र भिन्न प्रकारचा आहे. नागानन्दांतील नांदी बुद्धाला उद्देशून लिहिलेली आहे. नागानन्दाच्या तिसर्‍या अंकांत हर्षानें पूर्वींच्या लोकप्रिय नाटकांप्रमाणें ब्राह्मणांची भरपूर निंदा केली आहे. ही निंदा अत्रेय नांवाच्या मूढमति व हीन दर्जाच्या विदूषकाकरवीं करण्यांत आली आहे. इतर प्राचीन नाटककार ब्राह्मण असल्यामुळें त्यांनां ब्राह्मणांची फजिती करितां आली नाहीं; पण या अत्रेय पात्रानें मात्र ब्राह्मणांची खूप निंदा केली आहे.

ही विदूषक या पात्रासंबंधाची गोष्ट झाली. विंडिशनें ज्या अनेक पात्रांच्या ठायीं केवळ सादृश्यावरून यवनमूलकत्व आरोपिलें आहे तींहि निरनिराळ्या संस्कृतींत विदूषकाप्रमाणेंच स्वंयस्फूर्तीनें उत्पन्न होण्यासारखीं आहेत. असो.

विंडिशचीं कांहीं मतें आपण खोडून काढलीं तरी ग्रीक रंगभूनीचा भारतीय रंगभूमीवर परिणाम बराच झाला असेल ही गोष्ट आपणांस नाकारंता यावयाची नाहीं.

वरील परिणामांपेक्षां अधिक महत्त्वाचा परिणाम म्हटला म्हणजे विशिष्ट उपासना आणि विचारसंप्रदाय यांचा अभिमान धरणारे जे परदेशांत संघ उत्पन्न झाले त्यांचा होय. हिंदुस्थानच्या एकराष्ट्रीयत्वास विघातक आणि देश्य संस्कृतीच्या उन्मूलनास बद्धपरिकर असेच हे संघ अथवा संप्रदाय होते; आणि या संप्रदायांच्या प्रसारानें हिंदुस्थानांतील राजकीय आणि सामाजिक प्रश्न जितके बिकट केले तितके दुसर्‍या कशानेंहि केले नाहींत. बराच काळ जाईपर्यंत हे परिणाम आपणांस जाचक होतील. आज दोन माणसें एकमेकांपासून दूर असण्याचें कारण एकास उपदेश करणारा या देशांत जन्मला तर दुसर्‍यास उपदेश करणारा त्या देशांत जन्मला हें होय. वरील कारण किंवा देवाविषयीं याची कल्पना अमुक होती आणि दुसर्‍याची तमुक होती हें कारण हीं दोन्हीं आजच्या जनतेस एकमेकांपासून दूर ठेवण्यास मात्र उपयोगी पडतात. ख्रिस्तीसंप्रदायाचा प्रसार हिंदुस्थानांत फार पूर्वींपासून झाला; आणि आजचे बरेचसे ख्रिस्ती हे परदेशीय आहेत किंवा स्वदेशीय आहेत हें सांगता येत नाहीं. अशा लोकांचा एक वर्ग म्हटला म्हणजे सीरीयन ख्रिस्त्यांचा होय. मलबारमध्यें या लोकांच्या पुढार्‍यांस स्वजनांवर अधिकार चालवण्यास मलयाधिपतींनीं ताम्रपट दिलेला आहे. आणि छत्री, मोर्चेलें व चवरी यांचाहि मान त्यांस मिळाला आहे असें सीरिअन सांगतात. सीरिअन यांनांच नेस्टोरिअन असेंहि म्हणण्याचा प्रचार आहे. तथापि आज त्रावणकोरमध्यें त्यांच्यांत अनेक पक्ष होऊन सीरिअन लोकांचे तीन चार तट पडले आहेत. ते रोमोसीरिअन, जॅकोबाइट सीरिअन, लंडन मिशनरी सोसायटी सीरिअन, खाल्डिअन सीरिअन हे होत. यांच्या मध्येंच अलीकडे ‘यूयोमयं’ नांवाचा एक संप्रदाय स्थापन झाला आहे.

अ‍ॅलेक्झांड्रियाचे पँटीन्युज् (Pantaenus) (इ. स. १८०) मिशनरी वगळल्यास, हिंदुस्थानांत येणारे ख्रिस्ती संप्रदायाचे अगदीं प्रथमचे प्रचारक म्हटले म्हणजे इराणांतून आलेले हे नेस्टोरियनच होत. जेसुइट जरी सोळाव्या शतकांत आले असले तरी केवळ संख्येकडे दृष्टी फेंकल्यास तेच जास्त यशस्वी होत असें वाटल्यांवाचून राहत नाहीं. यांनीं देशीभाषांतून विपुल वाङ्‌मय तयार केलें. त्यापैकीं बरेंचसें वाङ्‌मय कोणास समजणार नाहीं असें आहे, तथापि कांहीं महत्त्वाचें आहे. फादर स्टिफन्सचा ग्रंथ चांगल्या मराठी पुस्तकांत मोडेल. “एसुर्वेद” करणारा आणि आपणास रोमचा ब्राह्मण म्हणवून व संन्याशाचा पोषाख करून दुधावर राहून दर्शनास आलेल्या राजेलोकांनां बेपर्वाई दाखवून ज्यानें आपली छाप पाडली आणि  हजारों द्राविड ब्राह्मण आपल्याकडे ओढले तो डि नोबिली यांच्याच पैकीं होता.

 जेसुइटांच्या प्रामुख्याखालीं क्याथोलिक संप्रदायाचा प्रसार जारीनें सुरु होता तेव्हां इन्क्विझिशन नामक छळ करून मतप्रसार करणारी संस्था मोठी कार्यकर्ती बनली होती. तिनें अनेक अमानुष कृत्यें करून लोकांस बाटविलें. त्यांवर सारवासारव करण्याचा प्रयत्‍न क्याथोलिक एनसायक्लोपिडिआनें केला आहे. संप्रदायाच्या प्रसाराला राजसत्तेची जोड मिळाली तेव्हां संप्रदायाचें संवर्धन सहज झालें यांत आश्चर्य नाहीं.

संप्रदायप्रचाराचा उपयोग राजकीय दृष्ट्या होईल अशी समजूत असल्यामुळें कोणत्या तरी प्रकारानें पण संप्रदाय वाढविण्यास पोर्तुगीज सरकाची संमति असे. तथापि याचा उलट परिणाम झाला. इंग्रज मात्र त्यापासून धडा शिकले आणि त्यांनीं आपलें बस्तान नीट बसेपर्यंत मिशनांस थोडाबहुत विरोधच केला.

अठराव्या शतकांत प्रॉटेस्टंट पंथाचे ड्यानिश लोक त्रांक्वेबारच्या किनार्‍यावर संप्रदायप्रचारार्थ प्रथम आले. हा वेळपावेतों संप्रदायसंवर्धनाच्या दृष्टीनें ज्या महत्त्वाच्या गोष्टी घडल्या त्या म्हणजे (१) या देशांत ख्रिस्तीसंप्रदायाला शिरकाव मिळाला व (२) हिंदु विचाराला महंमदी संप्रदायानें जें एकेश्वरीपंथाचें वळण लावण्यास सुरुवात केली होती तीच पद्धत मिशनर्‍यांनीं चालू ठेवली, या होत. तुरळकपणें व अंधश्रद्धेनें संप्रदायप्रसार करावयाची चाल अगदीं निरूपयोगी आहे, तिच्या योगानें उच्च वर्गांत संप्रदायाचा अगर तत्त्वांचा प्रसार होत नाहीं, अशी पुष्कळांची खात्री झाली. आतां येथें शिक्षणविषयक प्रयत्‍नांस अधिक महत्त्व मिळत आहे. अमेरिकन लोकांनीं संप्रदायवर्धनाचा प्रयत्‍न १८१० पासून चालविला आहे. इंग्रज मिशनर्‍यांत कॅरेनें इकड येऊन कलकत्त्याच्या उत्तरेस १५ मैलांवर श्रीरामपुर येथें एक मिशन स्थापलें त्या वेळेपासून संप्रदायवर्धनापेक्षां पाश्चात्त्यसंस्कृतिप्रसाराकडेच विशेष लक्ष दिलें जात आहे. इ. स. १८३४ पर्यंत कॅरेनें व त्याच्या दोन मित्रानीं बायबलचें सात भाषांत व नव्या कराराचें ३० भाषांत भाषांतर केलें. ह्याशिवाय त्यांनीं वाङ्‌मय, शास्त्र वगैरेविषयीं फार परिश्रम केले आहेत. त्यांनीं कांहीं शेतकीविषयक संस्था, सेव्हिंग ब्यांकाहि स्थापन केल्या आणि सती, बालहत्या वगैरे दुष्ट चाली बंद करण्याकरितां फार परिश्रम घेतले. अर्थात् संप्रदायवर्धन हें ध्येय मिशनर्‍यांनीं टाकून दिलें नाहीं. मात्र संप्रदायवर्धनासाठीं उच्चवर्गाकडे न जातां अशिक्षित वर्गाकडे गेल्यानें अधिक फायदा होईल या भावनेनें तिकडे त्यांनीं मोर्चा वळविला. दक्षिणेंत त्रावणकोर येथें रिंगेलटाबे (Ringeltaube) नांवाच्या लंडन मिशनरी सोसायटीच्या एजंटनें विशेषतः ताडी काढणार्‍या लोकांत आपली चळवळ सुरू करून, इ. स. १८४० पर्यंत १५००० लोक ख्रिस्ती बनविले. तिनवेल्ली येथें र्‍हेनियस (Rhenius) नें चालविलेल्या चर्च मिशनरी सोसायटीस असेंच यश लाभलें. पूर्वकिनार्‍यावरील जगन्नाथपुरी या क्षेत्राची महती ऐकून, बॅप्टिस्ट लोकांनीं इ. स. १८२१ त ओरिसामध्यें एक मिशन स्थापलें. सिलोन, म्हैसुर व कावेरीखोरें या ठिकाणीं वेस्लियन मिशनरी होतेच; लंडन मिशनरी सोसाटीच्या शाखा, मद्रास, बेंगलोर व बेल्लारी या प्रमुख लष्करी ठाण्यांच्या ठिकाणीं होत्या; व अमेरिकन बोर्डाचे एजंट अहमदनगर व इतर महाराष्ट्रांतील भागांत होते. हिंदूंच्या आचारविचारांचें माहेरघर म्हणून नांवजलेल्या गंगायमुनांच्या प्रदेशांत बॅप्टिस्ट मिशनरीशिवाय चर्च मिशनरी सोसायटी, व लंडन मिशनरी सोसायटी या वावरत होत्या. ह्यांचा शिरकाव खुद्द काशींत झाला तो अनुक्रमें १८१६, १८१८ व १८२० या सालीं होय. स्कॉटिश प्रेसबिटेरियन पंथाचा मिशनरी अलेक्झंडर डफ यानें कलकत्त्यास मोठ्या प्रमाणावर शिक्षणाचें काम सुरू केलें; व बहुधा सर्व ठिकाणीं बायबलवरचे लहान ग्रंथ प्रसिद्ध करून त्यांचा प्रसार करणार्‍या संस्था उत्पन्न केल्या. ख्रिस्ती पीठांचे लहान मोठे धर्माध्यक्ष, उपाध्याय वगैरे अधिकारी संप्रदायप्रसारार्थ आलेली संधि केव्हांहि फुकट दवडीत नसत. इ. स. १८३० मध्यें १० संस्थांचे १४७ एजंट १०६ ठिकाणीं ख्रिस्ती संप्रदायाच्या प्रसाराच्या कामावर होते. १८३४ सालीं पश्चिम किनार्‍यावर बॅसेल मिशन, मदुरेस अमेरिकन मिशन व लुधियाना येथें अमेरिकन प्रेसबिटेरियन मिशन, अशा संस्था स्थापन झाल्या. या निरनिरळ्या संस्थांनां जीं कामें करावीं लागतात म्हणून त्या संस्था बोभाटा करितात तीं कामें येणें प्रमाणेः (१) “लोकांनां उपासनाविषयक व सामाजिक स्वातंत्र्य” देऊन व “विश्वबंधुत्वाची कल्पना” लोकांच्या मनावर बिंबवून जातिभेद व “ब्राह्मणांचा जुलुमी वरचढपणा” नाहींसा करणें; (२) लोकांची वर्तणूक सुधारून, त्यांचा दर्जा वाढविणें; (३) अनेकेश्वरी मूर्तिपूजा व तदानुषंगिक ‘अनितीचे’ प्रकार यांचें खंडन करणें; (४) विश्वाच्या ईश्वरमयत्वाची (Pantheistic) भावना नाहींशी करून तिच्या जागीं विश्वाचा कर्ता, आपण उत्पन्न केलेल्या जीवांची व्यक्तिशः काळजी करणारा आणि विशेष प्रकारच्या अलौकिक मार्गानें मनुष्याला साक्षात्कार देणारा असा प्रकारच्या ईश्वराविषयीं आस्तिक्याची भावना उत्पन्न करणें; (५) स्त्रियांची व परायांसारख्या अस्पृश्य जातींच्या लोकांची उन्नति करणें वरील गोष्टी हिंदूंच्या बाबतींत कराव्या लागतात व त्याशिवाय सहा कोटी महंमदीयांनां वळविण्यासाठीं योजावे लागणारे उपाय निराळेच. अशा बाबतींत कार्य करण्याच्या प्रमुख दिशा खालीलप्रमाणें होत; व त्या दिशांनीं आजपर्यंत हें कार्य होत आलेलें आहे. मोठाल्या शहरांतून देशीभाषेंतून उपदेश करणें व खेडेगांवांतून फिरते उपदेशक ह्या कामीं नेमणें हा त्यांचा स्वाभाविक कार्यक्रम आहे. यूरोपियन न अमेरिकन प्रचारकांच्या देखरेखीखालीं देशी ख्रिस्ति उपदेशकांनीं या कामीं चांगले यश संपादलें आहे असें म्हणतात. उपदेशाशिवाय औषधोपचाराच्या कामाकरितां देखील मिशनर्‍यांनीं संस्था काढल्या आहेत. अशा संस्थांनीं, मिशनरी लोकांविषयीं सर्वसाधरण अनुकुल ग्रह उत्पन्न होण्याला बरीच मदत झाली आहे. अनाथगृहें काढणें या बाबतींत रोमन कॅथोलिक पंथाच्या मिशनर्‍यांनीं पुढाकार घेतला आहे; कां कीं रोमन कॅथोलिक यांची सामाजिक भावना तीव्र असल्यामुळें नवीन इसम सामाजिक दृष्टीनें रोमन कॅथोलिक बनण्यापूर्वीं त्याचा यूरोपीय आचारांत पुष्कळच दूरवर प्रवेश व्हावा लागतो आणि यासाठीं नवीनास बरींच आचारपुटें द्यावीं लागतात; व अशीं पुटें देण्यास जरूर ती सवड मिळावी म्हणून ‘गृहा’ सारख्या संस्थेची अवश्यकता असते. मिशनांच्या नेतृत्वाखालीं देशी भाषांच्या शाळा देखील निघाल्या आहेत. या बाबतींत अमेरिकन बोर्डाचें मदुरा येथलें मिशन नमुनेदार आहे. इंग्रजी शिक्षण देण्याची व्यवस्था करणें या बाबतींत मिशनरी संस्थांनीं सरकारच्या प्रयत्‍नाला बरीच जोड दिलेली आहे; यांचीं ढळढळीत उदाहरणें म्हणजे मद्रासचें ख्रिश्चन कॉलेज, कलकत्त्याचें जनरल असेंब्ली ऑफ स्कॉटलंडस् इन्सिटट्यूशन, मुंबईचें विल्सन कॉलेज, त्रिचनापल्लीचें सेंट जोसेफस् कॉलेज आणि नागपूरचें हिस्लाप कॉलेज हीं होत. कांहीं कांहीं ठिकाणीं याच्याहि पुढचें काम म्हणजे सुशिक्षित हिंदूंनां व्याख्यानें व संभाषणें यांच्या द्वारें आपल्या संप्रदायाकडे वळविणें, या कार्यार्थ प्रयत्‍न होतोच. तथापि त्यांत किती येतें हा प्रश्न आहे. स्त्रीशिक्षण व जनान्यांतील थोर स्त्रियांनां मिशनरी स्त्रियांचें हितकर्ते म्हणून मिरवूं पहातात. त्याप्रमाणेंच, प्रचारासाठीं ज्याअर्थीं त्यांनीं सुशिक्षित समाजाकडे दुर्लक्ष करून अज्ञानी मंडळीस पकडण्याचा प्रयत्‍न चालविला आहे त्याअर्थीं त्यांस मागासलेल्यांचें, अस्पृष्टांचें आणि वन्यांचें पुढारीपण करण्याची जरूरी भासते हें उघड आहे. ब्राह्मणब्राह्मणेंतरांत कलब लावण्यांत यांची खालच्या वर्गाविषयींची कळकळ बरीच कामास येते. या बाबतींत तेलगू भाषा बोलणार्‍या प्रदेशांतल्या अमेरिकन बॅप्टिस्टांनां मलजातीस ख्रिस्ती करण्यांत व लंडन मिशनरी सोसायटीच्या प्रचारकांस मादिगांनां आपल्या संप्रदायांत ओढण्यांत चांगलेंच यश आलें आहे. कारण पुष्कळ तेलगु लोक ख्रिस्ती झालेले दृष्टीस पडतात. वर सांगितलेल्या खटपटींखेरीज, छोटानागपुरचे कोल, संताळ व बंगालच्या पूर्वेकडील खासिया पर्वतांतील वन्य लोक अशा जातींतून प्रचारकसंस्था स्थापणें, ख्रिस्ती देवालयांची काळजी घेणें, हीं जुजबी कामें मिशनरी करीत असतात.

ख्रिस्ती मिशनरी स्वजनांत पैसे मिळविण्यासाठीं आपण लोकोद्धाराचीं काय कामें करतों याचें रसभरित वर्णन करितात तेव्हां हिंदूंच्या बायकांची कींव व खालच्या वर्गाची कळकळ दाखवून ब्राह्मणांच्या जुलमांचा काल्पिनक हिशोब सांगतात, व आपण या बाबतींत कसा काय प्रयत्‍न करीत आहों याचा हिशोब देतात आणि धार्मिक, बौद्धिक, औद्योगिक व राजकीय बाबतींत मोठमोठे फरक ब्रिटिश सरकार व ख्रिस्ती मिशनरी यांच्या संयुक्त प्रयत्‍नानेंच झालेले आहेत असें भासवितात. ब्रह्मसमाज व आर्यसमाज यांच्या वाढीचें श्रेय ते स्वतःसच घेतात. पुराणमतवादी हिंदू लोक हिंदू कथापुराणांचीं बाडें संशोधक दृष्टीनें चाळून त्यांतील अद्‍भुत कथांतील रूपाकात्मक अर्थ शोधतात आणि धर्मजागृति करण्याचा जो थोडाफार प्रयत्‍न करितात त्यांचेंहि श्रेय मिशनरीच घेतात.फारच थोडे मुसुलमान ख्रिस्ती झालेले आहेत व जे झाले आहेत ते तरी सुशिक्षितांपैकींच. तथापि त्या समाजांतील तरुण सुशिक्षित लोकांची प्रवृत्ति स्वतंत्र विचाराकडे जास्त दिसून येते हा देखील आमच्याच प्रयत्‍नांचा परिणाम आहे असें ते सांगतात.

हिंदुस्थानांतील मिशनरी लोकांच्या मतें त्यांच्या कामांत येणारे विशिष्ट अडथळे म्हणजे खालील होतः (१) परकीयांच्या सर्व गोष्टींविषयीं लोकांत असलेला द्वेष. (२) हिंदू लोकांची बुद्धि प्रयोग व अनुभव यांकडे विशेष पाहणारी नसून तिला कल्पनेचेंच विशेष वेड आहे. या बुद्धीला ऐतिहासिक पुराव्याचेंच विशेष वेड आहे. या बुद्धीला ऐतिहासिक पुराव्याचें महत्त्व वाटत नाहीं. (३) “प्रथम खड्ड्यांत पडण्याच्या तयारीचा अभाव;” ज्या हिंदुस्थानसारख्या देशांत अविभक्त कुटुंबाची पद्धत सार्वत्रिक व प्रबळ असते त्या ठिकाणीं व्यक्तिस्वातंत्र्य व इच्छास्वातंत्र्य यांविषयींची आस्था देखील बेताचीच असते. (४) स्त्रियांचें अज्ञान व रूढिप्रियता. (५) पापाबद्दलची “अपूर्ण” कल्पना. (६) ख्रिस्ती उपदेशाला न जुळणारें असें तत्त्वज्ञान व पाश्चात्य भौतिकवाद यांचा हिंदुस्थानांत प्रवेश. या वर दिलेल्या {kosh En. Bri, Article on ‘Missions.}*{/kosh}  कारणांचा अर्थ देखील लावण्याची जबाबदारी आम्ही घेत नाहीं. मिशनरी लोकांच्या कार्याच्या दिशा नेहमींच शहाणपणानें ठरविल्या जात नाहींत; उलट कांहीं वेळां त्यांच्या ‘प्रभूनें’ “मी नाशाकरितां आलो नसून पूर्णता करण्यासाठीं आलों” या आंखून दिलेल्या मार्गानें ते गेलेले नाहींत असें स्पष्ट दिसतें. तथापि वरील अडथळे आले असतां देखील ह्या प्रचारक मंडळींनीं चिरस्थायी व वाढतें यश मिळवून ठेवलें आहे.