प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ४ थें.
हिंदुस्थान, सिलोन आणि ब्रह्मदेश.

ब्रह्मदेशाच्या इतिहासाचे घटकावयव.— ब्रह्मदेशाच्या इतिहासांतील उदय आणि अस्त पावलेलीं राजघराणीं दुर्लक्षिलीं तरी तेथील मनुष्यसमूहाची घटना आपणांस लक्षांत घेतली पाहिजे. राजघराण्याचा इतिहास किंवा संस्थानाच्या सरहद्दींचा इतिहास म्हणजे राष्ट्राचा इतिहास नव्हे. राष्ट्राचा इतिहास म्हणजे तेथील रक्ताचा इतिहास होय किंवा राष्ट्रांत आयुष्यक्रमाच्या सादृश्यासादृश्यामुळें जे समुच्चय बनतात त्यांच्या विस्तारसंकोचाचा इतिहास होय. ब्रह्मदेशाचा इतिहास या दृष्टीनें सांगवायाचा म्हणजे या भूमीवर कोणकोणते लोक दिसूं लागले, त्यांत शासनप्रामुख्य कोणी मिळविलें, निरनिराळ्या लोकांनीं भरलेल्या या प्रदेशास राष्ट्रीयत्व अथवा समाजवैशिष्ट्य कसें आलें, त्या देशांत किती भाषा बोलणारे लोक मिसळले, भारतीय जनतेचा त्यांच्या लोकसमूहाशीं संबंध काय इत्यादि गोष्टींचें विवरण करावयाचें. या गोष्टींची ओळख होण्यास उत्तम साधन म्हणजे तेथील जाती व तेथें प्रचलित असलेल्या भाषा व त्या भाषांचा इतिहास आणि त्यांचा भारतीय किंवा इतर भाषांशीं संबंध यांचें ज्ञान हें होय.

तेथील प्रमुख भाषा व त्या भाषांतील महत्त्वाचें वाङ्‌मय यांची थोडक्यांत पुढें माहिती दिली आहे तीवरून ब्रह्मदेश व भरतखंड यांच्यामध्यें प्राचीन कालापासून असलेल्या संबंधाचें कांहींसें अनुमान करितां येईल.

आज आपण ब्रह्मदेशाच्या नकाशाकडे पाहिलें तर भाषांचे पट्टे तेथें अनेक दिसून येतात. देशांत लोकवस्ती थोडी पण भाषांचे प्रकार मात्र पुष्कळ. चिनी सरहद्द जेथें ब्रह्मदेशास भिडते तेथें काचिन जात व तिची विशिष्ट भाषा दृष्टीस पडते. हिंदुस्थानाकडून निराळ्याच भाषांची पाचर देशांत घुसलेली दिसते आणि मार्ताबानच्या आखाताच्या आसपास मोनख्भेर, पेगू अगर तलैंग भाषेचें प्रामुख्य दिसून येतें. उत्तरेकडून आणि पूर्वेकडून शान भाषा चिकटलेली दिसते तर तलैंगच्या क्षेत्राभोंवतालीं करेण भाषेंचें प्रामुख्य दिसतें. केवळ भाषेच्या दृष्टीनें राष्ट्रें मोजावयाचीं व त्यांचें नामकरण करावयाचें तर आपणांस निरनिराळ्या लोकसमूहांस ब्रह्मी, करेण, तलैंग, शान, काचिन, व कुकिचिन अशीं नांवें देतां येतील. या निरनिराळ्या भाषा बोलणार्‍यांची राजकीय व आर्थिक खळबळ आपणांस या प्रदेशांत नजरेस येते. करेण लोकांनीं दक्षिणकिनारा व्यापिला, परंतु त्यांच्यापासून बराचसा अंश तलैंग लोकांनीं जिंकून घेतला. पण त्या तलैंग लोकांस तेथें स्थाइक होण्यास स्वतःची भाषा सोडून एका निराळ्याच भाषेचा आश्रय करावा लागण्याइतकें स्वत्व सोडावें लागलें. इरावतीच्या उत्तर भागापासून तों बंगालच्या उपसागराच्या पूर्वकिनार्‍यापर्यंत ब्रह्मी भाषेंनें आपलें स्थान कायम राखिलें तर त्यांत हिंदुस्थानांतील आराकानी वगैरे लोकांनीं आपल्या लोकसमूहाची पाचर घातली.

भाषा कायम राहून तिला परकीय संस्कार झाला तर ती भाषा बोलणारांच्या राष्ट्राचाच सामाजिक व आर्थिक विकास झाला असें होतें; भाषेस संस्कार करणारे नवीन आलेले परकीय लोक देश्य समाजाचेच पुढारी व हितकर्ते बनतात. असो.

ब्रह्मदेशाची सोंवळ्या ओंवळ्याच्या कल्पनांपासून अलिप्‍तता, ब्रह्मी स्त्रियांची वाटेल त्याजबरोबर लग्न करण्याची प्रवृत्ति, इत्यादि गोष्टींवरून तेथें राष्टीकरण फार सोपें असावें अशी आपणांस कल्पना येईल परंतु या बाबतींत आपली निराशा होते. निरनिराळ्या भाषा बोलणारे लहान लहान पृथक् लोकसमूह ब्रह्मदेशांत जेवढे दिसतात तेवढे हिंदुस्थानांत दिसत नाहींत. ब्रह्मदेशाच्या डोंगराळपणामुळें लोकांचें पृथक्त्व अधिक झालें असावें. तसेंच चीन, तिबेट, सयाम आणि हिंदुस्थान येथील निरनिराळे लोक ब्रह्मदेशांत आल्यानें त्यांचें राष्ट्रीकरण कठिण झालें असावें किंवा निरनिराळ्या लहानलहान राष्ट्रकांचें वैशिष्ट्य नाहींसें करून आत्मसंस्कृतिमूलक एकत्व सर्व प्रदेशावर लादण्यास जबरदस्त डोक्याचा वर्ग तेथें निर्माण झाला नसावा अथवा झाला असल्यास त्यास आपलें कार्य पूर्ण करण्यास अवसर सांपडला नसावा. कांहीं असो, आज या प्रदेशांतील अनेक राष्ट्रकांस एकत्र करण्याच्या कामांत विघात आणणारें भाषांचें विविधत्व तेथें फार प्रचुर दिसतें यांत शंका नाहीं.

हें विविधत्व भाषा व जाती यांच्या खालीं दिलेल्या कोष्टकावरून लक्षांत येईल.

एकंदर जनसमूहाचें जगांतील एकंदर मानवजातीशीं नातें काय आहे हें भाषांच्या सादृश्यासादृश्यावरून ठरविलें पाहिजे. आज त्यासंबंधानें निश्चायात्मक विधान करतां येत नाहीं. ब्रह्मदेशाच्या भाषा आणि त्यांचें वर्गीकरण वारंवार होऊन शेवटीं भाषाविषयक पाहणी (Linguistic Survey) वरून जें वर्गीकरण ठरविण्यांत आलें आहे तें येथें देतों.
Khand1 0009

ह्या स्थूल वर्गीकरणावरून देशांतील एकंदर जातिभेदाची आणि जातिमूलक भाषाभेदाची बरोबर कल्पना येणार नाहीं. एका ठिकाणचे आणि एक भाषा बोलणारे लोक वियुक्त झाले म्हणजे त्यांच्या निरनिराळ्या राष्ट्रस्वरूपी जाती बनतात. हेच वियुक्त झालेले सदृश लोक त्यांच्यांतीलच एका मोठ्या  संघाच्या, जातीच्या किंवा राष्ट्राच्या तावडींत आले आणि त्यांच्यामध्यें दळणवळण वाढलें म्हणजे त्यांच्या उपभाषांचें वियुक्तत्व नाहींसें होऊन त्यांचें पुन्हा मोठें राष्ट्र बनण्यास सुरूवात होते. कोणत्याहि भाषेस जितका संस्कार अधिक तितकें तिंचें मर्त्यत्व कमी, आणि ती बोलणार्‍यांचा मोठ्या समूहांत समावेश होऊन त्यांचें विशिष्टत्व नाहींसें होण्याचा संभव कमी. पण लहान लहान टोळ्यांस संस्कार झाला नाहीं तर कालांतरानें अधिक संस्कार पावलेल्या दुसर्‍या भगिनीरूपी उपभाषा बोलणार्‍या शेजारच्या एखाद्या समूहांत त्यांचा सहज अंतर्भाव होतो. यासाठीं निरनिराळ्या जाती आणि त्यांच्या उपभाषा यांच्या वृद्धिसंकोचाकडे पाहिलें पाहिजे. जाती आपली विशिष्ट उपभाषा टाकून सर्वसमान्य भाषेचा आश्रय कितपत करतात हें दाखविण्यासाठीं जातींची लोकसंख्या आणि जातीची भाषा बोलणारांची संख्या यांची तुलना केली पाहीजे.

  ब्रह्मदेशांतील जातींची संख्या व त्या जातींची भाषा बोलणारांची संख्या दाखविणारें कोष्टक.

संख्यामहत्त्वाशिवाय ज्या दुसर्‍या मुद्याकडे लक्ष द्यावयाचें तो मुद्दा म्हटला म्हणजे समुच्चयाचें ऐतिहासिक महत्त्व हा होय. हें महत्त्व मोजतांना जातीचें एकंदर कार्य लक्षांत घेतलें पाहिजे; जातीचा अधिकार किती प्रदेशावर होता, तिचें वाङ्‌मय किती आहे, त्य जातीच्या उत्कर्षाबरोबर कोणत्या कला कितपत वृद्धिंगत झाल्या हें मोजलें पाहिजे. अशी मोजणी करतां ब्रह्मी जातीस आणि ब्रह्मी भाषेसच अधिक ऐतिहासिक महत्त्व आहे हें दृष्टीस पडतें.  ब्रह्मी भाषा ब्रह्मदेशांतील इतर भाषांपेक्षां अधिक सुसंस्कृत आहे. त्यामुळें भारतीय संस्कृतीचा ठसा ब्रह्मी जातीवर इतर जातींपेक्षां अधिक आहे. शान, करेण, काचिन इत्यादि जाती देखील बौद्ध आहेत, पण त्यांच्या उपासनापद्धतीस ज्ञानाचा जोर नाहीं, यामुळेंच करेणसारख्या लोकांस ख्रिस्ती करण्यास मिशनरी मंडळीस बरेंच सोपें गेलें.  आराकानी, काचिन आणि करेण यांचीहि सविस्तर माहिती आपणांस अवश्य आहे. आतां प्रत्येक महत्त्वाच्या जातीकडे वळूं.