प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण ४ थें.
हिंदुस्थान, सिलोन आणि ब्रह्मदेश.
ब्रह्मदेश — अगदीं जवळचा आणि आधुनिक व प्राचीन भारतीय लोकांनीं भरलेला व कित्येक शतकें ब्राह्मणानुयायी हिंदूंच्या शासनसंस्थांनीं शासित झालेला सिंहल देश सोडून आतां आपण पूर्वेस ब्रह्मदेशाकडे जाऊं. ब्रह्मदेश हा आज बर्याच हिंदूंचे आश्रयस्थान झाला आहे, तथापि ब्रह्मदेशांतील हिंदूंची वस्ती आजकालची नाहीं. अनेक शतकांपूर्वीं येथील व्यापारी आणि साहसी लोक ब्रह्मदेशास जाऊन त्यांनीं तेथील लोकांस सुसंस्कृत बनविलें. भारतांतून प्राचीन कालीं देशाच्या उत्तरेकडून आसामच्या मार्गानें आणि दक्षिणेकडून पेगूच्या मार्गानें असे दोन प्रवाह ब्रह्मदेशांत आले असें तेथील इतिहासग्रंथ सांगतात. पेगूंत वस्ती करणारे तलैंग लोक हे मूळचे तेलंगी, परंतु त्यांची भाषा लवकरच नष्ट होऊन एक निराळीच भाषा तलैंग या नांवानें लोकपरिचित झाली. भाषांचा अभ्यास लोकांच्या स्थानांतराच्या इतिहासास पोषक आहे, आणि यासाठीं भाषाविषयक विवेचन आणि तन्मूलक इतिहास पुढें येईलच. येथें सामान्यतः इतकेंच सांगतो कीं, ब्रह्मदेशांतील भाषा संस्कृत भाषेशीं द्रविडी भाषांप्रमाणेंच असंबद्ध असून त्यांवर संस्कृत भाषेचा संस्कार मात्र झाला आहे. म्हणजे ब्रह्मी जनता मूळची भिन्नजातीय असून संस्कृतीनें मात्र आपणांस स्वकीय झाली आहे.
हिंदुस्थान व ब्रह्मदेश यांची सरहद्द आज जी आहे तीच पूर्वीं नव्हती. आसाम, आराकान आणि तेनासरीम या तीन प्रांतांचा संबंध ब्रह्मदेशाशीं फार जुना आहे; आणि कांहीं बौद्धिक परिस्थिति लक्षांत घेतां ब्रह्मदेश आणि आराकान इत्यादि भाग हे एकच स्वरूपाचे होते असें म्हणण्यास हरकत नाहीं. जेथें जेथें ब्राह्मणांचें महत्त्व नसून क्षत्रियांचें व त्यांच्या आश्रयानें बौद्धांचें महत्त्व असेल तेथें तेथें इतिहासविषयक लेखनाकडे प्रवृत्ति अधिक दिसून येईल असें विधान ब्रह्मदेशाच्या इतिहासांत फायर (Phayre) यानें केलें आहे, तें सर्वांशीं खरें नसलें तरी अशा तर्हेचें विधान करण्यास एखाद्या गैरसावध लेखकास स्फर्ति होईल इतकें सत्य त्याच्या मुळाशीं आहे हें खचित. आसाम, आराकान आणि ब्रह्मदेश येथील राजघराणीं बौद्ध होतीं आणि त्यांनीं इतिहासलेखनास उत्तेजन देण्याच्या कामीं बरीच खटपट केली. यामुळें या तिन्ही ठिकाणीं कांहीं ऐतिहासिक वाङ्मय आहे. तें पद्धतशीर रीतीनें हुडकून काढण्याचा व चाळण्याचा प्रयत्न अजून झालेला नाहीं. मलबार प्रांतांत आणि ब्रह्मदेशांत वास्तुविषयक कांहीं सादृश्यें सांपडतात; आणि तीं तिकडून इकडे आलीं कीं इकडून तिकडे गेलीं याविषयीं संशोधकांमध्यें तर्क वितर्क चालू आहेत. ब्रह्मदेशाशीं दळणवळण पूर्वापार आहे ही गोष्ट खरी, तथापि आज ब्रह्मदेशाकडे जितकीं माणसें जातात तितकीं पूर्वीं जात असल्याचें दिसत नाहीं. सिहलद्वीप ज्याप्रमाणें रामायण, रत्नावली, पद्मिनी इत्यादि काव्यनाटकादि ग्रंथांनीं व स्त्रियांच्या मनोहर कथांनीं भारतीय अंतःकरणाशीं बद्ध झालें आहे त्याप्रमाणें ब्रह्मदेश झालेला नाहीं; आणि सर्वसामान्य वाङ्मयाच्य द्वारा तो आमच्याशीं बद्ध झाला नसल्यामुळें आमच्या देशास चिकटलेला असूनहि तो आह्मांस दूरचा वाटतो. ब्रह्मदेशाचा पदच्युत राजा थीबा रत्नागिरि येथें आणून ठेवला तो तेथें मरेपर्यंत होता, तरी त्याच्याविषयीं अगर त्याच्या देशाविषयीं आपल्या देशांत ग्रंथरूपानें जिज्ञासा फारशी व्यक्त झाली नाहीं. असो.