प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ४ थें.
हिंदुस्थान, सिलोन आणि ब्रह्मदेश.

तलैंग व लाओ वगैरे.- पूर्वद्वीपकल्पाच्या अन्तर्भागांतील लिपींची उत्पत्ति तलैंग लिपी पासून झालेली आहे. लाओ भाषेंत  ही गोष्ट स्पष्ट दिसते; कारण त्या भाषेंत व्यंजनोच्चार दर्शविणारीं अशीं दोन चिन्हें आहेत. 'गा' या अक्षराबद्दल तलैंग भाषेंत 'के' हें अक्षर येतें; व 'बा' याचा उच्चार 'पे' असा होतो. अहोम, खाम्ती व श्यान या लिपी ब्रह्मी लिपीपासून झालेल्या नाहींत; यांची उत्पत्ति तलैंग लिपीपासूनच असली पाहिजे. कारण ऑ हा स्वरसंयोग तलैंगभाषेप्रमाणेंच व्यंजनावर उजव्या बाजूकडे जोडरेघ काढून दर्शवितात; परंतु ब्रह्मी भाषेंत अशा प्रकारचें चिन्ह नाहीं. अशाच प्रकारची जोडरेघ (-) चवथ्या व पांचव्या शतकांतील संस्कृत लेखांत आढळते. मलाकांतील लेखांत संस्कृतचें मिश्रण आहे; परंतु अशा प्रकारचें मिश्रण सिलोनमधील लेखांमध्यें आढळत नाहीं. मलकाच्या प्रत्येक लेखांत एका ओळीमध्यें तेच ते शब्द आले आहेत. प्राचीन लिपीमध्यें ज्या ठिकाणीं शेवटीं 'म' हें व्यंजन येतें, त्या ठिकाणीं पुढच्या शब्दाचें शेवटचें व्यंजन खालीं लिहून शेवटीं संस्कृत अनुस्वार लिहितात. शब्दाच्या शेवटचा मूळचा स्वर ज्या ओळींत नाहींसा होतो, ती ओळ संस्कृतप्रमाणें व्यंजनाच्या खालीं लिहितात. तलैंग भाषेंत हल्लीं त्याच चिन्हाचा उपयोग केला जातो; फक्त तें चिन्ह अक्षराच्या वरच्या भागीं करतात.

पूर्वकिनार्‍यावरील लिपीची सिंहलीपासून उत्पत्ति झाली असावी. कांबोजी लोकांची लिपी पश्चिमेकडील लिपीपेक्षां अगदीं भिन्न आहे; परंतु सिंहली लिपीशीं तिचें निकट साम्य आहे. सयामी लिपी गेल्या चार पांच शतकांत कांबोजी लिपीच्या धर्तीवर बनवली गेली. पूर्वींच्या सिंहली भाषेचे सात घटकावयव होते. परंतु हल्लींची सयामी भाषा फारच सोपी आहे. सयामी लिपीचे फारच थोडे घटकावयव आहेत.

या वरील विवेचनावरून असा सिद्धान्त निघतो कीं सयाम व कांबोज येथील लोकांनीं आपला धर्म व वाङ्‌मय सिलोनपासून घेतलें; व पुरातन कलिंगराज्यापासून हिंदुस्थानाच्या पश्चिम किनार्‍याकडील लोकांस शिक्षण मिळालें.

सदरहू डॉ. मेसन यांच्या निबंधाचें व इतर ग्रंथांचे अवलोकन करून प्रो. के. अमृतराव, मद्रासच्या विश्वविद्यालयांतील द्राविड शब्दव्युत्पत्तिशास्त्राचे अध्यापक, हे तलैंग भाषेसंबंधानें लिहितात :— "अमेरिकन ओरिएंटल सोसायटीचिया १८५४ सालच्या एका वृत्तपत्रिकेंत तलैंग भाषेविषयीं कांहीं मनोरंजक माहिती प्रसिद्ध झाली आहे (पान २७९ पहा). हा निबंध रेव्हरंड फ्रान्सिस मेसन नांवाच्या ब्रह्मदेशांतील एका अमेरिकन पाद्र्यानें १८५३ सालच्या मे महिन्यांत त्या मंडळासमोर वाचला होता. तेनासरिम प्रांताच्या दक्षिणेस सुमारें दोनशें मैलांवर असलेल्या मलाक्कामध्यें जे  पाली व संस्कृत शिलालेख सांपडले आहेत, त्यांवरून पाद्रीमजकुराचें असें मत झालेलें दिसतें कीं, पेगूमध्यें हिंदू लोकांची वसाहत बरीच अगोदर झाली असली पाहिजे; व हे आरंभीं आलेले हिंदू लोक त्या देशांतील कांहीं स्थानिक राष्ट्रजातींत मिसळून हल्लींचा तलैंग लोकांचा समाज बनला असावा. जिला ब्रह्मी लोक थोदुन असें म्हणतात अशा एका स्थानिक राष्ट्रजातीचा ह्या तलैंग लोकांतच अंतर्भाव होऊन ती विलुप्‍त झाली आहे असें कॅप्टन फायर यानें आराकानाच्या इतिहासांत म्हटलें आहे."

प्रो. के अमृतराव यांच्या माहितीवरून असें दिसतें की दक्षिण हिंदुस्थानांत प्राचीन तलैंग लिखाणांचा अभ्यास अद्याप कोणाकडूनहि झालेला नाहीं.

रंगून येथें १८७९-८० सालीं प्रसिद्ध झालेल्या 'ब्रिटिश बर्मा गॅझेटिअरच्या' दुसर्‍या खंडांतहि तलैंग भाषेविषयीं कांहीं संक्षिप्‍त माहिती दिलेली आढळून येते. ती माहिती तेथें 'अमेरिकन ओरिएंटल सोसायटीच्या जर्नलमधूनच' घेतलेली आहे.

मेसनच्या तलैंग भाषेवरील निबंधांत थोडेसे तलैंग भाषेंतील शब्द व त्या भाषेच्या व्याकरणांतील कांहीं विशेष लक्षणें दिलीं आहेत. तलैंग व तेलुगु ह्या दोन भाषांचा एकमेकींशीं कोणत्याहि प्रकारचा संबंध असेल असें दिसत नाहीं. मोन (तलैंग) शब्दांसारखेच शब्द कोल, गोंड, कुरुख (कोरकु) आणि माल्टो भाषांत आहेत असें दाखविण्याचा मेसननें प्रयत्‍न केला आहे. त्यानें दिलेली शब्दांची यादी फ्रेंच 'रिह्वयू दि लिंग्विस्टिक' च्या १७ व्या खंडांतहि दिली आहे (पान १६७ व पुढील पानें). मेसन म्हणतो कीं, ह्या भाषांतील प्राथमिक अंक, पुरुषवाचक सर्वनामें शरिराच्या अवयवांचे वाचक शब्द, निसर्गांतील कित्येक पदार्थांची नांवें व थोडीशीं क्रियापदें हीं सर्व निःसंशय एकाच मुळापासून निघाली असलीं पाहिजेत व ज्यांचें परस्पराशीं जरा दूरचें सादृश्य आहे असें दुसरे शब्द बहुधा एकाच धातूपासून बनले असावे.