प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण ४ थें.
हिंदुस्थान, सिलोन आणि ब्रह्मदेश.
तलैंग व मलाकी :— बौद्ध ग्रंथांचा प्रवेश होण्यापूर्वीं तलैंग भाषेचा लेखनाकडे उपयोग होत नसे; नाहींतर, पूर्वींची बरीच माहिती मिळाली असती. गौतम व अशोक यांचे प्रचारक संप्रदायप्रसारार्थ फिरत असत त्यावेळीं तलैंग लोक मार्तबानच्या आखाताशीं रहात होते. थादुंग ही त्यांची राजधानी होती. हल्लींची त्यांची लिपी ख्रिस्त शकापूर्वीं तीनशें वर्षें प्रचारांत असलेल्या लिपीवरून निघाली असावी. अमरावती येथील लेखांवरून या जुन्या लिपीचें तलैंग लिपीशीं असलेले सादृश्य दिसून येतें. मलकांतील तोकून येथील लेखांतील लिपीचें अमरावती येथील लेखांच्या लिपीशीं साम्य आहे. मलाकांतील केद्दाजवळ सांपडलेल्या लेखाची लिपीहि तलैंग लिपीशीं जुळतें. यावरून मलाकांतील लोक व तलैंग लोक यांचा पूर्वीं संबंध असावा असें वाटतें. मलाकाच्या लेखांतील अक्षरें नवव्या व दहाव्या शतकांतील कुतिलाच्या अक्षरांसारखीं आहेत.
क् हें अक्षर पहिल्यानें आडवें लिहीत असत. ज्या वेळीं अलाहाबाद येथील स्तंभावर लेख लिहीला गेला त्यावेळीं आडव्या ओळीला थोडें खालच्या बाजूला वळण दिलें गेलें. व केद्दा लेखांत त्या वळणास अर्धवर्तुळाचा आकार मिळाला. न् बद्दल पूर्वीं लंबक काढीत असत परंतु गया लिपींत त्याबद्दल लंबक व वांक काढूं लागले. मलाका लेखांत हें अक्षर असेंच लिहिलें आहे. हल्लींच्या तलैंग भाषेंत हें अक्षर ओळीच्या खालीं लिहितात. अस्सल पाली भाषा यानंतर झाली असली पाहिजे; कारण या अक्षराला वरील भागीं दुहेरी ओळ जोडतात.